Pathlag - 6 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग – (भाग- ६)

Featured Books
Categories
Share

पाठलाग – (भाग- ६)

सेकंदामागुन सेकंद, मिनीटा मागुन मिनीट जात होती पण युसुफचा काहीच पत्ता नव्हता. दिपकची चलबिचल वाढत चालली होती. इतकं अस्वस्थ, इतकं हतबल त्याला यापुर्वी कधीच वाटले नव्हते. पिंजर्‍यात ठेवलेल्या

एखाद्या हिंस्त्रपशुसारखा तो इकडुन तिकडे येरझार्‍या घालत होता. इतक्यात त्याला बाहेर हालचाल जाणवली.

दिपक सावध झाला. हळुवारपणे त्याच्या कोठडीच्या कुलुपात एक किल्ली सरकवली गेली होती आणि अत्यंत सावकाशपणे ती किल्ली फिरवुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत होता. थोडावेळ खुटपुट झाल्यावर एकदाचे

ते दार उघडले गेले. दारामध्ये युसुफ उभा होता.

युसुफला बघताच दिपकचा जिव भांड्यात पडला.

“चल लवकर..”, युसुफ म्हणाला..

क्षणाचाही विलंब न करता दिपक बाहेर पडला. व्हरांड्यात युसुफच्या मागे अजुन एक कैदी उभा होता. तो ‘इस्माईल शेख’ असावा हे दिपकने ताडले. त्याला पहाताच दिपकची मस्तकाची शिर ताणली गेली. शेवटी काही झालं तरीही तो एक टेररीस्ट होता, एका माफीयाचा भाऊ.. एक देशद्रोही.

युसुफने दिपकच्या चेहर्‍यावरील भाव हेरले तसा तो म्हणाला.. “चला लवकर चला, आपल्याकडे फार वेळ नाहीये.. आधी भटारखाना…”

पुढे युसुफ, त्याच्यामागे इस्माईल आणि सगळ्यात शेवटी दिपक. व्हरांड्यातील अंधाराचा फायदा घेउन तिघं जण एका मागोमाग एक जात होते. लपत छपत सर्वजण शेवटी एकदाचे सर्वजण भटारखान्यात पोहोचले.

युसुफने खिश्यातुन रॅटकिलच्या गोळ्या आणि एका छोट्या बाटलीत भरलेले फिनाईल काढले. इस्माईलने एव्हाना चिकनचे काही पिसेस पातेल्यात काढुन ठेवले होते. युसुफने त्या गोळ्या बारीक बारीक करुन त्या पिसेसवर टाकल्या आणि त्यावर फिनाईल होतले व ते सर्व मिश्रण एकजिव केले.

“युसुफ.. पण हे पिसेस त्या कुत्र्यांना देणार कसे… आधीच त्या चिकनचा वास आणि त्यात आपला अनोळखी वास.. ती कुत्री सतर्क होऊन लगेच आपल्याकडे धाव घेतील…”, दिपकने शंका उपस्थीत केली.
“नाही आपण त्यांच्या जवळ नाही जायचे. आपल्याला अंधारातच हे खाद्य फेकावे लागेल.. दुसरा पर्याय नाहीये…”, युसुफ म्हणाला.

तिघंही जणं ते पातेलं घेउन अंगणात आले. दिपकला जणु आपण नग्न होऊन चालले आहोत असंच वाटत होतं. सर्व बाजुने मोकळं पटांगण होतं. कुणाचीही नजर पडली असती तरी त्यांना हे तिघं जण सहज दिसले असते. लपायला काहीच जागा नव्हती.

झपझप चालत तिघंही कुत्र्यांच्या पिंजर्‍याजवळ पोहोचले. पिंजरा रिकामाच होता ह्याचाच अर्थ ती कुत्री त्यांच काम करत होती.

