" मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज , कोणीतरी नख्यांनी लोखंडावर घासल्यावर येईल तसा आवाज आला.
" मीच तो ज्याने गण्याला जंगल जाळण्यापासून रोखले .
" मीच तो ज्याने तुम्हाला तिघांनाही त्या बनावट चर्चमध्ये नेलं
" मीच तो ज्याने शेवंताच्या मृत्यूची खोटी गोष्ट सांगून तुम्हाला फसवून तुमचं रक्त घेतलं
" मीच तो ज्याने शेवंताला गाण्याच्या स्वप्नात प्रवेश करू दिला
" मीच तो , जो मशाल दाखवून तुम्हाला इथं घेऊन आला
" मीच तो काळोख ज्याने राम्याचा अंत केला
आणि
" मीच तो ज्याने जॉनच्या शरीरात प्रवेश करून.........
किती विचित्र आवाज होता . त्या आवाजाने गण्या व मन्या दोघांच्याही अंगावर काटे आले. इतका वेळ ज्या गोष्टीपासून दूर पळत होतो , ज्या गोष्टीपासून वाचायचा प्रयत्न करत होतो तीच गोष्ट आता समोर उभा राहिली होती . त्यामुळे त्यांच्या काळजाचा थरकाप उडत होता .
" आमचा बळीच द्यायचा होता तर अगोदरच द्यायचा नव्हता का ? एका फटक्यात गोष्ट संपवून टाकायची होती . आमचा इतका छळ करायची काय गरज होती ? " गण्या तावातावात बोलून गेला
" शेवंताssss ये ना ग्.. माझी लाडकी शेवंता "
तोच तो घाणेरडा आवाज शेवंताला हाक मारत होता
गण्या , मन्या त्याच्यापुढे एक शुल्लक निरुपद्रवी प्यादे होते . त्याचे दोघांकडेही लक्ष नह्वते .
" सांगा तुम्ही आम्हाला का मारून नाही टाकत , असा छळ का लावलाय आमचा ? " मन्या
" मारेन , मारेन , वेळ आली की लगेच मारेन . सध्या मी माझ्या लाडक्या शेवंताला शोधतोय . इथेच तर होती . "
मन्याची शीर सनकली . तो वेड्यासारखं करायला लागला . कोणी दिसत नव्हतं . आवाज चहूकडून येत होता . आतापर्यंत झालेल्या घटना काय कमी होत्या त्यात भर म्हणून हे सगळं . आणि जीवही जात नव्हता , मोकळा व्हायला . मन्याच्या मनावर प्रचंड ताण आला .
" आयला असं तीळ-तीळ तुटुण मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं "
आणि तिथल्याच दगडावर जोरजोरात डोक आपटू लागला .
" आरं मन्या , काय करतोय लगा "
गण्या त्यांना अडवायला गेला पण त्यांना गणालाही ढकलून दिलं .
पुन्हा तोच खर्जातला कर्णकर्कश आवाज आला
" मारायचा आहे तुला , गडबड आहे , मर मग . "
तेव्हाच मन्या हवेत उडाला .एखाद कलिंगड हत्तीच्या पायाखाली यावे तसे त्याच्या मस्तकाच्या चिथड्या उडाल्या .
अपरिमित रक्त सांडू लागलं . पण ते सार हवेतच राहिलं . कसलंतरी गोलाकार परदर्षक भांड असल्याप्रमाणे . मन्याचं धडा विना व रक्तात बुडालेलं शरीर हवेत अधांतरी तरंगत होतं .
