ISHQ - 21 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | इश्क – (भाग २१)

Featured Books
Categories
Share

इश्क – (भाग २१)

“काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..
“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन
“नाही अरे.. मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”
“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”
“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”
“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन
“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं..

“तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत रोहन म्हणाला..
“मला काय.. मला सगळ्याच आवडतात…”, कसंनुसं हसत कबीर म्हणाला..”पण खरंच, कुणालाही आवडावी अशीच आहे ती…”
“मग कसली वाट बघतो आहेस.. हो पुढे बिनधास्त.. राधाला विसरुन जा.. तिने तिच्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे.. आणि तिचा आणि तुझा मार्ग कधी एकच असेल असं मला तरी वाटत नाही..”

“हो रे.. पण राधा जातच नाही मनातुन.. काय करु…?”
“थोडा मिक्स हो लोकांमध्ये.. रतीशी संपर्क वाढव.. राधा म्हणजे जग नव्हे.. जग खुप सुंदर आहे कबीर.. आज प्रेमात पडल्यावर माझ्या हे लक्षात आलेय.. इथे कोणी कुणासाठी थांबत नसतं..”
“खरं आहे.. रती म्हणाली आहे तसंही.. पुन्हा भेटुया…”
“अरे व्वा.. ए मग एक भारी आयडीया आहे.. लेट्स हॅव अ डबल-डेट..”, खुर्चीतुन आनंदाने उठत रोहन म्हणाला..

“म्हणजे?”
“अरे म्हणजे.. मी-मोनिका.. तु आणि रती.. मस्त जाऊ ना एखाद्या छानश्या रेस्तॉरंटला.. मज्जा येईल…”
“चालेल भेटुया.. पण रतीला असं एकदम विचाराणं बरोबर दिसणार नाही.. मी तिला आधी इनफॉर्मली भेटतो.. आणि मग तेंव्हा विचारेन..”
“डन देन.. सांग मग कधी.. कुठे ते…”


कबीरला वाटलं होतं, रती फोन करेल, पण ४ दिवस वाट पाहुनही तिचा फोन नाही आला.. शेवटी कबीरनेच तिला फोन लावला..
“हाsssssय कबीर…कसा आहेस??”,रती म्हणाली..

रतीच्या आवाजामध्ये एक फ्रेशनेस होता.. उत्साहाचा खळाळता झरा होता…

“मी मस्त…कुठे गायब आहेस..?”, कबीर
“मी कुठे गायब.. तुच गायब आहेस.. म्हणलं आज फोन करशील.. उद्या करशील..”
“हो का? बरं बरं.. सांग कधी भेटुया?”
“कश्याला?”

रतीच्या प्रश्नाने कबीर एकदम स्टंप्ड झाला..
“ओके ओके.. सॉरी.. मस्करी केली रे.. मी संध्याकाळी ७.३० नंतर मोकळी होते.. उद्या भेटुया?”
“चालेल.. पण पाशा नको.. ह्यावेळेस माझं कार्ड-पेमेंट असेल.. परवडणार नाही पाशा..”, हसत हसत कबीर म्हणाला..
“बरं..तसं असेल तर मग मला थोडा उशीर होईल..”
“का?”
“का काय अरे.. मी साडी घालुन येऊ का तुझ्याबरोबर दुसरीकडे.. इथे पाशामध्ये चाललं असतं..”
“ओके.. ९.३०?”
“१० ला भेटु.. हायवे वर रंगला-पंजाब नावाचा ढाबा आहे.. मस्त असतं पंजाबी.. आणि उशीराच सुरु होतो तो.. चालेल?”
“पळेल.. भेटु उद्या..”
“बाsssssय…”

फोन ठेवल्यावर कबीर स्वतःशीच विचार करत होता.. किती सहज एकरुप झालो आपण हिच्याशी.. असं वाटतंय खुप वर्षांपासुनची ओळख आहे..हिच्याशी बोलायला लागलं की सगळं टेन्शन खल्लास होऊन जातं. असं खुप स्पेशल वाटतं… रोहनच्या म्हणण्याचा विचार करावा का? राधाला विसरुन… पण रतीबद्दल तरी काय माहीती आहे आपल्याला? कश्यावरुन ती सिंगल असेल? कदाचीत असेलही तिच्या आयुष्यात कोणी. पण मग तसं असतं तर ती बाहेर जेवायला यायला लगेच तयार झाली नसती.. कदाचीत आढे-वेढे घेतले असते..