“दहा कुत्री आहेत एकुण..”, युसुफ हळुच कुजबुजला.. “कुत्री कसली..कोल्हेच ते.. एक कुत्र आपल्या तिघांना भारी पडेल….”
“युसुफ भाय.. जो भी करना है.. जल्दी करो.. मुझे साला ये मामु लोग, और कुत्ता लोगोंसे बहोत डर लगताय..”, इस्माईल पहील्यांदाच बोलला. त्याचा आवाज फार जड होता आणि बोलताना त्याला धाप लागत होती.

युसुफने एकदा मान डोलावली आणि मग एक चिकन पिस घेऊन जोरात अंधारात दुरवर भिरकावला..

दुरवर कुठेतरी धप्प असा आवाज आला आणि परत शांतता…. कसलीच हालचाल जाणवत नव्हती..

युसुफने अजुन एक पिस उचलला आणि आधी फेकला होता त्याच्यापासुन थोडा लांब अजुन एक पिस भिरकावला.. आणि परत अजुन एक करत करत साधारण वेगवेगळ्या दिशेने ते तुकडे फेकुन दिले. आता वाट बघण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते.

प्राण कानात आणुन तिघेही जण हालचालींचा अंदाज घेऊ लागले.

इस्माईल काहीतरी बोलणार एव्हढ्यात दिपकने त्याला खुणेनेच शांत केले आणि दुरवर कुठेतरी तो बोट दाखवु लागला.

दुरवरुन कुत्र्यांच्या गुरगुरीचा आवाज ऐकु येत होता. मधुनच चमकुन जाणार्‍या दिव्यांच्या प्रकाशात कुत्र्यांच्या सावल्या आणि त्यांच्या भांडणात उडणारी धुळ दिसत होती. मच्चक.. मच्चक्क आवाज करत ते चिकनचे तुकडे गपागप ओरबाडुन खात होते.

युसुफने आपले दोन्ही हात पुढे केले आणि इस्माईल आणि दिपकने हळुवारपणे त्याला एक एक टाळी दिली.

“दस्स मिनीट और..”, युसुफ इस्माईलकडे पहात बोलला..

हळुहळु कुत्र्यांच्या गुरगुरीचा आवाज कमी होत गेला आणि काही वेळाने पुर्ण शांतता झाली. परंतु धोका पत्करण्यात अर्थ नव्हता. तिघंही जण पुढची १० मिनीटं कानोसा घेत बसुन राहीले परंतु कुत्र्यांच्या हालचालीचा कोणताही आवाज आला नाही.

“चलो… शो टाईम..”, पुन्हा माघारी वळत युसुफ म्हणाला..

तिघंही सरपटत पुन्हा इमारतीत आणि तेथुन भटारखान्यात आले. पुढची १० मिनीटांत तिघांनीही मिळेल ते खाण्याचं सामान पिशव्यांमध्ये भरुन घेतले आणि मोर्चा सिलेंडर्सकडे वळवला.

सिलेंडर्स पुर्ण भरलेले होते त्यामुळे ते आवाज न करता ओढत न्हेण्याची कसरतीत काही क्षणांतच तिघांची दमछाक झाली. घामाने निथळत तिघंही जण पुन्हा पुर्वीच्या ठिकाणी येऊन पोहोचले. तेथुन काही पावलांवरुन पुढे स्पॉटलाईटच्या प्रकाशाचा झोत येत होता. मनोर्‍यांवर बंदुक घेऊन उभे असलेल्या पोलिसांची करडी नजर त्या उजळलेल्या प्रकाशातुन फिरत होती.

“युसुफ..”, दिपक हळु आवाजात म्हणाला.. “दोन प्रकाशांमध्ये फक्त ५ सेकंदांचा डिले आहे. इतक्या कमी वेळात एका सेक्शनमधुन दुसर्‍या सेक्शनमध्ये जायचे.. थोडे अवघड वाटतय…”

“फक्त ५ सेकंद.. तु वेळ नक्की मोजली आहेस?”, युसुफ..
“येस्स..नक्की.. पाहीजे तर परत मोजु..”, दिपक

दिपक आणि युसुफने पुन्हा एकवार वेळ मोजली.. जेमतेम ५ सेकंद होत होते.