पुन्हा एकदा आवाज आला
" तुला पण मरायचं का ? आत्ताच सांग . मला वाटलं होतं तू थोडा फार हुशार असशील , पण तू तर महामूर्ख निघाला . अरे तुम्ही तिघही माझ्या लाडक्या शेवंती नावाच्या मासोळी साठी जाळं होता रे .. जाळं ..... "
" माझी शेवंता , तिला दुसऱ्याला झालेला त्रास सहन होत नाही , आता सापडली जाळ्यात , माझ्यापासून इतकी वर्षे लपत होती आता सापडली ना जाळ्यात . "
" आता तुझं नी माझं मिलन होणार , किती तरी युग आता आपण एकत्र घालवणार , अगं माझी शेवंता , बोल ना तू , बोलत का नाही ? "
तेव्हाच शेवंता च्या आवाजात गण्या बोलला
" कोण आहेस तू ? का मला त्रास देतोय ₹ जॉन आणि मी सुखाने जगलो असतो तु कोणा आला आमच्या आयुष्यात "
शेवंताला गणाच्या शरीरात प्रवेश करायला भाग पाडले तेव्हाच त्या अघोरी शक्तीने शेवंताला गण्याच्या शरीरात कैद करून टाकले .
" शेवंता हे तू बोलतेस ! किती वर्षातून ऐकला हा तुझा मधुर आवाज ...! हीच ती वेळ आहे आपण दोघे एकत्र येऊ . मग तू चांगलेच ओळखशील मला ...."
आणि क्षणात आजूबाजूचा पूर्ण परिसर बदलला . ते एका उंचच्या उंच कड्यावर होते . आजूबाजूला जिथवर नजर जाईल तिथपर्यंत मिट्ट काळ्या पाण्याचा समुद्र पसरला होता . कसलाही आवाज नव्हता . भयान शांतता . तो समुद्र ही विचित्र होता . त्याच्यावर ती एकही लाट नव्हती . ना कसली हालचाल होती . ना हवेची झुळूक होती . ना वाऱ्याचा आवाज होता . त्या ठिकाणी सजीवाचे कोणतेच लक्षण नव्हते . मनावर एक दडपण होते . तो अघोराचा समुद्र होता .
धप्पकन आवाज झाला मन्याचे छिन्न झालेले शरीर त्या समुद्रात कोसळले . इतक्या वेळ शांत असलेल्या त्या समुद्राने रौद्र रूप धारण करून , उंच उंच काळ्यापाण्याच्या लाटा उसळवून त्या पडलेल्या धडाचा स्वीकार केला .
त्यावेळी फक्त गणा जिवंत होता . मन्या , राम्या , शेवंता जॉन सारी भूतेच होती . शेवंता गण्याच्या शरीरातून बाहेर निघाली . गण्या च्या एका बाजूला राम्याचे आणि मन्याचे व दुसऱ्या बाजूला जॉन व शेवंताचे आत्मे होते . त्यांच्या समोर एक गोलसर काळपट आकार होता त्यातून आवाज येत होता
" बघ हा आत्मशक्तीसाठी व रक्ताच्यासाठी भुकेलेला समुद्र . शेवंता हा समुद्र म्हणजे मार्ग आहे आपल्या मिलनाचा , युगानुयुगे एकत्र राहण्याचा , त्यासाठी फक्त या साऱ्यांची आहुती द्यायची आहे ."
आणि त्या गोलसर काळपट आकारातून दोर बाहेर यावा तसे काहीतरी बाहेर येऊ लागले ..... व ते राम्या व मन्या यांच्या आत्म्याभोवती आवळले जाऊ लागले.
" या दोघांची पहिली आहूती.....
इतका वर्ष जॉन त्याच्या गुलामीत होता . त्याला त्या
' कुणाच्यातरी ' शक्तीची कमजोर नस कळलीच असणार...
त्याच वेळी जॉनने त्या गोलसर काळपट आकारावरती जलद चाल केली . त्या काळ्या , गोलाकार ढगातून चित्रविचित्र आवाज आले . शेवटी तो गोलसर काळपट आकार नष्ट झाला व खाली पडला एक हाडांचा सापळा . ज्याला कुठे कुठे मांस राहिले होते . एक भयानक दुर्गंधी पसरली .