शट्ट.. एक गोष्ट कधी सरळ घडत नाही आपल्या आयुष्यात..

कबिर स्वतःवरच चरफडला..


रंगला पंजाब ढाबाच्या थिमनी सजलेलं एक रेस्तॉं होते. कबीर नेहमीच्याच वापरातले कपडे घालुन आला होता.. निळ्या रंगाची जिन्स आणि पांढर्‍या रंगाचा शर्ट. तर रतीसुध्दा नेहमीच्याच पेहेरावात होती. गुलाबी रंगाची स्लॅक, गुलाबी रंगाच्याच फ्लॉवरी प्रिंटेड पॅटर्नचा स्लिव्हलेस कुर्ता, केसांना गुलाबी रंगाची रिबिन आणि हातात भरपुर बांगड्या.

“हॅल्लो..” दोघांनी एकमेकांना ग्रीट केलं
“टेबल घ्यायचं? का ह्या बाहेर मांडलेल्या कॉट्स?”, कबीरने विचारलं
“कॉट्स.. एनीटाईम.. टेबलवार तर आपण नेहमीच जेवतो..”, गार्डनमधल्या एका कॉटवर बसकण मारत रती म्हणाली..
“आधी ऑर्डर करु आणि मग गप्पा मारु.. खुप भुक लागलीय…”, कबीर मेन्युकार्ड चाळत म्हणाला..

“एस्क्युज मी.. लिकर-चं कार्ड…”, वेटरला हात करत कबीर म्हणाला..
“ए.. लिकर काय.. त्यापेक्षा जलजीरा घेऊ.. अरे फार मस्त मिळतं.. भारी चॅट-मसाला आणि खारी बुंदी वगैरे टाकुन देतात..”, कबीरला थांबवत रती म्हणाली..

कबीरला रतीचं मनातल्या मनात हसूच आलं. आयुष्यात कधी ड्रिंक्स म्हणुन आपण जलजीरा घेऊ असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, पण रतीखातर त्याने ते मान्य केलं. बाकीची ऑर्डर देऊन झाल्यावर रती म्हणाली..

“कबीर.. तुला काहीतरी दाखवायचं होतं…”
“हम्म.. दाखवं की..”
“चिडणार नाहीस ना?”, पर्सध्ये हात घालत रतीने विचारलं..
“ते काय आहे त्यावर अवलंबुन आहे..”,हसत हसत कबीर म्हणाला.

रतीने पर्समधुन कबीरचेच पुस्तक बाहेर काढले..

“हे काय? माझंच पुस्तक काय मला दाखवतेस…”, कबीर आश्चर्याने म्हणाला..
“अरे एक मिनिटं.. हे बघ..”, पुस्तक उलट करुन मागचं पान दाखवत रती म्हणाली

कबीरने उत्सुकतेने पुस्तकाच्या मागच्या पानावर नजर टाकली. जिथे त्याचा फोटो छापला होता तो भाग रती त्याला दाखवत होती. रतीने त्या फोटोला पेनने दाढी-मिश्या काढल्या होत्या..

“हे काय? ऑफ़ीसमध्ये वेळ जात नव्हता म्हणुन असले उद्योग करतेस का तु?”
“अरे.. चं.. निट बघ ना.. छान दिसतेय तुला दाढी.. म्हणजे अशी फ़ार नाही.. पण थोडी खुरटी.. मस्त रफ़ लुक दिसेल की तुला…”, रती पुन्हा फोटोकडे बोट दाखवत म्हणाली

रतीने त्याचा.. त्याच्या लुकचा विचार केला हा विचारच कबीरला सुखावणारा होता..

“खरं का?” आपल्या हनुवटीवरुन हात फिरवत कबीर म्हणाला
“हे बघ.. तसंही तुझा ब्रेक-अप झालाय नं.. मग असा ब्रेक-अप झाल्यावर लुक चेंज करायचा असतो अरे..आणि अशी दाढी वगैरे तर म्हणजे अगदीच साजेसा होईल..”

