'गीतरामायणाचे जनक - गदिमा'
गीतरामायण हा सर्वकालीन रसिकांचा आवडता असा गीतसंग्रह ! घरी, कार्यालयात, कुठल्याही कार्यक्रमात अगदी रस्त्याने जाताना कुठेही गीतरामायणाचे शब्द कानी पडले की, मानव अगदी भान हरपून त्यात रंगून जातो. बाबुजींच्या अविस्मरणीय आवाजात स्वतःही ते शब्द, ते गीत गुणगुणायला लागतो. अनेक घराघरातून होणारी सकाळ गीतरामायणाच्या गीतातून होते हे या गीताचे वैशिष्ट्य! महाराष्ट्रातील गणेशोत्सव असो, दुर्गामहोत्सव असो किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम असो या कार्यक्रमांंमधून गीतरामायणाची गीते गाऊन उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केल्या जाते. सुधीर फडके अर्थात बाबुजी यांच्या स्वरांचे जसे आगळेवेगळे गारूड रसिकांच्या मनात घर करून आहे. त्याचप्रमाणे या गीतांची रचना, शब्द यांचीही मोहिनी वर्षानुवर्षे रसिकांच्या ह्रदयात घर करून आहे. कोण आहेत या अजरामर गीतांचे गीतकार? 'गदिमा' या नावाने सर्वदूर ख्यातनाम असलेल्या, मराठमोळ्या रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे, गजानन दिगंबर माडगूळकर.....
गदिमा यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ या दिवशी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात असलेल्या शेटेफळ या गावी झाला असला तरी त्यांचे मूळगाव आटपाडी तालुक्यातील माडगूळे हे गाव. गदिमा यांच्या वडिलांचे नाव दिगंबरराव तर आईचे नाव बनूताई असे होते.गदिमा यांच्या जन्माची एक विलक्षण कथा सांगितल्या जाते. बाळंतपणासाठी बनूताई त्यांच्या माहेरी शेटेफळ या गावी आल्या होत्या. यथावकाश बाळ जन्माला यायचे संकेत मिळत होते. त्याकाळी आजच्या सारखी मुबलक आणि आधुनिक अशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. गावातील सुईण बाळंतपण करण्यात पटाईत आणि सराईत असायची. अशा एका अनुभवी सुईणीला बोलावण्यात आले.काही वेळात ती सुईण बाहेर आली.तिथे आतून येणारी आनंदी वार्ता ऐकण्यासाठी आसुसलेल्यापैकी कुणीतरी 'काय झाले?' असे विचारले. त्यावेळी ती सुईण म्हणाली, 'काय सांगू? घात झाला. देवाने दिले ते कर्माने नेले.' ते ऐकून तिथे निराशा पसरली. म्हातारी सुईण पुन्हा आत गेली. बनूताईंंना ग्लानी आली होती. त्या झोपेत होत्या. त्यांच्या शेजारी ते बालक निश्चेष्ट पहुडलेले पाहून सुईणीला वाटले, काही वेळातच हे बालक कायमचे निघून जाणार.तिला अचानक काहीतरी सुचले. एक प्रयत्न करून बघावा या विचाराने तिने बाळंतणीला देण्यासाठी तयार केलेला शेक (विस्तव) बाळाच्या बेंबीजवळ नेला आणि आश्चर्य घडले. निपचित पडलेल्या, मृत म्हणून समजल्या गेलेल्या त्या बाळाने टाहो फोडला. ते ऐकून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आणि साहित्य, चित्रपट क्षेत्राला गदिमा मिळाले.... गदिमांना सारेजण 'अण्णा' या टोपणनावाने बोलवत असत. त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आटपाडी, कुंडल आणि औंध या गावातील शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागला. गणित या विषयासोबत छत्तीसचा आकडा असल्यामुळे गणिताने गदिमा यांना महत्त्वाच्या अशा मॅट्रिकच्या परीक्षेत धोका दिला. घरची परिस्थिती तशी यथातथाच असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेण्याचा नाद सोडावा लागला.