“मग आता?”, युसुफ

“मला वाटतं, आपल्याला सिलेंडर्समधला गॅस थोडा कमी करावा लागेल. पुर्ण भरलेले असल्याने हे फारच जड आहेत..”, दिपक

“पण गॅस कमी करुन, आपल्याला तो कमी पडला तर? भिंत फुटलीच नाही तर?”, युसुफ..
“पुढचं पुढे, पण आत्ता हे नक्की आहे की हे जड सिलेंडर्स आपण तेथपर्यंत न्हेऊ शकणार नाही..”, दिपक

युसुफने काही क्षण तो सिलेंडर उचलुन पाहीला आणि मग त्याने होकारार्थी मान डोलावली.

तिघांनीही सिलेंडर्सवरचा नॉब हलवुन लुज केला आणि त्यातुन गॅस बाहेर जाऊ लागला.

पाच-एक मिनीटांनंतर तिघांनीही सिलेंडर्स बंद केले. दिपकने एकदा सिलेंडर उचलुन बघीतला आणि मग त्याने समाधानदर्शक मान डोलावली.

“ऑन अ काऊंट ऑफ़ फ़ाइव्ह….वन.. टु.. थ्री.. फ़ोर.. फाईव्ह.. गो..”

तिघांनीही आपले सिलेंडर्स उचलले आणि काही काळापुरत्या निर्माण झालेल्या अंधारातुन ते पुढे सरकले.

“१..२..३..४..५.. स्टॉप..”, दिपकने सगळ्यांना थांबायला सांगीतले.

प्रखर प्रकाशाचा एक झोत तिघांच्या अगदी जवळुन निघुन गेला. तिघांनीही पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि सिलेंडर्स उचलुन पुढच्या अंधार्‍या भागाकडे धाव घेतली. हळु हळु करत तिघं जण पुढे सरकत होते. तिघांनाही चांगलाच दम लागला होता, पण इस्माईल.. तो तर अक्षरशः धापा टाकत होता..

“युसुफ भाय.. मै अब और नही उठा सकता…”

दिव्याचा प्रखर प्रकाश तिघांच्या जवलुन निघुन गेला.. त्या मंद प्रकाशात इस्माईलचा घामेजलेला चेहरा दोघांनी पाहीला. त्याला श्वास पुरत नव्हता. नाका-तोंडाने तो जोरजोरात श्वाछोत्वास करत होता.

“नाही म्हणजे??”, दिपकने विचारले…
“मुझे.. हाय बि.पी. है.. मैने इसे और उठाके चला तो मेरा दिल फट जायेगा.. और नही चल पाऊंगा मै..”
“अरे पण हे आधी सांगायचं ना… आपण तुझा सिलेंडर घेतला नसता आणि आमचे सिलेंडर्स फुल्ल ठेवले असते..”, युसुफ

“युसुफ.. आपले सिलेंडर्स अर्धे आहेत.. भिंत फोडायला हे नक्कीच खुप कमी आहेत.. आपल्या दोघांनाच त्याचा सिलेंडर न्हावा लागेल..”, दिपक

“पण कसा? आपली काय कमी दमछाक झाली आहे का? एक न्हेतानाच इतका त्रास, दोन कसे न्हेऊ शकु?”, युसुफ

“हे बघ.. आपण त्याच्या सिलेंडर आत्ता इथेच ठेवुन एक सेक्शन पुढे जायचे.. मग आळीपाळीने दोघांपैकी एकाने मागे येऊन त्याचा सिलेंडर घेऊन परत पुढे यायचे.. मग परत एक सिलेंडर मागे ठेवुन नेक्स्ट सेक्शन.. परत एकाने मागे.. असंच करावं लागेल..”, दिपक

“पण वेळ खुप जाईल.. आत्ताच माझ्या हिशोबाने ३.३० वाजत आले असतील. आपल्याला उजाडायच्या आतच जंगलात शिरावे लागेल..”, युसुफ

“पर्याय नाहीये दुसरा.. लेट्स गो..”, दिपक

आणि अश्या रीतीने तिघं जण पुढं मागं.. पुढं मागं करत करत एक एक टप्पा ओलांडत जाऊ लागले. मिट्ट काळोखात पुढे काय आहे, भिंत अजुन किती दुर आहे ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. क्षणभरासाठी का होईना प्रकाशझोत जवळुन गेला की छातील चर्र होत असे. कधी कुठुन पोलिसाची गोळी येऊन छातीचा वेध घेईल हीच भिती मनात बाळगत तिघांचा प्रवास सुरु होता.

