सौंदर्यखणी रेखा
चित्रपटाचं माध्यम हे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं आहे.या क्षेत्रात अनेक कलाकार येतात आणि जातातही.अभिनयाच्या जोडीनेच सौंदर्यवती नायिका आणि पौरूषपूर्ण नायक यांची मोहिनी रसिकांच्या मनावर ठसते.
नायिका जशा सौंदर्यवती असाव्यात तशाच विविध प्रकारच्या भूमिका तितक्याच सशक्तपणे पेलण्याची त्यांची क्षमताही असावी लागते.
चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे व्यक्तीगत आयुष्य हासुद्धा चर्चेचा विषय ठरत असतो.त्यांचे व्यक्तिगत नातेसंबंध,त्यांच्या आवडी-निवडी याकडेही सिनेरसिकांचे लक्ष असते.
नायिका येतात… आणि जातातही… पण आपल्या किशोर वयापासून ते अगदी वयाच्या पासष्टीच्या टप्प्यातही कायमच या सर्व कारणांनी रिनेरसिकांच्या चर्चेचा विषय ठरलेली नायिका… “रेखा”..
सौंदर्य, नृत्य, अदाकारी आणि अभिनय असे विविध गुण आत्मसात केलेली अभिनेत्री रेखा. वास्तविक भानुरेखा गणेशन हे त्यांचं नाव केव्हाच मागे पडून केवळ “रेखा" एवढं म्हटलं तरी त्यांची छबी भारतीय मनांमनात रेंगाळतेच. वेगवेगळ्या कारणांनी सतत चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असलेल्या रेखा यांची ही कथा.
कोणत्याही समारंभात आपल्या वेशभूषेने कायम सर्वांचे लक्ष वेधून घेणारी. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मनाचा एक “हळवा कोपरा” असलेली, आपल्या भागातील “सिंदूर” हा सुद्धा जिच्या आयुष्यातील रंजक विषय ठरू शकतो अशी ही व्यक्ती”रेखा”.
“पिया बावरी.... म्हणणारी”चुलबुली अभिनेत्री पासून “ मेरे लिए भी क्या कोई उदास बेकरार है” असं म्हणत गंभीर आयुष्याचा पट उलगडणारी नृत्यांगना असा रेखा यांच्या अभिनयाचा मोठा पट आहे, तो रंजकही आहेच.
भानुरेखा गणेशन यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. गेली ५० वर्षे ८० पेक्षा जास्त चित्रपटात आपला ठसा उमटविलेल्या या अभिनेत्रीने १९६६ साली ‘रंगुला रत्नम’ या तेलगू चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. आपल्या सौंदर्याने जगावर अधिराज्य गाजविलेल्या या अभिनेत्रीला सुरुवातीच्या काळात तिच्या रूपामुळे दुर्लक्षित केले गेले होते हे ऐकून आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. १९७० सालापासून मात्र रेखा यांच्यातील अभिनेत्रीला वाव मिळाला आणि त्यांची कारकीर्द बहरत गेली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणा-या चित्रपटांच्याखेरीज रेखा यांनी समकालीन कलात्मक चित्रपटातही सशक्त भूमिका पेलल्या आहेत.
वडील तमिळ अभिनेते जेमिनी गणेशन आणि आई तेलगू अभिनेत्री पुष्पांवली यांचा अभिनयाचा वारसा भानुरेखा यांनी सांभाळला असे म्हणायला हरकत नाही.
सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट या शाळेत रेखा यांचे शिक्षण झाले पण असे म्हणतात की कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी रेखा यांनी शिक्षण मध्येच थांबवून अभिनयाला सुरुवात केली.
आपल्या एका मुलाखतीत रेखा यांनी म्हटले आहे की “ मला अभिनयात रस नव्हता. पण कुटुंबाच्या आर्थिक चणचणीला तोंड देताना मला अभिनयाची वाट निवडावी लागली. मी दाक्षिणात्य असल्याने मला हिंदी नीट बोलता येत नसे. तेराव्या वर्षी मला वेगळ्या आणि अनोळखी चित्रपट सृष्टीत वावरताना दडपण येत असे. महानगरी मुंबई ही जणू काही एमला एक “जंगल” वाटत असे. लोकांनी माझया कोवळ्या वयाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. मलाही शाळेत जाऊन इतर मुलींसारखा आनंद लुटावा असे वाटत असे. कपडे, रंगभूषा यांचा मला तिटकारा वाटत असे”. कालांतराने रेखा यांनी या सर्व परिस्थितीला उजाळा दिला आहे परंतु त्यावेळी या सर्व प्रसंगांवर त्यांनी आत्मविश्वासाने मात केली होती. उंची साड्या, मौल्यवान आणि आकर्षून घेणारे दागिने यांनी लक्षवेधी ठरत असलेल्या रेखा यांचे बालपण त्यांना इतके क्लेश देणारे ठरले असेल याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही.
