समाज सुधारक - आगरकर
'आई, तुझा मुलगा खूप शिकला आहे. आता त्याला चांगल्या पगाराची नौकरी मिळेल असं तुला वाटत असेल. पण आई, मी तुला आताच सांगतो, मी पोटापूरता पैसा कमविणार असून सर्व पैसा लोकहितार्थ खर्च करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मी देशसेवा करणार आहे.'..... प्रसिद्ध समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी एम. ए.ची पदवी प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आईस लिहिलेल्या पत्रातील एक वाक्य!
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील टेंभू तालुका कराड जिल्हा सातारा येथे १४ जुलै १८५६ या दिवशी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती. गोपाळच्या आईचे नाव सरस्वतीबाई असे होते. आगरकरांचे मामा कराड या गावात राहात होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे गोपाळला प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी मामाच्या गावी जाऊन राहावे लागले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि आगरकरांनी न्यायालयात कारकुनी केली. परंतु शिकायची तीव्र इच्छा असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि रत्नागिरीचा रस्ता धरला. तिथे त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला परंतु आर्थिक परिस्थिती साथ देत नाही हे पाहून ते पुन्हा कराड मुक्कामी परतले. तिथे त्यांनी दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रसंगी माधुकरी मागितली. शिक्षण घेण्याची आंतरिक इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून आगरकर अकोला येथे गेले. तिथे त्यांनी१८७५ या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. विद्यार्थी दशेतच आगरकरांनी मिल, स्पेन्सर, गिबं, रुसो इत्यादी अभ्यासकांच्या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आगरकर पुणे येथे आले. तिथे त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. विद्यार्थी दशेतही देशातील राजकीय परिस्थिती, आर्थिक विषमता, जातीभेद पाहून त्यांचे मन विषण्ण होत असे. या अस्वस्थ मनात असंख्य विचार गर्दी करत असत. अभ्यासासाठी हाती घेतलेल्या लेखनीने कागदावर विचारांची शृंखला रेखायटाला सुरुवात केली. ज्यावेळी मन अस्वस्थ असते अशावेळी कागदावर उतरणारे असंख्य विचार, साहित्य श्रेष्ठ दर्जाचे अवतरते. आगरकरांचेही असेच झाले. त्यांचे विचार लेखस्वरुपात प्रकट होऊन त्या लेखांना 'वऱ्हाड समाचार' या दैनिकात स्थान मिळू लागले. त्यातून मिळणाऱ्या मानधनामुळे काही प्रमाणात पोटाचा प्रश्न सुटला. बुद्धी कुशाग्र असल्यामुळे आगरकर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये भाग घेऊ लागले. बुद्धिमान असल्यामुळे त्यांना विविध स्पर्धेत बक्षीस म्हणून पैसेही मिळू लागले. गोपाळ गणेश आगरकर यांनी एकविसाव्या वर्षात पदार्पण केले आणि सन १८७७ मध्ये त्यांचा विवाह यशोदाबाई यांच्याशी झाला. १८७८ या वर्षी आगरकर बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी १८८० यावर्षी एम. ए. च्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. त्यासाठी त्यांनी इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांची निवड केली. एम. ए. ला शिकत असताना आगरकरांची ओळख बाळ गंगाधर टिळक यांच्याशी झाली. दोघांचे विचार जुळले. मैत्रत्व निर्माण झाले. या मैत्रीतूनच दोघांनी मिळून 'केसरी' हे वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले. एम.ए. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना एक मोठी संधी चालून आली. इंदौर येथील संस्थानिक शिवाजी होळकर यांनी आगरकरांना नोकरी देऊ केली. दरमहा पगार म्हणून पाचशे रुपये देण्याची तयारी दर्शविली परंतु गोपाळ गणेश आगरकर यांच्या मनात नोकरी न करता समाजसेवा करायची होती म्हणून त्यांनी होळकर यांचा प्रस्ताव विनम्रपणे नाकारला. बाळ गंगाधर टिळक यांनी १८८० या वर्षी ठरल्याप्रमाणे केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले. या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी सूत्रं स्वीकारली. आगरकरांना अजून एक संधी उपलब्ध झाली. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी ०१ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना केली होती. एम.ए. झाल्यानंतर आगरकर १८८१ यावर्षी त्या संस्थेत दाखल झाले. दरम्यान एक वेगळी घटना घडली. केसरीमध्ये कोल्हापूर येथील दिवाण-बर्वे वरील लिखाणामुळे टिळक आणि आगरकर या दोघांनाही चार महिन्यांची शिक्षा झाली. तुरुंगातील उत्तम वागणूक पाहून दोघांनाही शिक्षेमध्ये एकोणवीस दिवसांची सुट मिळाली. यावेळी त्यांना मुंबई येथील डोंगरी तुरुंगात ठेवले होते. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आगरकरांनी 'डोंगरी तुरुंगातील आमचे १०१ दिवस ' या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी तुरुंगात आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत....
