२८. महाराष्ट्रातील किल्ले- ३
* महाराष्ट्रात असलेले किल्ले-
२. राजगड-
'राजगड' हा सुद्धा शिवाजी महाराजांचा एक महत्वपूर्ण किल्ला होता. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची पहिली राजधानी होती. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली होती. इ.स. १६४५ ते १६७२ जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काही काळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला ‘राजगड’होता. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किलोमीटर अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. त्याचबरोबर, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. म्हणजे हे दोन्ही किल्ले अतिशय महत्वाचे होते. मराठेशाहीची राजधानी म्हणून २५ वर्षाचा काळ इथे गेला. याव्यतिरिक्त ह्या किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत. वेळवंड,मळे,भूतुंडे,पाल खुर्द,वाजेघर,गुंजवणे,फणसी,या मार्गाने गडावर जाता येते. काही पाऊलवाटा वापरात नाहीत. दाटझाडी आणि अतिशय अवघड चढ-उतारांमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत.
अतिशय दुर्गम किल्ला म्हणून आजही जागतिक स्तरावर ‘राजगड' किल्ल्याचा गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू अतिशय सुंदर आणि पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अक्राळ विक्राळ पण तरीही सुंदर अशा रूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असा हा किल्ला आहे. पाऊसामध्ये ह्या किल्ल्याच रूप अधिकच सुंदर आणि विलोभनिय असे दिसते. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जो तह केला होता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्या वेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्ध किल्ला. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. गडाकडे येण्याचे मुख्य रस्ते म्हणजे पाली गावातून येणारा पाली दरवाजा- हे पाली अष्टविनायकातील नव्हे- आणि गुंजवणे गावातून येणारा गुंजवणे दरवाजा. गुंजवणे दरवाजा आता वापरात नाही पण गुंजवणे गावातून एक रस्ता चोर दरवाज्याने येतो तोच प्रामुख्याने वापरला जातो त्या दरवाजाने पद्मावती माचीवर २ तासात पोहोचता येते. चोर दरवाज्याने प्रवेश केल्यास उजव्या बाजूला पद्मावती तलाव असून जरा पुढे गेल्यास पद्मावती देवीचे देऊळ आणि राणी सईबाईंची समाधी असून बाजूला पिण्याच्या पाण्याच्या २ विहिरी तसेच शंकराचे देऊळ आहे. पाली दरवाज्यातून येणारी वाट तशी सोपी असून या मार्गाला राजमार्ग म्हणून ओळखले जाते. या दरवाज्याच्या रचनेत, पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस तटबंदी आणि मध्ये दरवाजा, बाजूला दोन बुरुज आहेत त्यातून आत आल्यास डाव्या बाजूला देवड्या व पुन्हा पायऱ्या अशी रचना आहे.
* राजगडावर पाहता येण्यासारख्या जागा-
* राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. १. पद्मावती माची, २. संजीवनी माची, ३. सुवेळा माची
१. पद्मावती माची- यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
२. संजीवनी माची
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली गेली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालगत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे .
३. सुवेळा माची- पद्मावती तळ्याच्या बाजूने वरती गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिरे दिसते. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे जातो. एक रस्ता डावीकडून सुवेळा माचीकडे जातो आणि तिसरा रस्ता उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोड उजवीकडे गेल्यावर पाली दरवाजा लागतो. गडावर यायला ही वाट तुलनेने सोपी आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण आहे. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे आणि एक ब्रम्हर्षी मंदिर सुद्धा आहे.
* राजगडावरील अजून पाहण्यासारख्या जागा-
१. पद्मावती तलाव- गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुंदर बांधणीचा मोठा असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजी महाराजांच्या काळातले आहे. त्याचबरोबर, मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
२. पद्मावती मंदिर- २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती दिसतात. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० लोकांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याच्या टाक्या आहेत. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.
३. राजवाडा- रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. या वाड्याच्या सभोवतालच्या पंचवीस एकरात महाराजांनी बागही तयार केली त्यास 'शिवबाग' असे म्हणत. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.
४. पाली दरवाजा- पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार अत्यंत उंच आहे आणि बऱ्यापैकी रुंदीचे आहे की यातून अंबारीसह हत्तीसुद्धा आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण बुलंद आणि भक्कम अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आहेत. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.
५. गुंजवणे दरवाजा- इथे ३ दरवाजे आहेत. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या आणि एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.
६. आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी ह्या दरवाजाचा वापर केला जातो. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जातो. आळू दरवाजा आजच्या काळात बऱ्यापैकी ढासळलेल्या स्थितीत आहे. या दरवाज्यावरील शिल्पा मध्ये वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे.
७. काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर- सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याच्या काही टाक्या दिसतात. पुढे गेल्यावर रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष पाहायला मिळतात. या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी विविध शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.
८. बालेकिल्ला- राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आहे आणि त्याचबरोबर अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. याच दरवाजाला महादरवाजा असे सुद्धा म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर आहे आणि प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले पाहायला मिळतात. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर पाहायला मिळते. पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर पाहायला मिळतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती, चौथरे, वाड्यांचे अवशेष सुद्धा आढळतात.
गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर, लोहगड,आणि विसापूर हे किल्ले दिसतात. असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा- राजगड! इसवी सन १६४८ ते १६७२ तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. राजगड थोडा थकलेला आणि मनाने भागला आहे. पण तरी आजही इथे भेट दिली, की अंगात नवचैतन्य संचारल्या शिवाय राहणार नाही. आणि आलेल्या प्रत्येकाला तो पुन्हा शिवकाळात घेऊन जातो आणि शिवभारताची कथा ऐकवतो! ट्रेकिंग ची आवड असलेल्यांना राजगड आवडीची जागा आहे. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.
* गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
१.गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास साधारण ३ तास लागतात.
२.पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरुन कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास साधारण ३ तास लागतात
३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४.आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५.गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.
राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असेच आहे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. त्यामुळे ट्रेकिंगसाठी उत्तम अशी ही जागा आहे.