अखेर अथक प्रयत्नांनंतर तिघंही जण भिंतीपाशी येऊन पोहोचले. सिलेंडर्स खाली ठेवुन तिघही जण भिंतीच्या कोपर्‍यात मट्कन बसले. शारीरीक आणि मानसिक कसोटी पहाणारा हा तासाभराचा प्रवास चांगलाच दमछाक करणारा होता. विश्रांती अत्यावश्यक होती, परंतु वेळ जास्ती नव्हता.

दम खाता खाताच युसुफने खिश्यातुन कपड्यांचे एक मोठ्ठे भेंडोळे काढले आणि इस्माईलकडे दिले. बहुतांश कपडे हे कैद्यांचे होते तर काही सटर-फटर फडकी होती.
तिघांमध्ये इस्माईलच त्यातल्या त्यात कमी दमलेला होता कारण त्याच्याकडे सिलेंडर नव्हता. त्याने ते कपडे एकमेकांमध्ये गाठ मारुन बांधायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याची एक मोठ्ठी लंबुळकी शेपटासारखी दोरी तयार झाली. त्याने तिन्ही सिलेंडर्स एकत्र ठेवले, त्याच्या टोकाला ह्या दोरीचे एक टोक बांधले आणि युसुफकडे पाहुन थम्ब्स अप केले.

युसुफ आणि दिपक लगेच जागेवरुन उठले आणि त्या दोरीचे दुसरे टोक घेउन भिंतीच्या आधाराने लांब जाऊन उभे राहीले. मागोमाग इस्माईलही त्यांच्याबरोबर जाऊन थांबला.

“धिस इज इट…”, दिपक म्हणाला.. तसे युसुफने खिश्यातुन काड्यापेटी काढली आणि एक काडी पेटवुन कपड्यांच्या त्या दोरीला लावली.

कपडे पेटत पेटत पुढे जाउ लागले तसे तिघंही अजुन थोडे लांब सरकले आणि कान झाकुन डोकं गुडघ्यात घालुन बसुन राहीले. कपडे पेटत पेटत सिलेंडर्सच्या दिशेने जात होते. तिघांनीही कान घट्ट झाकुन घेतले. ‘सुर्र..सुर्र’ आवाज करत आग सिलेंडर्सच्या जवळ पोहोचली आणि काही क्षणातच ‘धडाम्म’ असा आवाज आला. प्रकाशाचा आणि धुराचा एक लोळ हवेत उसळला. भिंतीचा काही भाग नक्कीच तुटला होता कारण सिमेंट आणि विटांचे तुकडे तिघांच्या अंगावर येउन आदळले होते.

विजेच्या वेगाने तिघेही जण उठले आणि भिंतीकडे धावले.

त्या मोठ्या धमाक्याने सगळेच जागे झाले होते. पहीले काही क्षण काय झाले हे शोधण्यात गेल्यानंतर त्यांना कारण उमगायला वेळ लागला नाही. जेथे विस्फोट झाला होता त्या दिशेने अजुनही धुर निघत होता. क्षणार्धात धोक्याचे सायरन वाजु लागले. शिट्या वाजवत पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली.

तिघंही जण्ं एव्हाना भिंतीजवळ पोहोचले होते. तिघांनीही भिंत पाहीली आणि त्यांना एक धक्का बसला. त्यांच्या दृष्टीने भिंतीला एखादे खिंडार पडलेले असणे अपेक्षीत होते, पण वास्तवदर्शी भिंतीचा वरवरचा थर निघाला होता आणि आतील विटा दिसत होत्या.

