२५. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ७- शेवटचा भाग
* राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे-
६. बिकानेर- "कॅमल फेस्टिवल साठी प्रसिद्ध वाळवंटातील शहर"
थर वाळवंटामध्ये वसलेले बिकानेर हे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. ह्या शहरात उंट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 'उंटांचा देश' अशी सुद्धा बिकानेर ची ओळख आहे. हजार हवेलींचे शहर म्हणून देखील बिकानेर प्रसिद्ध आहे. इथले कॅमल फेस्टिवल विशेष प्रसिद्ध आहे. त्याची मजा अनुभवण्यासाठी ह्या जागी लाखोंच्या संखेने पर्यटक भेट देतात. आणि फक्त आपल्या देशातलेच नाही तर विदेशांतून येणारे पर्यटक इथे भेट देण्यासाठी उत्सुक असतात. ही जागा राजस्थान मधल्या ३ मुख्य वाळवंटी प्रदेशांपैकी एक आहे. उंट आणि वाळवंटा बरोबर इथले मुख्य आकर्षण म्हणजे भव्य हवेली.. बिकानेर भुजिया, थंडाई, खरेदी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. बिकानेर मध्ये काय पाहता येईल-
* जुनागढ किल्ला- बिकानेर मधील भव्य असा हा किल्ला अतिशय प्रसिद्ध आहे. आधी ह्या किल्ल्याला चिंतामणी म्हणले जायचे पण २०व्या शतकात "ओल्ड फोर्ट" किंवा जुनागड असे नाव ह्या किल्ल्याला देण्यात आले. जुनागढ हा किल्ला राजस्थानच्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. त्याची उभारणी साधारण ४०० वर्षापुर्वीची आहे. आर्कीटेक्चर पाहण्यासाठी अतिशय सुंदर अशी ही जागा दर वर्षी देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करतांना दिसते. आत्ताचे बिकानेर शहर ह्या किल्ल्याच्या आस पास विकसित झाला आहे. आणि पर्यटकांसाठी उत्तम जागा आहे.
* लालगड महाल- हा महाल महाराज गंगा सिंह ह्यांनी आपल्या पिता लाल सिंह ह्यांच्या आठवणीसाठी लाल दगडांपासून बनवला होता. अतिशय देखणा असा हा महाल आहे. इथे मुघल, राजपूत आणि युरोपीयन शैलीचा संगम पाहायला मिळतो. ह्या महालात खूप मोठे लॉन आहे जिथे मोर मुक्तपणे हिंडतांना दिसतात. मोरांचा नाच पाहण हे इथल मुख्य आकर्षण आहे. इथे लायब्ररी, कार्ड रूम, बिलियर्डस रूम इत्यादी वेगवेगळ्या खोल्या आहेत. ह्या महालाच रुपांतर हॉटेल मध्ये केले आहे त्यामुळे म्युझियम सोडून इतर ठीकामी पर्यटकांना प्रवेश मिळत नाही. लालगड महाल आर्कीटेक्चर साठी विशेष प्रसिद्ध आहे आणि पर्यटनासाठी उत्तम जागा आहे.
* गंगा सिंह संग्रहालय- १९३७ साली राजा गंगा सिंह ह्यांनी ह्या संग्रहालयाची स्थापना केली. हे संग्रहालय गव्हरमेंट सुट्ट्या आणि शुक्रवार सोडून सर्वांसाठी खुले असते. इथे प्रवेशासाठी तिकीट आहे. ज्यांना इतिहासाची आणि पुरातत्वशास्त्रीय अभ्यासाची आवड आहे त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. इथे राजपुतांनी वापरलेली मातीची भांडी, पेंटिंग, शस्रे इत्यादी वस्तू पाहायला मिळतात.
* नॅशनल कॅमल रिसर्च सेंटर- हे रिसर्च सेंटर खास उंटांसाठी बनवले आहे. ४ ब्रीडच्या उंटांचा अभ्यास इथे केला जातो. इथे साधारण ४०० उंट आहेत. ब्रिटीश असलेल्या काळापासून इथे आर्मी सठी उंटांचा वापर करण्यात येतो. इथे उंटावरून फिरण्याची मजा घेता येते. इथे उंटाच्या दुधापासून आय स्क्रीम सारखे सॅम्पल फूडची मजा घेता येते. इथे जाण्यासाठी तिकीट आहे आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत हे रिसर्च सेंटर उघडे असते. ही जागा उंटांचे ब्रीडिंग ग्राउंड म्हणून प्रसिद्ध आहे.