नोकरी करण्याचा निर्णय गदिमांनी घेतला. असे म्हणतात की, एक मार्ग बंद झाला की, दुसरा मार्ग आपोआप सापडतो. गदिमांना प्राथमिक शाळेत असतानाच नकला करण्याची आणि लेखन करण्याची आवड होती. नोकरी करण्याचा निर्णय गदिमांनी घेतला आणि त्यांच्या मदतीला त्यांनी लहानपणापासून जोपासलेले छंद धावून आले. 'हंस पिक्चर्स' या संस्थेने 'ब्रम्हचारी' या चित्रपटात गदिमांना एक छोटीशी भूमिका दिली. गदिमांनी मन लावून त्या चित्रपटात काम केले. गदिमांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते, जणू कागदांवर उतरलेल्या मोत्यांच्या माळा! चित्रपटात काम करीत असताना गदिमांनी साहित्य क्षेत्रातील एक बडे नाव म्हणजे वि. स. खांडेकर यांंच्याकडे त्यांचे लेखनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याचा दुसरा फायदा असा झाला की, खांडेकर यांच्याकडे असलेल्या पुस्तक संग्रहालयातील अनेक चांगली चांगली पुस्तकं वाचण्याची संधी गदिमांना मिळाली. उत्तम आणि दर्जेदार असे वाचत असताना त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. विचारांना एक दिशा मिळत गेली आणि त्यातूनच आपणही काही लिहावे ही ऊर्मी दाटत गेली. त्यांच्या कविता लेखनाचा श्रीगणेशा खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि मग गदिमांनी मागे वळून पाहिलेच नाही. म्हणतात ना, 'कोशीश करने वालों की हार नही होती' त्याप्रमाणे गदिमांकडे एक संधी चालून आली. के. नारायण काळे यांची नवयुग चित्रपट लिमिटेड या नावाची एक संस्था होती. त्यांनी गदिमांना त्यांंच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. या पदावर काम करीत असताना गदिमांना चित्रपट व्यवसायाशी निगडित अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. दरम्यान आचार्य अत्रे यांच्या गीतांनी गदिमांना आकर्षित केले. आचार्यांनी रचलेली गीते ही सोप्या भाषेत तर होतीच परंतु ती प्रासादिक ही होती. यानंतर गदिमांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी गीतरचना करताना कादंबरी, कथा या क्षेत्रातही भारदस्तपणे चौफेर प्रवास केला असल्याचे त्यांच्या एकूण साहित्य निर्मितीमधून आपल्या लक्षात येईल. गदिमांनी काही मंगलाष्टके लिहिली असल्याचा उल्लेख एका ठिकाणी आढळतो.
गदिमांनी भरपूर साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी जवळपास १५० चित्रपटांसाठी गीत रचना केलेल्या आहेत. पंच्याहत्तर पेक्षा जास्त पटकथा त्यांनी लिहिल्या असून जवळजवळ पन्नास मराठी चित्रपट कथांचे ते लेखक आहेत. यासोबतच गदिमांनी हिन्दी चित्रपटांंसाठीही बहुमोल कार्य केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या पंचवीस कथांवर हिंदी सिनेमाची निर्मिती झाली आहे तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी संवादलेखनाची जबाबदारी लीलया पेलली आहे. चित्रपटासाठी वैविध्यपूर्ण लेखन करून गदिमा थांबले नाहीत तर स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवताना त्यांनी जवळपास पंचवीस चित्रपटातून भूमिका ही पार पाडल्या आहेत. असे म्हणतात की, गदिमांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी 'लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही...' हे अजरामर आणि नयनी अंजन घालणारे गीत लिहिले.गदिमांच्या नावावर एकूण दोन हजार गीते आहेत. यावरून एकापेक्षा एक सरस गीतांची निर्मिती करण्यात गदिमांचा हातखंडा होता, ते त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते हे लक्षात येईल.
