शाहू महाराज
'शिक्षण हे एक साधन आहे, साध्य नव्हे. दु:खाच्या दुष्ट चक्रातून सुटका करून घेण्याचे शिक्षण हे प्रभावी साधन आहे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळविणे नव्हे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून सुटका करून घेणे आणि सर्व लोकांच्या भल्यासाठी उपयोगी पडणारे ज्ञान मिळविणे, यातच खऱ्या शिक्षणाचे महत्त्व सामावलेले आहे. शिक्षणातून शरीर, बुद्धी आणि ह्रदय यांचा समतोल विकास झाला पाहिजे. '
--- राजर्षी शाहू महाराज.
कागल! कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव. या गावात 'लक्ष्मी विलास पॅलेस' नावाचा एक मोठा राजवाडा होता. राजवाड्यात जयसिंगराव घाटगे हे जहागिरदार राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई होते. २६ जून १८७४ या दिवशी सकाळी राधाबाईंच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मले. राजवाड्यात आणि परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. बाळाचे नाव 'यशवंत' असे ठेवण्यात आले. यशवंत लाघवी, बाळसेदार होता. जसजशी त्याची वाढ होत होती तसतसा तो गुटगुटीत दिसत होता. आपल्या बाळाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून राधाबाई यशवंताच्या गालावर काजळाची काळी तीट लावायच्या. आईवडील, दास-दासी यांचे संगोपन, यशवंताच्या बाळलीला आणि कौतुकात दोन वर्षे निघून जात नाहीत तोच राजवाडा पुन्हा एकदा आनंदाने न्हाऊन निघाला. यशवंतला भाऊ झाला. बाळाचे नाव 'पिराजी' असे ठेवण्यात आले. स्वतःच्या कामातून जमेल तसा वेळ काढून जयसिंगराव मुलांसोबत घालवत असत. ते मुलांना राजे-महाराजे, देव, संत-महात्मे यांच्या कथा ऐकवत असत.
यशवंत तीन वर्षाचा आणि पिराजी एक वर्षाचा असताना जयसिंगराव यांच्या जीवनात एक अत्यंत दु:खाची घटना घडली. २० मार्च १८७७ यादिवशी राधाबाईंचा अचानक मृत्यू झाला. मुलांकडे बघत जयसिंगरावांनी स्वतःचे दु:ख आवरले. लहानपणापासून यशवंत धट्टाकट्टा होता. त्याची शरीरयष्टी पाहून यशवंताने पहिलवान व्हावे असे जयसिंगरावांना वाटत होते. त्यांनी यशवंतला गावात असलेल्या दत्तोबा शिंदे यांच्या तालमीत पाठवायला सुरुवात केली. परंतु तिथे एक गंमत झाली. यशवंत म्हणजे राजपुत्र! त्याच्याशी कुस्ती कशी खेळावी असा प्रश्न तालमीतील इतर पहिलवानांना पडला परंतु वस्तादांनी त्यांची समजूत काढली आणि यशवंताची कुस्ती सुरू झाली.
यशवंत दहा वर्षांचा झाला आणि त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी एक महत्वाची घटना घडली. त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर चौथे शिवाजी महाराज होते. १८८३ या वर्षात एक अनाकलनीय घटना घडली. इंग्रजांनी शिवाजी महाराजांना नजर कैदेत टाकले. तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. एका तुरुंगाधिकाऱ्याने शिवाजी महाराजांवर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. कोल्हापूर संस्थानातील जनता प्रचंड संतापलेली असताना संस्थांनाचा वारस कोण ही चर्चा सुरू झाली. जयसिंगरावांची कोल्हापूरचे कार्यकारी शासक म्हणून नेमणूक झाली. शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी जयसिंगराव यांना बोलावले. त्या म्हणाल्या,
"आबासाहेब,तुमचा मुलगा पिराजी हा कोल्हापूर संस्थानचा वारस व्हावा अशी आमची इच्छा आहे."