सुरुवातीच्या काळात त्यांच्या गडद सावळ्या रंगामुळे रेखा यांच्याकडे ugly duckling म्हणून पाहिले जायचे यावर आपला विश्वास बसणेही कठीण आहे. नाही का???
१९६९ साली रेखा यांनी नायिका म्हणून ‘ऑपरेशन जेकपॉट नल्ली सी आय डी ९९९’ चित्रपटात राजकुमार यांच्यासह भूमिका केली. त्याच वर्षी त्यानंतर “अंजाना सफर” या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली परंतु सेन्सॉर बोर्डाच्या काही अडचणीमुळे हा चित्रपट आठ वर्षांनंतर प्रदर्शित झाला. त्यामुळे १९७० साली प्रदर्शित झालेला “सावन भादो” हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट मानला जातो. मोहन सेगल हे त्याचे दिगदर्शक असून नवीन निश्चल यांनी त्यात नायकाची भूमिका केली आहे. या चित्रपटात रेखा यांनी “चंदा” नावाच्या नायिकेची भूमिका केली आहे. युरोपातून विक्रम नावाचा एक श्रीमंत तरूण आपल्या सावत्र लोभी आई आणि बहिणीकडून फसवला जाऊन भारतात येतो.त्या दोघी त्याला ठार करण्यासाठी त्याच्यावर मारेकरी पाठवतात.पण चंदा आणि तिच्या गावातील लोक या तरूणाला मारेकर्यांपासून वाचवतात.चंदा आणि विक्रम परस्परांच्या प्रेमात पडतात. यानंतर विक्रमची सावत्र आई त्याला चंदाशी लग्न करण्यापासून परावृत्त करते.विक्रमला ठार करण्याचे वेगवेगळे प्रयत्न त्याची सावत्र आई करते.पण त्यातून तो कसा वाचतो आणि शेवटी चंदा आणि विक्रमच्या प्रेमाचा कसा विजय होतो हे या चित्रपटात मांडले आहे. हा चित्रपट रसिकांची दाद मिळवून गेला.
१९७० ते १९८० या दशकात रेखा यांनी सुरुवातीला रामपूर का लक्ष्मण (१९७२), कहानी किस्मत की (१९७३) प्राण जाये पर वचन न जाये( १९७४) या चित्रपटात भूमिका केल्या. नमक हराम हा त्यांचा आणखी एक चित्रपट.हृषीकेश मुखर्जी यांच्यासारख्या सशक्त दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याची संधी रेखा यांना मिळाली.आनंद चित्रपटातील प्रसिद्ध जोडी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या कलाकरांसह रेखा यांनी या चित्रपटात काम केलं आहे.श्यामा नावाची व्यक्तिरेखा त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. मात्र १९७६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दो अंजाने’ या अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपटातील रेखा यांच्या एका लोभी आणि महत्वाकांक्षी पत्नीच्या भूमिकेने त्यांना यशाचे शिखर दाखविले. हिंदी चित्रपट सृष्टीत या चित्रपटाने यश मिळविले आणि रसिकांची मनही जिंकली.
रेखा यांनी उत्तम चित्रपटात चांगली भूमिका करता यावी यासाठी आपली हिंदी भाषा सुधारली. आपल्या सावळ्या रंगामुळे आपल्याला दुर्लक्षित केले जाते हे लक्षात आल्याने त्यांनी स्वतःचे राहणीमान, पोशाख यात जाणीवपूर्वक बदल केले.