गदिमांनी अनेक बालगीते लिहिलेली आहेत. ही सारी गीते बालमंडळीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामागील कारण असे की, त्यांची बालगीते पटकन समजतात. अर्थ तात्काळ लक्षात येतो. पाठ करायला खूप सोपी असल्यामुळे चटकन मुखोद्गत होतात. 'मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया...' बालकांप्रमाणे थोरांपर्यंत सर्वांना आवडणारे, गावेसे वाटणारे हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे. आगीनगाडीने मामाकडे जायचे म्हटले की हे गीत सर्वात आधी आबालवृद्धांच्या मुखी येते. मामाच्या गावी गेले की, मामीच्या हातची शिकरण-पोळी खाऊन तिला गमतीने सुगरण म्हणताना हे आवडते गीत म्हणून दाखवणारी बच्चे मंडळी आजही आहे. लहान मुलांना विशेषतः मुलींना आवडणारे गदिमांचे अजून एक गीत म्हणजे 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण..' हे गाणे आजही घराघरात मोठ्या आनंदाने गायिले जाते. विशेषतः एखाद्या लहान बहिणीच्या दादाच्या लग्नाचा विषय निघाला की, दादाची लाडुली हमखास हे गीत गाऊन दादाला चिडवते. हिच सानुली जेव्हा दादाला करंगळी दाखवून खिजवणाऱ्या आवाजात म्हणते, ' वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा। तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा...' हे ऐकताच चिडलेला दादा जेव्हा तिला खोटे खोटे मारायला धावतो तेव्हा ती चिमुकली आई-बाबा, आजोबा-आजी यांच्या मागे जाऊन लपताना दादाला खट्याळपणे अंगठा दाखवते. त्यावेळी हसणारा दादा तिला पकडून तिचा पापा घेतो तेव्हा ती रागाने गालावर हात फिरवून दादाने घेतलेला पापा पुसून टाकते तेव्हा तो खेळ पाहणारे सारे खदखदून हसतात. ही आहे गदिमांच्या शब्दांची, अक्षरांची जादू.
बालगीते, भक्तीगीतं, प्रेमगीतं, मातेची थोरवी गाणारे गीत याचबरोबर गदिमांनी भारतमातेसाठी आणि सैनिकांसाठीही अनेक गीते लिहिली आहेत. ही गीतेही प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली आहेत. 'माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू....', ' भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी...' अशा अजरामर गीतांमधून गदिमांनी रसिकांच्या काळजाला हात घातला होता.त्याचप्रमाणे गदिमांचे रसिकांना अत्यंत आवडणारे आणि प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनी, राम जन्मोत्सवाच्या काळात भक्तीयुक्त, श्रद्धापूर्वक अंतःकरणाने गायिले जाणारे गीत म्हणजे, 'राम जन्मला गं सखे राम जन्मला! ' अनेक दशके हे गीत गायिले जात असतानाही या गीताची गोडी कमी झालेली नाही उलट ती वाढतच आहे यामागे आहे गदिमांचे शब्द सामर्थ्य! गदिमांची अनेक गीते ही एकापेक्षा एक सरस, गोड, समजायला सोपी अशीच आहेत.