बिकानेर हे हवेलींसाठी प्रसिद्ध आहे. इथली रामपुरीया हवेली विशेष प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली बिकानेर चित्र शैली प्रसिद्ध आहे. इथले लक्ष्मी नाथ टेम्पल सुद्धा प्रसिद्ध आहे. बिकानेरचे जैन मंदिर, मठ, छत्र्या, शहराबाहेरील गजनर राजवाडे, शहरातील राजवाडा उंदरांच मंदिर, इत्यादी स्थळे फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
७. अजमेर- "दर्गा शरीफ आणि बरच काही."
अजमेर राजस्थान च्या मध्यावर आहे. आणि आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर, अजमेर दर्गा शरीफ मुळे प्रसिद्ध आहे. दर्गा शरीफ किंवा दर्गा ख्वाजा म्हणजे सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या समाधिस्थळी दरवर्षी सहा दिवस होणा-या उत्सवासाठी देशोदेशीचे मुस्लीम यात्रेकरू येत असतात. इथे पाहता येण्यासारख्या अजून काही जागा-
* अनासागर तलाव- अजमेरमधील अनासागर हा कृत्रिम तलाव अनाजी चौहान यांनी १२ व्या शतकात बांधला होता. नंतर जहांगीर, शहाजहान या मोगल सम्राटांनी स्फटिकांचे कठडे आणि विश्रांतिस्थान बांधून या स्थळाचं सौंदर्य वाढविलं. ह्या तलावाच्या बाजूला दौलत बाग गार्डन आहे जे ह्या तलावाच सौंदर्य अधिकच खुलवण्यात मदत करते. आणि ह्या जागेला पर्यटकांची आवडती जागा आहे.
* अकबराचा महाल- अजमेर शहराच्या मध्यवर्ती भागात अकबराचा महाल आहे. हा महाल १५०० AD मध्ये बांधला होता. अकबराच्या राजवाडयात मोगल आणि राजपूतकालीन दुर्मिळ वस्तूंचं सरकारी वस्तूसंग्रहालय आहे. इथे त्या काळातली शस्त्र सुद्धा पाहायला मिळतात. इथे असलेला काळ्या संगम्रावारातील काली देवीची प्रतिमा प्रसिद्ध आहे. इथे प्रवेशासाठी फी आकारली जाते.
* तारागड- मूळचं संस्कृत महाविद्यालय आणि ३० हिंदू मंदिरं पाडून तेथे महंमद घोरीनं नमाज पढण्यासाठी अडीच दिवसांत बांधलेली मशीद अढाई दिन का झोपडा तारागड टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळते. ही जागा अतिशय प्रसिद्ध आहे. अस मानले जाते की, आशिया खंडातला पहिला टेकडी वरचा किल्ला आहे. नागपहरी टेकडीवर तारागड किल्ला वसलेला आहे.
*पुष्कर सरोवर- अजमेरपासून ११ किलोमीटर वर निसर्गरम्य पुष्कर तीर्थ (सरोवर) हे हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ह्या तलावाच्या चहुबाजूला पुष्कर गाव आहे. पद्म पुराणानुसार ब्रह्मदेव यज्ञासाठी शांत जागा शोधत हिंडत असताना त्याच्या हातातील कमलपुष्पं तीन ठिकाणी गळून पडली आणि तेथून पाणी वाहू लागलं. पुष्कर हे त्यांपैकी एक आहे. येथील रमणीय सरोवरा भोवती स्नानासाठी घाट बांधलेले आसून तेथेच पूजा, धार्मिक विधी केले जातात. पुष्करला अनेक देवालयं असली तरी ब्रह्मदेवाचं मंदिर हे त्यांत प्रमुख आहे. हे एकमेव ब्रह्मदेवाचं देवालय भारतात आहे. दर कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. उंटांचा बाजार हे या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे.
असे अजमेर ही राजस्थान मधली प्रसिद्ध जागा आहे. इथले अनेक सरोवर प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर, इथला निसर्ग सुद्धा खास आहे. त्यामुळे ही जागा पर्यटकांची आवडती जागा आहे. इथे खरेदीसाठी साड्या, ओढणी, लेहेंगा इत्यादी प्रसिद्ध आहे.