ते ऐकून काही क्षण विचार करून जयसिंगराव म्हणाले, "परंपरेप्रमाणे धाकटा मुलगा दत्तक दिला जातो. परंतु तो खूप लहान आहे. शिवाय पिराजी जेमतेम वर्षाचा असताना राधाबाई आम्हाला सोडून गेल्या. त्याचे पालनपोषण आम्ही केले असल्याने त्याच्यावर थोडा जास्त जीव जडला आहे. कृपया गैरसमज नसावा. यशवंतवरही आमचे तेवढेच प्रेम आहे. तोही आमच्या काळजाचा तुकडाच आहे. आपलाही आदेश डावलता येत नाही तेव्हा आपण यशवंतला दत्तक घ्यावे."
जयसिंगराव यांच्या इच्छेखातर आनंदीबाईंनी यशवंतला दत्तक घेतले. १७ मार्च१८८४ या दिवशी यशवंत जयसिंग घाटगे हा मोठ्या आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात दत्तक गेला. आनंदीबाईंनी यशवंताचे नामकरण 'शाहू' असे केले. त्यावेळी नऊ तोफांची सलामी देण्यात आली. यशवंत आता शाहूमहाराज या नावाने ओळखला जाऊ लागला. शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी राजकुमार विद्यालय, राजकोट येथे पाठवण्यात आले. तिथे त्यांना कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले, फिट झरीलाल, स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेजर, रघुनाथ सबनीस इत्यादी विविध विषयांच्या शिक्षकांनी महाराजांना संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र आणि जगाचा इतिहास या विषयांचे सखोल मार्गदर्शन केले. शाहूंनी हे सर्व विषयात प्राविण्य मिळवले. त्यामुळे त्याचे शिक्षक आणि त्याचे मित्र आनंदी होत असत. इकडे कोल्हापूर येथे जयसिंगराव सतत आजारी पडत होते. उपचार चालू असताना २० मार्च १८८६ या दिवशी जयसिंगरावांची प्राणज्योत मालवली....
शाहू महाराज सतरा वर्षांचे असताना आनंदीबाईंनी त्यांच्यासाठी वधू पाहायला सुरुवात केली. गुजरात राज्यातील बडोदा संस्थानचे प्रमुख सरदार गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई या शाहू महाराजांच्या पत्नी या नात्याने त्यांच्या जीवनात आल्या. विवाहसमयी लक्ष्मीबाईंचे वय अकरा वर्षांचे होते. आनंदीबाईंनी लक्ष्मीबाईंच्या शिक्षणाची व्यवस्था केली. श्रीमती कॉक्स या युरोपियन स्त्रीची त्यासाठी नेमणूक केली. १० मार्च १८९४ हा दिवस शाहू-लक्ष्मी यांच्या जीवनात आनंदी क्षण घेऊन आला. या दोघांना यादिवशी कन्यारत्नाचा लाभ झाला. आपल्या आईच्या नावावरून शाहू महाराजांनी कन्येचे नाव राधाबाई असे ठेवले. पाठोपाठ एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली. २ एप्रिल १८९४ या पवित्र दिनी शाहूंना कोल्हापूरच्या गादीवर बसवून त्यांच्याकडे संपूर्ण कारभार सोपवला गेला . हे सारे घडत असताना त्यांचा संसार पुर्णपणे फुलत होता. लक्ष्मीबाईंना राधेच्या पाठीवर राजाराम आणि शिवाजी ही दोन मुले तर आऊबाई ही मुलगी झाली.
राज्यकारभाराची सुत्रं हाती घेताच महाराजांनी दीनदुबळे,गरीब जनतेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. शिक्षण व्यवस्था, जातीभेद निर्मूलन यासोबतच प्रशासनात बदल करणे अशा योजना त्यांनी हातात घेतल्या. त्याप्रमाणे नियोजन आणि अंमलबजावणी सुरू केली.सुसंस्कृत, समजुतदार,
विचारी समाज निर्माण करावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे पाहून प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा कायदा केला. केवळ कायदा करूनच ते थांबले नाही तर पाचशे ते एक हजार लोकसंख्या असलेल्या गावात त्यांनी शाळा उघडल्या. जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत अशा पालकांना दरमहा एक रुपया दंड ठोठावण्याची व्यवस्था केली.