१८८४ यावर्षी बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांनी एकत्र येऊन पुणे येथे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना केली. पुढच्याच वर्षी या संस्थेच्यावतीने 'फर्ग्युसन महाविद्यालयाची' स्थापना केली. आगरकर या संस्थेत शिक्षक म्हणून हजर झाले आणि कालांतराने त्याच कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. केसरी वर्तमानपत्रात टिळकांचे आणि आगरकरांचे लेख असायचे. टिळक यांचे लिखाण प्रामुख्याने कायदा आणि धर्मशास्त्र याविषयी असे तर दुसरीकडे आगरकरांचा ओढा इतिहास, अर्थ आणि सामाजिक या विषयांवर असे परंतु त्यांच्या लेखनात बुद्धिप्रामाण्यवाद आणि उदारमतवाद यांचे प्राबल्य असे. टिळकांचे मत होते की, 'आधी भारताचे स्वातंत्र्य!' परंतु आगरकरांची अशी भूमिका होती की,'आधी समाजसुधारणा आणि नंतर राजकीय स्वातंत्र्य!' केसरीची जी प्रमुख मंडळी होती त्यांचा कल राजकीय प्रश्नांकडे असल्यामुळे आगरकरांचे विचार त्यांना तितकेसे पटत नसल्याने आगरकरांच्या लेखनावर मर्यादा येऊ लागल्या आणि ह्या मर्यादा आगरकर सहन करु शकत नव्हते. शेवटी गोपाळ गणेश आगरकर केसरीतून बाहेर पडले. परंतु त्यांची लेखणी आणि त्यांचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी आगरकरांनी स्वतःचे असे 'सुधारक' या नावाने१८८८ मध्ये वृत्तपत्र सुरु केले. स्वतःचे, मालकीचे व्यासपीठ असल्यामुळे आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या गोष्टींना जास्त प्राधान्य देताना लिखाण केले. समाजदोष नाहीसे केल्याशिवाय राष्ट्राची उन्नती होणार नाही असे आगरकरांचे ठाम मत असल्यामुळे सुधारकमधील लेख त्याच धारणेचे होते. विधवांचे केशवपन, स्त्रियांचा पोशाख, स्त्री शिक्षण, सोवळे ओवळे, अंत्यविधी, मूर्तीपूजा, देवतांची उत्पत्ती, जोडे, हजामत,मरणोत्तर आत्म्याची स्थिती अशा विषयांवर आगरकर सुधारकमधून प्रकाश टाकत. ते म्हणत,' बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे आणि शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरुढीत आधार असो वा नसो.' आगरकर एके ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे लिहितात की, 'राजकीय, सामाजिक बाबतीत समता, संमती, स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत. मनुष्यकृत विषमता शक्यतो कमी असावी. सर्वास सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे....' अशाच विचारसरणीतून त्यांनी सुधारकची वाटचाल सुरु ठेवली होती. समाजचिंतन हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव असला तरीही राजकीय विचार कमालीचे जहाल होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य याविषयीची सुस्पष्ट, सडेतोड भूमिका त्यांच्या लेखांमधून वाचायला मिळत असे. त्याशिवाय विषयाची चिंतनशील मांडणी करत असताना पल्लेदार वाक्ये, मुद्देसुद प्रतिपादन आणि मधूनच केलेली प्रासंगिक विनोदाची पाखरण ही त्यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्ये होती. त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या शीर्षकावरुन आपणास त्यांच्या विचारसरणीची कल्पना येऊ शकते. 'अनाथांचा कोणी वाली नाही' या लेखातून त्यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या काठिण्यतेवर टीका केली होती. 'वाचाल तर चकित व्हाल' या लेखाद्वारे आगरकरांनी भारतातील दारिद्य्राचे सप्रमाण वर्णन केले होते. सक्तीचे वैधव्य या विषयावर त्यांनी 'शहाण्यांचा मुर्खपणा' हा लेख लिहिला होता. 'धर्माचा सुकाळ व बकऱ्यांचा बकाळ' आणि 'आमचे ग्रहण आणखी सुटलेच नाही' अशा लेखातून अनिष्ट प्रथांवर ताशेरे ओढले होते.