तुरुंगाच्या इमारतीत होणारी हालचाल त्यांना दिसत होती. सायरनचा आणि शिट्यांचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. हातावर हात धरुन बसण्यात अर्थ नव्हता. तिघांनीही तत्परतेने लाथा मारुन उरलेली भिंत पाडायला सुरुवात केली. पहीले काही आघात सहन केल्यावर डचमळीत झालेली भिंत पडायला सुरुवात झाली. परंतु ह्यात वेळ जात होता. धावत येणार्‍या पोलिसांनी एव्हाना गोळीबार सुरु केला होता. त्या गोळ्या त्यांच्यापासुन काही अंतरावर येऊन पडत होत्या. फार वेळ हातात नव्हता. काही क्षणातच ते पोलिस जवळ येतील आणि त्यांच्या गोळ्या तिघांपैकी कुणाच्या अंगात घुसण्याची शक्यता होती.

तिघांनीही आपला जोर आणि वेग वाढवला. भिंतीत निर्माण झालेल्या फटींमधुन आता तिघांनीही विटा ओढुन काढायला सुरुवात केली आणि काही क्षणातच कसेबसे जाता येईल इतपत खिंडार निर्माण झाले. तिघंही पट्कन त्यात घुसुन बाहेर पडले आणि त्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांच्या शिट्यांचा आवाज जवळ जवळ येत चालला होता. पोलिस भिंतीतुन बाहेर पडायला सुरुवात झाली तेंव्हा तिघंजण सुरुवातीच्या विरळ जंगला शिरले होते.

पहाट व्हायला सुरुवात झाली होती आणि वातावरणात मंद प्रकाश पसरला होता.

“आपण तिघंही वेगवेगळ्या दिश्यांनी जाऊ या, त्यामुळे एकाच दिशेने येण्याऐवजी पोलिस तिन दिश्यांमध्ये विभागले जातील”, दिपक म्हणाला..

“नको नको.. आपण एकत्रच राहु.. पोलिसांचा एकत्रीत मुकाबला करता येईल..”, इस्माईल..

“नाही.. दिपक म्हणतो ते बरोबर आहे.. एकत्र रहाण्यात धोका आहे..”, युसुफ

इस्माईलने काहीश्या नाराजीनेच दोघांकडेच बघीतले. इकटे रहाण्याच्या विचारानेच त्याला घाम फुटला होता पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

पोलिसांचा आवाज जवळ जवळ येत होता. अंधारात तिर मारल्याप्रमाणे ते कुठेही बेछुट गोळीबार करत होते.

दिपकने कुणाकडेही लक्ष न देता अंधारात धाव घेतली. युसुफ आणि इस्माईलही मिळेल त्या वाटेने धावत सुटले.

दिपकचा अंदाज बरोबर होता. तिघंही वेगवेगळ्या दिशेने गेल्यामुळे पोलिस काही क्षण गोंधळले आणि मग तिन गट करुन तिघंही त्यांच्या मागे धावले.

दिपक वेडा-वाकडा कसाही धावत सुटला होता. परंतु त्याला फायदा होता त्याच्या सैनिकी ट्रेनिंगचा. मोकळ्या जागा शक्यतो टाळत तो झुडपांच्या आणि दाट झाडीच्या आधाराने वेगाने धावत होता. परंतु तेथे तैनात असलेले पोलिससुध्दा मुरलेले होते. त्याच भागातले असल्याने त्यांना तेथील परीस्थीतीचा अंदाज होता. दिपक आणि त्याच्या मागे असलेल्या पोलिसांमधील अंतर वेगाने कमी होत होते.

दिपकने एका घनदाट झाडीची जागा पाहुन त्या झुडुपात उडी घेतली आणि तेथेच आडोश्याने तो लपुन राहीला. त्याला त्या झुडुपांच्या आडुन दुर अंतरावर खाकी वर्दीतील एक पोलिस दिसत होता. दिपक त्याच्या नजरेआड झाला तसा त्याचा धावण्याचा वेग मंदावला. तो आता हळु हळु चालत चालत दिपक लपला होता त्या दिशेने येत होता.