" आपल्याला ह्याला नष्ट करायला पाहिजे "जॉन म्हणाला
" पण कसे " शेवंता
" कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात . तसेच शक्ती ही दोन प्रकारची असते , विचारही दोन प्रकारचे असतात .त्या दोन बाजू म्हणजे चांगले व वाईट , सुष्ट व दुष्ट , सकारात्मक व नकारात्मक , पवित्र व अपवित्र आणि मंगलमय व अमंगल . दोन्ही बाजूंना एकमेकांपासून धोका असतो . कारण ज्या ठिकाणी एक प्रबळ असते तिथे दुसरीला जागा नसते . किंबहुना जी बाजू प्रबळ असते ती दुसरीला संपवायचा किंवा आपल्या हद्दीतून घालावायचा प्रयत्न करत असते . आपल्या या सृष्टीमध्ये अनंत काळापासून मंगलमय , पवित्र शक्तीचा वास आहे व अपवित्र दुष्ट शक्ती त्या शक्तीच्या विरोधात कटकारस्थाने करून आपले स्थान प्रबळ व आपले वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करत आहे . मात्र नेहमी सत्याचा विजय होत आलेला आहे . यावेळी आपल्याला तेच करायचा आहे . ती मंगलमय , पवित्र शक्ती नक्कीच आपल्या मदतीला धावून येईल .
" पण नक्की करायचं काय ? "
" आपल्या पवित्र जे काही आहे ते याच्या वरती झोकून द्यायचं. म्हणजे तुम्हाला काही चांगल्या आठवणी असतील ,
पवित्र आठवणी असतील , पवित्र गोष्टी असतील , पवित्र विचार असतील , देवाचं नाव असेल . जे काही तुमच्यामध्ये चांगलं असेल , ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या असतील त्या साऱ्या काही आठवा . ते सारं काही मनात आणा , आणि ते सारं नष्ट कोणामुळे होणार आहे हेही मनात आणा . आपल्या सात्विक संतापाच्या विचार , सात्विक संतापाची अस्त्रं त्याच्यावरती झोकून द्या . "
जॉनला शेवंताचा प्रेम आठवलं . शेवंताला जॉन आठवला , तिच्या बाबांची तिच्यासाठी जी तळमळ आठवली , सदूकाकां व काकूंचे जीव्हाळा आठवला . अजुनही बऱ्याच गोष्टी आठवल्या . गण्याला त्याच्या मित्रांसोबतची दोस्ती आठवली. आई नव्हती पण आईची माया जाणवली . वडिलांनी त्याला आईची कमतरता कधीच भासू दिली नाही , त्यांनी त्याला मोठा केला . मित्रांनी प्रेम दिलं . सारं काही आठवलं. सगळ्यांनी चांगल्या गोष्टी आठवल्या . त्या गोष्टींचे , त्या विचारांचे अस्त्र बनवले नि फेकून दिले त्या पवित्र व मंगलमय दुष्ट शक्ती वरती आणि तेव्हाच नाश झाला त्या दुष्ट अमंगलमय अपवित्र शक्तीचा . तो हाडाचा सापळा हवेत विरून जाऊ लागला .
त्यांचा विजय झाला होता . विजय झाला होता पावित्र्याचा , मांगल्याचा , सकारात्मकतेचा . विजय झाला होता मानवी मनाचा , मानवी नात्यांचा , मानवी भावनांचा नि साऱ्या वरती विजय झाला होता मानवाचा .
तो हाडाचा सापळा नष्ट झाला . तिथेच एक आकृती अवतरली . बहुदा तोच आत्मा होता ज्याने हे सगळे कारस्थान केले होते .
" प्रताप तू " शेवंता म्हणाली
जॉन म्हणाला " तू याला ओळखतेस
" हो , हा माझा बालमित्र आहे .
" प्रताप तू केलंस हे सगळ पण का...?
त्या विशाल काळा समुद्राचा साऱ्यांना विसर पडला होता . इतका वेळ खवळलेला समुद्र पुढचा बळी न मिळाल्याने शांत झाला होता . पण तो अघोर समुद्र होता . त्याला जाणीव झाली होती घडणाऱ्या घटनांची . कुठेतरी नोंद घेतली जात होती या साऱ्यांची . आदेश दिले जात होते पुढच्या गोष्टीसाठी . पण या साऱ्यांची जाणीव कोणालाच नव्हती..
