Fulacha Prayog.. - 2 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | फुलाचा प्रयोग.. - 2

Featured Books
Categories
Share

फुलाचा प्रयोग.. - 2

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

२. फुला

त्याचे नाव होते फुला. फुलांचे त्याला वेड. त्याचे वय फार नव्हते. पंचवीस-तीस वर्षांचे असेल. फुलाने लग्न केले नव्हते. त्याने आपले लग्न फुलझाडांशी लावले होते. तो शिकला होता. शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. विशेषत: वनस्पतीशास्त्राचा त्याने अभ्यास केला होता. त्यातल्या त्यात पुन्हा फुलांच्या सृष्टीचा अभ्यास म्हणजे त्याचा आनंद.तो शिकत असताना त्याचे अनेक मित्र होते. फुलाला फुलांचे वेड असे व मुलांना फुलाचे वेड असे. फुलाचा चेहरा फुलाप्रमाणेच टवटवीत व सुंदर होता. फुलांची सारी कोमलता व मधुरता जणू त्याच्या तोंडावर फुलली होती. त्याचे डोळे कमळाप्रमाणे होते. कपाळ रूंद होते. नाक सरळ पण जरा वाकलेले असे होते. तो उंच होता, परंतु स्थूल नव्हता. त्याची उंची त्याला खुलून दिसे.‘फुला, तू क्रांतीत भाग घेणार की नाही?’ त्याचे मित्र त्याला विचारीत.‘हो, घेणार आहे!’ तो हसत म्हणे.‘क्रांतीत भाग घेणारा हसत नाही!’ कोणी म्हणे.‘क्रांतिकारक का रडतो?’ फुला पुन्हा हसून विचारी.‘क्रांतिकारक रडत नाही. तो रडवणार्‍यांना रडवतो. तो निश्चयी असतो, गंभीर असतो. त्याच्या जीवनात एक प्रकारची प्रखरता असते. गुलगुलीत व लुसलुशीत असे त्याच्या जीवनात नसते. तुझ्या ठिकाणी तर हे काहीच दिसत नाही. तू हसतोस, आनंदात असतोस-’ एका विद्यार्थ्यांने सांगितले.‘परंतु मी हसणार्‍या सृष्टीतच क्रांती करणार आहे. समाजातील गरिबांच्या मुलांची तोंडे टवटवीत करण्याची क्रांती तुम्ही करा. तुम्ही गरिबांचे संसार सुखाचे करा. धुळीत पडलेल्यांचा उध्दार करा. शेतकर्‍याकामकर्‍यांची मान उंच करा. श्रमणार्‍याची प्रतिष्ठा वाढवा.’ ‘ते काम माझे नाही. मी फुलांच्या सृष्टीत क्रांती करणार आहे. एकेका फुलावर दहा दहा रंग फुलवणार आहे. हया झाडाचे त्यावर कलम, त्याचे ह्यावर कलम. रानातील फुले आणून त्यांचा मी विकास करीन. निरनिराळे शोध लावीन. गंधांची व रंगाची जी ही पुष्टसृष्टी, तिच्यात मी वावरेन. तुम्ही मानवजात सुखी करा. त्या सुखी मानव जातीच्या भोवती मी फुलबाग वाढवीन. घाणेरीची फुले मोगर्‍याची करीन. टाकाऊ फुलांत गंध आणीन. सुंदर नसणार्‍या फुलांना सुंदर करीन, हे माझे काम. हयासाठी माझे हात, हयासाठी माझे डोळे, हयासाठी माझा अभ्यास, हयासाठी माझे ज्ञान, हयासाठी माझे घरदार, माझी सारी संपत्ती. माझ्या डोळयांसमोर जागेपणी व झोपेतही फुलेच फुले हसत असतात. मग मी हसू नको तर काय करू?’ फुला आपले हदय उघडे करून सांगे.

असे ते शिकण्याचे दिवस गेले. फुला आपले शिक्षण संपवून स्वत:च्या गावी राहू लागला. त्याला एक आत्या होती. आणखी कोणी नव्हते, ती आत्या फुलावर जीव की प्राण प्रेम करी. ती आता म्हातारी झाली होती.‘फुला आता लग्न कर. माझ्या डोळयांनी तुझी बायको बघू दे.’ एके दिवशी आत्या म्हणाली.‘मला नाही लग्न करायचे. माझे लग्न फुलांशी-’ तो म्हणाला.‘बगीच्यात फुले हवीत. घरात मुले हवीत.’ आत्या हसून म्हणाली. ‘काहीतरीच तुझे. दुसरे काही बोलत जा. लग्नाचे नको बोलू. नाही तर मी तुझ्याशी बोलणार नही बघ-’ फुला फुरंगटून म्हणाला.‘बरे हो. नाही काढणार पुन्हा लग्नाची गोष्ट. तुला ज्यात सुख त्यातच मला, तुझ्यासाठी तर मी जगल्ये आहे,’ आत्या म्हणाली.