१९०२ या वर्षी सातवा एडवर्ड यांच्या राज्याभिषेकासाठी शाहू महाराज युरोपला गेले होते. तिथली राज्यव्यवस्था पाहून महाराज प्रभावित झाले. तिथल्या विकासाचा त्यांनी अभ्यास करून तिथूनच कोल्हापूर संस्थानसाठी २६ जुलै १९०२ यादिवशी एक अध्यादेश जारी करून कोल्हापूर संस्थानांतर्गत प्रशासनात पन्नास टक्के जागा मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षित केल्या. शाहू महाराज स्वतः कुस्तीपटू असल्यामुळे युवक सुदृढ, निरोगी असावेत त्यासाठी युवकांनी व्यायाम करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी आखाडे आणि तालमी यांना भरपूर मदत केली. त्यामुळे कोल्हापूरची ओळख मल्ल विद्येची पंढरी म्हणून झाली. विविध कलागुणांचा विकास व्हावा यासाठी संगीत, चित्रकला, लोककला, चित्रपट इत्यादी क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर चालवित असलेल्या 'मुकनायक' या वृत्तपत्राला सहाय्य केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता जाणून त्यांना शिक्षणासाठी मदत केली. आबालाल रहिमान, बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी, अल्दियाखाँ, हैदरबक्ष, अंजनीबाई मालपेकर, केसरबाई, केशवराव भोसले या कलाकारांना प्रोत्साहन दिले. १९१५ यावर्षी कोल्हापूर येथे केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी केली.
इंग्लंडच्या दौऱ्याहून शाहू महाराज भारतात परत येत असताना ते इंग्लंड आणि भारत यांच्याकडे असलेल्या भौतिक सुविधांची मनोमन तुलना करीत होते. अनेक योजना मनामध्ये आकारत असताना महाराजांचे लक्ष जहाजाभोवती पसरलेल्या समुद्राच्या पाण्याकडे गेले. सोबत असलेल्या दिवाणजींना ते म्हणाले,
"दिवाणजी, धरण बांधण्यासाठी सारी माहिती जमा करा.त्यासाठी एक जाहीरनामा प्रकाशित करा."
कोल्हापूर येथे पोहोचताच महाराजांच्या इच्छेप्रमाणे पाटबंधारे प्रकल्पाची यादी तयार करण्यात आली. जाहीरनामा प्रकाशित करून नद्यांचे सर्वेक्षण झाले.भौगोलिक, सामाजिक आणि पर्जन्यमान अशा सर्व गोष्टींचा विचार करून कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगावती नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पाठोपाठ प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. होऊ घातलेल्या धरणाला 'महाराणी लक्ष्मीबाई ' आणि धरणाच्या शेजारी वसविण्यात आलेल्या गावाला 'राधानगरी' असे नाव देण्यात आले.
बहुजन समाजातील मुलांमध्ये शिक्षणाची जागृती होऊन ही मुले मोठ्या संख्येने शिक्षित व्हावीत या तळमळीने शाहू महाराजांनी मराठा, जैन, शिंपी, मुसलमान, लिंगायत, प्रभू, पांचाळ, ढोर, नाभिक, ख्रिस्ती इत्यादी बहुजन समाजातील मुलांसाठी कोल्हापूर येथे वसतिगृहांची निर्मिती केली. अस्पृश्य समाजातील मुलांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग' उभारले. त्याचप्रमाणे गरीब लोकांना रोजगार मिळावा या हेतूने 'शाहू मिल' या महत्त्वाकांक्षी कापड कारखान्याची निर्मिती केली. सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू होण्यासाठी त्यांनी 'सहकारी संस्था कायदा' अंमलात आणला. शाहुपरी व्यापारपेठ, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती केली. 'किंग एडवर्ड ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट' या संस्थेची उभारणी करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास करावा, नगदी पिके घ्यावीत अशी त्यांची तळमळ होती.
