फुलाचा प्रयोग
पांडुरंग सदाशिव साने
९. देवाचा दरबार
परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर बसला होता. देवदूत स्तुति-स्तोत्रे गात होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू सारे हात जोडून उभे होते.
‘देवा, तुझा महिमा किती वर्णावा? हे अनंत विश्व तू निर्माण केलेस. इंद्राल पाऊस पाडायला लावलेस; सूर्याला तापावयास सांगितलेस. तुझ्या आज्ञेने वायू वाहातो, अग्नी जळतो, समुद्र उचंबळतो; तुझ्या आज्ञेने पर्वत उभे आहेत, नद्या धावत आहेत, फुले फुलत आहेत, वृक्ष डोलत आहेत, किती विविध ही सृष्टी; किती सुंदर, किती मोठी आणि सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यप्राणी. देवा, परमेश्वरा, तुझे सारे बुध्दिवैभव मनुष्य निर्मिण्यात ओतले आहेस. एवढासा साडेतीन हात देहात राहणारा हा मनुष्य, परंतू सर्व विश्वाचे तो आकलन करू शकेल, सर्व सृष्टीवर सत्ता गाजवू शकेल. तो पृथ्वीवर राहून तार्यांचा इतिहास लिहील, पाताळातील घडामोडी वर्णील. मानवाला अशक्य असे काही नाही.’
परमेश्वराची अशी स्तुती चालली होती, इतक्यात तेथे सैतान आला. सारे कुजबुजू लागले. दुधात जणू मिठाचा खडा पडला. सुखात विष कालवले गेले. सर्वाच्या प्रसन्न चेहर्यावर वक्रता दिसू लागली. सैतान संतापाने व उपहासाने बोलू लागला, ‘पुरे करा ही स्तुतिस्तोत्रे. स्तुती करण्यासारखे काय आहे? परमेश्वराचे अनंत विश्व दूर राहो. आपण पृथ्वीपुरतेच पाहू या. काय आहे त्या पृथ्वीवर? त्या पृथ्वीवर सदैव मारणमरण सुरू आहे. ‘बळी तो कान पिळी’ हा प्रकार सुरू आहे. कोल्हा कोंबडीला खाईल, लांडगा कोल्हाला खाईल; वाघ, सिंह सर्वांना खातील. चिमणी किडे खाईल, ससाणा चिमणीला खाईल. तेथे भूकंप होतात व एकदम सारे गडप होते. ज्वालामुखीचे स्फोट होतात व आगीचा वर्षाव होऊन लाखो जीव त्यात मरतात. त्या पृथ्वीवर नाना रोग, नाना साथी, तेथे प्लेग आहे, कॉलरा आहे, मानमोडी आहे, विषमज्वर आहे, देवी आहेत, गोवर आहे, घटसर्प आहे, काळपुळी आहे. कोणी आंधळे आहेत, कोणी पांगळे आहेत, कोणी मुके आहेत, कोणी बहिरे आहेत आणि त्या मनुष्यप्राण्याची कशाला स्तुती करता? काय आहे त्या मानवात? मनुष्यप्राणी आज हजारो वर्षे झाली तरी आपसांत झगडत आहे. मनुष्य मनुष्याला छळीत आहे, पिळीत आहे, गिळीत आहे, एकमेकांना मारू पाहतात, एकमेकांना गुलाम करू इच्छितात. मारण्याची भयंकर साधने शोधीत असतात. कोणी घंटा वाजविण्याचा हट्ट धरतात. कोणी तीन वाजविण्याचा हट्ट धरतात. घंटेसाठी भांडणार्यांचे का कौतुक? कोणी तोंडाने शांतिमंत्र म्हणतात आणि खुशाल रक्तपात करतात. शांतिधर्माचे, प्रेमधर्माचे उपाध्यायच युध्दांना उत्ततेजन देतात. मारामारीत आशीर्वाद देतात. हा मनुष्यप्राणी वरून हसतो व मनात रडतो. गोड बोलतो, पोटात द्वेषाचे विष असते. मनुष्याजवळ सत्य नाही, न्याय नाही. आपल्या मनाला जे वाटेल ते तो करतो आणि त्याचे समर्थन करण्यासाठी फक्त बुध्दी वापरतो. मनुष्यप्राणी म्हणजे मूर्तिमंत पाप. किती स्वार्थी, किती दांभिक; किती अहंकारी, किती धूर्त ; मनुष्यप्राणी म्हणजे दुनियेला शाप. तो सर्वाचा संहार करील. स्वत:च्या जातीचाही करील. तो पक्ष्यांना गंमतीसाठी मारील व मग त्यांच्यात पेंढा भरुन तो दिवाणखान्यात ठेवील. तो हरणे मारील व मग त्यांची शिंगे शोभेसाठी आणील. तो पक्ष्यांची पिसे ते जिवंत असता उपटील व त्या पिसांनी नटेल. हया मनुष्याकडे पाहू नये असे मला वाटते. मनुष्या म्हणजे वासनाविकारांचा गोळा.’
