Pathlag - 5 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग – (भाग- ५)

Featured Books
Categories
Share

पाठलाग – (भाग- ५)

“ठिक आहे तर, मी सांगतो तसं कर. थोड्यावेळाने मला मारायला सुरुवात कर. इतकं मार की रक्त निघालं पाहीजे. अर्थात तुलाही थोडा मार खावा लागेलच, पण..”

“अरे पण का? कश्यासाठी”, दिपक मध्येच म्हणाला.
“सांगतोय.. ऐक आधी.. ते एवढ्यासाठी की एकदा का आपण कोठडीत गेलो की परत बाहेर येणं शक्य होणार नाही.

त्यामुळे आपल्यापैकी कुणालातरी कोठडीच्या बाहेर रहाणे आवश्यक आहे. तुरुंगाची मला जास्ती माहीती आहे त्यामुळे मी बाहेर राहीलो तर तुमची सुटका करु शकेन.

आपल्या मारामारीत मी जखमी झाल्यावर मला येथीलच एका छोट्या दवाखान्यात भरती करतील मलम-पट्टीसाठी. तेथुन बाहेर पडणे ह्या कोठडीपेक्षा नक्कीच सोपे आहे.

तेथुन बाहेर पडलो की इथल्या चाव्या मी मिळवेन.. ती जबाबदारी माझी. त्या चाव्या घेउन मी तुमची सुटका करु शकेन.

कोठडीतुन बाहेर पडलो की आपण भटारखान्यात पोहोचायचे. तेथुन खाण्याचे जेवढे बरोबर घेता येईल तेवढे घ्यायचे. कारण इथुन बाहेर पडल्यावर मोठ्ठे जंगल आहे जेथे आपल्याला कित्तेक दिवस लपुन रहावे लागेल. शिवाय आपल्याला त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा आहेच..”

“तो कसा काय करणार?”, दिपकने विचारले.

“गेल्या काही आठवड्यात मी जेलमध्ये ठेवलेल्या रॅट-किलच्या गोळ्या जमा करुन ठेवलेल्या आहेत. भटारखान्यातुन आपण जे अन्न घेउ त्यामध्ये रॅट-किलच्या गोळ्या आणि फिनाईल मिसळुन त्या कुत्र्यांना खायला फेकायचे. ती कुत्री अलर्ट आणि आक्रमक रहावीत म्हणुन त्यांना २-२ दिवस खायला घालत नाहीत. आपण त्यांना खायला फेकले की क्षणाचाही विलंब न करता ते खाऊन टाकतील आणि १५-२० मिनीटांत ते आपल्या मार्गातुन बाजुला होतील.

एकदा कुत्री बाजुला झाली की मग तुझं काम सुरु होतं. तेथुन आपल्याला लपत छपत, स्पॉटलाईट चुकवत जायचे आहे. मला माहीती आहे तुमच्या आर्मी ट्रेनींगमध्ये अश्या गोष्टी प्राधान्याने शिकवल्या जातात.बरोबर?”

दिपकने काही न बोलता होकारार्थी मान डोलावली.

“गुड..फक्त ह्यात थोडं कष्टाचं काम आहे.. आपल्याला जाताना ३ गॅस सिलेंडर्स घेऊन जायचे आहेत..”

“गॅस सिलेंडर्स? कश्यासाठी?”, दिपकने आश्चर्याने विचारले.
“एकदा का आपण भिंतीपाशी पोहोचलो की पुढे आपला रस्ताच खुंटतो. सपाट भिंत असल्याने भिंतीवर चढणे शक्य नाही. आपल्याला भिंतीमध्ये खिंडारच पाडावं लागेल. आपण गॅस सिलेंडर्सचा भिंतीपाशी स्फोट केला की भिंतीला भगदाड पडेल त्यातुनच सुटकेचा मार्ग आहे..”, युसुफ बोलत होता.

“अरे पण.. त्याचा आवाज होणार नाही का?”, दिपक
“होईल, पण काय झालं आहे हे समजेपर्यंत आपण बाहेरच्या जंगलात शिरलो असु. ते जंगल इतके दाट आहे की आपल्याला न पकडले जाण्याचे चान्सेस ७०‍% तरी नक्कीच आहेत.. पुढे अल्लाह भरोसे..”, युसुफ..

