स्त्री शिक्षणाचे शिल्पकार : महर्षी कर्वे!
'महर्षी अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार होते......'
(प्रल्हाद केशव अत्रे)
मुरुड हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव. या गावात केशवपंत कर्वे या नावाचे सद्गृहस्थ राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते. लक्ष्मीबाईंचे माहेर शेरवली हे गाव. कर्वे कुटुंब तसे गरीब होते. दोघांचाही स्वभाव स्वाभिमानी होता. पती-पत्नीची विचारसरणी उच्च दर्जाची होती. १८ एप्रिल १८५८ या दिवशी या दांपत्याच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मले. त्यावेळी लक्ष्मीबाई या बाळंतपणासाठी माहेरी म्हणजे शेरवली येथे आल्या होत्या. दोन्ही कुटुंबात अत्यंत आनंद झाला. मुलाचे नाव धोंडो उर्फ अण्णा असे ठेवण्यात आले. आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि उत्तोमोत्तम संस्कार करण्याची केशवराव आणि लक्ष्मीबाई यांची इच्छा होती. अण्णा यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथील प्राथमिक शाळेत झाले. या शाळेत त्यांना सोमण गुरुजी शिकवत होते. सोमण गुरुजींकडून अण्णांना लोकसेवेची प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले. या काळात प्राथमिक शिक्षण घेणेही किती अवघड होते याची जाणीव धोंडो कर्वे यांच्या एका अनुभवावरून सहज लक्षात येईल. धोंडो केशव कर्वे हे सहाव्या वर्गात शिकत असतानाची गोष्ट. सहावीची परीक्षा देण्याची व्यवस्था गावी नव्हती. तिथून १२५ मैल अंतरावर असलेल्या सातारा या गावी जावे लागायचे.सातारला जाण्यासाठी कोणतीही वाहन व्यवस्था नव्हती केवळ एक पर्याय होता तो म्हणजे कुंभार्ली घाटातून पायी जावे लागे. धोंडो केशव कर्वे सहावीची परीक्षा देण्यासाठी ठाम होते. तीन दिवस सतत पायी प्रवास करून अण्णा कर्वे सातारा येथे पोहोचले. अशाप्रकारे पुढे सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अण्णांनी मुरुडच्या प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी रत्नागिरी येथील शाळेत प्रवेश घेतला.
१८७२ या वर्षी धोंडो केशव कर्वे यांचा विवाह राधाबाई यांच्यासोबत झाला.विवाहसमयी धोंडो केशवराव यांचे वय चौदा वर्षांचे तर राधाबाईंचे वय केवळ आठ वर्षांचे होते. अण्णा १८८१ यावर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बी. ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १८८४ यावर्षी अण्णा बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. गणित विषयात ते पहिले आले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन या शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. गणित हा त्यांच्या अध्यापनाचा विषय होता. १८९१ हे वर्ष अण्णांच्या जीवनात प्रचंड उलथापालथीचे ठरले. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी राधाबाई यांचा बाळंतपणात दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षांचा कालावधी लोटला आणि अण्णांनी दुसरा विवाह केला. विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अण्णांनी आपल्या मताशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. अण्णांनी केलेले दुसरे लग्न अनेकांना वरवर त्यांचा स्वतःचा स्वार्थ दिसत असला तरी ते एक प्रकारचे बंड होते. 'आधी केले मग सांगितले' या विचारसरणीनुसार त्यांनी१८९३ यावर्षी गोदूबाई नावाच्या एका विधवा तरुणीशी विवाह केला. या निर्णयाचे परिणामही त्यांना भोगावे लागले. परंपरा मोडीत काढून एक नवीन पायंडा सुरु केल्याचा निषेध म्हणून गावातील लोकांनी त्यांना बहिष्कृत केले. त्यांना विविध दुषणे दिली. अगदी जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. गोदूबाई जशी बालविधवा तशीच त्यांची विचारसरणी बंडखोर होती. सामाजिक विरोध प्रखर असतानाही गोदूबाई यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या शाळेत शिकायला सुरुवात केली. गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे या नावाने ख्यातकीर्त झाल्या. अण्णासाहेब कर्वे यांच्या प्रत्येक कार्यात आनंदीबाई हिरीरीने भाग घेत असत.
