Bharti in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | भारती

Featured Books
Categories
Share

भारती

भारती

“एकसाथ राष्ट्रगीत शुरू कर ...”

या सरांच्या वाक्यासरशी भारती शाळेत शिरली .

साडे दहा वाजायला फक्त दोन मिनिटे शिल्लक होती .

चटकन जाऊन भारती मुलींच्या रांगेत उभी राहिली आणि तिने राष्ट्रगीत

म्हणायला सुरवात केली .

मनातून तीला अगदी हायसे वाटले ,शाळेत वेळेत पोचल्या बद्दल .

शेजारी कमल तिची मैत्रीण उभी होती ती हसली आणि कुजबुजत म्हणाली

“बर झाल आलीस लवकर नाहीतर आज पण बोलणी खाल्ली असतीस बाईंची “

भारती ओशाळली .”.हो ग ..अगदी धावत पळत आले बघ ..”

अग पण तू वेळेत का निघत नाहीस घरातून ?

“रोज काही तरी कारणाने उशीर करतेस,

एक तर इतक्या दुर रहातेस

मग लवकर का नाहीस बाहेर पडत घरातून ?..कमल म्हणाली

काय सांगु तुला आता माझी कहाणी ,जाउदे ..

असे म्हणुन भारती गप्प झाली ..

तिच्या डोळ्या समोरून घरचे चित्र तरळले...

स्टेशन जवळ असलेल्या एका झोपड पट्टीत भारती रहात होती .

आई वडील दोघेही मजूर होते

,आजकाल घरोघरी बायका नोकरीस बाहेर पडत असल्याने

आईला तीन चार ठिकाणी पोळ्या व इतर घरकामाची कामे मिळाली होती .

खरेतर राहायला जागा पण नव्हती यापूर्वी

पण सुदैवाने मामा ने स्वतःचे घर घेतल्या मुळे त्याच्या नावावरची झोपडी काही वर्षा पूर्वी त्याने बहिणीला राहायला दिली होती .

घरात दोन लहान भावंडे ,आजी आजोबा ,एक अपंग मावशी

असा भरपूर गोतावळा होता

.अपंग मावशीला ठेवून घ्यायचे या एका अटीवरच मामाने ही झोपडी आईला दिली होती.त्याबदल्यात त्याची झोपडीच्या भाड्याची पण अपेक्षा नव्हती .शिवाय झोपडीत आतच बाथरूम व जवळ संडास असल्याने तशी ही सोयीस्कर जागा होती .फक एकच अडचण म्हणजे गावा पासून झोपडी बरीच दुर होती .

तिच्या भावंडाना शाळा जवळ होती .

पण भारतीची शाळा खूपच दुर पडत होती .

शाळा मात्र खुपच नावाजलेली होती .

मुलीना फी नसल्याने आर्थिक नुकसान काहीच नव्हते .

या वर्षी भारती दहावीत शिकत होती ,आणि या न त्या कारणाने अकरावी साठी भारतीला दुर जावेच लागणार होते ..मग त्याची सुरवात आता पासुन झाली असे समजायचे असा साधा सरळ विचार होता भारतीचा ..!!

तिच्या मानाने त्या शाळेतल्या मुली उत्तम आर्थिक परिस्थिती मधल्या होत्या पण त्यामुळे भारतीला काहीच फरक पडत नव्हता .कारण तिचे ध्येय फक्त उत्तम शिक्षण हेच होते ..

आणि वर्गात तिचा कायमच पहिला नंबर असे ..

आई आणि बाबा सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडत असत .मग त्यानंतर घरचा उरलेल्या स्वयंपाक व इतर कामात आजीला मदत करणे .भावंडांचे आवरून त्याना शाळेत पाठवायची तयारी करून देणे अपंग मावशीला तिचे आवरून देण्यात थोडा हातभार लावणे .मावशी अपंग असली तरी थोडी इकड तिकडची शिवण काम वगैरे बारीक सारीक कामे करीत असे .