“पण युसुफ.. आधीच तो स्पॉटलाईट चुकवत भिंतीपर्यंत जाणं अवघड आहे, आणि त्यात ते अवजड सिलेंडर्स घेउन जायचे म्हणजे…”, दिपक

“रिस्क आहे.. मान्य आहे.. आवाज होऊ न देता आपल्याला हे काम करायचं आहे.. पण रिस्क घ्यावीच लागेल.. इथं सडत मरण्यापेक्षा पोलिसाच्या गोळीने मरणं मंजुर आहे मला…”, युसुफ..

बाहेरचा उजेड कमी कमी होत चालला होता..

“लवकर ठरव दिपक.. वेळ कमी आहे.. थोड्याच वेळात आपल्याला परत आपल्या कोठडीकडे न्हेतील.. आणि एकदा का आपण आत गेलो की मग मात्र…..”, युसुफ

“ठिक आहे.. रिस्क घेऊ आपण.. बोल काय करु?”, दिपक
“काय करु? चल बघु आज तु किती मार खातोस माझ्या हाताचा आणि तु मला किती तुडवतोस.. कर सुरुवात..”, असं म्हणुन युसुफने हातातील फावड्याच्या मागील दांडका दिपकच्या जबड्यावर हाणला..

दिपकच्या जबड्यावर तो दंडुका असा काही बसला की त्याच्या तोंडातुन एक रक्ताची धार बाहेर आली..

दिपक उठुन बसेपर्यंत युसुफ पुन्हा त्याच्यावर धावुन आला. गटाराच्या त्या गाळातुन उठुन उभा राहीपर्यंत युसुफने रबरी बुटांची एक जोरदार लाथ दिपकच्या तोंडावर मारली. दिपकने चुकवायचा प्रयत्न केला परंतु बुटांचा निसटता फटका दिपकच्या भुवईवर बसला आणि तेथे जोरात खरचटले गेले.

दिपक एव्हाना सावध झाला होता. खाली वाकल्या वाकल्या त्याने त्याच्यावर धावुन आलेल्या युसुफच्या हनुवटीवर स्वतःचा गुडघा जोरदार मारला. सैनिकी तालीमीत तयार झालेल्या दिपकचा प्रवाह इतका जोरदार होता की युसुफची हनुवटी कट्कन तुटल्याचा आवाज आला आणि रक्ताची एक चिळकांडी बाहेर उडली.

एव्हाना युसुफने स्वतःचा जोर कमी केला होता. दिपकला जेवढे लागलेले दिसणे आवश्यक होते तितके झाले होते. उगाच त्या नादात दिपकला काही गंभीर इजा होणे त्यांच्या दृष्टीने सोयीचे नव्हते. दिपकही घाव वर्मी बसणार नाही ह्याची काळजी घेत.. पण त्याचबरोबर जखम दिसेल अश्या हिशोबाने युसुफला मारत होता.

दोघांच्या हाणामारीचा आवाज ऐकुन बाहेरचे ते दोन हवालदार धावत आत आले. चरफडतच ते गटारात शिरले आणि दोघांना धरुन फरफटत बाहेर काढले.


“काय झालं शिंदे? काय प्रकार आहे हा?”, तो जाड्या पोलिस-इन-चार्ज हवालदारला युसुफ आणि दिपककडे पहात विचारत होता.

“माहीत नाही सर.. ह्या दोघांना काय झालं अचानक.. पार चढलेच एकमेकांवर….”, शिंदे हवालदार म्हणाला.

“घेऊन जा साल्यांना कोठडीत.. आणि ह्याला न्या दवाखान्यात.. जबडा तुटलाय साल्याचा..”, युसुफकडे बोट दाखवत तो म्हणाला..”बरं झालं दोघांनीच एकमेकांना बडवले, माझे काम कमी झाले..काय???”

सगळे पोलिस एकमेकांना टाळ्या देत हसु लागले.

युसुफने एकवार दिपककडे पाहीले. “आपले काम झाले.. आता भेटु रात्री..” असेच जणु काही त्याला म्हणायचे होते.