कबीर काहीच बोलला नाही..

“ओके सॉरी.. तु हर्ट झाला असशील तर.. पण मी ही अशीच आहे.. प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझीटीव्ह शोधणारी.. एकदम ऑप्टीमिस्टीक.. बरं ब्रेक-अपचं जाऊ देत.. पण खरंच चांगली दिसेल तुला थोडी-खुरटी दाढी.. ट्राय तर करुन बघ..”, रती समजावणीच्या स्वरात म्हणाली.

“बरं बघु.. मी पण तुझ्यासाठी काही तरी आणलंय..”,खिश्यातुन एक छोटी डब्बी काढत कबीर म्हणाला..
“अरे व्वा.. सुधारलास की.. मी म्हणलं मागच्या वेळेसारखा हात हलवतच येतोस की काय?”, त्याच्या हातातुन ती ड्बी घेत रती म्हणाली..

रती ती डबी उघडत असताना कबीर तिच्याकडे निरखुन बघत होता.. एखाद्या निरागस मुलीसारखी प्रचंड उत्सुकता तिच्या चेहर्‍यावर होती. क्षणाक्षणाला तिच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते..

रतीने ती डबी उघडली.. आतमध्ये केशरी आणि मोरपंखी रंगाच्या शेड्सचे दोन नेलपेंट्स होते…

“वॉव.. मिक्स-अ‍ॅन्ड मॅच.. लव्ह्ड इट…”, रती दोन्ही रंग निरखुन बघत म्हणाली
“तु आणलेस?”
“म्हणजे काय?”
“म्हणजे.. तु दुकानात जाऊन आणलेस.. आपले आपले..?”
“हो.. सेंन्ट्रलला गेलो होतो.. तिथुन आणलेत..बिल दाखवु का???”
“नको नको.. राहु देत.. ए पण मस्तच आहेत…”

दोघांच्या गप्पा चालु असतानाच ऑर्डर आली…
टेबलावर खाण मांडुन वेटर गेल्यावर रती म्हणाली.. “कबीर मला मोनिका.. आणि राधा दोघींबद्दल ऐकायचं आहे.. सांग ना मला सगळं…”
“का? तुला का सांगु मी?”, कबीर
“म्हणजे काय.. तुझ्या पुस्तकातली पात्र आहेत ती.. आणि मी ती कॉन्टेस्ट-विनर आहे.. त्या दिवशी आपलं बोलणं पुर्ण झालं नाही.. मला अजुन जाणुन घ्यायचं आहे त्या दोघींबद्दल.. म्हणजे रिअल-लाईफ़मध्ये त्या दोघी कश्या आहेत.. अगदी पुस्तकात लिहीले आहे तसेच का?”
“ओय.. झालं ती पार्टी संपली तिथेच.. आता कसलं विनर आणि कसलं काय? तेंव्हाच विचारायचं होतंस..”,
“फटके देईन हा कबीर.. नाटकं करु नकोस.. निट सांग पहील्यापासुन.. खाऊन देणार नाही नाहीतर मी तुला…”, डोळे मोठ्ठे करत रती म्हणाली…
“ओके.. ओके.. सांगतो…” असं म्हणुन कबीरने मोनिकाच्या भेटीपासुन सगळं सांगायला सुरुवात केली


इटलीमधील नेपल्सच्या एअरपोर्टवर राधाने पाय ठेवला तेंव्हा ती प्रचंड रोमांचीत झाली होती. गेले काही महीने.. किंबहुना काही वर्ष तिच्यासाठी वाईटच ठरली होती. अनुरागशी लग्न झाल्यानंतर काही महीन्यातच तिच्या स्वप्नांचा चक्काचुर झाला होता. गोकर्णमधुन ती थोडक्यात वाचली होती, त्यावेळेस अनुरागची आणि नंतर कबीरची मदत झाली नसती तर ती एव्हाना एकतर पोलिस-स्टेशनमध्ये किंवा पोलिस-स्टेशनच्या चकरा मारण्यात अडकली असती.

