ISHQ - 18 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | इश्क – (भाग १८)

Featured Books
Categories
Share

इश्क – (भाग १८)

“मग.. पुढे काय करायचं ठरवलं आहेस?”, कडक कॉफीचा घोट घेता घेता मेहतांनी कबिरला विचारलं.
“कश्याबद्दल?”, कबिरने न कळुन विचारलं
“कश्याबद्दल काय.. तु पुस्तकाचा दुसरा भाग लिहीणार आहेस ना.. त्याबद्दल.. काही विचार केला आहेस का?”
“ओह.. हा.. ते… नाही.. अजुन काही विचार नाही केलाय…”
“मग कर की सुरु आता.. आत्ता विचार चालु केलास तर ४-६ महीन्यात थोडीफार सुरुवात होईल…”

“हम्म.. बरं, आपल्या सगळ्या एडीशन्स संपल्या का?”
“अरे हा.. बरं झालं आठवण केलीस.. आपण तिसरी एडिशन जरा जास्तीच मोठ्ठी काढली होती.. पण थोडा आता सेल कमी झालाय.. पुस्तकही दुकानात पडुन आहेत.. तर आमच्या मार्केटींग टीमने एक नविन कल्पना काढली आहे.. विक्री वाढवण्यासाठी…”

“काय?”
“तु ते पुस्तकाच्या शेवटी तुझा फोन नंबर टाकला होतास बघ.. नंतर तुला अनेक फोन आले होते.. बरोबर..?”
“हो.. जरा खुप जास्तीच आले होते…”
“आपण त्या फोन नंबरमधुन एक लकी ड्रॉ काढायचा.. म्हणजे त्याच असं नाही.. पण आपण ही लकी-ड्रॉची जाहीरात केली की अजुन जे फोन येतील ते आणि आधीच ह्यामधुन…”
“आणि.. काय कार वगैरे देताय की काय?”, हसत हसत कबिर म्हणाला..

“नाही रे.. जो नंबर निघेल त्याच्या. किंवा तीच्याबरोबर तु डिनर डेटला जायचंस…”
“ओह प्लिज हा.. मी असलं काहीही करणार नाहीए..”, मेहतांना थांबवत कबिर म्हणाला..
“अरे.. असं काय करतोएस.. बिल आम्ही भरणारे…”, हसत मेहता म्हणाले..
“बिलाचा प्रश्न नाही.. पण लकी ड्रॉ मध्ये कुणी जख्ख आजोबा.. कजाग काकु.. एखादा टोंणगा निघाला तर? फ़ार पकवतात हो लोकं.. मी नाही डिनर डेटला वगैरे जाणार..”

“अरे नाही निघणार.. तुला आवडेल अशी.. तुला शोभेल अशी.. सुंदर.. डिसेंट मुलीला आपण सिलेक्ट करु.. ओके?”
“असं कसं करता येईल..?”
“का नाही येणार? अरे थोडे पैसे दिले की सगळा डेटा आजकाल ह्या टेलिफोन कंपन्या विकतात.. आणि ते तरी कश्याला.. माझ्या स्वतःच्या कित्तेक ओळखी आहेत.. पैसे न भरताही प्रत्येक फोन नंबरची कुंडली मिळेल आपल्याला.. त्यावरुन काढु आपण.. तु ठरव फ़ार तर..कुणाला शॉर्ट-लिस्ट करायचं ते.. मग तर झालं..?”

कबिरला त्यातल्या त्यात हा पर्याय बरा वाटला…

“काय हरकत आहे..”, त्याने स्वतःशीच विचार केला.. तश्याही बर्‍याचश्या संध्याकाळ त्याने एकट्याने घरात टीव्हीसमोर बसुन घालवल्या हो्त्या

फ़ारसे आढेवेढे न घेता तो तयार झाला..


डेली-न्युजपेपरमध्ये जाहीरात येऊन गेल्यानंतर मध्ये आटलेला फोन्सचा ओघ पुन्हा सुरु झाला.
कबिरकडे भरपुर वेळ होता.. त्यामुळे तो येणार्‍या फोन्सवर अगदी मनापासुन गप्पा मारत होता. पुस्तक कधी वाचले? कुठला भाग जास्ती आवडला? आधी कोण-कोणती पुस्तकं वाचली.. वगैरे चौकश्या तो करत असे. ह्या फोन्सच्या माध्यमातुन त्याला एक नव्याने हुरुप आला होता. शहराच्या.. राज्याच्या… काही अंशी देशाच्या कानाकोपर्‍यातुन फोन आला की त्याला फ़ार आनंद वाटे. आपण जे लिहीतो ते लोकांना आवडते आहे.. आपली गोष्ट कुणाला ना कुणाला अगदी त्यांचीच गोष्ट वाटते आहे हे ऐकुन तो भारावुन जाई. त्यातल्या त्यात फ़ोनवरुन जो आवाज चांगला वाटे.. जिच्याशी बोलताना त्याला छान वाटे असे नंबर तो कागदावर लिहून ठेवत होता जेणेकरुन अश्याच लोकांचा डेटा फोन-कंपनीतुन मागवता येईल..

