असं म्हणतात हा रस्ता खूप सुनसान आहे . या रस्त्यावरती म्हणे रात्रीची भुते फिरतात . बरेच चकवे आहेत म्हणे या रस्त्यावर . मला बिलकुल विश्वास नाही असल्या भुताखेतांच्या गोष्टीवर . म्हणूनच माझी मित्रांबरोबर पैज लागली. मी म्हटलं या रस्त्यावरून मी जाऊन दाखवणार व व्हिडिओ शूटिंग काढून तुम्हा सर्वांना आणून दाखवणार. मग ठरल्याप्रमाणे त्या अमावस्येच्या रात्री मी माझी मोटार बाईक काढून निघालो. मित्र म्हणत होते अरे बाबा एखाद्या देवाचा फोटो किंवा अंगारा वगैरे घेऊन जा , पण असल्या या अंधविश्वासू गोष्टींवरती माझा मुळीच विश्वास नाही . मी नेहमी या अंधश्रद्धांच्या विरोधात बोलत आलेलो आहे . त्यामुळे मी असल्या अंधश्रद्धा बाळगणे हे माझ्या मनाला न पटणारे होते . त्यामुळे या कोणत्याच गोष्टी न घेता मी जायचं ठरवलं . स्टेट हायवे असल्यामुळे रस्ता तसा बराच रुंद होता. एकावेळी चार चार-चाकी वाहने जाती एवढा मोठा . माझा अंदाज चुकत असेल तर , कमीत कमी तीन तरी वाहने कशीही जातील इतका मोठा रस्ता होता. दोन्ही बाजूला चिंचेची झाडे होती. दोन्ही बाजूला घनदाट जंगल व या जंगलाला कुंपणसारखी लावलेली ती चिंचेची झाडे . मी गाडी घेऊन चाळीस ते पन्नास या स्पीडने निघालो होतो . डोक्या वरती हेल्मेट होते . हेल्मेट घालायचं कारण थंडी होतं . हा रस्ता बराच कुख्यात असल्याने रात्रीच्या वेळी ना कोणते मालवाहू वाहन जात होते ना कोणती चार चाकी . त्या किर्र् शांत असलेल्या रस्त्यावर मी एकटाच जात होते.
मला एक कळत नाही लोक सहजपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास कसे काय ठेवतात . जेव्हापासून या रस्त्याबद्दल च्या गोष्टी कानावर येऊ लागल्या होत्या तेव्हापासूनच मी या रस्त्याबाबत घडणाऱ्या गोष्टी वरती निरीक्षण ठेवले होते . त्यामुळे मला एक गोष्ट कळाली होती . जेव्हापासून या रस्त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या त्याच्या आधी एक गुंडांची टोळी या भागात लपायला आली होती . नंतर ती एन्काऊंटर मध्ये मारली गेली हा भाग अलाहिदा पण तेव्हा उठलेल्या वावड्या थांबायचं नाव घेत नव्हत्या , वरचेवर लोकांना वेगवेगळे अनुभव येतच होते . या गोष्टीवरून कोणताही माणूस जो साधा का असेना तर्क लावू शकतो , तो समजू शकत होता की या भागांमध्ये गुंडांची टोळी अजूनही सक्रिय होती व तीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांना घाबरवण्याचे काम करीत होती . पण माझ्यासारखे बुद्धिमान लोक त्याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी वर्तवू शकतात . पहिली गोष्ट ती म्हणजे या टोळीला कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याचे मोठे पाठबळ असणार . दुसरी गोष्ट ती म्हणजे या टोळीकडे अत्याधुनिक हत्यारे असणार . तिसरी व शेवटची गोष्ट म्हणजे या टोळीला चालवणारे जे काही डोके होते ते हुशार असणार . पण मला ग्यारंटी होती ते माझ्या इतके हुशार नक्कीच नसणार , कारण मी बुद्धिमत्ता व तर्क लावण्याच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलो आहे आणि हे माझ्या मित्रांना ही मान्य आहे . त्यामुळे खरं तर या भागात शिरताना मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती .
मी स्पीड न वाढवता मी स्थिर गतीने जायचं ठरवलं होतं . कारण आजूबाजूला जंगल असल्यामुळे एखाददुसरं जंगली जनावर गाडीच्या अडव आलं असता फुकटची फजिती व्हायला नको. पण मी जाताना निरीक्षण करणार होतो . साधंसुधं निरीक्षण नाही तर आमच्यासारखी बुद्धिमान माणसे सिंहावलोकन करतात त्यामुळे माझ्या नजरे खालून एक ही गोष्ट सुटणार नव्हती . मी बरेच अंतर आत आलो होतो पण अजूनही वेगळी किंवा विचित्र गोष्ट माझ्या नजरेस पडली नव्हती . पण मी माझं निरीक्षण चालूच ठेवलं . बऱ्याच दिवसापासून मला गाडी चालवण्याचा व गाडी चालवता-चालवता निरीक्षण करण्याची सवय असल्यामुळे मी सहजच कुठेही गेलो तरीही त्या रस्त्यावरच्या साऱ्या खाणाखुणा मला लगेच पाठ होतात . या वाटेवरून येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी अधिकच करड्या नजरेने सिंहावलोकन करत होतो .
मी त्या रस्त्याच्यी निम्मी लांबी पार केली असेल . त्या ठिकाणी मला एक विचित्र गोष्ट दिसली . ती सहजासहजी कोणालाही दिसली नसती . माझी निरीक्षण करण्याची क्षमता सामान्य लोकांपेक्षा जास्त असल्यामुळे ती मला सहजच दिसली . चिंचेच्या झाडावर प्रकाश टाकताच एक लाल चकती चमकत होती . ती जराशी उंचीवर असल्याने गाडी च्या हेडलाईटच्या प्रकाशापासून वंचित राहत होती . पण माझ्या डोळ्याच्या प्रकाशापासून ती वंचित राहू शकली नाही . रस्त्यावर अशी रेडियम आर्ट विचित्र मुळीच नाही पण या संपूर्ण रस्त्यावर कुठेच रेडियम आर्ट नव्हती त्यामुळे ती विशेष करून माझा डोळ्यात भरली . यामागे नक्कीच काहीतरी गोम होती असा माझा तर्कशुद्ध मेंदू सांगत होता . या ठिकाणी नक्कीच कोणासाठीतरी हेतुपूर्वक ठेवलेली खूण होती . ज्या कोणा माणसासाठी ही खूण ठेवली होती फक्त त्यालाच दिसेल अशा हिशोबाने ती ठेवली होती . मात्र माझ्या चाणाक्ष नजरेखालून कोणतीच गोष्ट सुटू शकत नाही . मग ही साधीसुधी खूण किस झाड की पत्ती....
मी माझ्या मेंदूने तर्कशुद्ध विचार करायला सुरुवात केली की हघ खूण कशाची असू शकते ...? मला वेगवेगळी उत्तरे मिळू लागली . त्या उत्तरांना शक्यतेच्या कसोटीवर तपासून बघायला मी चालू केलं . एकतर त्या टोळीला जो कोणी सपोर्ट करत होता त्या सपोर्टसाठी ही खूण असणार . दुसरं म्हणजे हे जंगल इतकं दाट होतं की तो माणसालाही ही स्वतःची जागा शोधणे अवघड असावं , म्हणून त्यांनी स्वतःसाठी केलेली ही खूण असावी. आणि तिसरं म्हणजे माझ्यासारख्या बुद्धीमान माणसाला स्वतःचे पितळ उघडे पाडण्यासाठी ठेवलेला पुरावा . मी तिथेच बाजूला गाडी थांबवली . ज्या चिंचेच्या झाडाला जरा वरच्या बाजूला ती लाल रेडियम आर्ट होती त्या झाडाचे व त्या आजूबाजूच्या परिसराचेही निरीक्षण करायला सुरुवात केली .बाकी झाडाच्या खोडाच्या जवळ व संपूर्ण झाडाखाली चिंचेचा पाला पाचोळा इतर काट्या-कुट्या , काड्या आश्या गोष्टी साचलेल्या होत्या पण त्या झाडाखाली चक्क प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या , काचेच्या बाटल्यांमध्ये , बहुदा दारूच्या , आणि प्लॅस्टिकचे रंगीबेरंगी रॅपर्स होते .
