आजीच्या बटव्यातली काही गुपितं-
उन्हाळा वाढला, हवा बदल झाला तब्येत बिघडू शकते. जर घरात कोणी आजारी पडल तर मदतीला धावून येते ती आज्जी आणि तिच्या बटव्यातील तिचे उपाय!! आज्जी नी वैद्यकीय अभ्यास केला नसला तरी तिच्या अनुभवातून तिला बरीच माहिती झालेली असते. असे किती साधे साधे बिनखर्चाचे आणि प्रभावी उपाय आणि उपचार. शिवाय हे सगळे उपाय सहजसुलभ मिळतात आणि अगदी हाताशीच असतात. आई, आजी, काकू, आत्या, मावशी, मामी सगळ्यांनाच असे कितीतरी उपाय माहीतच असायचे. परंपरेनं चालत आलेलं घरगुती शहाणपण म्हणजे खात्रीशीर गुणकारी!! काही त्रास व्हायला लागला कि लगेच डॉक्टर कडे पळायची गरज नसते. सोप्पे उपाय करून सुद्धा होणारा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. पण अर्थात घरगुती उपचारांनी प्रकृती मध्ये काही फरक पडला नाही तर मात्र अंगावर न काढता डॉक्टर कडे जाण महत्वाच असत. त्याचबरोबर, घरात काही आवश्यक वस्तू म्हणजेच थेर्मोमीटर, शेकायची पिशवी इत्यादी ठेऊन द्यायची गरज असतेच.
* घरच्या घरी करता येणारे काही उपाय-
१. ताप-
बऱ्याच वेळा हवा बदलली कि घरात तापाचे पेशंट्स वाढायची शक्यता वाढते. त्यावर घरातल्या घरात करता येण्यासारखा उपाय-
१. कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा करून खावा.
२. गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे हे घालून काढा करून तो काढा पिल्यानी नक्कीच ताप कमी होण्यास मदत होते.
३. घरी बनवलेलं चिकन सूप घेतल्यानी आराम मिळतो.
२. कफ-
कफावर उत्तम घरगुती उपचार-
१. खडी साखर, हळद, कोरफडीचा रस हे मिश्रण मधा मधून चाटणे.
२. जेष्टमदाची कांडी तोंडात बराच वेळ चघळावी.
३. पांढरा कांदा किसून त्याचा काढा दिवसातून २ वेळा घ्यावा.
३. सर्दी, खोकला-
पावसाळ्यात उद्भवणारा त्रास म्हणजे सर्दी आणि खोकला. त्यावर लगेच अॅलोपथी औषध घेण्यापेक्षा घरगुती उपचारांमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि गोळ्यांचा काही दुष्परिणाम सुद्धा होत नाहीत.
१. उकळलेल्या पाण्यात गवती चहा किंवा निलगिरी घालून त्या पाण्याचा वाफारा घ्या.
२. ओव्याची पाव चमचा पूड कोमट पाण्यातून वरचेवर घ्यावी.
३. सुंठ व लवंगाचा काढा करून त्यात मध घालून ठेवून द्या आणि ते दिवसात २ वेळा घ्यावे.
४. डोळ्याचे विकार-
कॉम्पुटर वर तासंतास बसायला लागल्यामुळे, जास्ती टी.व्ही पाहिल्यामुळे डोळ्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. कधी कधी हवामानातल्या वाढलेल्या उष्णतेमुळे सुद्धा डोळ्यांना त्रास होतो. अश्यावेळी आजीच्या बटव्यातले काही उपाय-
१. गुलाब पाण्याच्या घड्या डोळ्यावर ठेवल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
२. डोळ्यातली उष्णता कमी होण्यासाठी पापाण्यांवरून बर्फ फिरवावा.
कधी कधी डोळ्यात धुळीचा कान गेल्यामुळे डोळ्यांमध्ये अस्वस्थ वाटू शकते.
१. एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात डोळ्याची उघडझाप करा. त्यामुळे धुळीचा कण बाहेर पडण्यास मदत होईल.
२. एक स्वच्छ रुमाल घेऊन तो रुमाल गरम पाण्यात भिजवून घ्या. तो व्यवस्थित पिळून डोळा शेकावा.
५. घसा बसला असल्यास-
हवेमुळे किंवा सर्दी झाल्यावर घसा बसू शकतो. त्यासाठी अॅलोपथी च औषध घेण्यापेक्षा आजीच्या बटव्या मधल्या काही युक्त्या-
१. घश्याला सहन होईल इतक गरम पाणी करून त्यात मीठ आणि हळद घालून त्याच्या गुळण्या करा. मीठ आणि हळदी मुळे घश्याला आराम मिळण्यास मदत होते आणि आवाज सुधारण्यास देखील मदत होईल.
२. हळदीचे दुध न विसरता सकाळ संध्याकाळ प्या.
३. दालचिनीचा तुकडा किंवा लवंग तोंडात ठेऊन चघळा.
४. जेष्ठमध, तूप आणि मध याच चाटण बनवून ते वारंवार चाटा.
५. ६ काळ्या मनुका गरम पाण्याबरोबर खाल्ल्ल्यानी आवाज सुटण्यास मदत होते.
६. सन बर्न-
कडक उन्हात बाहेर फिरल्यावर सन बर्न चा त्रास जाणवू शकतो. अश्यावेळी आजीचा बटवा कामी येतो.