फुलांचे घर तीन मजली होते. त्याने घराच्या गच्चीवर एक काचेची खोली बांधली होती. त्या काचेच्या घरात तो फुलांचे प्रयोग करी. त्या काचांवर निरनिराळया रंगांचे पडदे सोडी. निरनिराळया रंगांच्या प्रकाशात फुलझाडे वाढवी, नवीन रोपे तयार करी. तेथे किती तरी कुंडया होत्या. काही कुंडयातून फुले फुलली होती. काहींतून नुसती रोपे होती. काहींतून बी पेरलेले होते.घराभोवती केवढी थोरली फुलबाग होती. शोकडो प्रकारची फुले तेथे फुललेली असत. अमुक एक प्रकार त्या बागेत नाही असे होत नसे. फुलाच्या हाताखाली एक-दोन माळी होते. ते त्या बागेत नेहमी काम करीत. फुला सूचना द्यावयाचा, नवीन गोष्टी सांगावयाचा. फुलांच्या संगतीत केव्हाच निघून जाई. सकाळी सूर्य वर येई. सूर्याचे किरण फुलांवर नाचू लागत, परंतु सूर्याचे ऊबदार किरण येण्यापूर्वीच फुलाची प्रेमळ अशी ती लांब सुंदर बोटे फुलांना कुरवाळीत असत. सूर्याच्या किरणांनी ती फुले फुलत का फुलाच्या प्रेमामुळे फुलत?सायंकाळी सूर्यनारायणाचे सोनेरी किरण फुलांशी शेवटची खेळीमेळी करून मोठया कष्टाने जात; परंतु फुला अंधार पडला तरी तेथेच असे चांदण्यात तर फुला बागेत बसे. कधी-कधी रात्री सर्पही त्याला भेटत. फुलांच्या वासाने नागोबा येई; परंतु फुला म्हणावयाचा,’ सर्पसुध्दा फुलांसाठी वेडे होऊन रात्री हळूच येतात मनुष्याने का सर्पापेक्षा कमी रसिक व्हावे? सर्पाने सौंदर्यपूजक, सुगंधपूजक व्हावे आणि माणसाने का घाणीची पूजा करावी?’फुला सध्या एका नवीन प्रयोगात मग्न होता. एका श्रीमंत रसिकाने कृष्णकमळीच्या फुलांवर सोनेरी छटा उठवून दाखवणार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एका ठरलेल्या तारखेला सर्वांनी आपापले प्रयोग आणावे; ज्याचा प्रयोग जास्तीत जास्त यशस्वी झाला असे ठरेल त्याला बक्षीस देण्यात येईल; बक्षीससमारंभ राजाच्या हाताने होईल; अशा तर्‍हेची ही वार्ता सर्वत्र गेली होती.

फुला तो प्रयोग करू पाहात होता. त्याला बक्षिसाची इच्छा नव्हती. एक लाख रुपयांसाठी तो हपापला नव्हता. फुलांवर प्रयोग करण्यात तर त्याचा आनंद होता. नवीन प्रयोग करावयाला मिळणार म्हणून तो आनंदला होता. पुष्पसृष्टीची रहस्ये शोधणे हेच त्याचे जीवितकार्य होते.फुलाच्या घराशेजारी एक गृहस्थ होता. त्याचे नाव गब्रू. गब्रूलाही फुलांचा नाद होता; परंतु फुलाजवळ ज्याप्रमाणे ज्ञान होत तसे त्याच्याजवळ नव्हते. तो जाहिर झालेला प्रयोग आपणही करावा असे त्याच्या मनात आले; परंतु कसा करावा प्रयोग ते त्याला सुचेना. त्याला एक लाख रुपयांचे ते बक्षीस रात्रंदिवस दिसत होते. शेवटी फुलाचा प्रयोग यशस्वी झाला तर तो आपणच चोरावा असे त्याने मनात ठरविले. फुला आपल्या काचेच्या घरात प्रयोग करीत बसे. गब्रू आपल्या घरातून ते सारे पाहात असे. तो म्हणे, हे नवीन प्रयोग काचेच्या घरात चालले आहेत, एक दिवस त्या काचेच्या घरात शिरावे व लांबवावा तेथील प्रयोग. फुलाच्या घराजवळ एक मोठे झाड होते. त्या झाडाच्या फांदीवरून गच्चीत उतरता आले असते व त्या काचेच्या प्रयोगालयात जाता आले असते.एके दिवशी रात्री गब्रूने झाडावरून चढण्याचे ठरविले. बाहेर अंधार होता. गब्रू हळूच फुलाच्या बागेत आला. हळुहळू त्या घराकडे तो जाऊ लागला. इतक्यात दोन मांजरे गुरगुरत बागेत आली. ती भांडू लागली. फुलाने ते मांजरांचे भांडण ऐकले. ती मांजरे बागेत भांडतील व त्यांच्या भांडणात फुले कुस्करली जातील, लहान-लहान झाडांचे नुकसान होईल म्हणून हातात काठी व दिवा घेऊन फुला बाहेर आला. शुक् शुक् करीत बागेत आला. गब्रू घाबरला. तो भराभर पावले टाकीत पळून गेला. कोण गेले पळत, रानमांजर की काय? फुला सर्वत्र हिंडून पुन्हा घरात आला. तो निजला; परंतु गब्रुला झोप नव्हती. पळवीन, एक दिवस तुझा प्रयोग पळवीन, एक लाख रुपये मी मिळवीन असे मनात म्हणत ता अंथरुणात तडफडत होता.