Pathlag - 7 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग – (भाग- ७)

Featured Books
Categories
Share

पाठलाग – (भाग- ७)

“गुड बाय धोंड्या…” दिपक स्वतःशीच पुटपुटला.

मनगटावर जोर देऊन त्याने खांदा वर उचलला आणि बंदुकीची नळी बरोब्बर सेट केली. तो कुठल्याही क्षणी ट्रीगर दाबणार इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो परत सावकाश पहील्यासारखा गवतात खाली झोपला. त्याने बंदुक आपल्या कानाशी आणली आणि हलकेच हलवली. आतुन बारीक किण-किण आवाज आला.

इस्माईल खाली कोसळला तेंव्हा त्याची बंदुक शेजारच्या खडकावर पडली होती आणि त्यामुळे बंदुकीच्या आतील स्प्रिंग लुज झाली होती. दिपकने सैन्यात असताना अश्या कित्तेक बंदुका हाताळल्या होत्या आणि असे अनेक बारीक-सारीक प्रॉब्लेम त्याला माहीत झाले होते.

आत्ता जर त्याने ट्रीगर दाबले असते तर गोळी सुटली नक्की असती, पण तिने अपेक्षीत वेध नक्कीच घेतला नसता. काही मिटरपर्यंत जाऊन ती गोळी पडली असती, परंतु आवाजाने दिपकचे लपण्याचे ठिकाण मात्र त्या गिड्याला कळले असते. पुढे त्याने काय केले असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीच.

दिपकने बंदुक ठेवुन दिली आणि तु सरपटत सरपटत मागे सरकला. काही मिटर्स तु उलटा कसलाही आवाज न करता जात राहीला आणि दाट झाडीत शिरल्यावर हळुच उठुन तो धावत सुटला.


पु्ढील कित्तेक सेकंद, मिनिट्स, तास दिपक वेड्यासारखा धावत होता. जरा कुठं खुट्ट वाजलं की तो सावध होई. जवळपासच्या झाडामागे किंवा गवतामध्ये लपुन परीस्थीतीचा अंदाज घेई आणि सर्व काही ठिक आहे ह्याची खात्री पटल्यावर दिशा बदलुन पुन्हा धावत सुटे.

कित्तेक वेळानंतर.. जेंव्हा हे जंगल जगाच्या अंतापर्यंतच आहे की काय असे दिपकला वाटु लागले होते.. तेंव्हा त्याला दुरुन रहदारीचा आवाज येऊ लागला होता.

गाड्यांच्या वेगावरुन जवळपास एखादा हाय-वे असावा असा दिपकने अंदाज बांधला.

रस्ता दिसु लागला तसा दिपक लपुन पुन्हा अंदाज घेउ लागला. १५-२० मिनीटं अंदाज घेतल्यानंतर दिपकला संशयास्पद असे काही आढळले नाही. रस्त्यावरुन नेहमीचीच तुरळक वाहतुक होते. माल वाहुन न्हेणारे ट्रक्स, प्रवासी बसेस आणि कार्स, क्वचीत एखाद्या जवळपासच्या गावातील मोटारसायकलवरुन जाणारे रहीवासी वगैरे.

दिपकने मोकळा रस्ता पाहुन पटकन ओलांडला आणि पलीकडच्या विरळ झाडीत शिरला. दुरवर दिपकला एक पत्र्याची शेड आणि एक झोपडीवजा घर दिसत होते. दिपक दबकत-दबकत त्या शेडच्या दिशेने जाऊ लागला.

त्या शेडमधुन रेडीओवर लागलेल्या जुन्या गाण्यांचे आवाज येत होते.

दिपकने शेडच्या खिडकीतुन आत डोकावुन पाहीले आतमध्ये कोणी दिसत तरी नव्हते. एकुण परीस्थीतीवरुन तरी ते एखाद्या मटण विक्रेत्याचे घर वाटत होते. एक टीपीकल वास वातावरणात भरुन राहीला होता. आतमध्ये सोललेले ४-५ बोकड उलटे टांगले होते.