८. चितोडगड- "अभिमान वाटावी अशी जागा.."
चितोडगड लॅंड ऑफ फोर्ट्स म्हणून ओळखले जाते. शिसोदिया वंशाच्या राजपुतांच्या राजधानीचं चितोडगड उदयपूरहून ११५ कि.मी. वर आहे. राजपुतांच्या अतुलनीय पराक्रमांच्या अनेक वीरगाथा चितोडलाच लिहिल्या गेल्या.
* चित्तोड किल्ला- एकून तीन वेळा पूर्ण विध्वंस झालेला चितोडचा हा किल्ला एका टेकडीवर असून किल्लाभोवतीच्या भक्कम तटबंदीच्या आत राजवाडे, मंदिर, तलाव-तळी यांचे बरेचसे भग्नावस्थेतील अवशेष पाहायला मिळतात. चितोड आपल्याला जास्त परिचित आहे ते रूपवान राणी पद्मिनीच्या सौंदर्यावर भाळून तिच्या प्राप्तीच्या आशेनं अल्लाउद्दान खिलजीनं चितोडवर केलेल्या स्वारीमुळे. एका तलावात हा पद्मिनी महाल आहे आणि समोरच्या दुस-या एका महालात एक आरसा अशा खुबीनं बसविण्यात आलेलं आहे की, तलावातील महालाच्या पायरीवर बसलेल्या व्यक्तीचं पाण्यातील प्रतिबिंब आरशात दिसावं. मागं वळून पाहिलं असता ती पायरीवरील व्यक्ती मात्र दिसत नाही.
* राणा कुंभ पॅलेस- राणा कुंभाचा राजपूत नागरी पद्धतीची बांधणी असलेला राजवाडा त्याच्या तळघरात राणी पदमिनी व इतर स्त्रियांनी केलेल्या जोहारामुळे अजरामर झाला आहे. याशिवाय मीरा महाल, पन्ना दाईचा महाल या इतर इमारतीही येथे पडीक स्थितीत उभ्या आहेत.
*विजय स्थंभ आणि कीर्ती स्तंभ- या किल्ल्यातील दोन प्रमुख स्मारकं म्हणजे ‘विजयस्तंभ’ आणि ‘कीर्तिस्तंभ’. ३७ मीटर्स उंचीचा नऊ मजली विजयस्तंभ राणाकुंभ यानं माळवा आणि गुजराथमधील मुसलमान राज्यकर्त्यांवर १४४० मध्ये मिळविलेल्या विजयाच्या प्रीत्यर्थ बांधला. २२ मीटर्स उंचीचा कीर्तिस्तंभ एका धनिक जैन व्यापा-यानं बांधला असून तो पहिले जैन तीर्थंकर भगवान आदिनाथ यांना अर्पण केलेला आहे.
*कालिका माता मंदिर- चितोडमधील अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या मंदिरांपैकी कालिका माता आणि संत मीराबाईचे मीरा आणि कुंभश्याम ही विशेष उल्लेखनीय. येथील फत्ते प्रकाश राजवाड्यांचे सध्या सरकारी म्युझियममध्ये रुपांतर करण्यात आलेलं आहे.
पराभवापेक्षा मरण स्वीकारणा-या शूरवीरांच्या आणि अब्रू वाचवण्यासाठी जोहारला कवटाळणा-या धैर्यवान स्त्रियांच्या करुण कहाण्या चितोडचा दगड अन् दगड अगदी मूकपणे कथन करत आहे, ही जाणीव या किल्ल्यातून हिंडताना अस्वस्थ करत राहते. पण ह्या जागेचा आणि इथल्या शूरांचा अभिमान वाटेल हे अगदी नक्की.. त्याचबरोबर इथे, श्यामा टेम्पल, मीरा टेम्पल इत्यादी मंदिरे पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे अभयारण्यात निसर्गाची मजा अनुभवता येते.
शौर्य, पराक्रम, वीरोचित स्त्रीदाक्षिण्य हे प्रमुख गुण असलेल्या शूर रजपुतांची ही राजस्थानची भूमी देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांची आवडती जागा आहे. इथे इतिहास जाणून घेता येतो पण त्याचबरोबर इथे अनेक अभयारण्ये सुद्धा आहेत. इतक्या विविधतेमुळे राजस्थान ही जागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते. आणि राजस्थानला एकदा तरी भेट दिली पाहिजे.