Jatra - Ek bhaykatha - 2 in Marathi Horror Stories by Shubham S Rokade books and stories PDF | जत्रा - एक भयकथा - 2

Featured Books
Categories
Share

जत्रा - एक भयकथा - 2

   तुम्ही जर मागील भाग वाचला नसेल तर माझ्या प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा.......
     
               जत्रा ( एक भयकथा ) भाग 2

          दिवसाउजेडी माणसाने कितीही फुशारकी मारली की आपण कशाला भीत नाही भूत असो नाहीतर काहीही असो मात्र रात्री अंधार पडल्यावर साऱ्यांचीच बोलती बंद होते . गण्याने कितीही मोठ्या बाता मारल्या असल्या तरी त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भीती आपले पाय पसरवत होती.
पाद्र्याची वाट ही काही वर्दळीची वाट नव्हत गाडीवाट असली तरी चाकाच्या 2 चाकोरीपुरतीच वाट राहिली होती बाकी सगळीकडे रानटी झाडे झुडपे माजली होती त्यामुळे जंगलात आल्यासारखं वाटत होतं . पायाखालचं वाळून गेलेलं गवत पाय पडल्यावर चुरचुर करत होतं . सुरुवातीला या जंगलात फिरताना राजेशाही असणारी त्यांची चाल थोड्याच वेळात दीनदुबळ्या माणसासारखी झाली. काही वेळाने शिकार शिकारीपासून जीव वाचवून पळण्यासाठी जशी धडपड करते त्याहून अधिक धडपड हे तिघे त्या जंगलातुन बाहेर पडण्यासाठी करू लागले . कुठेतरी कोल्हेकुई व्हायची आणि त्यांची काळीजं झटकन उडायची . मग काही काळ शांत जायचा पायाखाली असणाऱ्या गवताच्या चुरचुरी चा आवाज इतका भयानक वाटायचा की कानाचे पडदे फाटायचे . तरीही धीर करून ते चालले होते त्यांच्या मनात कुठेतरी लपून बसलेला विचार म्हणत होता की भुते वगैरे काही नसतात सारे भास असतात पण……….।
तो विचार किती खरा आणि किती खोटा या सार्‍यांपेक्षा सहीसलामत बाहेर जाणे अधिक महत्त्वाची होती इतकावेळ विचारांच्या तंद्रीत चालणाऱ्या भानावर येत मन्या व राम्याला हाका मारल्या त्याचा आवाज त्या निस्तब्ध जंगलात कुठच्या कुठे हरवून गेला. त्याच्या हाकेला उत्तर न आल्याने त्याने मागे वळुन बघीतले तर………….
         
                तिथे कोणीच नव्हतं . तो एकटाच चालत होता …. कधीपासून …?केव्हापासून …? त्याला काहीच माहित नव्हत.त्याला काहीच कळत नव्हत . तो घाबरला. गुरासारखा ओरडत मान्या राम्या त्यांच्या नावाने हाका मारत सुटला . थोडाच वेळ पण थोड्या वेळानंतर तो ओरडला खूप ओरडला पण त्यालाही स्वतःचा आवाज ऐकू येईनासा झाला . त्या अघोरी जंगलाने त्याच्यावर ती कोणती करणी केली होती कोणास ठाऊक ….?
     

          तो वेड्यासारखा धावत सुटला इकडून तिकडे तिकडून इकडे धाप लागेपर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत तो धावतच होता पण तो कुठेच पोहोचत नव्हता फिरून फिरून एकाच जागी येत होता.

तो घाबरला खूप घाबरला मृत्यू दारावरती दिसल्यावर मृत्यूचा पाश जीवनवृक्षाचा रस संपूवू लागल्यावर सगळेच घाबरतात आणि हाच घाबरट पणा हीच हीच मूर्ती पासून ची भीती सामान्य माणसाकडून अचाट कामे करून घेते मृत्यूपूर्वीच असच बळ त्याच्या अंगी संचारला त्याला राग आला त्या जंगलाचा , त्या पाद्रीचा , त्याच्या प्रेमात पडणार्‍या शेवंताचा , दोघांच्या मिलनाचा अडथळा बनणाऱ्या पाटलाचा ही.
 

        त्याच रागाच्या भरात त्यानं एक अचाट धाडस केलं .
जंगलातील वाळलेली लाकडं गोळा केली , पालापाचोळा गोळा केला , त्यांचा ढीग लावला आणि खिशात हात घातला पण आगपेटी नव्हतीच . तिथेच पडलेले दोन गारगोटीचे दगड घेतले आणि एकमेकांवर आपटणे सुरू केले . त्याला कशाचेच भान नव्हत एकाच गोष्टीवर त्याचं लक्ष होतं ती म्हणजे जंगल जाळायचं……। गारगोटीवर गारगोटी आपटता आपटता त्याच्या डाव्या हाताचा अंगठा ठेचून निघाला त्याच्यातून रक्त वाहू लागलं पण त्याला कशाची जाणीव नव्हती गारगोट्या संघर्ष वाढत होतं नि शेवटी त्यातून ठिणगी उडाली ती पाल्यावरती पडली आणि एकच भडका उडाला …..।
          जाळ लागल्याबरोबर ओली वाळली सगळी लाकडे आगीच्या कचाट्यात येऊ लागली. त्याचबरोबर आजूबाजूचे वृक्ष-वेली सगळेच आगीने आपल्या बाहुपाशात आजूबाजूला घेतले . सगळीकडे नुसती आग झाली . आगीच्या ज्वाला त्याच्या शरीराला स्पर्श करू लागल्या आगीचा दाह आता प्रकर्षाने जाणवू लागला ….। हळूहळू तोही यज्ञामध्ये पडलेल्या आहुतीप्रमाणे अग्नी मध्ये जळू लागला . मृत्युलाही भीती वाटावी इतकी भयानक वेदना त्याला होऊ लागली पण वेळानंतर सारे काही शांत झाले .

      त्याला काहीच कळेना तो कोठे होता तिथे काहीच नव्हते त्याला काहीच दिसत नव्हते त्याला काहीच जाणवत नव्हते फक्त मोकळं आणि हलकं जाणवत होतं हाच असतो का तो मृत्यू ज्याला आपण भित असतो पण यात भिण्यासारखं काहीच नाही…।

         हळू हळू त्याला शीतल पाण्याच्या तुषारांचा गारवा जाणवू लागला आणि गारव्याबरोबरच अनेक आवाज त्याच्या कानात गर्दी करू लागले…..।
       मन्या आणि राम्या त्याला उठवत होते . तो बेशुद्ध झाला होता हळूहळू त्याने डोळे उघडले त्याला जाणवले आपण जिवंत आहोत .

       मग ते जंगल ती आग हे सगळं खोटं होतं का ? तेव्हाच त्याच्या हाताच्या अंगठ्याला असह्य वेदना झाल्या , हे सारं खरं होतं तर …? मग तो वाचला कसा ? कुणी वाचवलं ? पद्र्याच्या भुतानं यांना काहीच केलं नाही का ….?