१९७८ साली “घर” या चित्रपटात रेखा यांनी “आरती” ही भूमिका केली. नवीन लग्न झालेल्या नायिकेवर सामूहिक बलात्कार होतो अशी या चित्रपटाची कथा आहे. आरतीचा पती हा धक्का सहन करु शकत नाहीच आणि या घटनेमुळे शारिरिक आणि मानसिक धक्का बसलेली आरतीही आपला संसार सांभाळण्यासाठी प्रयत्न करते.पण तिची अगतिकता आणि विचित्र परिस्थितीला तिला सामोरे जावे लागणे या अभिनयातून रेखा यांच्या सशक्त अभिनयाची ओळख समाजाला झाली. या भूमिकेने त्यांना फिल्मफेअर पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट नायिकेचे नामांकन त्यांना मिळवून दिले. समीक्षक आणि रसिक दोघांनाही या भूमिकेची दखल घ्यावी लागली. १९८० साली आलेल्या खुबसूरत या सिनेमातही रेखा यांनी आपल्या अभिनयाने बहार आणली आहे.निर्मला गुप्ता ही शिस्तप्रिय गृहिणी आपली चार मुले आणि पती यांच्या कुटुंबाला शिस्तबद्धपणे सांभाळत असते.आपल्या दुसर्या मुलासाठी ती अंजू नावाची मुलगी पसंत करते. अंजूला खट्याळ आणि विनोदबुद्धी असलेली,आयुष्याचा आनंद घेणारी मंजू नावाची धाकटी बहीण असते. अंजूच्या लग्नानंतर मंजू आपल्या ताईच्या सासरी काही दिवस रहायला येते.मंजूच्या येण्याने निर्मलाच्या शिस्तीच्या बडग्याला कंटाळलेल्या कुटुंबातील ताण कमी व्हायला लागतो.अंजूचे सासरे द्वारकाप्रसाद हेही मंजूच्या खोडकर स्वभावामुळे तिला आपलसं करतात.दरम्यान अंजूचा धाकटा दीर इंदर हा मंजूच्या प्रेमात पडतो. पण निर्मला मात्र खट्याळ मंजूकडे रागानेच पाहत असते.निर्मलाला हे जाणवू लागते की आपण कुटुंबाच्या भल्यासाठीच शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहोत पण कुटुंबाला आपला राग येतो आहे आणि मंजू सर्वांना आपलीशी वाटते आहे.निर्मलाच्या या वागण्यामुळे एक दिवस द्वारकाप्रसाद यांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी घरातील सर्व मंडळी बाहेर गेली असताना मंजू मात्र प्रसंगावधान राखते आणि द्वारकाप्रसाद यांचा जीव वाचतो.या अनुभवातून निर्मलालाही मंजूचा समजुतदारपणाही लक्षात येतो आणि पुढे इंदर आणि मंजूचे लग्न होते.पिया बावरी.... म्हणत रेखाने मंजूच्या भूमिकेत या चित्रपटात आपला विशेष ठसा उमटविला... या चित्रपटाला आणि रेखालाही फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला.
१९७८ साली मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या अभिनयामुळे गाजला तसाच तो सलाम ए इश्क मेरी जान या गीतावर थिरकून आपल्या अदाकारीने तमाम चित्रपटसृष्टीला वेड लावणार्या रेखा यांच्या भूमिकेमुळेही लक्षात राहिला. गोहराबाई ही भूमिका रेखा यांनी या चित्रपटात केली आहे.सिकंदर(अमिताभ बच्चन) तिच्या कोठ्यावर येऊ लागला आणि गोहराबाई त्याच्यावर अमर्याद प्रेम करू लागली.पण प्रसंगी सिकंदरच्या भल्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करून गोहरा बोटातल्या हिर्याच्या अंगठीतली हिरा खाऊन आत्महत्या करते. अमिताभ बच्चन,राखी,निरूपा राॅय यांच्यासारख्या मुरब्बी कलाकारांच्या गदारोळातही रेखाने आपली गोहरबाई जिवंत केली आहे.
उमराव जान अदा या कादंबरीवर आधारित “उमराव जान” हा चित्रपट रेखा यांच्या चित्रपट कारकीर्दीला महत्वाचे वळण देणारा ठरला. यात त्यांनी एका कोठेवालीचीच भूमिका केली आहे.