शाहू महाराजांना शिकारीचा छंद होता. मात्र शिकार करताना त्यांचा एक नियम होता. ते माजलेल्या प्राण्यांची शिकार करीत असत. शाहू महाराजांनी एकदा सिंहाचा बछडा पाळला होता. ती महाराजांसोबत सातत्याने राहात असे. ती सिंहीण मोठी होताच शाहू महाराजांनी तिला जंगलात नेऊन सोडले. सिंहीण जंगलात इकडेतिकडे फिरताना महाराजांना शोधत होती परंतु महाराज दिसत नाहीत हे पाहून तिचा जीव कासावीस होत होता. तिचे डोळे पाणावले. शेवटी महाराजांना शोधत ती राजवाड्यात पोहोचली. शाहू महाराज दिसताच ती धावत सुटली आणि तिने सरळ शाहू महाराजांच्या अंगावर झेप घेतली. ते पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. त्या दोघांमधले संबंध माहिती नसणारांना वाटले असणार की, तिने महाराजांवर हल्ला केला असावा परंतु तिचे प्रेम जाणून महाराज म्हणाले,
"अग...अग, पुरे झाले. आता शांत हो बरे..." असे होते शाहू महाराजांचे प्राणीमात्रांवरील प्रेम!
राज्यात जातीभेद नसावा या उद्देशाने महाराजांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे महाराजांनी आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील एका तरुणासोबत लावून दिले. तसेच अकाली विधवा झालेल्या महिलांसाठी शाहू महाराजांनी पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आणला. त्याचबरोबर देवदासी प्रथा बंद केली. शाहू महाराज नेहमी म्हणत,
'जातीयवाद संपणे आवश्यक आहे. सामाजिक प्रगतीमध्ये जातीभेद हा मोठा अडसर असल्यामुळे विकास थांबला आहे.' जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी नाशिक येथे 'उदोजी विद्यार्थी वसतिगृह' निर्माण केले.
शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक, महिला संबंधीचे कार्य लक्षात घेऊन, त्यांची विकासाची जाण आणि तळमळ लक्षात घेऊन २१ एप्रिल १९१९ रोजी कानपूर येथे भरलेल्या कुर्मी समाजाच्या विशाल अधिवेशनात शाहू महाराजांना 'राजर्षी' या पदवीने सन्मानित करण्यात आले.कोल्हापूर संस्थानात महाराजांनी सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण केले,सुधारणा घडवून आणल्याचे पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 'सामाजिक लोकशाहीचे आधार स्तंभ' या
शब्दांमध्ये स्तुती केली. त्याचबरोबरीने 'महाराजांचे महाराज' असाही गौरवपूर्ण उल्लेख केला जात असे.
हे सारे घडत १९२२ यावर्षी एक अत्यंत दु:खदायक घटना घडली. शिवाजी हा शाहू महाराजांचा मुलगा नेहमीप्रमाणे जंगलात शिकारीला गेलेला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्या आकस्मिक घटनेने शाहू महाराज अत्यंत खचले. जीवनात महाराजांनी अनेक संकटांशी सामना केला होता परंतु मुलाच्या मृत्यूने ते पार कोलमडून गेले. स्वतः राजर्षी महाराजांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासले होते. डॉक्टर त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत होते. परदेशात जाऊन चांगला औषधोपचार घ्या असे सुचवत होते परंतु शाहू महाराज कुणाचेही ऐकत नव्हते.
ते म्हणत, 'मला परदेशातील डॉक्टर आणि त्यांच्या औषधांची काहीही गरज वाटत नाही.' जनतेचे प्रश्न आणि त्यांच्या कल्याणाची कामे त्यांना स्वस्थ बसू देत नसत.
३० एप्रिल १९२२ या दिवशी बडोद्याचे फत्तेसिंहराव यांच्या कन्येचा विवाह होता. डॉक्टरांनी जाऊ नये असा सल्ला दिला असतानाही ते बडोद्याला गेले. तिथेही त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले म्हणून लग्न सोहळा झाल्यानंतर ते बडोदा येथेच चार दिवस आरामासाठी थांबले. परतीचा प्रवास सुरू झाला. मुंबई येथील 'पन्हाळा लॉजवर' थांबले असताना तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. ६ मे १९२२ यादिवशी वयाच्या केवळ अठ्ठेचाळीसाव्या वर्षी शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या क्षणी ते म्हणाले,
'मी जाण्यास आता तयार आहे. डर कुछ नही। सब को सलाम बोलो।...'
'जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला' या त्रिकलाबाधित सत्याची पुन्हा प्रचिती आली. राजर्षी शाहू महाराज यांच्या दु:खद निधनानंतर कोल्हापूरनगरीसह सारा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला...
नागेश सू. शेवाळकर
९४२३१३९०७१