यावरूनही बऱ्याच गोष्टी माझ्या तर्कशुद्ध मेंदूला समजल्या . त्या म्हणजे इथे जे काही लोक होते ते दारू पीत होते . दारू पिणारे होते म्हटल्यानंतर बाहेरचा कोणी माणूस दारू पिण्यासाठी इथे येणे शक्य नाही . म्हणजे इथलाच असणार , इथलाच असणार म्हटल्यानंतर तो गुन्हेगार असणार व टोळीतील सदस्य असणार जी इथे काम करत होती . मी त्या सार्या गोष्टीच्या मुळाशी पोहोचलो होतो . ती सारी माणसे इथेच असणार त्यामुळे मला आता सावध राहायला लागणार होतं . पण येथे कोणता निवाराही दिसत नव्हता त्यामुळे मला माझ्या तर्कावर ती शंका येत होती . पण माझे तर्क हे नेहमीच तर्कशुद्ध असल्यामुळे त्यांना तर्कशुद्ध शंकिंशिवाय शंका घेणे रास्त नव्हते . त्यामुळे मी तर्कशुद्ध शंका घेण्याचा प्रयत्न केला पण तर्कशुद्ध शंका निष्फळ ठरली कारण उघड्यावरती निवारा थाटायला ते इतके मूर्ख नव्हते . त्यामुळे निश्चितच त्यांनी लपून-छपून निवारा थाटला असणार . त्यामुळे माझे डोळे लपलेल्या खुणांचा शोध घेऊ लागले . मी त्या अंधार्या रात्री त्या शांत वाटेच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाखाली गोल गोल फिरत इकडे तिकडे बघत त्या खुणांनचा शोध घेऊ लागलो . पण मला काही सापडेना त्यामुळे वैतागून मी पुढे जायचं ठरवलं व गाडीकडे निघालो . तेव्हाच माझ्या पायाला ठेच लागून मी ठेचकाळुन पडलो . आणि मी ज्यासाठी शोधत होतो ती खुण मला सापडली .
मला बऱ्याच वेळा आश्चर्य वाटतं की निरीक्षण करूनही मला जी गोष्ट सापडली नाही ती गोष्ट ठेच लागून पडल्यावर ती कशी सापडली ....?किंबहुना बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी अपघातानेच सुचतात किंवा सापडतात . पण तसे अपघात का होतात ....? कसे होतात .....? याचा तर्कशुद्ध विचार मी करतो आहे पण उत्तर काही सापडत नाही....?
तो एक मोठा दगड होता . आता दगड ही काय खूण झाली का ...?त्यात काय दगड कुठेही पडलेले असतात . हे झाले सामान्य माणसाचे बोलणे . पण पण माझ्यासारख्या तर्कशुद्ध विचार , निरीक्षण आणि अभ्यास असलेल्या माणसासाठी तो दगडही बहुमूल्य होता .कारण त्या भागात तशाप्रकारचा दगड पृष्ठभागावर ती सापडत नव्हता . त्यासाठी खोलवरती खाणकाम करणे आवश्यक होते . याचा अर्थ खाणकाम केल्यानंतर जो दगड निघतो तो दगड या ठिकाणी होता . म्हणजे या ठिकाणी निश्चित काहीतरी खाणकाम चालू असणार . तर्कशुद्ध विचाराबरोबरच शरीरालाही मी महत्त्व देत असल्याने माझी शारीरिक तब्येत खणखणीत व दमदार होती त्याचाच मला आता उपयोग झाला . मी तो दगड सहजपणे बाजूला सारला त्याच्याखाली मला एक दीड बाय दोन फुटाचा लोखंडी पत्रा दिसला जो गंजून गेला होता . म्हणजे माझी शोधमोहीम बरोबर होती तर मी तो लोखंडी पत्रा बाजूला सारला त्याच्या खाली एक निळसर रंगाचं प्लास्टिकचे बटण होतं जे दाबल्यानं तर नक्कीच आजूबाजूला काहीतरी उघडणार होतं . मी ते प्लास्टिकचं बटन दाबलं आणि माझ्या मागच्या बाजूला खरखर सळसळ विचित्र आवाज येऊ लागला. मी मागे वळून पाहिलं तर ते एक पंचर काढण्याचं दुकान होतं .