दिपक अर्धवट लोटलेले दार उघडुन आतमध्ये शिरला तसा एक उग्र दर्प त्याच्या नाकात घुसला. दिपकने नाक घट्ट दाबुन धरले. जमीनीवर ताज्या रक्ताचा पाट वाहात होता. नुकतेच हलाल केलेले एक बोकड तेथे पाय झाडत तडफडत प्राण जाण्याची वाट पहात पडले होते. बोकडाला चिरून हात-पाय धुवायला तेथील माणुस जवळपास गेला असावा असा दिपकने अंदाज बांधला. अर्थात दिपकलाही तेथे फार वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. सर्वात प्रथम आ्वश्यकता होती ती कपड्यांची. तुरुंगातील कैद्यांचे कपडे घालुन दिपकला उघड्यावर फिरणे केवळ अशक्य होते आणि मिळालेच तर थोडेफार पैसे.

दिपक सर्वत्र शोधाशोध करु लागला. इतक्यात शेडचे दार उघडण्याचा आवाज झाला. दिपक चपळाईने शेजारील एका पिंपाच्या मागे दडून बसला. सर्वत्र माश्या मोठ्या प्रमाणात घोंगावत होत्या. जंगलातुन पळताना हाता-पायाला खरचटण्याने जखमा झाल्या होत्या त्यावर माश्या येऊन बसत होत्या. आधीच ठणकणारे त्याचे हात पाय, माश्यांमुळे अजुनच चुरचुरत होते. दिपक शक्य तितक्या हळुवारपणे माश्या हकलावत होता, परंतु त्या माश्या फिरुन-फिरुन पुन्हा त्याच्या जखमांवर येऊन बसत होत्या.

“कौन छुपा है वहा.. बाहर आओ नही तो मै पोलिसको फोन करुंगा..”, अचानक त्या शेडमध्ये आलेल्या व्यक्तीचा दिपकला आवाज ऐकु आाला.

उगाच नशीबाची परीक्षा पहाण्यात अर्थ नव्हता. दिपक तेथे लपुन बसला आहे हे त्या व्यक्तीला नक्कीच कळाले होते. उगाच त्याने पोलिसांना फोन केला असता तर नसते संकट ओढावले असते.

दिपक सावकाशपणे बाहेर आला. त्याच्या समोर एक साठीतला हडकुळा बर्‍यापैकी वृध्द गृहस्थ उभा होता. चौकटी-चौकटीची लुंगी, अंगात मळलेला बनीयन, खुरटी दाढी आणि हातात बोकड कापायचा मोठ्ठा सुरा.

अर्थात दिपकला त्याच्या सुर्‍याचे भय नव्हते. शेवटी तो वृध्द गृहस्थ होता आणि दिपक कधीही निशस्त्र असला तरी त्याला भारी पडु शकला असता. दिपकला केवळ त्याचा विश्वास संपादन करायचा होता. परंतु कैद्याचे कपडे, वाढलेली दाढी आणि अस्ताव्यस्त केस, अंगावर जखमा असा अवतार असताना समोरचा माणुस त्याच्यावर कितपत विश्वास ठेवु शकेल ह्याची मात्र त्याला खात्री वाटत नव्हती.

“चाचाजी..”, दिपक खंबीर परंतु हळुवार आवाजात म्हणाला, “देखीये, प्लिज गलत मत समजीये, मै यहा किसी गलत इरादेसे नही आया.. मै तो बस..”

“पुलिससे छुपना चाहते हो?”, समोरची व्यक्ती म्हणाली.

“जी.. जी.. हा.. नही.. मतलब.. मै यहा रुकके आपको और परेशानी मै नही डालना चाहता.. मै चला जाऊंगा यहासे, लेकीन ये कपडे..”, दिपक कैद्याच्या कपड्यांकडे बोट दाखवत म्हणाला.

त्या व्यक्तीने हातातला सुरा टेबलावर ठेवला आणि तो आतल्या खोलीत गेला.

दिपकला ते काही क्षण विलक्षण साशंकतेचे गेले. “आतमध्ये जाऊन त्यांनी पोलिसांना फोन केला तर?”, एक विचार त्याच्या मनात चमकुन गेला.

टेबलावर ठेवलेला सुरा त्याला खुणावत होता. परंतु दिपक हालचाल न करता एका जागेवरच उभा राहीला.

थोड्यावेळाने तो माणुस बाहेर आला. त्याच्या हातामध्ये काही कपडे होते ते त्याने दिपककडे दिले.

एक चुरगळलेला गंजी आणि जीर्ण झालेली एक लुंगी होती.