देवदूत सैतानाला थांबवू पाहात होते; परंतु परमेश्वर म्हणाला, ‘त्याला बोलू दे. सर्वाना मोकळेपणाने बोलण्याचे येथे स्वातंत्र्य आहे. आणखी बोलायचे आहे का? मी शांतपणे सारे ऐकत आहे. सैताना, बोल सारे मनातील बोल.’
सैतान म्हणाला, ‘किती बोललो तरी सूर एकच. तुझी सृष्टी वाईट आहे. ती पृथ्वी भेसूर आहे. मनुष्यप्राणी म्हणजे शापरुप आहे.’
परमेश्वर म्हणाला, ‘सैताना, मी तुला एकच सांगतो, शेवटी सारे गोड होईल. आंबट कैरी पिकते. लहान नदी मोठी होते. नदी वेडीवाकडी जाते. कधी उथळ कधी गंभीर; परंतु शेवटी सागराला मिळते. तसाच हा मनुष्यप्राणी. तो वेडावाकडा जाईल. कधी माकडासारखा वागेल. कधी वृकव्याघ्रांहून क्रूर होईल; परंतु शेवटी मांगल्याच्या सागराकडे येईल. हया चिखलातून तो शेवटी डोके वर काढील व स्वत:चे जीवन कमळाप्रमणे पावित्र्याने व माधुर्याने भरील. मला ही आशा आहे. मला ही निश्चीत खात्री आहे. तू पाहा एकदा प्रयोग करून ते पाहा सारे मानव येथून दिसत आहेत. तुला जो पसंत पडेल त्याच्यावर प्रयोग कर. त्याला पापाकडे नेण्याचा हट्ट घर; परंतु शेवटी तो सत्पंथाकडेच वळेल. तुझ्या पापाचा शेवटी त्यांला कंटाळा येईल. चिखलातच बेडकाप्रमाणे उडया मारण्याचे तो बंद करील व गरूडाप्रामणे उच्च जीवनात भरारी मारील. करून पाहा प्रयोग. बघ मानवाचा अध:पात होतो का. जितके त्याला खाली नेता येईल तेवढे नेण्याची पराकाष्ठा कर; परंत मनुष्य शेवटी वर येईल.’
सैतान पृथ्वीवरच्या मानवांकडे पाहू लागला. हाती धरावा असा काही मनुष्य त्याला दिसेना. सारे दुबळे व भेकड. व्यक्तित्तव कोणाजवळही नाही. अशा बावळटांवर प्रयोग करण्यात काय अर्थ? परंतु इतक्यात त्याला एक मनुष्य दिसला. तो मनुष्य मोठा मनस्वी होता. तो कोणाचा गुलाम नव्हता. मनात येईल ते न भिता करणारा होता. बेडर होता तो. सैतानला तो मनुष्य मानवला. हया माणसाजवळ करावा खेळ, हयाच्यावर करावा प्रयोग असे त्याला वाटले. बलवंताला बलवंताशी त्याच्यावर मी प्रयोग करतो. जर मी हरलो तर तसे येऊन सांगेन. सैतानही सत्याला मान देतो.’
परमेश्वर म्हणाला, ‘ठीक, जा. प्रयोग कर. ने मानवाला खालीखाली; परंतु शेवटी तो चांगल्याकडेच वळेल. मला मुळीच शंका नाही.’