१. बेकिंग सोडा सन बर्न झालेल्या भागावर लावण्यामुळे त्वचेला आराम मिळण्यास मदत होते.
२. घरात असलेली कोरफडीचा गर सन बर्न झालेल्या भागावर लावावा. त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.
३. थंड मिल्क कॉम्प्रेस चा वापर केल्यानी सन बर्न चा त्रास कमी होण्यास मदत होते.
७. जीभेला चव नसल्यास-
कधी कधी जिभेची चव एक्मच जाते. कोणत्याही पदार्थाची चव लागली नाही कि विचीत्रच होत. अश्यावेळी आजीच्या बटव्या मधले उपाय जरूर करून बघा.
१. लिंबाच्या फोडीला थोड मीठ लाऊन टी फोड जिभेला चोळावी.
२. तूप आणि बडीशेप गरम करून थोड्या हळदी मध्ये मिसळून दिवसातून ३ वेळा खावी.
३. तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठ पाणी घ्यावे.
४. आल्याच्या तुकड्याला मीठ लाऊन खाल्ल्यानी तोंडाची चव येण्यास मदत होते.
८. उलटी होत असल्यास-
उलटीचा त्रास व्हायला लागला कि सगळ अवसानच गळून जात. अश्यावेळी आजीच्या बटव्यातून काही सोप्पे उपाय-
१. आल्याचा रस आणि कांद्याचा रस याच मिश्रण प्यावे.
२. आल्याचा काढा बनवून त्याचा एक एक घोट घेतल्यानी फायदा होतो.
३. मिरी बरोबर मीठ घालून ते वाटून घेऊन खावे.
९. मूत्र विकाराचा त्रास होत असल्यास-
जवळजवळ निम्म्याहून अधिक बायकांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच लघवीत जंतूजन्य दाह याचा अनुभव येतो. अस्वच्छता असलेल्या ठिकाणी लघवी ला गेल्यामुळे हा त्रास व्हायची शक्यता जास्ती असते. लाघवी च्या विअकारांवर घरातल्या घरात करता येणारे उपाय-
१. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यावर दह्याच नियमित सेवन केल्यामुळे त्रास कमी झाल्याच दिसून येत.
२. धने आणि जिरे रात्रभर भिजत घालून ते पाणी गळून प्यावे.
३. कोकम सरबत प्यावे.
४. रात्री २ चमचे बडीशेप भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.
५. गुळामध्ये हळद मिसून खावी.
१०. केसांसाठी-
सुंदर काळे भोर केस प्रतेक बाईला हवे हवेसे वाटत असतात. त्यासाठी जास्ती खर्च न करता घरातले उपाय-
१. केसांना कोरफडीचा गर लावा त्यामुळे केस वाढण्यास फायदा होतो.
२. केसात कोंडा झाला असल्यास तेलात लिंबाचा रस मिसळून ते केसांना लावा.
३. रोज अर्धा चमचा काळे तीळ चावून खाल्ले तर केस गाळण्याचा त्रास कमी होईल.
११. अशक्तपणा आला असल्यास-
मासिक पाळी च्या वेळी अशक्तता जाणवू शकतो. किंवा अगदी फार ताण, श्रम झाले तर अशक्तपणा येतो आणि शरीरातली सगळी शक्ती जाते. त्यावर घराच्या घरी करण्यासारखे उपाय-
१. चना डाळ रात्री भिजत घालून खावी.
२. बीट कापून त्यावर मिरीपूड, मीठ, धने जिरे पूड घालून कच्चा खाव किंवा ते उकडून खाल्लं तर जास्ती उपयुक्त ठरेल.
३. नेमानी ४-५ खजूर किंवा खारीक खावी.
४. जेवल्यावर पिकलेली केळी खावी.
५. जेवणात हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्य इत्यादीचा समवेश न चुकता करा.
१२. डोक दुखत असल्यास-
डोके दुखी चा त्रास हा कधीही चालू होऊ शकतो. डोक दुखायला लागल ली काही विचार न करता आपण गोळ्या घ्यायचा विचार करतो पण तस करण्याआधी घरगुती उपाय करून बघा. आणि हो. गरज पडली तर डॉक्टर चा सल्ला महत्वाचा आहेच.
१. लवंगाच तेल कपाळाला चोळावे.
२. उन्हातून आल्यावर डोक दुखत असेल तर कांदा फोडून त्याचा वास घ्यावा आणि तळपायाला चोळावा.
३. रात्री काळ्या मनुका खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे.
४, गाई च्या दुधार सुंठ उघळून त्याचा लेप कपाळावर लावावा. आणि त्यावर कापूस लाऊन ठेवावा.
असे बरेच उपाय आजीच्या बटव्यात असतात. थोडा त्रास होत असल्यास लगेच डॉक्टर कडे जाण्यापेक्षा आधी हे उपाय करून बघा. त्यानी तुमचे पैसे तर वाचतीलच आणि महत्वाच म्हणजे तुम्हाला त्रासातून मुक्ती देखील मिळेल. पण जर कोणताही त्रास वाढला तर मात्र मनानी औषध घेण्यापेक्षा डॉक्टर चा सल्ला घेण कधीही हितावह ठरत आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे गरज असेल तर डॉक्टरचा सल्ला नेहमीच महत्वाचा.
हा उन्हाळा आरोग्यदायी जावो... :-)