पायाने अधु असल्याने मावशी एकटी फारशी कधी बाहेर पडत नसे ...

तिच्या जवळ हाताने चालवायचे एक मशीन होते .त्यावरच ती ही कामे करीत असे .आजूबाजूच्या कामगार बायकांचे शिवणकाम तिच्या कडे येत असे .

लहान भावंडाना एका जवळच्या शाळेत घातले होते त्यामुळे त्यांची काळजी नसे

ते आपापला डबा दप्तर घेऊन एकमेका सोबत शाळेत जाऊन परत येत नसत .आजीला दिवसभर घरचे काम पुरत असे .आजोबा पण जवळच एका ठिकाणी अपार्टमेंट मध्ये रात्रपाळी चे काम करत असत .

खरे तर आजोबा आजीचे वय झाले होते पण कामासाठी त्यांची कधीच कुरकुर नसे .त्यांच्या घरची प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामात आपला वाटा उचलत होती .कुणाच्याही लाचारीच्या ओझ्याखाली त्यांना जगायचे नव्हते .

शाळा सुरु झाली आणि पहिल्याच तासाला हेड बाईनी येऊन शाळेत एक नवीन सायन्स प्रोजेक्टची घोषणा केली .सदर प्रोजेक्ट सरकारी होता व थोडी फी भरून त्यात सहभाग घेता येणार होता .यात अव्वल येणाऱ्या विद्यार्थिनीला एक रकमी पाच हजार रुपये बक्षीस होते .

भारती एकदम खुश झाली. बक्षिसासाठी नाही ,पण सायन्स तिचा आवडता विषय होता .आणि प्रोजेक्ट हे तिच्या साठी फार इंटरेस्टिंग गोष्ट होती .

आतापर्यंत जे जे प्रोजेक्ट तीने केले होते त्या सगळ्यात तिचाच “अव्वल” नंबर होताच

दुपारच्या सुट्टीत मग ती हेड बाईंच्या केबिन मध्ये गेली .तिथेच तिच्या सायन्स च्या बाई पण होत्या .प्रोजेक्ट विषयी माहिती देताना तिच्या सायन्स च्या बाई हेड बाईना म्हणाल्या,

”म्याडम भारती हा प्रोजेक्ट उत्तम करेल .आणि तिच्या मुळे आपल्या शाळेचे नाव पण सर्व दुर पोचू शकेल” .

हेड बाईना पण भारती विषयी कल्पना होतीच .त्यामुळे त्यांनी हसुन मान डोलवली .

”या प्रोजेक्ट साठी वेळ मात्र खुप कमी आहे फक्त पंधरा दिवस

तशात तुम्हा मुलींची सहामाही परीक्षा पण जवळ आली आहे माहित आहे न ?”

सायन्स च्या बाई म्हणाल्या

“हो म्याडम मला माहित आहे हे ,पण तुम्ही काळजी करू नका मी हा प्रोजेक्ट उत्तम करेनच आणि सहामाही च्या मार्कावर पण काही “परिणाम” होऊ नाही देणार “.भारती उत्तरली ..

“ या साठी खुप वेळ तुम्हाला प्रयोग शाळेतच काढायला लागेल ,तशात तु इतकी दुर राहतेस ..”बाईनी शंका काढली

“ बाई मी करेन सर्व व्यवस्थित म्यानेज आणि मी घेणार यात भाग ..

किती फी भरावी लागेल त्या साठी “?..भारती ने विचारले .

“ फी थोडी जास्त आहे .तुला नाही झेपणार ती .पण तु नको चिंता करू आम्ही शिक्षक मिळून भरू तुझी फी .”.हेड बाई म्हणाल्या .

हे ऐकुन भारती थोडी खट्टू झाली .

“म्याडम पण किती आहे फी ?मी करेन काहीतरी व्यवस्था ,आई बाबा देतील मला” भारतीम्हणाली

“अग त्यांना झेपणार आहे का असा खर्च .?.राहू दे आम्ही बघू काय ते “

हेडबाई म्हणाल्या ..अडीचशे रुपये म्हणजे काय थोडी रक्कम आहे का ?

