कबिर आणि राधा साधारण ३-३.३० तास ड्राईव्ह मध्ये एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत.
शेवटी बर्याचवेळानंतर राधा म्हणाली, “आय एम सॉरी!”
“सॉरी? सॉरी कशाबद्दल? बिचबद्दल…. की त्या घाटाबद्दल?”, कुत्सीतपणे कबिर म्हणाला
“दोन्हीबद्दल…”, राधा
“म्हणजे? तुला म्हणायचंय की दोन्ही बाबतीत चुकलीस?”
“नाही.. मी चुकीची नक्कीच नाही वागले.. पण तु हर्ट झालास.. म्हणुन सॉरी..”
“ओह.. सो तुला वाटत नाहीए तु चुकलीएस.. मग तुला काय करायचंय कोण हर्ट झालं आणि कोण नाही. तु बरोबर आहेस ना.. मग झालं तर…”
“नाही, तसं नाही. सगळ्यांत पहीलं म्हणजे मी माझ्या भावनांना आवरायला पाहीजे होतं.. निदान तुझ्या बाबतीत. मी प्रेझेंट मधे जगणारी मुलगी आहे कबिर.. त्या क्षणी जे वाटलं ते करते. आधी काय घडलं होतं.. किंवा पुढे काय होईल ह्याचा फारसा विचार नाही करत. पण तु तसा नाहीएस.. तु कुठली पण गोष्ट मनाला लाऊन घेतोस.. सो त्यावेळीच मी स्वतःला थांबवलं असतं.. तर तो घाटातला प्रसंग टाळता आला असता…”, राधा
“एनिवेज.. जे झालं ते चांगलंच झालं ना.. वन्स अॅन्ड फ़ॉर ऑल.. आपण दोघंही आता एकमेकांच्या बाबतीत सुपर क्लिअर आहोत.. सो गुड फ़ॉर बोथ ऑफ़ अस… “, कबिर
“हम्म.. खरंय.. बर.. थोडा ब्रेक घेऊया का?.. तु सकाळपासुन ड्राईव्हच करतो आहेस… २.३० वाजलेत.. पुढे पेट्रोल पंप आहे एक.. मॅक्डोनाल्ड पण आहे.. मागेच एक बोर्ड होता.. थांबुयात तिथे?”
“ओके…”
पाच एक किलोमीटरवरच्या पेट्रोल-पंपावर कबिरने गाडी आतमध्ये वळवली.
“काय घेशील… बर्गर-फ़्राईज-कोकच आणु का दुसरं काही?”, राधा
“मी आणतो ना, बस तु..”, कबिर
“प्लिज.. उगाच फॉर्मॅलीटी नको.. आणते मी..”, गाडीतुन उतरत राधा म्हणाली..
“अरे पण रात्री..अपरात्री.. मी येतो बरोबर फ़ार तर..”
“कबिर.. रिअली.. इट्स ओके.. मला फ़्रेश व्हायला जायचंच आहे.. मी आणते…”, असं म्हणुन राधा निघुन गेली.
कबिरही गाडीतुन खाली उतरला. बाहेरचा गार वारा लागल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. गाडीतल्या त्या ए/सीने त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. दोन्ही हात-पाय ताणुन त्याने अंग मोकळं केलं. दोन तिन चालत चकरा मारल्यावर त्याला थोडं मोकळं वाटलं. मॅक्डोनाल्डच्या काचेच्या तावदानातुन त्याने आतमध्ये नजर टाकली तेंव्हा काऊंटरवर राधा ऑर्डर देत होती.
“का आवडतेस तु राधा मला एव्हढी?”, त्याने स्वतःलाच प्रश्न केला…”तु सांगीतलेली कुठलीच गोष्ट तु म्हणतेस तशी मला किंवा माझ्या आई-वडीलांनाही आवडणारी, पटणारी नाही. दोघांनीही जुळवुन घ्यायचं ठरवलं तरीही ही दरी इतकी मोठ्ठी आहे की आपण कधी एकत्र येण्यापेक्षा समांतरच राहुन जाऊ.. सगळं मान्य आहे मला हे.. पण तरीही.. तरीही.. तुला विसरण सोडाच.. तुला विसरायचा प्रयत्न करणं.. किंवा.. तुला विसरायचा प्रयत्न करायचा आहे ह्या विचाराने सुध्दा वेदना होताएत…”
कबिरच मन राधाला विसरायला लागणार आहे ह्या विचारानेच बगावतीवर उतरलं होतं. त्याच्या मनाचा कुठलाही कोपरा राधाला विसरायला तयार नव्हता.
कबिरने लक्ष विचलीत करण्यासाठी मोबाईलमध्ये डोकं खुपसलं…व्हॉट्स-अप चालु झाले तसे अनेक मेसेजेस इन-बॉक्स येऊन पडले. त्यात एक मेसेज रोहनचा ही होता.
कबिरने रोहनचा मेसेज ओपन केला…
“अभिनंदन.. अभिनंदन.. त्रिवार अभीनंदन.. शेवटी तुला जे पाहीजे ते मिळालं… बिग पार्टी तु आल्यावर..” रोहनने सोबतच पार्टी, फुलं, केक वगैरेंचे इमोटीकॉन्सही पाठवले होते.