असंच एकदा घरातल्या आराम-खुर्चीत रेलुन तो पुढच्या भागात काय लिहावं ह्याचा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला..

“हॅल्लो.. कबिर..”, पलीकडुन एक गोड आवाज कानावर पडला..
“बोलतोय…”, नकळत कबिर खुर्चीत सरळ होऊन बसला..
“कबिर, मी रती बोलतेय.. तुम्ही क्रेडीट कार्ड वापरता का?”
“डॅम इट..”, कबिर स्वतःशीच चरफ़डला… “सॉरी.. मला नकोय क्रेडीट कार्ड.. थॅंक्स..”

पलिकडुन खिदळण्याचा आवाज आला तसा कबिर फोन ठेवता ठेवता थांबला..
“सॉरी.. सॉरी.. मी क्रेडीट कार्डसाठी नाही फोन केला.. खरंच सॉरी.. मस्करी केली..”
“कोण बोलतंय?”, कबिरने काहीसं चिडून विचारलं..
“सांगीतलं तर.. रती बोलतेय… मी पुस्तक वाचलं तुमचं…”, पलिकडुन पुन्हा तोच गोड आवाज..
“तरीपण मला क्रेडीट कार्ड नकोय…”, ह्यावेळी मस्करी करत कबिर म्हणाला..

काही क्षण दोघंही हसण्यात गुंग झाले…

“नाही.. तुम्ही डेट वर न्हेणार आणि ऐनवेळी पैसे नाहीत बिल भरायला म्हणालात तर.. म्हणुन म्हणलं आधी विचारावं, क्रेडीट कार्ड वापरता का…”, रती हसु थांबवत म्हणाली..
“ए प्लिज.. कबिर म्हणालीस तरी चालेल..”, कबिर…
“ओके.. कबिर..”
“गुड.. सो कशी वाटली गोष्ट.. इश्क ची?”, कबिरने विचारलं आणि मग पुढची ५-१० मिनीटं दोघंही पुस्तकातल्या विवीध भागांबद्दल बोलत राहीले…

“मग.. तुला काय वाटतं.. आपल्या हिरोने पुढच्या भागात काय करायला हवं? मीराची वाट बघणं योग्य आहे की त्याने मुव्ह ऑन करावं?”
“मला वाटतं.. त्याने त्याच्या आधीच्या गर्ल-फ्रेंडकडे परत जावं..”, रती
“का?”, कबिरला हे उत्तर अगदीच अनपेक्षीत होतं..
“का नाही?”, रतीने प्रतीप्रश्न केला..

“त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडनेच त्याला सोडलं होतं.. ते पण तिच्या स्वार्थासाठी.. अनपेक्षीत अपेक्षा ठेवुन.. नायकाने तीची खुप वाट बघीतली.. नाही असं नाही.. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो.. आणि शेवटी झालं ते चांगलंच झालं ना.. मीराच्या रुपाने त्याला पुन्हा एकदा प्रेम मिळालं, पहाताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि प्रत्येक भेटीत तो तिच्याकडे अधीकच ओढला गेला. अर्थात मीराच्या तिच्या आयुष्याकडुन असलेल्या अपेक्षा वेगळ्या होत्या म्हणुन ती कदाचीत त्याच्या आयुष्यातुन निघुन गेलीही असेल.. पण असंही होऊ शकतं ना की.. त्याच्यापासुन दुर राहील्यावरच मीराला प्रेमाची जाणीव होईल आणि ती परत येईल… म्हणजे मला तरी असं वाटतं.. तुला नाही वाटत ज्याच्यावर आपण मनापासुन प्रेम करतो त्याने आपल्या प्रेमाचा स्विकार करावा.. आपल्या आयुष्याचा साथीदार म्हणुन तोच मिळावा म्हणुन?”

“कबिर, जरं का तुझं शेवटचं वाक्य खरं असेल ना तर.. त्याची गर्लफ्रेंड सुध्दा हेच तर मागते आहे त्याच्याकडुन…”
“पण.. तिनेच तर त्याला सोडलं होतं..”, रतीचं वाक्य मध्येच तोडत कबिर म्हणाला..
“कबिर.. तुझ्याकडे फक्त हे एकच कारण आहे का? का तु दुसरं पण काही बोलणार आहेस?”
कबिर काहीच बोलला नाही..

“कबिर.. यु नो व्हॉट अ ट्रु जंटलमन इज?”
“व्हॉट?”

“ट्रु जंटलमन तोच असतो जो स्त्रीचा आदर करतो.. तिच्या भावनांचा आदर करतो.. तिच्या मतांचा आदर करतो.. आणि तुझ्या कथेचा नायक जर त्याच्या पुर्वीच्या गर्लफ्रेंडकडे परत गेला ना तर तो एकावेळी दोन्ही स्त्रीयांच्या भावना सांभाळेल. एकीकडे त्याच्या गर्लफ्रेंडच्या प्रेमाला तो होकार देईल तर दुसरीकडे मीराच्या मतांचा आदर करुन तिला हवं असलेलं आयुष्य तिला मिळावं म्हणुन तिच्या मार्गातुन बाजुला होईल..”