शेवटी माझा तर्क बरोबर आला होता तर या ठिकाणी नक्कीच कुणीतरी वास्तव्याला होता तेही छुप्या प्रकारे . एखाद्या माणसाने दुरुन येताना हे पंचर चे दुकान पाहिले तर त्याला वाटणार इथे कोणीतरी आहे . पण नंतर हे बटन दाबून जर की दुकान खाली सारले म्हणजेच भुयखरात सारले तर या ठिकाणी काहीही नसणार याचाच अर्थ ते भुताटकी सारखेच होते . म्हणूनच न समजणारे विज्ञान म्हणजेच मॅजिक अशी व्याख्या करतात ती काही चुकीची नाही......
इथे कोणत्याही प्रकारची भुताटकी नव्हती हे माझ्या लक्षात आले त्यामुळे मी म्हणत होतो ते शेवटी सिद्ध झाले होते . पण आता हे आपण चर्चा दुकानाची पाहणी करणे मला क्रमप्राप्त होते व त्याचा व्हिडिओ काढून माझ्या मित्रांना दाखवणे ही ..... मी मोबाइल काढला पण मला त्या दुकानातून हालचाल जाणवली . आत कोणीतरी होते . पाठोपाठ बंदुकीचा आवाज आल्यासारखख वाटला . त्यामुळे मी पटकन तिथून निघून जायचं ठरवलं . मी हेल्मेट डोक्यावरती चढवलं व गाडीवरती बसून सुसाट निघालो.
गाडीचा स्पिडोमिटर चा काटा तुटून बाहेर पडेपर्यंत मी गाडी पळवली . ते गॅरेज आता तिथे दिसेनासे झाले होते मी खूप लांब आलो होतो .
मला समोरून चार चाकी गाडी येताना दिसत होती . ती बहुदा क्रुझर सारखी मोठी असावी किंवा क्रूजर असावी अंधारात नीट कळालं नाही . पण ती त्या गॅरेजकडे चालली होती त्या गाडीमध्ये बरीच माणसे असावीत असं मला वाटत होतं व ती गाडी गॅरेजच्या दिशेने निघाल्या मुळे त्यांच्या जीवाला धोका होता . मी त्यांना अडवून थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी काही थांबेना .
मी त्या लोकांना चांगले क्रमप्राप्त होते एक दक्ष नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य बजावणे गरजेचे होते त्यामुळे त्यांच्या गाडीचा मागे मी माझी गाडी दामटली व त्यांना ओरडून सांगू लागलो . पण त्यांच्या गाडीचा वेग अतिशय जास्त होता त्यामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसावा त्यामुळे मी गाडी अजून जोरात पळू लागलो इतक्यावेळ ते ग्यारेज त्या ठिकाणी दिसत नव्हते . गडबडीत मी त्या झाडाची खून विसरलो व अगदी जवळ गेल्यानंतर ते गॅरेज मला त्या ठिकाणी दिसू लागले . तोपर्यंत ग्यारेज मधील माणसे बाहेर आली होती व त्यांनी गाडी अडवली होती गाडी मधल्या माणसांना त्यांनी खाली उतरवले होते मी बाजूलाच थांबून सारा प्रकार पाहत होतो . माझ्यात पुढे जायची हिंमत नव्हती . सगळी माणसे खाली उतरली. पण ती गाडी आपोआपच पुढे पळाली ती खूप वेगात तिथून निघून गेली .