हेड बाईनी अशा प्रकारे तिच्या आर्थिक परिस्थिती विषयी बोलणे खरे तर

भारतीला अजिबात पटले नाही आणि अडीचशे रुपये ती भरू शकली असती

पण हेड बाई तिचे काही ऐकून घेईनात ..

त्यानंतर ती थोडी नाराज होऊन घरी आली ..घरी आल्यावर तीने आईला हे

सारे सांगितले .

आई म्हणाली .”तुला स्पर्धेत जायला मिळते आहे न बास झाले

बाईंचे पैसे आपण थोडे थोडे फेडून टाकू ..”

यानंतर दोन आठवडे भारतीसाठी खुपच गडबडीचे गेले .

सकाळी लवकरच ती डबा घेऊन बाहेर पडत असे आणि संध्याकाळी पण

उशिरा येत असे .

या काळात अभ्यास आणि प्रोजेक्ट या व्यतिरिक्त तीला काही

म्हणजे काहीच सुचत नव्हते .

प्रोजेक्ट सोबत परीक्षा पण जवळ येत होती .त्यामुळे उशीरा आली तरी

पटकन जेवून रात्री अभ्यास करीत असे .

प्रोजेक्ट खुप छान झाला .भारती एकदम आनंदी होती .

प्रोजेक्ट सबमिट झाल्या वर तिच्या घरच्या लोकांनी पण सुटकेचा निश्वास

टाकला .तिची धडपड आणि कष्ट त्यांनी पाहिले होते .

शाळेतून या प्रोजेक्ट साठी तिची फक्त एकच एन्ट्री होती .

त्यामुळे शाळेसाठी पण ही गोष्ट “महत्वाची” होती .

भारतीची परीक्षा पण उत्तम झाली

काही दिवसात निकाल लागला आणि नेहेमी प्रमाणे भारती ने पहिला

नंबर काढलाच .

सायन्स च्या बाईना खुप कौतुक वाटला ,” भारती प्रतिकुल परिस्थिती

मध्ये सुद्धा तु नेटाने सगळे पुर्ण केलेस .आता फक्त प्रोजेक्ट सिलेक्शन

ची वाट पहायची”

आणि अखेर तो दिवस उजाडला ..

सकाळी प्रार्थना होताच हेड बाईनी तिला स्टेज वर बोलावले .

भारतीच्या छातीत आनंदाने धडधड होऊ लागली .

ती वर गेली आणि सायन्सच्या बाईनी घोषणा केली .

संपुर्ण महाराष्ट्रातुन तिच्या एकटीच्या प्रोजेक्ट ची निवड झाली होती

तीला आणि तिच्या शाळेला पण प्रथम क्रमांक मिळाला होता .

तिच्या केलेल्या श्रमांचे चीज झाले होते

आणि शाळेची पण मान “उंच” झाली होती .

टाळ्यांच्या कडकडाटाने सारी शाळा दणाणून गेली .

हेड बाईनी शाळे तर्फे एक मोठा पुष्पगुछ् आणि एक मोठी पेढ्याची

पेटी तिच्या हातात ठेवली .

भारतीच्या चेहेर्या वर “आनंद” मावत नव्हता .

पेढ्याची पेटी उघडून बाईनी तिच्या तोंडात पेढा घातला .

भारती सर्व शिक्षकांच्या पाया पडली ,सर्वांनी तीचे तोंड भरून कौतुक केले .

भारती ने पेढ्यांची पेटी बाईंच्या हातात दिली

“बाई हे पेढे आमच्या वर्गात वाटूया ..

“नको ग हे फक्त तुझ्यासाठी आहेत .घरी घेऊन जा .तुझ्या घरच्यांना पण खाऊ

दे त्यांनी पाहिले पण नसतील कधी असले पेढे “हेड बाई म्हणाल्या ..