आनंदीबाई कर्वे यांनी पुढे शिक्षण घ्यावे ही जशी स्वतः आनंदीबाई यांची इच्छा तशीच महर्षी कर्वे यांचीही इच्छा होती. दिवसभर कितीही काम केले असेल तरीही कर्वे रात्री उशिरापर्यंत आनंदीबाईंना शिकवत असत. लग्नाच्या अगोदर त्या जशा पंडिता रमाबाई यांच्या प्रोत्साहनामुळे शारदा सदन शाळेत शिक्षण घेत होत्या त्याचप्रमाणे विवाह झाल्यानंतर पती धोंडो केशव कर्वे यांच्या आग्रहामुळे त्यांनी पुन्हा शारदासदन याच शाळेत शिकायला सुरुवात केली. आनंदीबाईंचे मोठेपण यात दडलेले आहे की, त्या महर्षी कर्वे यांच्या पत्नी असूनही त्यांनी कधीही पतीचे दडपण घेतले नाही. उलट पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कार्यात त्यांना बहुमोल साथ देत असत. संसाराची सारी कर्तव्ये पार पाडताना अनेक महिला आणि अनाथ मुलांना त्यांनी सदोदित मदतीचा हात दिला. आश्रमाचा खर्च चालविण्यासाठी छोटीमोठी कामे करत असताना देणग्या गोळा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता, परखड असाच होता. लोकनिंदेची पर्वा न करता हाती घेतलेले कम पूर्णत्वास नेणे ही त्यांची खासियत होती.
विधवाविवाहाची सुरुवात स्वतः करुन अण्णासाहेब थांबले नाहीत. त्यांनी ३१ डिसेंबर १८९३ रोजी 'विधवा विवाह संघ' या मंडळाची स्थापना केली. हे मंडळ 'विधवा विवाहोत्तेजक मंडळ' या नावानेही ओळखल्या जात असे. आपण सुरु केलेल्या कार्याला गती मिळावी, या कार्यात समाजाचा अधिक प्रमाणात सहभाग मिळावा म्हणून अण्णांनी १ मे १८८४ या दिवशी पुनर्विवाहा करणारांचा एक कौटुंबिक मेळावा घेतला. पुनर्विवाहाची गरज, अडचणी, फायदे-तोटे अशा अनेक विषयांवर चर्चा केली. अण्णांनी अनाथ मुलींना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल टाकले. १८९६ या वर्षात त्यांनी 'अनाथ बालिकाश्रम' सुरु केला. बालिका आश्रमाच्या संदर्भात अण्णांनी त्यांच्या आत्मचरित्रात असे लिहिले आहे की,'आश्रमापासून झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे खुद्द विधवांच्या अंतःकरणात त्याने जो आशेचा अंकुर उत्पन्न केला तो होय. हिंदूंच्या ज्या जातीत विधवाविवाह रुढ नाही, त्या जातींतील अल्पवयस्क विधवांना शिक्षण देऊन, त्यांची मने सुशिक्षित करून, त्यांना स्वावलंबी होता येईल असे साधन हस्तगत करून देणे व आपले जीवित उपयोगी असून ते कोणत्या तरी कार्याला लावता येईल असा विश्वास त्यांच्यामध्ये उत्पन्न करणे, हे आश्रमाचे उद्देश आहेत व ते चांगल्या रीतीने तडीला जात आहेत.' या वाक्यातील 'त्यांची मने सुशिक्षित करून...' हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. माणूस शिकला, पदवी हातात पडली म्हणजे त्याचे मन सुशिक्षित होते असे नाही. ज्ञानात भर पडेल, सर्वांगीण उन्नती होईल पण माणसाच्या मनाचे काय? तो जर परंपरागत, कुणावर तरी अन्याय करणाऱ्या रुढींना कवटाळून बसला, सकारात्मक विचारसरणीची अवहेलना करीत असेल तर तो कोत्या मनाचा आहे, त्याचे मन शिक्षित झालेले नाही. अशीच भूमिका ही शब्दरचना करताना कर्वेंची असू शकते. विधवा महिलांना हक्काचे ठिकाण मिळाले पाहिजे यासाठी अण्णांनी पुणे शहराजवळ हिंगणे येथे एका महिला आश्रमाची स्थापना केली. हा आश्रम सुरुवातीला एका माळरानावर सुरु झाला. 