" सांगतो सोने , सांगतो , माझं ऐकून तरी घे "
" शेवंताला लहानपणी सारे सोनीच म्हणायचे . ती होतीच सोन्यासारखी . आम्ही सारे मिळून राजा राणीचा भातुकलीचा खेळ खेळायचो . त्यात सोनी राणी आणि मी राजा . पण ते फक्त खेळात होतो हे अजून मनाला पटत नाही . पुढे सोनी मुंबईला शिकायला गेली आणि सुट्टीपुरतच गावाला येऊ लागली . तरीही सुट्टीला आली की आम्ही खेळायचो . वय वाढले तसे खेळ बदलत गेले . हळूहळू खेळ बंद झाले . फक्त बोलनं वाढत गेलं . सोनी मला सारं काही सांगायची . मला वाटायचं मी तिचा खास मित्र आहे . त्या तारुण्यसुलभ वयात मी माझ्या मनाचा भलताच समज करून घेतला होता . आणि तिथेच मी चुकलो . सोनी सुट्टी पुरती यायची आणि परत जायची . पण मी मात्र पुढच्या सुट्टीची अधाशासारखी वाट पाहायचो .
शेवटी तिची शाळा संपली . सुट्टीला घरी आली होती . तेव्हा मी माझ्या मनाचा हिय्या करून , मनातली गोष्ट तिला सांगितली . तिचे बाबा केव्हाही तयार झाले असते कारण गावात तेवढा मान-मतराब होताच आमचा . पण ती मला नाही म्हणाली . तिने मला झिडकारलं आणि तिने कारण सांगितले की
" मला अजून शिकायचे आहे . कॉलेज करायचं आहे आहे . आत्ताच लग्न करायचं नाही आणि तसंही लग्न करून गावात राहायचं नाही "
माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली मी माझ्या बाकडे गेलो व बाला झालेली सारी हकीकत सांगितली . माझा बा लगेच पाटलाकडे माझ्यासाठी मागणी घालायला गेला . पाटील नाही म्हणणार नव्हता कारण प्रसंगी माझ्या बापानेच पाटलाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढला होता . पाटलाला पोरीचे पुढे साऱ्याचा विसर पडला .
म्हणाला
"पोरीला पुढे शिकवायचा आहे , थोडासाठी माघार नको . "
माझा बा म्हणला " शिकवू द्या , शिकल्यावर लगीन लावलं तरी चालल की. "
तरीपण नाहीच म्हणाला
" पोरीला तर पसंत पाहिजे "
माझ्या बानं लय समजावलं
" कोण विचारतो पोरींची पसंत वगैरे वगैरे..."
पण पाटील पुरता इंग्रजाळलेला होता . कसले आधुनिक का फिधुनिक विचार होते त्याचे . शेवटी माझा बा तरी किती समजावणार . तो पण माघारी आला .
कुणीतरी खरच म्हणले राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो . मी रागाच्या भरात माझ्या बापाचा खून केला . त्यामुळे मला परागंदा व्हायला लागलं . तरीपण शेवंताला प्राप्त करण्याची इच्छा सोडली नव्हती . मला गावागावात फिरता येत नव्हतं म्हणून नुसती जंगलात फिरत होतो . शिकारी येत होती म्हणून बरं झालं . किती दिवस फिरत होतो काय माहित ?
