Fulacha Prayog.. - 1 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | फुलाचा प्रयोग.. - 1

Featured Books
Categories
Share

फुलाचा प्रयोग.. - 1

फुलाचा प्रयोग..

पांडुरंग सदाशिव साने

१. दोघांचा बळी

त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते सारे पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जबाबदारी दोन प्रधानांवर सोपवली होती.राजक्रांतीच्या वेळेस हया दोन प्रधानांना लोक देवाप्रमाणे मानीत त्यांच्या नावाचा जयजयकार केला जाई. किती त्यागी, किती थोर त्यांची देशभक्ती असे सारे म्हणत; परंतु आता पूर्वीप्रमाणे लोकांची श्रध्दा त्यांच्यावर राहिली नाही. समाजात काही मत्सरी लोकांनी त्या दोन प्रधानांच्या विरुध्द सारखी मोहीम सुरू केली. हे प्रधान स्वार्थी आहेत, मानासाठी हपापलेले आहेत, राजाला ह्यांनीच प्रवासासाठी पाठविले, ह्यांना सर्व सत्ता स्वत:च्या हाती घ्यावयाची आहे, कसली देशभक्ती नि कसले काय, अशा प्रकारचा विषारी प्रचार त्यांनी सुरू केला. सभांतून, वर्तमानपत्रांतून, खाजगी बैठकींतून एकच सूर ऐकू येऊ लागला.लोक चंचल असतात. ते आज एखाद्याची पूजा करतील, उद्या त्याचीच कुतरओढ करतील. ते आज जयजयकार करतील, उद्या शिव्या-शाप देतील. आज उंचावर चढवतील, उद्या खाली ओढतील, आज फुलांचे हार घालतील, उद्या दगड मारतील. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. लोकांना जसे वळवावे तसे ते वळतात. अग्नीने सुंदर स्वयंपाक करता येतो, आगही लावता येते. लोकांना शांत ठेवता येते, त्यांना प्रक्षुब्धही करता येते. पाणी शांत असते, परंतु जोराचा वारा सुटला तर तेच पाणी प्रचंड लांटाचे रूप धारण करते. मोठमोठया बोटीही मग त्या लाटांसमोर टिकू शकत नाहीत. त्याप्रमाणे शांत राहाणारी जनता कोणी एखाद्या गोष्टीचा तुफानी प्रचार केला तर खवळते. ती मग आवरता येत नाही.राजधानीतील लोक त्या दोन प्रधानांविरुध्द फारच बिथरले. एके दिवशी सायंकाळी विराट सभा झाली. द्वेषाची आग पाखडणारी भाषणे झाली. प्रधानांच्या घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. ‘मारुन टाका हे प्रधान; स्वार्थी बेटे; देशभक्त म्हणून मिरवतात; तुकडेतुकडे करा. आगा लावा त्यांच्या बंगल्यांना-’ असे ओरडत प्रक्षुब्ध जनता निघाली.एक प्रधान घरात सापडला. दुसरा कोठे आहे? परंतु आहे त्याची तरी उडवा चटणी. जो प्रधान सापडला त्याला लोकांनी फराफरा ओढीत आणले. कोणी हात तोडला. कोणी पाय उडवला. हाल-हाल करुन त्या प्रधानाला मारण्यात आले. त्याचे डोके भाल्यावर रोवून ते मिरवण्यात आले. ‘देशद्रोहयांना असे शासन हवे. स्वार्थी लोकांना हे बक्षीस मिळते-’ असे गर्जत लोक गेले.

परंतु तो दुसरा प्रधान कोठे आहे? राजधानीतील काही विचारी माणसांनी एक पत्रक काढले. ‘एका प्रधानाचा लोकांनी सोक्षमोक्ष लावला. आता दुसर्‍याचा सूड घेण्यास ते अधीर झाले आहेत; परंतु हा खरा मार्ग नव्हे. प्रधानांची न्यायासनासमोर चौकशी होऊ दे. जर ते दोषी ठरले, त्यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले तर त्यांना होऊ दे शिक्षा. आता दुसर्‍या प्रधानास तरी न्यायासनासमोर उभे करा.’