'आमचे दोष आम्हांस कधी दिसू लागतील?' या लेखातील छोटासा अंश त्यांच्या जहाल लेखनाची ओळख करून देण्यासाठी पुरेसा आहे. या लेखात आगरकर लिहितात, ' अलीकडे देशाभिमान्यांची जी जात निघाली आहे, तिच्यापुढे इंग्रजांची किंवा दुसऱ्या कोणत्याही अर्वाचीन, युरोपियन लोकांची उद्योगाबद्दल, ज्ञानाबद्दल किंवा राज्यव्यवस्थेबद्दल प्रशंसा केली की, तिचे पित्त खवळून जाते. या जातवाल्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष किंवा त्याची स्तुती साहण्याचे बिलकुल सामर्थ्य नाही. पण करतात काय बिचारे! सूर्याला सूर्य म्हटल्याखेरीज गत्यंतर नाही, तसे युरोपियन लोकांचे श्रेष्ठत्व या घटकेस तरी नाकबूल केल्यास आपलेच हंसे झाल्यावाचून राहणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे! तेंव्हा ते काय हिकमत करितात की, नेटिव युरोपियनांची तुलना करण्याची वेळ आली की, ते आपल्या गतवैभवाचे गाणे गावू लागतात. इंग्रज लोक लोक अंगाला रंग चोपडीत होते, ते कच्चे मांस खात होते, ते कातडी पांघरत होते, इंग्रजांना लिहिण्याची कला ठाऊक नव्हती. त्यावेळेस आम्ही मोठमोठ्याल्या हवेल्या बांधून राहात होतो, कापसाच्या किंवा लोकरीच्या धाग्यापासून मोठ्या परिश्रमाने विणून तयार केलेली वस्त्रे वापरत होतो. बैलांकडून जमीन नांगरून तीत नानाप्रकारची धान्ये, कंदमुळे, व फळे उत्पन्न करीत होतो. आणि रानटी लोकांप्रमाणे मांसावर अवलंबून न राहता आपला बराच चरितार्थ वनस्पत्यांवर चालवीत होतो. यावरुन मांसाहार आम्ही अगदीच टाकला होता असे कुणी समजू नये. ज्या गाईच्या संरक्षणासाठी सांप्रत काळी जिकडेतिकडे ओरड होऊन राहिली आहे व जे संरक्षण कित्येकांच्या मते हिंदूमुसलमानांचा बेबनाव होण्यास बऱ्याच अंशी कारण होत आहे, त्या गाईचा देखील आम्ही विशेष प्रसंगी समाचार घेण्यास मागेपुढे पाहात नव्हतो. कोणी विशेष सलगीचा मित्र किंवा आप्त पाहुणा आला आणि बाजारात हवा तसा जिन्नस न मिळाला म्हणजे लहानपणापासून चारा घालून व पाणी पाजून वाढविलेल्या गोऱ्याच्या अथवा कालवडीच्या मानेवर सुरी ठेवण्यास आम्हांस भीती वाटत नव्हती. आता एवढे खरे आहे की, हे गोमांस रानटी लोकांप्रमाणे आम्ही हिरवे कच्चे खात नव्हतो तर सुधारलेल्या त्यात निरनिराळया तऱ्हेचे मसाले घालून त्याला नाना प्रकारच्या फोडण्या देऊन ते अत्यंत स्वादिष्ट करून खात होतो....' अशा प्रकारचे स्वकियांवर घणाघाती लेखन करीत असल्यामुळे आगरकरांवर चौफेर टीकाही होत असे. परंतु आगरकरांनी आपली लेखणी म्यान केली नाही. उलट अशा तीव्र प्रतिक्रियांवर त्यांची प्रतिक्रियाही तशीच उत्स्फूर्त असे. ते म्हणतात, 'मन सुधारकी रंगले अवघे जन सुधारक झाले.' आगरकर पुढे असेही म्हणतात की, 'रुढीप्रिय लोक मुर्ख नसतात, पण बहुतेक मुर्ख हे रुढीप्रिय असतात.' आगरकरांची मान्यता अशी होती की, 'विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे.'