एक दिवस जंगलात एक विचित्र प्रकार दिसला . दोन-चार सुंदर ललना एका वडाच्या झाडाखाली भर दिवसा नृत्याविष्कार करत होत्या . मला फार विचित्र वाटलं .इतक्या जंगलात हे शक्यच नव्हतं . मी पुढे गेलो पण त्यांचं माझ्या कडे लक्षच नव्हते . त्या फक्त नाचत होत्या . तिथे एक सडपतळ इसम पडला होता . दाढी हातभर वाढली होती . अंगावर माणसांचा एकही तुकडा नव्हता . नुसता हाडांचा सापळा व त्यावर कातडी असल्यासारखे ते शरीर होतं .संपूर्ण शरीराला कसलं तरी पांढरे भस्म का काही लावलेलं होतं आणि फक्त लंगोटी घातलेली होती . तो नशा करून पडलेला असावा मी त्याला उठवलं , शुद्धीवर आणलं तेव्हा मला कळालं की हे त्यांना स्वतःच्या मनोरंजनासाठी केलेले चेटूक होतं .
मी त्याला माझी कहाणी सांगितली . मला काय पाहिजे ते सांगितलं . तेव्हा त्याच्या डोळ्यात एक असूरी आनंद दिसला . पण त्यावेळी मला तो जाणवला नाही . तेव्हाच माझा शाळा सुरू झाली . तो सांगेल तसे करत करत गेलो . नंतर माझं काहीच चालेना , त्याचा गुलाम झालो , त्याच्या हातातलं बाहुलं झालो . जेव्हा त्याने जॉनला उचलायला सांगितलं . तेव्हा मला खूप आनंद झाला पण त्यालाही त्यांनं गुलाम बनवलं . त्याला वेठीस धरून शेवंता बरोबर जे काही केलं त्यावेळी मी त्याचा शेवटचा विरोध केला आणि त्या वेळीच त्यांना माझं अस्तित्वच संपवलं व मी नेहमीसाठी त्याच्या मध्ये विलीन झालो .
तो वाढत गेला . बळी घेत गेला . बळी देत गेला . शक्ती वाढवत गेला . आताही तो आहे . तो गेलेल्या नाही . हे त्याचंच ठिकाण आहे बळी देण्याचे , त्याचंच ठिकाण आहे आपल्या साऱ्या शक्ति वाढवण्याचे , याच ठिकाणी आतापर्यंत कित्येक बळी देऊन त्याने आपली शक्ती वाढवली आहे , याच ठिकाणी त्याचा अघोर समुद्राला बळी देऊन तो अघोराकडून शक्ती प्रदान करून घेतो , आता आपल्या साऱ्यांचा बळी देऊन तो या अघोर समुद्राचा स्वामी बनेल .
कारण अघोर स्वामी बनण्यासाठी त्याने केलेल्या खेळातील हा शेवटचा डाव होता .
आता मला कळतंय , की तो क्षणिक राग जर मी केला नसता तर तुम्हा साऱ्यांचं आयुष्य वाचलं असतं । पण माझ्या मनात त्या वेळी प्रबळ झाली होती ती काळी , दुष्ट , नकारात्मक अपवित्र , अमंगलमय बाजू .
मला माफ कर अशी म्हणायची सुद्धा माझी लायकी नाही पण मी तुम्हा सर्वांची माफी मागतो
" हा ss हा sss "
एक क्रूर हास्याचा आवाज सर्वत्र घुमला .
त्या कातळ काळोखाच्या अघोर समुद्रामध्ये लाटा उसळल्या. कर्णकर्कश्य ध्वनी आसमंतात घुमू लागला .
" माग , माफी माग . कारण थोड्याच वेळात माफी मागायला तुही नसशील आणि ज्यांना माफी मागायची आहे तेही नसतील . "
आणि लाटा अधिकच जोमाने उसळू लागल्या .लाटा उसळत होत्या . उंच उसळून कड्यावरती आपटत होत्या. त्या कड्यावरचा , त्या बेटावरचा एक एक आत्मा गायब होत होता . त्या अघोरी समुद्रामध्ये त्यांचा बळी दिला जात होता .