पण ह्या सगळ्यांतुन जाउन राधा आता सावरली होती.. स्वतःच्या पायावर उभी राहु पहात होती. मोठ्या कष्टाने तिने स्वतःसाठी नोकरी.. करीअरचा मार्ग निवडला होता. आपला आनंद कुणाजवळतरी व्यक्त करावा असं तिला राहुन राहुन वाटत होतं. लगेज चेकआऊट करुन बाहेर आल्यानंतर तिने फोनमधील कॉन्टॅक्ट्सवरुन नजर फिरवली. परंतु कुणाला फोन करावा असं तिला कुणी सापडतचं नव्हते. आई-बाबा, अनुराग, जवळचे मित्र-मैत्रीणी सगळ्यांनीच तिच्याशी संबंध तोडुन टाकले होते. कॉन्टॅक्ट्स स्क्रोल करताना ती कबीरपाशी येऊन थांबली.

गोकर्णवरुन परतल्यानंतर तिने कबीरला फोनच केला नव्हता आणि त्याने सुध्दा परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्हता. नविन नोकरी.. इटलीचा व्हिसा आणि आता नेपल्समध्ये प्रवेश ह्याबद्दल तिने कबीरला काहीच सांगीतले नव्हते.

कंपनीने राधाला फोनवर इंटरनॅशनल-रोमींग चालु करुन दिले होतेच, शिवाय फॅमीलीसाठी काही फोन मोफ़त करण्याची सुविधाही दिली होती.

तिने घड्याळात नजर टाकली, इटलीतील वेळेनुसार संध्याकाळचे सात वाजले होते, त्यानुसार भारतात साधारण रात्रीचे १०.३० वाजुन गेले असतील असा तिने विचार केला.

“काय करत असेल कबीर? करावा का त्याला फोन..? आपण इटलीतुन फोन करतो आहोत हे मोठ्ठे सप्राईज असेल? की मी फोन केला हेच त्याच्यासाठी सर्प्राईज असेल?”
शेवटी ‘दोन मिनिटं बोलायला काय हरकत आहे.. नसेल मोकळा तो तर नाही घेणार फोन…’ असा विचार करुन राधाने मोबाईलवर कबीरचा नंबर लावला..


“पण मग आता राधा आहे कुठे सध्या?”, कबीरचे बोलुन झाल्यावर रतीने विचारले
कबीर काही बोलणार एव्हढ्यात त्याचा फोन वाजला..

“नेम द एन्जल अ‍ॅन्ड एन्जल अ‍ॅपीअर्स…”, मोबाईल रतीला दाखवत कबीर म्हणाला..

राधाचा फोन बघुन रतीच्या चेहर्‍यावरील क्षणभरासाठी का होईना बदललेले भाव कबीरने टिपले.

“घे ना फोन..”, रती म्हणाली
“नको.. जाऊ देत..”, कबीर फोन सायलंट मोडवर करुन परत खिश्यात ठेवत म्हणाला..
“का? अरे घे.. एक महीन्याने फोन करतेय ना ती..”
“म्हणुनच नको.. आज आपली डेट..” आणि कबीर एकदम थांबला..
“ओह.. ही डेट होती का?”, काहीसं हसत रती म्हणाली…
“दॅट रिमाईंड्स मी.. रोहन म्हणत होता की आपण चौघ भेटुयात कुठेतरी.. म्हणजे आपण दोघं आणि तो आणि मोनिका.. व्हॉट से?”
“अं.. रोहन म्हणतोय ना.. मग मी रोहनला सांगते हो की नाही ते.. “, पुन्हा एकदा हसत रती म्हणाली..
“तु काय नेहमी माझी खेचायलाच बसलेली असतेस का? बर मी विचारतोय तुला.. जायचं का?”, कबीर खजील होत म्हणाला..
“मला चालेल… पण मी दोघांनाही फारसं ओळखत नाही रे.. एक काम कर ना, व्हॉट्स-अ‍ॅपवर एक ग्रुप बनव आपला चौघांचा.. म्हणजे जरा ओळखपण होईल..”
“वोक्के… चल निघुयात?”
“चलो…”

दोघंही बिल भरुन हॉटेलमधुन बाहेर पडले..


कबीरच्या फोनवर राधाचा चार मिस्ड-कॉलनंतर पाचव्यांदा फोन वाजत होता.

[क्रमशः]