गॅरेजमधील त्या लोकांनी त्या माणसांचा निर्घुणपणे खून केला . मी तो खून असाह्यपणे पाहिला ......
.
.
.
.
काही दिवसानंतर स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये खालील बातमी आली होती
भुताच्या वाटेन घेतला आणखी एक बळी
गावाला लागूनच काही अंतरावर ती असलेला स्टेट हायवे हा भुताची वाट म्हणून कुप्रसिद्ध आहे . या वाटेने अजून एक बळी घेतला आहे . काल रात्री संतोष खंडेकर हे क्रुझर या गाडीने त्यांच्या काही मित्रांसोबत येत होते . मात्र वाटेत त्यांना चकवा लागला त्या चकव्यातून ते एकटेच कसेबसे निसटले असून बाकीचे मित्र त्या चकव्यात सापडले व मृत्यू पावले असा त्यांचा दावा आहे . पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण साहेब या गोष्टीचा अधिक तपास करीत आहेत .
संतोष खंडेकर सांगतात
" काल रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला होता उगाच उशीर नको म्हणून आम्ही जवळच्या वाटेने म्हणजेच त्या भुताच्या वाटेने येत होतो . थोड्या अंतरावर आत गेलो असेल नसेल तोच समोरून जुनीपुराणी खटारा मोटरसायकल येताना दिसली . तिच्यावर ती कोणीतरी बसल्यासारखं वाटत होतं . आम्हाला वाटलं कोणीतरी माणूस असेल पण ते काहीतरी भलतंच धूड होतं . त्याचे हातही हँडल वरती नव्हते . ते मागे बांधले होते . डोक्या वरती हेल्मेट होतं . हेल्मेट मधून जळून गेलेली कवटी चारीबाजूंना गरगर फिरत होती . आम्ही ते पाहिलं तसं गाडीचा वेग वाढवला . पण ते धूडही आमच्या मागेच येत होते . आम्ही वेग वाढवत होतो तसे ते धूडही वेग वाढवत होते . काही अंतरावर गेल्यानंतर आम्हाला तिथे बल्ब लावलेला दिसला . त्यामुळे मदतीसाठी आम्ही गाडी थांबवली . सगळे जण खाली उतरले . मला जरा वेळ लागला . पण मी उतरायच्या आधीच त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या मी मागे वळून पाहिलं त्याठिकाणी कोणीच नव्हतं . माझी खाली उतरायची हिम्मत झाली नाही . मी लपूनच इकडेतिकडे बघितलं कुठे कोणी दिसत आहे का...? पण माझ्या मित्रा पैकी एकही जण त्या ठिकाणी दिसत नव्हता . उलट दूरवरुन कुठूनतरी त्यांच्या किंकाळ्याचा आवाज माझ्या कानात रुतत चालला होता . भीतीपोटी मी तिथून पळालो . "
काय आहे भुताची वाट.....?
मागच्या वर्षापासून ही भुताची वाट फारच कुख्यात झालेली आहे . आतापर्यंत भुताच्या वाटेवरती कैक लोकांचे बळी गेलेले आहेत . मागील वर्षी एक नक्षलवाद्यांची टोळी याठिकाणी सक्रिय असल्याचे बोलले जात होते . त्या वाटेच्या कडेला असलेल्या जंगलात थोरियमचे दुर्लभ साठे असल्याचे आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे . त्या नक्षलवादी टोळीला पहिल्यांदा एका पत्रकाराने उघड केले . त्या पत्रकाराने व्हिडिओ काढून त्याच्या मित्रांना सेंड केला होता व त्या टोळी मागे कोणाचा हात आहे हेही सांगितले होते . कोणतातरी गद्दावर राजकीय नेत्याचा एक नातलग त्या टोळीच्या आड लपून थोरियमचा धंदा करत असल्याचे उघड झाले होते . तो पत्रकार जिवंत परतू शकला नाही . त्यानंतर एका सर्च ऑपरेशन करून त्या टोळीला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले . तेव्हापासून भुताची वाट ही आपले एके-एक बळी घेत आहे .
समाप्त......