या चित्रपटाची कथा १८४० सालात सुरु होते.अमिरन नावाची एक मुलगी फैजाबादहून पळवून नेली जाते.लखनौमधल्या खानूम जान नावाच्या एका गणिकेला ही मुलगी विकली जाते. खानूम जान रंगिल्या रसिकांची मने रिझवण्यासाठी तरूण नर्तिका आणि वेश्या यांना शिक्षण देत असते. अमिरन इथेच मोठी होती आणि तिला ‘उमराव जान’ असे नाव देण्यात येते.लखनौच्या नवाब सूलतानाला आकर्षित करण्यात उमराव यशस्वी होते आणि ते दोघे परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडतात.पण आपल्या कुटुंबाच्या इच्छेखातर नवाब दुसर्या एका खानदानी युवतीशी लग्न करतो.त्यानंतर ती अली नावाच्या पुरुषाच्या प्रेमात पडते पण पोलिसांनी अलीची हत्या केल्यानंतर उमरावला लखनौला परत यावे लागते.त्यानंतर ब्रिटीश सैन्य लखनौवर हल्ला करते आणि लखनौच्या रहिवाशांना निर्वासित व्हावे लागते. उमराव इतर नागरिकांसह निर्वासितांची छावणीत येते आणि तिला आठवते की हे छोटे गाव म्हणजे फैजाबादच आहे.उमराव आणि तिच्या कुटुंबियांची भेटही होते.तिला कुटुंबात परत जाण्याची इच्छाही असते पण तिचा भाऊ तिला कुटुंबात परत येण्यास नकार देतो.उध्वस्त मनाने ती लखनौला परत येते पण तिथलेही तिचे जग उध्वस्त झालेले तिला पहायला मिळते.
लहानपणी पळवून नेलेली,कुटुंबापासून नाते तुटलेली, तरूणपणात प्रेमाला पारखी झालेली उमराव रेखा यांनी समर्थपणे पेलली आहे.
फारुख शेख यांच्यासह असलेली रेखा यांची भूमिका आणि आशा भोसले यांच्या आवाजातील उत्तम गीते आणि रेखा यांची नृत्य - अभिनय अदाकारी असा सुरेख संगम या चित्रपटाने साधला. या चित्रपटातील भूमिकेसाठी रेखा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
या चित्रपटांच्या यशानंतर रेखा यांना समांतर चित्रपटात भूमिका करण्याची अतीव आकांक्षा होती. कलात्मक चित्रपटातील भूमिका ही केवळ भूमिका नसून ते एक आव्हान असते आणि रेखा यांनी अशा विविध चित्रपटातून ते सहजी पेलले असे दिसून येईल.
श्याम बेनेगल यांचा ‘कलियुग’ गोविंद निहलानी यांचा ‘विजेता’ गिरीश कर्नाड यांचा ‘उत्सव’ किंवा गुलजार यांचा ‘इजाजत’,या चित्रपटांची सिने रसिकांना भुरळ पडली आणि कलात्मक चित्रपटातील रेखा यांचा वावरही लक्षणीय ठरला.
उत्सव चित्रपट कथानकामुळे शृंगारप्रिय रसिकांच्या मनाला जिंकणारा ठरलाच पण त्यापेक्षाही अधिक रेखा यांच्या मादक सौंदर्याची भुरळ सिनेजगतावर पडायला या चित्रपटाचे योगदान आहे.एका गरीब ब्राह्मणाच्या प्रेमात पडलेली सौंदर्यवती गणिका वसंतसेना रेखा यांनी साकारली आहे.
महाभारतावर आधारित कलियुग चित्रपटातील द्रौपदी असो किंवा संस्कृत नाटक मृच्छकटीक यावर आधारित उत्सव चित्रपटातील ‘वसंतसेना’ ही गणिका असो, रेखा यांनी केलेल्या भूमिका सिनेरसिक आणि जगभरातील समीक्षक यांच्याही कौतुकास पात्र ठरल्या आहेत.
‘मेरा पती सर्फ मेरा है’, ‘अमिरी गरिबी’ या १९९० च्या दशकातील त्यांचे चित्रपट लक्षवेधी ठरले नाहीत पण ‘फूल बने अंगारे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे यश संपादित केले. आपल्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रामाणिक पतीच्या खुनानंतर त्याचा सूड घेण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी त्याची पत्नी नम्रता पोलिस अधिकारी होते. या संघर्षाची कहाणी रेखा यांनी नम्रताच्या भूमिकेत उत्तम साकारली आहे.
