Mogra fulna in Marathi Short Stories by Aaryaa Joshi books and stories PDF | मोगरा फुलता..

Featured Books
Categories
Share

मोगरा फुलता..

मुंबईच्या दादर परिसरातला उच्चभ्भू परिसर... भर मे महिन्याचे दिवस. आजी संध्याकाळच्या दिवेलागणीची तयारी करत असतानाच रोज काका यायचे. मोगरे वासवाल्ले....... बंगल्याच्या टोकाशी हाक ऐकू आली की मनूला कोण आनंद होई... आजी... काका आले.....
बंगल्याच्या वरच्या मजल्यावर मनू राही.मनू आजी,बाबा आणि आई. आजी म्हणजे मनूच्या आईची आई.
आई आणि बाबा अजून घरी यायचे असत.मनूला हाका मारून मारून आजी थकून जाई.चला घरी.दिवसभर हुंदडणं झालय रोजचंच तुम्हा मुलांचं.
चला आता तिन्हीसांजेला घरात या.... काहीशा नाराजीनेच मनू घरात येई.हात पाय धुते न धुते तोच काकांची हाक कानी पडे...
धावत मनू गॅलरीत येई आणि काकांना अंगणाच्या फाटकापासून घरापर्यंत येताना पाहत राही.
पांढरं धोतर,वर सदरा,डोक्याला पागोटं,कपाळी गंध,पायात वहाणा  आणि गळ्यात तुळशीची माळ.
काकांच्या पांढर्‍या फक्कडबाज मिशा पाहून तिला गंमत वाटे.
चैत्रात गुढीपाडव्यानंतर काका यायला लागत.गौरीच्या सजावटीसाठी आणि हळदी
कुंकवासाठी कधीतरी जास्त गजरे आई आधी सांगून ठेवत असे.सगळ्यांना अत्तर लावून एकेक
गजरा द्यायला मनूला फार आवडे.
काका आले की दारातच हातातली पाटी ठेवत.मनू रोज त्यांना तांब्यात पाणी देत असे.तांब्यातून वरूनच पाणी पिताना काकांचा हलणारा गळा आणि पाणी घशात उतरतानाचा आवाज पाहताना मनूला मज्जा वाटे... गालांवर आलेले ओघळ पंचाला पुसत काका आजीला विचारत,काय आई काय हवं! आजी नेहमीप्रमाणे म्हणे बाळकृष्णाला गजरे आणि माझ्या लेकीच्या भल्याधोरल्या वेणीत माळायलाही....
ही माझी नात तर भुंड्या केसांची... फार तर एखादा गजरा दोन्ही कानांवरून डोक्याच्या मधोमध बांधेल कधीतरी.. पण रोजचे तीन गजरे दे हो....
  काका मग पाटीवर घातलेला ओलसर पंचा काढत.छोट्या बाळांसारखे ते गुबगुबीत गजरे ओळीने मांडून ठेवलेले असत.तसंही काका अंगणात शिरलेत याची वर्दी देणारा मोगर्‍याचा मन प्रफुल्लित करणारा सुवास घर अंगण व्यापून टाकी.पण ते बाळसेदार टपोरे गजरे पाहून मनूला त्या वासाची अधिक गंमत वाटे. गटगट पाणी पिऊन तहान भागवावी तस्सं रोज मनू गटगट तो सुवास मनमुराद नाकात भरून घेई.
आजी रागावे... मनू देवाला वहायचय गं... 
आजी मीच तुझा देव आहे ना ग???मनू म्हणे.
झालं... रोजचं भांडण काकांनाही माहिती झालं होतं. काळपट पसरट पानात काका तीन गजरे अलगद ठेवत. जणू काही ते त्यांच्या बाळांना निरोपच देत असत. मग पानांची चार टोकं मुडपून पुडा बांधला जाई. कसल्याशा पानाच्या सोपटाच्या दोरीनेच काका तो पुडा बांधत... आणि मनूच्या हातात देत.