‘होय, हे बरोबर आहे. हया दुसर्‍याची चौकशी करू या. सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत. त्यांचे इतर साथीदार कोण आहे हेही कळेल. त्यांचाही नायनाट करता येईल. असे लोक म्हणू लागले. हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे व न्यायधिशांनी त्यांची चौकशी लवकर करावी अशाही मागण्या लोकांनी सभांतून केल्या.त्या दुसर्‍या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आले. स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली. केव्हा येणार राजा? राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळणार तर नाही ना? खवळली तर हया प्रधानास कसे वाचविता येणार?तो दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता. इतक्यात कोणी तरी तेथे आले. कोण होते ते? समजावयाला मार्ग नव्हता. त्या व्यक्तिच्या तोंडावरुन बुरखा होता. त्या अज्ञात व्यक्तीने त्या प्रधानाच्या हातात चिठ्ठी दिली. काय होते त्या चिठ्ठीत?‘आज रात्री आठ वाजता तुरुंगाच्या दाराबाहेर घोडयाची गाडी असेल. तीत तुम्ही बसा व शहराच्या दक्षिण दरवाजाकडे जा. तुम्ही तेथे पोचताच दरवाजा उघडला जाईल. आपण त्याच गाडीतून देशाबाहेर निघून जाऊ’. तो प्रधान विचार करू लागला. घोडयाच्या गाडीतून जाणे धोक्याचे होते. कोणी गाडी थांबवली तर? कोणाला संशय आला तर? पंतु प्राण वाचविण्याचा हाच एक मार्ग होता. आलेली संधी घ्यावी. पुढचे कोणाला कळणार?तो प्रधान रात्र केव्हा होते व आठ केव्हा वाजतात हयाची वाट पाहात होता. शेवटी एकदाचे आठ वाजले. कोणी तरी कोठडीजवळ आले. प्रधानाला त्या अज्ञान व्यक्तीने तुंरुगाबाहेर नेले. तेथे पडदे सोडलेली गाडी होती. प्रधान तीत बसला. गाडी भरधाव निघाली. रात्रीची आठ-साडेआठची वेळ. रस्ते गजबजलेले होते; परंतु त्या गर्दीतून ही गाडी वेगाने जात होती. गाडी दक्षिणेकडच्या दरवाजाकडे वळली. तिकडे गर्दी कमी होती. रहदारी कमी होती. गाडी दरवाजाजवळ येऊन थांबली; परंतु दरवाजा बंद. तेथील पहारेकरी दरवाजा उघडीना.

‘अरे, दरवाजा लवकर उघड-’ गाडीवान म्हणाला.‘तसा हुकूम नाही.’ पहारेकरी म्हणाला.‘हुकूम नाही?’ गाडीतून प्रधानाने विचारले.‘नाही. कोण आहे गाडीत?’ पहारेकर्‍याने प्रश्न केला.‘त्याची तुला उठाठेव नको. आधी दरवाजा उघड. प्रत्येक क्षण मोलाचा जात आहे. देशाचे काम आहे.’ गाडीवान म्हणाला.‘काही तरी फितुरी दिसते. कोण आहे गाडीत? मी दरवाजा उघडणार नाही,’ पहारेकरी जोराने म्हणाला.

आता काय करणार? गाडीवानाने गाडी वळविली. पुन्हा वेगाने हाकली; परंतु, ‘दगा, फितुरी, पकडा, अडवा गाडी!’ असे तो पहारेकरी ओरडून म्हणाला. रस्त्यातील लोकांनी ते शब्द ऐकले. एका क्षणात ते शब्द शहरभर पसरले. जनता खवळली. लाखो लोकांचे थवे जमा झाले. गाडी गर्दीतून वेगाने जाईना. लोकांनी घोडे धरले. गाडी थांबली.‘कोण आहे गाडीत?’ लोक ओरडले.‘अहो, विचारता काय? काढा ते पडदे-’ कोणी म्हणाले. गाडीचे पडदे ओढण्यात आले. तो आत तो दुर्दैवी प्रधान!‘अरे देशद्रोही प्रधान! पळून जात होता. ओढा त्याला. ठेचा. हाणा. मारा. तुकडे करा. पळून जात होता. पापाला पळून जाता येत नाही. भरली त्याची घटका. भरला पापांचा पेला. मोठे देशभक्त! खरा असता तर पळू बघता ना. ओढा त्याला, खेचा.’त्या प्रधानाला हाल-हाल करून मारण्यात आले. त्याच्या शरीराचा लहानसा तुकडाही कोठे सापडला नाही. तुकडयांचे तुकडे, तुकडयांचे तुकडे केले गेले. प्रत्येकाला सूड घेण्याची इच्छा होती. लोकांची माणुसकी मेली होती. क्रोधाने, सूडबुध्दीने माणसाचा पशू होतो. पशूही बरा. कारण त्याला फार बुध्दी नसते; परंतु बुध्दिमान मनुष्य पशू झाला तर फारच भयंकर ती गोष्ट. दुनियेला तो शाप असतो.तो प्रधान, तो गाडीवान, ते घोडे सर्वांचा फन्ना उडाला. त्या गाडीला आग लावण्यात आली. राक्षसी आनंदाने लोक नाचू गर्जू लागले. ‘दोन्ही काटे निघाले.’‘परंतु त्यांचे साथीदार आता शोधले पाहिजेत.’‘बीमोड केला पाहिजे.’‘तरच नवीन राजा सुखी होईल. नव्या राजाचा जयजयकार असो!’