'छोटी झोपडी' ही या आश्रमाची पहिली इमारत होती. अण्णांनी चालविलेल्या महिलांविषयक कार्याने प्रेरित होऊन हिंगणे येथील एक दानशूर व्यक्ती रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी स्वतःची सहा एकर जागा आणि सातशे पन्नास रुपयांची रक्कम अण्णांकडे सुपूर्त केली. दरम्यान अण्णासाहेब एकदा जपान या देशात गेले होते. स्त्री शिक्षण विषयक त्यांना प्रचंड तळमळ आणि आस्था होती. जपान येथील वास्तव्यात त्यांनी तिथल्या महिला विद्यापीठाला भेट दिली. तिथे असलेला अभ्यासक्रम आणि स्त्री शिक्षणाच्या कार्यक्रमाने अण्णा खूप प्रभावित झाले. त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर त्यांनी अनेकांशी चर्चा करून पुणे शहरात महिला विद्यापीठाची स्थापना केली.अण्णा कर्वे यांची महिला शिक्षणाची तळमळ पाहून विठ्ठलदास ठाकरसी नावाचे दानशूर गृहस्थ समोर आले. त्यांनी अण्णांनी सुरू केलेल्या महिला विद्यापीठाला थोडीथोडकी नाही तर चांगली पंधरा लाख रुपयांची घसघशीत देणगी दिली. कृतकृत्य झालेल्या अण्णांनी ठाकरसी यांच्या दानत्वाचा सन्मान म्हणून महिला विद्यापीठाला 'श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी भारतीय महिला विद्यापीठ' हे नाव दिले. भारतातील पहिले महिला विद्यापीठ अशी या विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पोहोचली. या महिला विद्यापीठाचे बोधवाक्य 'संस्कृता स्त्री पराशक्ती:' असे होते. विशेष म्हणजे हे बोधवाक्य अण्णांनी सुचविले होते. या विद्यापीठात प्रपंचशास्त्र, गृहशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायनकला अशा प्रकारचे विषय ठेवले होते. यामागे प्रमुख हेतू हा होता की, समाजात वावरताना महिलांना आवश्यक सारे ज्ञान असावे. यासोबत विद्यापीठात माध्यमिक शिक्षण पदवी, गृहजीवन पदवी, आरोग्य परिचारिका असे विषय अभ्यासक्रमात होते. महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांच्या उद्धाराकरिता निर्माण करण्यात आलेल्या संस्थाचे कार्य नि:स्वार्थपणे व त्यागी वृत्तीने करणारे समाजसेवक तयार करणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून 'निष्काम कर्म मठ' हे मंडळ कार्यान्वित झाले. कर्वे यांनी मुरुड फंड, निष्काम मठ, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, समता संघ अशा अनेक संस्था स्थापन केल्या होत्या. निष्काम मठ या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'भारत सेवक समाज' या संस्थेकडून मिळाली. परंतु कार्यव्याप वाढत गेल्यामुळे या सर्व मंडळांचे एकत्रीकरण करून 'महर्षी कर्वे शिक्षण संस्था' हे नाव देण्यात आले. महिला स्वावलंबी व्हायला हव्यात, त्या कर्तृत्ववान बनाव्यात हे उद्देश समोर ठेवून अण्णांनी आपल्या संस्थाच्या शाखा राज्यात ठिकठिकाणी स्थापन केल्या. दानशूर व्यक्ती मदत करत असल्या तरीही संस्थेपुढे नेहमीच पैशाची अडचण भासत असे. त्यासाठी अण्णांनी वर्षानुवर्षे हिंगणे ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत पायी प्रवास केला परंतु घेतलेला वसा सोडला नाही. अतिशय जिद्दीने, धाडसाने, आत्मविश्वासाने ते आपले कार्य पुढे पुढे नेत होते. अण्णांच्या संस्थेमध्ये राहणाऱ्या अनेक महिला अण्णांना म्हणत, 'अण्णा तुम्ही नसते तर आमचे काय झाले असते हो?'