रामायण हा आपल्या भारतीयांचा जणू श्वास! जिथे कुठे रामायण ऐकायला मिळते, प्रसंगानुरूप जिवंत देखावे उभे केले जातात तिथे रामभक्त भक्तीभावाने हजेरी लावून कान तृप्त होईपर्यंत ऐकतात, डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत ती सारी दृश्यं पाहतात. एक अलौकिक ठेवा घेऊन समाधानाने घरी परततात. ऋषी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली. ज्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार श्लोक आहेत. गदिमांनी 'गीतरामायणाची' रचना केली ती गीतांमधून. गीतरामायणात अवीट, श्रवणीय, सुमधुर अश्या छप्पन्न गीतांंची रचना केली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून एक वर्षापेक्षा अधिक काळ ह्या अमृततुल्य गीतांची मेजवानी रसिकांना ऐकायला मिळाली. गदिमांची गीतरचना आणि सुधीर फडके यांचा स्वर असा एक दुग्धशर्करा योग चालून आला तो श्रीधर आणि आनंद यांच्या व्रतबंधनाच्या वेळी. एका धार्मिक कार्यक्रमाला जमलेल्या मंडळीला न भुतो न भविष्यती अशी भेट याप्रसंगी मिळाली. खुद्द गदिमांनी यावेळी गीतांचे निवेदन केले आणि बाबुजींनी त्यास स्वरांचा साज चढविला. उपस्थित सारे अत्यंत तृप्तपणे, समाधानी अंतःकरणाने तिथून निघाले. गीतरामायणाच्या रचनेला आज सत्तर वर्षे होऊन गेले असले तरीही त्या रचनांमधला गोडवा, टवटवीत भाव, ताजेपणा, श्रवणता, भक्तीभाव इत्यादी अनेक भाव, तन्मयतेने ओतलेले सारे रस तेवढ्याच जोमदारपणे टिकून आहेत. हे आहे गदिमांच्या अक्षरांचे सामर्थ्य आणि बाबुजींच्या आवाजाची जादू. गीतरामायणाची ही जादू इथेच थांबत नाही तर गीतरामायणाचे हिंदी या राष्ट्रीय भाषेसोबत गुजराथी, संस्कृत, तेलगु, कन्नड, बंगाली, आसामी, मल्याळी, कोकणी अशा भाषांमध्ये रुपांतर झाले आहे. खरेतर मराठी भाषा आणि मराठी रसिकांसाठी हा एक मानाचा तुरा ! गीतरामायणाची ही प्रचंड लोकप्रियता पाहून गदिमांना 'महाकवी आणि आधुनिक वाल्मिकी' अशा दोन पदव्या रसिकांनी दिल्या. गदिमांचा उल्लेख वारंवार महाकवी होत असताना गदिमा गमतीने म्हणायचे, 'मी महाकवी नाही तर महाकाय कवी आहे...' याचबरोबर गदिमांनी टोपणनावाने ही काही लेखन केले आहे. 'बोप्या भगवान' , 'शाहीर अमर', 'शाहीर वैश्वानर', 'शाहीर बोऱ्या भगवान' आणि 'राम गुलाम' ही ती काही टोपणनावं ! शिर्डीचे साईबाबा हे महाराष्ट्रातील भक्तांचे दैवत. शिर्डीच्या मंदिरात दररोज सकाळी काकड आरती होत असते. 'करितो साईनाथ देवा, चिन्मयरूप दाखवी घेऊनी बालक - लघुसेवा!' गदिमानी लिहिलेली रचना दररोज शिर्डीच्या साई मंंदिरात काकड आरतीच्या वेळी ऐकायला मिळते. साई बाबांंच्या चरणी माथा टेकवायला, आशीर्वाद घ्यायला देश-विदेशातील भक्त दररोज गर्दी करतात त्या सर्वांना एका मराठी व्यक्तीचे गीत कानी पडते ते गीत लिहिणारे कवी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गदिमा!
गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा म्हणजे चित्रपटसृष्टीत, वाडं्गमीयन क्षेत्रात, तमाम भारतीयांच्या मनात स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारा एक ध्रुवतारा! जो सातत्याने लखलखत असताना इतरांना साहित्य, चित्रपट क्षेत्रात प्रकाशमान करतो आहे. गदिमांच्या विषयी लिहिणे म्हणजे वैशाख महिन्यात भर दुपारी तळपणाऱ्या सूर्याला देवघरातील दिव्याने ओवाळण्याचा प्रयत्न! परंतु एका सर्वकालीन महान व्यक्तीच्या कार्याला अल्पशा रुपात वाचकांपुढे ठेवण्याचा हा प्रयत्न !
नागेश सू. शेवाळकर,