दिपक पुन्हा कोठडीत येउन पडला. त्याचं सर्वांग ठणकत होते.

त्याच्या जबड्यातुन अजुनही रक्त ठिपकत होतं. शर्टाच्या बाहीने त्याने तोंड पुसले आणि तो भिंतीला टेकुन पडुन राहीला. आधीच त्या गटारात केलेले शारीरीक कष्ट आणि त्यानंतरची ही हाणामारी ह्यामुळे त्याला थकवा आला होता.

“प्लॅनला सुरुवात तर झाली होती, पण पुढे सगळं ठरल्याप्रमाणे होईल ना??”, दिपकच्या मनात विचार चालु होते..”युसुफ दवाखान्यातुन बाहेर पडुच शकला नाही तर?.. पण छे.. असं कसं होईल, त्याला खात्री असल्याशिवाय त्याने पुढचा प्लॅन आखलाच नसता.. पण कश्यावरुन तो दिपकला सोडवायला येइल? कश्यावरुन त्याने दिपकचा दवाखान्यात भरती होण्यापुरत्या कामासाठी उपयोग करुन घेतला नसेल? आणि समजा नाहीच आला तो सोडवायला, तर दिपक त्याचं काय वाकडं करु शकणार होता?”

एक ना अनेक.. असंख्य विचार दिपकच्या मनात रुंजी घालत होते. सध्यातरी दिपकला युसुफवर विश्वास ठेवण्याव्यतीरीक्त दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. रात्र फार मोठ्ठी आणि कष्टाची होती आणि दिपकला थकुन चालणार नव्हते.

दिपकने स्वतःला त्या थंडगार फर्शीवर लोटुन दिले. काही क्षणातच तो निद्रेच्या आहारी गेला.


किती वेळ गेला असेल कुणास ठाउक. दिपकला जाग आली तसा तो खडबडुन जागा झाला. आजुबाजुला सर्वत्र काळोख पसरला होता.

दिपक पटकन कोठडीच्या दरवाज्यापाशी गेला आणि त्याने दरवाज्याच्या छोट्याश्या खिडकीतुन बाहेर डोकावुन पाहीले. अजुनतरी बाहेर सामसुम झालेली नव्हती. व्हरांड्यातील सर्व दिवे चालु होते. दिपकचे रात्रीचे जेवण सुध्दा अजुन आलेले नव्हते म्हणजे रात्र उलटली नव्हती.

दिपकने स्वतःशीच हुश्श… केले. आणि तो पुन्हा जागेवर बसुन बाहेरच्या हालचालींचा कानोसा घेऊ लागला. मनाचा एक कोपरा बाहेरच्या हालचाली टिपत असतानाच दुसरा कोपरा मात्र रात्रीच्या घटनांचे प्लॅनींग करत होते. युसुफने सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीचा तो बारकाईने विचार करत होता. त्यात, काही असतीलच तर त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करत होता. एखादी बारीकशी चुकही सर्व प्लॅन उधळु शकत होती. परंतु वरवरदर्शी तरी त्याला तसं काही आढळलं नाही.

युसुफने सांगीतलेल्या घटना योग्य रितीने घडत गेल्या तर काही तासांतच दिपकची ह्या जाचातुन सुटका होणार होती.

दिपक स्वतःशीच बाहेर गेल्यावर काय करायचं ह्याची स्वप्न पाहु लागला. स्वतःला अवगत असलेल्या कलांचा वापर करुन काय करता येऊ शकेल ह्याचे आडाखे बांधुन पाहु लागला. परंतु काही क्षणच.. नंतर त्याने ते विचार मनातुन काढुन टाकले आणि पुन्हा एकदा रात्री काय काय करायचे हे ठरवण्यात तो मग्न होऊन गेला.

त्याची तंद्री भंगली ती दरवाज्याबाहेरच्या हालचालीने. थोड्यावेळाने त्याचा दरवाजा उघडला गेला, जेवणाची एक थाळी आत ढकलण्यात आली आणि दरवाजा पुन्हा बंद झाला.