“मान्य.. पण म्हणुन त्याने स्वतःच मन मारुन परत तिच्याकडे जावं असं तुला म्हणायचं आहे का?”
“मन मारुन? नाही कबिर मला नाही वाटत त्याला मन मारुन म्हणतात.. अर्थात तु लेखक आहेस.. ती पात्र तु रंगवलेली आहेस.. सो तुझ्या पात्रांचा स्वभाव काय आहे.. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे तुला अधीक माहीती.. पण माझ्या लेखी त्याला `इगो विसरणं’ म्हणत असावेत.. मला वाटतं त्याच्या गर्लफ्रेंडने सोडल्याच्या दुःखापेक्षा त्याचा इगो परत जाण्याच्या मार्गात अधीक येतोय.. मी चुकही असेन.. पण मला तरी असं वाटतं..”

कबिर क्षणभर खरोखरंच चकीत झाला.. मोनिकाकडे परत जाण्यात आपलं दुःख आड येतंय? का खरंच आपल्या मनात कुठेतरी खोलवर इगो दडुन बसलाय? हा विचार त्याच्या मनाला स्पर्शुन गेला..

“क्षणभर हेही मान्य की कदाचीत त्याचा इगो असेल.. पण बाकीच्या गोष्टींच काय.. अश्या इतरही अनेक गोष्टी होत्या ज्या त्याला पसंद नव्हत्या.. त्या पेज-थ्री पार्टीज.. ते अपेक्षांच ओझं?”

“कबिर.. तु तो जुना बॉबी सिनेमा पाहीला आहेस..”, काही क्षण शांततेत गेल्यावर रती म्हणाली..
“डिंपलचा ना? हो पाहीलाय…”
“त्यात एक मस्त डायलॉग आहे बघ.. कोई प्यार करे तो तुमसे करे, तुम जैसे हो वैसे करे। कोई तुमको बदल कर प्यार करे तो वो प्यार नहीं, सौदा है.. और सायबा.. प्यार मै सौदा नही होता… आठवतोय ना…?”

नकळत कबिरच्या चेहर्‍यावर हास्याची एक लकेर येऊन गेली.. कित्तेक दिवसांनी.. कित्तेक दिवसांनी कबिर हसला होता…
त्याने घड्याळात नजर टाकली.. गेला अर्ध्या तासाहुनही अधीक काळ तो ह्या रतीशी फोनवर बोलत होता…

“मला आवडेल तुझ्याशी ह्या विषयावर अधीक बोलायला रती.. मला वाटतं.. प्रत्यक्ष भेटलोच तर तेंव्हा बोलायला थोडं ठेवुया नाही का?”, कबिर म्हणाला..
“ऑफ़कोर्स.. मी तयार आहे..”, रती
“डन देन.. होप सो.. यु विल बी द लकी विनर.. आणि आपण इथुनच पुढे आपला वाद सुरु करु.. व्हॉट से…?”
“आमेन…”, हसत हसत रती म्हणाली…
“बाय देन..”
“बाय…”

कबिरने फ़ार कष्टाने फोन बंद केला.. अजुन कित्तीतरी वेळ तो रतीशी बोलु शकला असता.. त्याला बोलायचं होतं.. आणि तो बोलणारही होता.. त्याने रतीचा नंबर ठळक अक्षरांनी कागदावर लिहीला आणि मग मेहतांना मेसेज केला..
“लकी विनर शोधायची गरज नाही.. मला लकी विनर मिळाला आहे.. सोबत नंबर पाठवत आहे…”

पुढचे काही तास तो पुर्णपणे राधाला.. मोनाला विसरुन गेला होता. पुढचा एक तास तो पुन्हा पुन्हा रतीबरोबरंच संभाषण आठवत होता. इतक्या फोन कॉल्समध्ये पहील्यांदा कुणीतरी त्याच्याशी वाद घातला होता.. मुद्देसुद संभाषण केले होते.. उगाचच आपलं ते नेहमीचंच `मी तुमचं पुस्तक वाचलं.. खुप छान आहे’ वगैरेंचा त्याला कंटाळा आला होता. रतीने त्याला त्याच्याच लेखनाचा विचार करायला लावला होता.. इतके आठवडे गंज लागुन पडलेला त्याचा मेंदु आळस झटकुन जागा झाला होता.. फ़्रेश झाला होता..

आता फ़क्त त्याला ती संध्याकाळ डोळ्यासमोर दिसत होती जेंव्हा तो रतीला प्रत्यक्षात भेटणार होता…

नकळत रतीच्या विचाराने त्याच्या अंगावर शहारा आला…

[क्रमशः]