दिपक श्वास रोखुन कसलीही हालचाल न करता गप्प बसुन त्याची हालचाल टिपत होता.

तो पोलिस सावध पवित्र्यात हातातील बंदुक रोखुन धरत पुढे पुढे सरकत होता.

दिपकच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. त्या पोलिसाला जरा जरी संशय आला असता तरी अंदाजाने का होईना त्याने दिपकच्या दिशेने गोळीबार करायला मागे पुढे पाहीले नसते.

नुसते बसुन रहाणे अशक्य होते. दिपकने त्या पोलिसावर हल्ला चढवायचे ठरवले. हलक्या हताने जोर देऊन तो तळव्यांवर उठुन बसला. तो पोलिस अजुन जवळ आला की त्याच्यावर उडी घ्यायची ह्या उद्देशाने तो तयारीत होता. त्याची नजर त्या पोलिसावर रोखलेली होती. इतक्यात त्या पोलिसाच्या मागे झुडुपात झालेली हालचाल त्याने टिपली. पोलिसाच्या मागुन इस्माईल हळु हळु पुढे सरकत होता. त्याची नजर पोलिसाच्या पाठीवर होती. दिपकला त्याने खचीतच पाहीलेले नव्हते.

दिपक श्वास रोखुन दोघांच्या हालचाली पहात होता. इस्माईल हळु हळु पोलिसाच्या जवळ आला आणि त्याने अचानक पोलिसावर उडी घेतली. तो पोलिस बेसावध होता. इस्माईलच्या अनपेक्षीत हल्याने तो खाली कोसळला. त्याची बंदुक फेकली गेली. इस्माईलने दोन्ही हातात त्याची मान पकडली आणि पुर्ण जोर देऊन तो पिरगळु लागला.

त्या पोलिसाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण गळाच आवळला गेला असल्याने त्याची शक्ती कमी कमी होत गेली आणि काही वेळातच तो गतप्राण होऊन खाली कोसळला.

इस्माईलने इकडे तिकडे पाहीले आणि मग खाली उचलुन त्या पोलिसाची बंदुक उचलली आणि जाण्यासाठी मागे वळला एवढ्यात ‘धाड्ड’ असा आवाज आला.

कुठुन तरी दुरुन आलेल्या पोलिसाच्या एका गोळीने इस्माईलच्या डोक्याचा वेध घेतला होता. त्याचे डोके फुटले आणि तो दिपकच्या समोरच कोसळला. गरम रक्ताचा एक शिडकावा दिपकच्या अंगावर उडाला. क्षणार्धात घडलेल्या त्या घटनेने दिपक भांबावुन गेला. क्षणभर तो जागेवरुन उठणार होताच, पण त्याने स्वतःला सावरले आणि तो जागेवरच बसुन राहीला. पोलिसाची ती बंदुक त्याच्या समोरच पडली होती. सावकाशपणे त्याने ती बंदुक ओढुन त्याब्यात घेतली आणि ज्यादिशेने इस्माईलवर गोळी झाडण्यात आली होती त्या दिशेने तो पाहु लागला.

थोड्यावेळाने तिकडुन तो जाड्या गिड्या पोलिस लांब पल्ल्याचा वेध घेणारी, दुर्बीण लावलेली बंदुक घेऊन सामोरा आला. अंदाज घेत घेत तो पुढे सरकत होता.

दिपकने हातातील बंदुक लोड केली आणि त्या पोलिसावर नेम धरला. त्याचे डोके दिपकच्या निशाण्यावर होते. एकामागुन एक आठवणी दिपकच्या मनात जाग्या झाल्या. आजवर त्याने कुत्र्यासारखा मार त्या गिड्याकडुन खाल्ला होता. लाथा-बुक्या त्याच्या शरीरावर दिवस-रात्र बरसल्या होत्या त्याची भरपाई करण्याची वेळ येऊन ठेपली होती. बस्स एक चाप ओढायचा आणि तो गिड्डा पोलिस जमीनदोस्त होणार होता.

दिपकने ट्रिगरवर बोट ठेवले……..


[क्रमशः]