आगरकर स्त्री स्वातंत्र्याचे खंदे समर्थक होते. स्त्रियांबद्दल त्यांचे विचार स्पष्ट मांडताना ते लिहितात की, 'पुरुषांनी बायका या केवळ प्रजोत्पादनाची हिंडती फिरती यंत्रे आहेत असे समजू नये.त्यांच्यात पुरुषांपेक्षा काय कमी आहे? बायकांना बुद्धी, मन, रुची, बरेवाईट समजण्याची अक्कल नाही का? स्त्रियांना घरात कोंडून ठेवल्याने समाजाची प्रगती निम्म्या वेगाने होत आहे म्हणून स्त्रियांना शिक्षण देऊन प्रत्येक शास्त्रात, व्यवहारात, कलेत निष्णात केले पाहिजे. घरकाम करण्यात पुरुषांनी कमीपणा समजू नये, धुणीभांडी, स्वयंपाक, दळणवळण ही कामे पुरुषांनी देखील केली पाहिजेत.'
आगरकरांचा काळ हा बालविवाहाची तळी उचलणारा होता. मुलीचे वय आठ-नऊ वर्षाचे झाले न झाले की तिचे लग्न लावून दिल्या जात असे. या प्रथेला विरोध करण्यासाठी तत्कालीन इंग्रज सरकारने संमती वयाचे विधेयक आणले. गोपाळ गणेश आगरकर यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. दुसरीकडे अनेकांनी अगदी टिळकांनीही या विधेयकाला विरोध केला. समाजाने ही समस्या स्वतः सोडवावी. त्यासाठी सरकारी कायदा कशासाठी असा विधेयक विरोधकांचा विचार होता तर संमती वयाचा कायदा अत्यंत आवश्यक आहे असे आगरकरांचे मत होते. शेवटी सरकारने संमती वयाचा कायदा पास केला परंतु काही समाजधुरीणांनी हा कायदा केवळ आगरकरांमुळे पास झाला असा प्रचार केला. संतापलेल्या मंडळीने आगरकरांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. या विषयी गोपाळ गणेश आगरकर हे त्यांनी लिहिलेल्या 'फुटके नशीब' या आत्मचरित्रात म्हणतात,' मी एकमेव असा समाजसुधारक आहे ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचाच अंत्यविधी पाहिला.'
स्त्री स्वातंत्र्यासाठी आग्रही असलेल्या आगरकरांनी स्वतःचे विचार पत्नीवर कधी लादले नाहीत. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदाबाई असे होते. यशोदाबाई या परंपरागत विचारसरणीच्या होत्या. हिंदू परंपरा आणि सणवार यावर त्यांचा विश्वास होता परंतु आगरकरांनी त्यांना कधीच विरोध केला नाही. आगरकर देव मानत नव्हते त्यांच्या या भूमिकेबाबत वि. स. खांडेकर एके ठिकाणी लिहितात,
'आगरकर म्हणजे देव न मानणारा देव माणूस!' हीच त्यांची ओळख आहे.
गोपाळ गणेश आगरकर यांना अस्थमाचा आजार होता. या आजाराची लक्षणे आगरकरांच्या लक्षात येत होती. अशा प्रसंगी त्यांना टिळकांची आठवण झाली. त्यांनी टिळकांना भेटायला बोलावले. टिळकही ताबडतोब भेटीला गेले. त्यांना पाहताच आगरकरांना गलबलून आले. आगरकरांनी स्वतःचे दु:ख टिळकांजवळ मोकळे केले. वय केवळ एकोणचाळीस वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले. तो दिवस होता...१७ जून १८९५! ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याजवळ एक पुरचुंडी सापडली. ज्यात वीस रुपये बांधलेले होते. कशासाठी तर आगरकरांचा अंत्यविधी आणि दहन संस्कार करण्यासाठी. अशा व्यक्तिबद्दल बोलावे तरी काय? गोपाळ गणेश आगरकर यांच्या निधनानंतर लोकमान्य टिळक यांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला. हा दोन कॉलमचा लेख लिहिण्यासाठी टिळकांना तब्बल चार तास लागले. लेख लिहिताना टिळकांच्या डोळ्यात आसवं होती, तर उमाळे दाटून येत होते...
नागेश सू. शेवाळकर.