यानंतर रेखा यांनी ज्या चित्रपटात भूमिका केल्या त्या फारशा लक्षणीय ठरल्या नाहीत पण ‘लज्जा’, ‘झुबेदा’ या कलात्मक चित्रपटात त्या पुन्हा दिसून आल्या. त्यांचा प्रगल्भ आणि अनुभवी अभिनय या चित्रपटांमध्ये विशेषत्वाने जाणवतो.
‘झुबेदा’ या चित्रपटात रेखा यांच्या चित्रपटसृष्टीतील समृद्ध आणि परिपक्व अनुभवाची झलक पहायला मिळते.काहीशा गंभीर भूमिकेतही रेखा या प्रौढत्वाकडे झुकलेल्या वयातही अतिशय सुरेख दिसल्या आहेत.
महाराणी मंदिरा देवी ही फत्तेपूरच्या महाराज विजयेंद्र सिंग यांची पत्नी.तिचा पती झुबेदा या सौंदर्यवती नायिकेच्या प्रेमात पडतो आणि आपल्या आनंदासाठी झुबेदाला आपल्या राजवाड्यात लग्न करून घेऊन येतो. झुबेदाचे राजावर अतीव प्रेम असूनही राजघराण्याच्या परंपरांची चौकट ओलांडणे झुबेदाला अशक्य होते.ती तिच्या प्रेमासाठी अट्टहास करत राहते.अशावेळी राजघराण्याचे नियम आणि समाजाची चौकट पाळण्याचे गांभीर्य सांभाळत झुबेदाशी नात्याची जबाबदारी पाळणारी काहीशी कठोर मंदिरादेवी रेखा यांनी या चित्रपटात साकारली आहे.करिश्मा कपूरसारख्या नव्या पिढीच्या सौंदर्यवती अभिनेत्रीसमोरही रेखा यांनी आपल्या भूमिकेची स्वतंत्र छाप उमटवली आहे.त्यामुळे रेखा यांची छोटी भूमिका झुबेदा या नायिकाप्रधान चित्रपटातही उठून दिसते.
अमिताभ बच्चन, जितेंद्र, राकेश रोशन ,फारुख शेख, या नायकांच्या पिढीसह रेखा यांनी अभिनय केलाच पण अक्षय कुमार, ह्रतिक रोशन या पुढच्या पिढीतील नायकांसहही त्यांनी भूमिका केल्या आहेत. कोई मिल गया या चित्रपटात त्यांनी बौद्धीक दृष्ट्या गतिमंद तरुणाच्या आईची केलेली भूमिका पुरस्कारप्राप्त ठरली.
रेखा यांच्या चित्रपट कारकीर्दीतील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना,२०१० साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
बहुचर्चित रेखा- वादळी आयुष्य
सिने जगतातील त्यांचा वावर जितका लक्षणीय ठरला आहे तितकेच रेखा यांचे वैयक्तिक आयुष्यही बहुचर्चित राहिले आहे.
१९९० साली रेखा यांनी मुकेश अग्रवाल या व्यावसायिक असलेल्या व्यक्तीशी विवाह केला. पण हा आनंद त्यांना फार काळ लाभू शकला नाही. वर्षभरातच त्यांच्या पतीने आत्महत्या केली आणि रेखा पुन्हा एकाकी बनल्या. १९७३ साली रेखा यांनी अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी विवाह केल्याची बातमी पसरली होती पण ती केवळ अफवा असल्याचे रेखा यांनी स्वतःच एका मुलाखतीत नोंदविले आहे.
यश कोहली यांच्यासह रेखा यांचे असलेले भावबंधही चर्चेचा विषय ठरले आहेत.
अमिताभ आणि रेखा-
प्रसिद्ध सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या हळुवार नात्याचा गोफ चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीत गुंफला गेला. आजही जगभरात त्यांच्या या नात्याची विशेष चर्चा होताना दिसते. परंतु रेखा मात्र या नात्याबद्दल बोलताना हळुवार होतात. मुकडदार का सिकंदर. मिस्टर नटवरलाल,गंगा की सौगंध ,दो अंजाने हे त्यांची एकत्रित भूमिका असलेले चित्रपट. सिलसिला हा चित्रपट गाजला तो केवळ विषयवस्तूमळे नाही तर त्या चित्रपटात रेखा अमिताभ यांच्यासह अमिताभ यांच्या पत्नी जया यांचीही भूमिका होती. ‘सिलसिला’ चित्रपटात एकमेकांवर प्रेम असलेल्या प्रेमिकांची भूमिका रेखा आणि अमिताभ यांनी केली आहे.पण या प्रेमाला सफलता न मिळण्यासारखे कथानक चित्रपटात घडत राहते. सिलसिला चित्रपटानंतर मात्र रेखा आणि अमिताभ या दोघांनी एकत्र कोणत्याही चित्रपटात भूमिका केलेली नाही.