“बस्स येही है मेरे पास..”, असे म्हणत त्या इसमाने त्याच्या बनीयानच्या खिश्यातुन पन्नास-पन्नासच्या दोन नोटा काढुन दिपकच्या हातात दिल्या.

“चाचाजी मै…”
“बातोमै वक्त जाया ना कर.. रेडीओ मै तुम्हारे बारेमे बता रहे है… पोलीस जगह-जगह ढूड रही है…” दीपकला थांबवत तो इसम बोलला.

दिपकने पटकन आपले कपडे बदलले.

त्या इसमाने टेबलाच्या खणातून एक काजळाची डबी काढून दीपकला दिली.
दिपकने एक जाड काजळाचा थर बोटावर घेऊन ते डोळ्यातून फिरवले.

मग त्या इसमाने कडेच्या टेबलावर पडलेला एक वस्तारा उचलून दीपककडे दिला आणि म्हणाला..”दाढी निकाल दो अपनी.. तुम्हारा हुलीया थोडा तो बदल जायेगा..”

दिपकने तो वस्तारा घेतला. त्याला त्या बोकडाचे केस चिकटले होते. दिपकने पटकन तो साफ केला आणि वाढलेली दाढी कापून टाकली. मिश्यांना थोडा कट देऊन चीनी लोकांसारख्या त्या हनुवटीपर्यंत येतील अश्या ठेवल्या आणि मग त्याने आरश्यात एकवार स्वताला न्ह्याहाळले.

त्या छोट्याश्या बदलणे त्याचा चेहरा एकदमच वेगळा दिसू लागला होता. दीपक एखाद्या मुसलमानासारखा दिसत होता.

दाराबाहेर पडण्यापूर्वी तो म्हणाला..”चाचाजी, मै कौनसे इलाके मै हु? बाजूमै कौनसा गाव है?”

“ये कोल्हापूर जिला है.. तुम याहासे ३-४ कि.मी. दूर जोगे तो तुम्हे बहोत सारे ट्रक दिखेंगे जो खेतोमैसे गन्ना निकालकर दुसरे गावोमै जाते है. मुझे लगता है, तुम उन्मेसे कोई भी ट्रक मै छुपकर दूर तक जा सकते हो..”, तो इसम म्हणाला.

दिपकने त्याचे पुन्हा एकदा आभार मानले आणि तो त्या पत्र्याच्या शेड बाहेर पडला.


“सर, कोण म्हणताय इस्माईलला पोलिसांनी मारले…इस्माईलला तर त्या दिपकने मारले सर..”, तो गिड्या इन्स्पेक्टर म्हणत होता.

“काय बोलताय तुम्ही? अहो आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना…”, कमिशनर..
“सर मी काय म्हणालो हे तुमच्या आमच्यात…बाहेरील जगासाठी इस्माईलला दिपकनेच मारले. माफिया ला जर कळले तो पोलिसांच्या हातून मारला गेला तर आपला काय खर नाय.. लागू देत त्या माफियाला दीपकच्या पाठी, एक वेळ दीपक आपल्याला सापडायचा नाही.. पण डॉनच्या भावाला मारणार्याला माफिया सोडणार नाही सर.. काट्याने कट निघेल..”, तो गिड्डा इन्स्पेक्टर बोलत होता..


“हम्म ठीक आहे.. द्या तशी बातमी मिडीयाला.., पण तुम्ही गाफील राहू नका. युसुफ आणि दीपक दोघेही पकडले गेले पाहिजेत, पण मृत.. खोटा एन्कौन्टर करून टाका..”, अस म्हणून कमिशनर ताड-ताड पावल टाकत बाहेर पडले, तर तो गिड्डा इन्स्पेक्टर पोटावरून खाली घसरणारी पेंट सावरत मिडिया रूम च्या दिशेने गेला..

दीपक लपत छपत कुठे पोलीस नाहीत न हे पाहत चालला होता.. पण त्याला ह्याची बिलकुल माहिती नव्हती कि पोलिसांच्या आधी माफियाची टोळी त्याच्या मागावर निघाली आहे..

एकीकडे पोलिसांचा ससेमिरा तर दुसरीकडून माफियाची भीती अश्या दुहेरी कात्रीत स्वताच्या जीवाला जपत दीपक कुठवर जाणार? पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत राहा.. पाठलाग….

[ क्रमशः ]