ती तीन सुवासिक बाळं आजीच्या हातात देताना मनूचा चेहराही फुलून येई.काकाही पाटी उचलत आणि उद्या यायचं कबूल करत निघून जात.काका गेले तरी  जिन्यात रेंगाळणारा सुवास मनूच्या मनाचा ठाव घेई. उन्हाळ्यातल्या गरम झळांनी उबदार हवेत रेंगाळणारा मोगर्‍याचा दरवळ तिला रात्रभर आठवत राही.
दुसर्‍या दिवशी पुन्हा काका येत. पुन्हा तीच सारी मज्जा...
काका महिन्यातून एकदाच पैसे नेत असत महिन्याच्या शेवटी.सुट्टीत घरी पाहुण्या आलेल्या ताया,मावश्या,काकू,आत्या यांच्यासाठीही गजरे घेतले जात.
काका मनूच्या घराच्या जोडीनेच आणखीही कुठे कुठे गजरे द्यायला जात.
जूनच्या सुरुवातीला शाळेची तयारी सुरु होई.मग एक दिवस काका सांगत की आता बहर संपत आला आहे.फारतर आठवडाभर येईन.
मनू उदास होई.आता काका कधी भेटणार??? पुढच्या वर्षी बाळा...
पण मोगर्‍याचा मोसम संपला तरी तीन महिन्यातून एकदा काका सहज येऊन जात.दारातच बसून चहा पाणी पीत.मनूशी गप्पा मारत..
काका गजरा नाही आणलात???
अग आता फुलं उमलत नाहीत.उन्हाळ्यातच बहर असतो ना मोगर्‍याचा...
वर्षभर मोगरा का येत नाही हे शाळकरी मनूला कोडच पडे.कारण मोगरा नाही की काका येणार नाहीत... ते येणार नाहीत की मग तो मोगर्‍याचा दरवळही नाही.......
नंतर मनू मोठी झाली आणि पुण्याला गेली.तिला तिच्या मामीने सांगितलं की ते काका थकले होते आणि गेले वृद्धापकाळाने.
ते काका कुठून येतात? काय करतात? कुठे राहतात हे मनूला तेव्हाही माहिती नव्हतं.. आजही माहिती नाही... पण तिच्या मनात "मोगरेकाका" कायमच दडले आहेत.
मनू आणखी मोठी झाली.यथावकाश प्रेमातही पडली,. लग्न झालं....
दरम्यान तिने बाजारात मिळणारे गजरे पाहिले,विकत घेतले,माळलेही.पण ते गजरे तिला आपले वाटलेच नाहीत कधी...
मनूचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मीनाक्षी मंदिराच्या बाहेरच्या फुलवालीकडून मोगर्‍याच्या गजर्‍याची लडच विकत घेऊन विमानात बसला. घरात शिरल्याशिरल्या त्याने मनूच्या हातात केळीच्या पानात बांधलेला तो मोठ्ठा पुडा ठेवला..... मनूला सुवासाची आठवण झाली...आता जाणत्या मनूचे केसही लांब होते गजरा माळण्याइतके... तिने न राहवून आधी पुडा उघडला... मोठ्ठा गजरा... संपेचना..... आणि तसाच गच्च गुंफलेला..... तिला क्षणात मोगरेकाका आठवले.....
त्यानंतर कधीतरी मनूच्या नवर्‍याने हौसेने घरच्या बागेत लावलेल्या मोगर्‍याला पहिली कळी आली..... कळी उमलली.....
मनूला त्या फुलात मोगरेकाकाच दिसले. मनूने ते फूल अलगद खुडलं... आणि आपल्या लग्नात माहेराहून मिळालेल्या बाळकृष्णाच्या लोभसवाण्या चिमुकल्या मूर्तीवर वाहिलं... तिचे मोगरेकाका कृष्णाच्या चरणी तिने अर्पण केले होते... तिचं सुवासाचं जग त्या उन्हाळ्यात पुन्हा उजळून निघालं.....