अण्णासाहेब कर्वे ज्या ज्या वेळी परदेशात जात असत त्यावेळी ते आवर्जून त्या देशात महिला विषयक ज्या योजना सुरू असत त्याची माहिती करून घेत आणि भारतात राबवित असलेल्या महिला पुनरुत्थानपणाच्या योजनांचीही माहिती तिथे मुद्दाम सांगत असत. महर्षी कर्वे शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला 'बाया कर्वे' या नावाचा पुरस्कार देते.
धोंडो केशव कर्वे यांना महिलांवर होणारे अत्याचार, महिलांना पुरुषांच्या मानाने दिली जाणारी दुय्यम वागणूक अशा गोष्टींचा खूप राग येत असे. पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कार्याने आणि विचारांनी ते भारावून गेले होते. अण्णांना प्रभावित करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर! स्पेन्सर यांच्या विचारांचा पगडा अण्णांच्या एकूण विचारांवर जाणवत असे.
सुरुवातीला धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची अनेकांनी अवहेलना केली, त्यांना वाळीत टाकले असले तरी कालांतराने त्यांचे विरोधक त्यांचे प्रशंसक झाले. देशातील अनेक लोक त्यांना आदराने महर्षी म्हणून संबोधत असत. कर्वे यांच्या कार्याची वेळोवेळी सरकार दरबारी नोंद होत होतीच. बनारस आणि पुणे येथील विद्यापीठांनी कर्वे यांना डी. लिट ही सन्मानाची पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने अण्णांच्या कार्याचा गौरव करून एल. एल. डी. ही पदवी बहाल केली. भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 'पद्मविभूषण' ह्या किताबाने सन्मानित केले. भारत सरकारच्यावतीने देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे 'भारतरत्न'! धोंडो केशव कर्वे यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार १९५८ यावर्षी देऊन सन्मानित करण्यात आले. भारतरत्न हा पुरस्कार मिळणारे महर्षी कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन होते. भारत सरकारच्या टपाल विभागाने महर्षी कर्वे यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट काढून त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे १९५८ साली मुंबई येथील ब्रेब्रॉन मैदानावर झालेल्या एका समारंभात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु उपस्थित होते. त्यावेळी नेहरू महर्षी कर्वे यांच्या बाबतीत गौरवोद्गार काढताना म्हणाले, 'मी या कार्यक्रमात अण्णांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.' यापेक्षा दुसरा मोठा पुरस्कार काय असू शकतो?
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी वयाचे शतक साजरे केले. ९ नोव्हेंबर १९६२ या दिवशी या महान समाजसुधारकाचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. त्यांना रघुनाथ, शंकर, दिनकर, भास्कर ही चार मुले होती. अण्णांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आत्मचरित्र लिहिले. त्यांची नावे आत्मवृत्त (मराठी) आणि इंग्रजी नाव 'लुकिंग बॅक' अशी आहेत.
नागेश सू. शेवाळकर