त्या अघोराने त्यांना वेळच दिला नाही . सारे आत्मे त्या अघोरामध्ये विलीन झाले . त्यांना आता कोणी वेगळं करू शकत नव्हतं . पाण्यात विरघळलेल्या साखरेप्रमाणे त्यांचं अस्तित्व संपलं होतं . आता फक्त गण्या राहिला होता .आणि समुद्र शांत झाला . गण्याच्या मनावर मोहिनी पडली . तो चालत जाऊ लागला कडाच्या टोकाकडे उडी घेण्यासाठी...
पण त्याच्या मनाच्या एकदम आतल्या पातळीवर संघर्ष अजूनही चालू होता . तो विरोध करत होता . पण तो विरोध तोकडा होता . शेवटी त्याने पराभव स्वीकार केला व मृत्यूच्या झोक्यावर बसून तो आठवणींच्या गावी गेला . आयुष्य त्याच्या नजरेसमोरून सरकून गेलं . मात्र एक दृश्य त्याच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा तरळत राहिलं
त्याचं लहानपण . त्याची अंजली .दोघेही वेगळे नव्हतेच. एकच होते दोघे. झाडावरती चढले होते कशासाठीतरी ?
पण कधी नव्हे ते गण्याचा पाय घसरला तेव्हा अंजलीनेच त्याला हात दिला व वर खेचले....
त्याच्या मनावरची मोहनी विरघळून गेली . ते दृश्य विरघळून गेलं . तो कड्यावरून खाली कोसळत होता आणि अंजलीने त्याचा हात पकडला होता . त्याला पुन्हा एकदा वर खेचला होता . आणि त्याचवेळी दिव्य तेजस्वी पांढरा प्रकाश सर्वत्र भरून उरला . त्याला काहीच दिसेना हळूहळू दिसू लागलं . तेव्हा त्याला जाणवलं . तो तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडला होता . ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती .
" कोण तू...?
" इतक्यात विसरला...
" अंजली तू मला वाचवलं ....?
" नाही तू स्वतः स्वतःला वाचवलं ....?
" आणि बाकीचे
" ते अघोरात विलीन झाले .
" आघोराचा नाश झाला का ..?
" ते आपल्यासारख्या सामान्यला शक्य नाही . आपण फक्त त्याला चुकवून येथे आहोत ....
" आता मी कुठे आहे ?
" स्वप्नात .
" तू कुठे आहे...?
तिने काहीच उत्तर दिले नाही . ती शांत राहिली . तोसुद्धा शांतपणे तिच्या मांडीवर पडून राहिला . तिचे हात त्याच्या डोक्यावरती फिरत राहिले .
अचानक त्याला पाण्यात बुडाल्यासारखा झालं . त्याने डोळे उघडले.
" साहेब तो शुद्धीवर आला.."
" हवालदार त्याला इकडे आणा.
" बोल रे इथे काय करत होता ?
" काल रात्री इथे कोण कोण होतं ?
" काल रात्री इथे काय काय झालं ?
" सांग पटकन...
तो समुद्रात एका बेटावर होता . काल रात्री बेटावर स्फोट झाला होता . संपूर्ण बेट जळालं होतं . नंतर अचानकच आग विझली . ज्यांनी किनाऱ्यावरून सारं पाहिलं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं...
??????????????
? जत्रे नंतर ?
शेवंता , पाद्री किंवा जॉन , राम्या ,मन्या आणि तो प्रताप सारे अघोरासाठी बळी गेले होते . ते बेट म्हणजे अघोराचं प्रार्थनास्थळ असावं . सारे बळी गेले . पण तो वाचला . त्याला वाचवलं . अंजलीने कि कुण्या दिव्य शक्तीने . अंजली त्याची लहानपणाची मैत्रीण होती . पण लहानपणा नंतर गण्याने तिला कधी पाहिलेच नव्हते . अचानक ती त्याच्या मदतीसाठी कशी आली ? नंतर गण्याचे काय झाले.....? अचानकच ही अंजली मधून कोठे आली ? हे प्रश्न पडले असतीलच....!
याच प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या कथेत जिचे नाव आहे फार्महाऊस
जत्रा इथेच संपली ......