“रात्रीला सुरुवात झाली तर…”, दिपकने विचार केला.. ह्यावेळी त्याने कसलाही विचार न करता ते निरस, बेचव जेवण समोर ओढले आणि पटापट खाऊन टाकले. न जाणो पुढच्या वेळी काय आणि कुठे खायला मिळेल… शेजारच्या माठातले थंडगार पाणी त्याने घश्याखाली ढकलले आणि उरलेले पाणी चेहर्‍यावर ओतुन तो फ्रेश झाला.

दुपारच्या त्या चांगल्या ३-४ तास झोपेने त्याला आता हुशारी जाणवु लागली होती. अंग ठणकणे सुध्दा जरा कमी झाले होते. हात पाय ताणुन त्याने अंग मोकळे केले आणि मग तो अंधारातच येरझार्‍या घालु लागला.


हळु हळु बाहेरचे आवाज कमी कमी होऊ लागले. वेळ अतीशय हळुवारपणे पुढे सरकत होता. दिपकची अस्वस्थता वाढत चालली होती. अगदी अंत पाहील्यावर एकदाचे व्हरांड्यातील दिवे बंद झाले.

दिपकला खात्री होती की युसुफ अजुन एक तास-दीड तास तरी नक्कीच काही हालचाल करणार नाही. वाट बघण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिपककडे नव्हता.

बराच वेळ गेल्यावर शेवटी एकदाची बाहेर पुर्ण सामसुम पसरली होती. दुरवर स्पॉटलाईटचे हालणारे प्रकाशाचे झोत दिपकला दिसत होते.

दिपकने दिव्यांच्या हालचालीची वेळ नोंदवायचे ठरवले. एक प्रकाशझोत एका दिशेने दुसर्‍या दिशेला गेल्यावर फक्त काही सेकंद मध्ये अंधार होता आणि पुन्हा दुसर्‍या दिशेने येणारा प्रकाशाचा झोत तो अंधारलेला भाग उजळवुन टाकत होता.

एक.. दोन.. तिन.. चार.. पाच आणि तो अंधारलेला भाग पुन्हा प्रकाशमान होत होता. कशी बशी पाच सेकंद प्रत्येक हालचालीला मिळत होती. त्या वेळेत एका अंधारलेल्या भागातुन दुसर्‍या अंधार्‍या भागात जाणे क्रमप्राप्त होते.. आणि ते सुध्दा भरलेले ते जड सिलेंडर्स घेउन…

दिपक पुन्हा पुन्हा वेळेचा अंदाज घेत होता. दिपकच्या अनुभवानुसार ४-५ सेकंद खुपच कमी वेळ होती. इतक्या कमी वेळात एका सेक्शनमधुन दुसर्‍या सेक्शनमध्ये कुणाच्याही नजरेस न पडता जाणं अशक्य होतं.

“शिट्ट… थोडा अजुन वेळ मिळाला असता तरी चाललं असतं.. किंवा निदान युसुफने त्याचा प्लॅन मागच्याच आठवड्यात सांगीतला असता तरी दुसरं काही प्लॅन करता आला असता… पण आता वेळ निघुन गेली होती. एव्हाना कदाचीत युसुफ दवाखान्यातुन बाहेर पडला असेल आणि कोठडीच्या चाव्या मिळवुन तो येतच असेल…”, दिपकचे विचार चालु होते..

पण युसुफ येतच नव्हता. अपेक्षेपेक्षा अधीक वेळ उलटुन गेला होता. एव्हाना युसुफला येणं भाग होतं पण अजुनतरी कोणतीच हालचाल दिपकला बाहेर जाणवत नव्हती.

“काय झालं असेल? युसुफला तेथुन सुटताच आलं नसेल? का सुटका झाली असेल आणि तो आपल्याला सोडुन निघुन गेला असेल?”.. दिपकच्या डोक्यात संशयाचा भुंगा सतत भुणभुणत होता.


काय होणार पुढे? दिपकप्रमाणेच हा भुंगा तुमच्याही डोक्यात भुणभुणत असेलच ना? त्यांचा हा प्लॅन यशस्वी होइल का? का दिपकला धोका होईल? काहीच सांगता येत नाहीये ना????

मग थोडा अजुन धीर धरा.. त्या रात्रीत काय काय घडलं ते ऐका पुढच्या अर्थात भाग-६ मध्ये…

[क्रमशः]