भारती चा चेहेरा एकदम पडला

कधी संधी मिळेल तेव्हा हेडबाई तिच्या परिस्थीतिचा “उल्लेख’ करायला

विसरत नसत ..!!

त्यांच्या हे मुळी लक्षातच येत नव्हते की तिच्या स्वाभिमान दुखावला जातोय

.का त्या हे मुद्दाम करीत होत्या कोण जाणे ..

घरी गेल्यावर सर्वाना खुपच आनंद झाला .भारती सारखी गुणी मुलगी आपल्या

घरात जन्माला आली याचा आई वडिलांना पण अभिमान वाटला .

रात्री जेवण झाल्यावर भारती ने हेड बाई बोलल्या ते आईला सांगितले ,पण आई म्हणाली ..”नको विचार करू असला त्या आपल्या बाई आहेतना !”

मध्यंतरी ती प्रोजेक्ट च्या फी चे पैसे बाईना द्यायला गेली तेव्हा तेव्हा त्या म्हणाल्या होत्या

“गरिबांना केलेली मदत मी परत घेत नसते ..”

तेव्हा पण तीला वाईट वाटले होते ....

हेड बाई तिच्या अपमानाची एकही संधी सोडत नव्हत्या .

दुसर्या दिवशी हेडबाईनी जेवणाच्या सुट्टीत तीला ऑफिस मध्ये बोलावून

घेतले ऑफिस मध्ये सर्व स्टाफ होताच ..

”बस भारती ,आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो .तुझ्या मुळे शाळेचे पण नाव सगळीकडे प्रसिध्द झाले .काय म्हणाले तुझे घरचे लोक ?”

“बाई त्यांना सगळ्यांना खुप आनंद झाला .जेवायला माझ्या आईने मुद्दाम माझ्या “आवडीचे” पदार्थ केलेहोते .”

“बरे झाले तुला त्या दिवशी पेढे दिले ..तुझ्या घरची काही गोडधोड करायची पण

परीस्थिती नाहीये ना ?” हेड बाई बोलल्या ..

“नाही बाई तसे काही नाही आईने खुप काही केले होते “भारती उत्तरली

“ झोपड पट्टीत राहणारी माणसे तुम्ही ..काय करणार आणि काय खाणार ?

असे बोलुन बाई छद्मी हसल्या ..

इतक्या लोका समोर बाईनी आपल्या गरिबीचा विषय काढून आपल्याला

हिणवले म्हणुन भारती ची मान “अपमानाने” खाली झाली .

स्टाफ रूम मधल्या इतराना पण हेड बाईंचे वागणे नाही आवडले .

“ तुला इथ मुद्दाम बोलावले याचे कारण म्हणजे उद्या प्रोजेक्ट च्या बक्षिसाचा

चेक येतोय तो तुला मिळणार आहे ..बर झाले तुमच्या गरीबाच्या घरात या

पैशाने थोडा आनंद मिळेल .काय काय आणणार त्यातुन हे ठरवले का नाही

तुझ्या घरच्यांनी ?“हेड बाईनी विचारले

आता मात्र भारती नाराज झाली आणि म्हणाली..

“म्याडम आमच्या घरी माहित पण नाही ह्या प्रोजेक्टला कीती बक्षीस आहे ते

त्यांना फक्त मी ह्या प्रोजेक्ट मध्ये नंबर काढला इतकेच माहित आहे .

त्यामुळे हे पैसे कसे आणि कुठे खर्च करायचे याविषयी आमच्या घरी कोणताच विचार नाहीये “

“ तेव्हा केला नसेल ग पण आता मिळालेत न पैसे .आणता येतील त्याना घरच्या काही वस्तू किंवा काही कपडे लत्त्याची गरज असेल तर तेही घेता येतील त्याना “...हेड बाई बोलल्या “

काय बोलणार भारती यावर ..चूप राहिली बिचारी ..!!

इतर स्टाफ ला पण हेड बाईंचे हे बोलणे बिलकुल आवडले नाही.