रेखा यांचा करिश्मा-
“बॉलिवूडची मडोना” असे ज्यांना संबोधिले जाते त्या रेखा यांचे व्यक्तिमत्व सुरुवातीच्या काळात अनाकर्षक होते त्यामुळे त्यांना चित्रपट नाकारले गेले हे खरे. पण त्यांच्या वेशभूषा, केशभूषा,नृत्यातील अदा आणि एकूणच व्यक्तिमत्वाची मोहिनी त्यांच्या उतार वयातही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या चिरतरुण सौंदर्यावर लुब्ध असा केवळ पुरुषच नाही तर महिलांचाही मोठा वर्ग आहे. याचे गमक त्यांची आहारपद्धती आणि योगाचा नियमित सराव यात दडले आहे. १९८३ साली अभिनेता चांकी पांडे याच्या आई आहारतज्ज्ञ स्नेहलता यांचे मार्गदर्शन रेखा यांनी घेतले. त्यातून त्यांची शरीरयष्टी सुडौल आणि आकर्षक झाली आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला टवटवीत ठेवण्यासाठी त्या नियमित योग करतात.
सिंदूर-
रेखा एका महत्वाच्या विषयामुळे अधिक चर्चेत राहतात आणि तो म्हणजे त्या कायम एखाद्या विवाहित स्त्री प्रमाणे आपल्या भांगात सिंदूर भारतात. पतीचे निधन झालेले असताना त्या कोणासाठी असे सिंदूर आपल्या भांगात भरतात याची उत्सुकता आजही जगभरात दिसून येते.
आपली वेशभूषा आणि केशभूषा, दागिने यामुळे आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाला वयाच्या ६४ व्या वर्षीही सौंदर्याची झळाळी बहाल करणारी रेखा ही अभिनेत्री. दाक्षिणात्य वस्त्रांच्या दुनियेत विशेष मान्यता पावलेली आणि उच्च अभिरुचीची जाणीव करून देणारी कांजीवरम साडी हा रेखा यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य स्त्रियाच नाही तर अभिनेत्री विद्या बालन हिलाही रेखा यांची अभिरुची आपलीशी करावीशी वाटते! आपल्या साडीला साजेशी केशभूषा आणि रंगभूषा त्या करतात. त्या जोडीनेच साजेसे दागिने आणि साडीला शोभा देणारी पोटली त्यांच्या हातात आवर्जून पहायला मिळते. ‘Singnature Diva’ म्हणून त्या आजही जगभरात लोकप्रिय आहेत ते यासाठीच.
चित्रपट पुरस्कार सोहळा,छोट्या वाहिनीवरील कार्यक्रम यामधील रेखा यांचा सहभाग कायमच लक्षणीय आहे.प्रौढत्वाकडे झुकत असलेल्या रेखा यांची दिलखेचक नृत्य अदाकारी आणि हावभाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत रसिक मनावर अधिराज्य गाजवते.
“पिया बावरी” पासून “मेरे लिए भी क्या कोई उदास बेकरार है” म्हणत सुरु झालेला सौंदर्याची हा प्रवास सौंदर्याची खाणच आहे... सिने रसिकांच्या मनात दडलेली “रेखा” आहे...
संदर्भ
१. https://en.wikipedia.org/wiki/Rekha
२. Biography- The Untold Story-Yasser Usman
३. रेखा-(हिंदी पुस्तक)
४. हिंदी सिनेमाके १५० सितारे
५. Rekha by Mohit Gandhi
६..https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/at-64-rekha-is-bollywoods-ageless-diva/b-towns-ageless-beauty/slideshow/66147959.cms
७.https://www.femina.in/celebs/indian/the-life-and-times-of-rekha-109358.html
८.https://www.lovesutras.com/fashion/story/rekha-and-her-love-for-kanjeevaram-silk-sarees-124728-2018-05-18