भारतीचा स्वभाव तिचे वागणे हे सर्वांनाच माहित होते पण तिथे हेड बाईंच्या “विरोधात “कोणीच काही बोलू शकले नाही .

भारती घरी गेली ते विचार करीतच

.खूप अस्वस्थ होते तिचे मन .

घरी गेल्यावर आईच्या लक्षात आली तिची अवस्था

जेवणात तर तीचे अजिबात लक्ष नव्हते .

आईने विचारले पण तिने मौनच ठेवले होते .

रात्री विचारात तिला कधीतरी झोप लागली एकदाची ..

सकाळी उठल्यावर नेहेमीप्रमाणे सगळे आवरून ती बाहेर पडली .

शाळेकडे जाताना मात्र तिने एक पक्का “निश्चय” मनात केला आणि तो अमलात आणायचे असेही ठरवले .

दुपारी शेवटचे दोन तास ऑफ होते आणि याचवेळी शाळेने तिला हा चेक द्यायचा कार्यक्रम ठेवला होता, ती तयारी पण सुरु झाली होती .

प्रास्ताविक झाल्यावर सायन्सच्या बाई उभ्या राहिल्या ..

आज आपण आपल्या “गुणी “विद्यार्थिनीला भारतीला तिच्या बक्षिसाचा चेक सुपूर्द करणार आहोत .तिचे “कौतुक” आपण परवा केलेच आहे .

शाळेला तिचा खूप अभिमान आहे .अशीच कौतुकास्पद कामगिरी कायम तिच्या कडून घडत राहो ..आमचे आशीर्वाद तिच्या सोबत आहेत .”

आता हेड बाईनी कार्यक्रमाचा ताबा घेतला आणि चेकचे बंद पाकीट घेऊन त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी भारतीचे नाव पुकारले .

भारती स्टेजवर पोचली .तिच्या हातात ते पाकीट देऊन हेड बाई म्हणाल्या ”अभिनंदन भारती ...

त्या पुढे काही बोलणार तोच अचानक भारती म्हणाली ..

“बाई मला काही बोलायचे आहे बोलू का ..”

अचानक तिचा प्रश्न ऐकून बाई थोड्या चमकल्या ..

पण म्हणाल्या ..”तुला तुझे मनोगत सांगायचे असेल ना ..बोल बोल “

भारती ने शिक्षक आणि विद्यार्थिनीना नमस्कार केला आणि बोलू लागली .

“आज सर्वप्रथम मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानते .

ज्यांनी हा प्रोजेक्ट करण्या साठी मला घडवले मला प्रोत्साहित केले .

माझ्या शाळेचा मला खूप अभिमान आहे .

माझ्या प्रोजेक्ट च्या यशामुळे माझ्या शाळेचे नाव सर्वदुर पोचले या गोष्टीचा मला खुप आनंद होतो आहे .

हे वर्ष माझ्या शालेय जीवनाचे शेवटचे वर्ष आहे .

शाळेसाठी काही तरी करावे आणि शाळेचे “ऋण “काही अंशी तरी फेडावे अशी माझी खुप इच्छा आहे ..”असे बोलून तिने हेड बाईकडे एक नजर टाकली .

बाईंच्या चेहेर्यावर बहुधा .आता ही काय करणार शाळे साठी? ..

असे भाव असावेत असे तिला वाटले .

याच विचाराने मी मला मिळालेला हा पाच हजार रुपयाचा चेक आपल्या शाळेच्या सायन्स विभागासाठी मदत म्हणून देत आहे “

असे म्हणून तिने ते चेक चे पाकीट हेड बाईंच्या हातात दिले ..

धन्यवाद आणि पुनश्च आभार “

इतके बोलून भारती स्टेजवरून खाली उतरली

आता चकित व्हायचो पाळी हेड बाईंची होती

भारतीच्या चेहेर्यावर स्वाभिमानाचे” तेज “ ओसंडत होते

आणि सर्व शाळेने टाळ्यांचा कडकडाट केला !!! .

______________________________________________________________________________-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

.