कबिरला आठवलं.. त्या दिवशी संध्याकाळी बिचवरुनच त्याने पट्कन रोहनला मेसेज केला होता.. राधाच्या किस आणि आय-लव्ह-यु बद्दल… आता मात्र त्याला पश्चाताप झाला. आपण उगाचच त्याला सांगायची घाई केली असंच त्याला त्या क्षणी वाटलं. त्याचं सहज लक्ष रोहनच्या स्टेटस कडे गेलं आणि त्याला आश्चर्यंच वाटलं.. रोहन ऑनलाईन होता.
“हा इतक्या उशीरा काय करतोय ऑनलाईन..?”, त्याच्या मनात विचार येऊन गेला.
एकदा त्याला पिंग करावं असं कबिरला वाटलं.. पण मग त्याला झाला गेला सगळाच प्रकार सांगत बसावं लागलं असतं आणि कबिर आत्ता त्या मुड मध्ये नव्हता.. म्हणुन मग त्याने सोडुन दिलं.
एव्हढ्यात राधा ऑर्डर घेऊन पोहोचली..
“काय रे? कसला विचार करतोएस..?”
“अगं. हा रोहन.. अजुन ऑनलाईन आहे…”
“रोहन?.. तुझा मिडिआ-मॅनेजर का कोण तो.. तोच का?”
“हम्म तोच..काय करत असेल इतक्या रात्री?”
“तुला काय रे चांभार चौकश्या..? प्रेमात वगैरे पडला असेल कुणाच्या तरी तो.. घे… पिरी-पिरी मसाला चालतो ना फ़्राईजवर?”, हातातले पार्सल कबिरला देत राधा म्हणाली..
“हम्म…”
“मग.. प्लॅन काय आहे आता?”,५-१० मिनिटं शांततेत खाण्यात गेल्यावर कबिर म्हणाला..
“अम्म.. आपण पोहोचलो की लगेचच दुपारी वगैरे मी स्ट्रॉबेरी-टुर्सना भेटेन.. मला तो जॉब हव्वाच आहे.. सगळे पोलिस-रिपोर्ट्स जमा करेन.. बहुदा २-४ दिवसांत मिळेल त्यांचं ऑफ़र लेटर.. तो पर्यंत मला घर शोधायचं आहे.. तुझ्या माहीतीत असेल कुठे रेंन्टवर तर सांग ना…”, राधा
“काय बजेट आहे तुझं?”. कबिर
“तसा बजेटचा काही प्रॉब्लेम नाही यायचा.. माझ्या पगाराचे पैसे असतील.. शिवाय डिव्होर्सनंतर चांगली पोटगी मिळेलच.. केवळ तेव्हढेच पैसे इ.एम.आय म्हणुन वापरले तरी नविन घर घेता येईल मला.. पण माझंच अजुन ‘पुढे काय’ नक्की नाहीए.. सो इन्व्हेस्ट आत्ता तरी नाही करायचंय मला कुठे…”
“मी एक सुचवु का? म्हणजे बघ पटलं तर.. नाही तर दे सोडुन..”
“हम्म बोल..”
“तु माझ्याच घरात का नाही रहात? माझा ३ बि.एच.के. आहे.. मी एकटाच रहातो मोठ्या घरात…”
राधाने त्याच्याकडे चमकुन बघीतलं..
“तु त्या हिप्पींबरोबर रहात होतीसच की.. मी काय तितका वाईट नाहीए.. शिवाय.. तुझी वेगळी खोली असेल.. तुझी प्रायव्हसी तुला मिळेल ह्याची काळजी घेईन मी…. खरं तर एव्हढं मोठ्ठ घर.. मोना गेल्यावर खायला उठतं.. आपलं बाकी काही असलं नसलं तरीही तसं बरं जमतं.. जोपर्यंत तुला मनासारखं घर मिळत नाही तोपर्यंत रहा पाहीजे तर..”
“हम्म.. ऑफ़र तशी टेंप्टींग आहे..”, बर्गरचा मोठ्ठा तुकडा तोंडात कोंबत राधा म्हणाली.. “पण नको.. थॅंक्स..”
“पण का? काय प्रॉब्लेम आहे?”, वैतागुन कबिर म्हणाला..”माझ्या प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणायचं ठरवलं आहेस का तु?”
“तसं नाही रे.. पण हे बघ.. मी एक दिवस काय तुझ्याबरोबर फिरले तर नको ते करुन आणि नको ते बोलुन बसले.. एकत्र रहायला लागलो तर.. माहीत नाही काय होईल.. त्यापेक्षा नकोच..”
“अरे असं कसं काहीही होईल.. आपण काय लहान आहोत का?”, कबिर काही आपला हट्ट सोडायला तयार नव्हता..
“ए चल.. झालं असेल तर निघु..”, कबिरचा विषय टाळत राधा म्हणाली आणि ती गाडीत जाऊन बसली..
कबिरने काही क्षण राधाकडे निरखुन बघीतलं. ह्या विषयावर पुढे काही बोलण्यात आत्ता तरी अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याने हातातल्या वाळुन गेलेल्या बर्गरकडे बघीतलं. त्याला खाण्यात कसलाही इंटरेस्ट राहीला नव्हता. उरलेला बर्गर आणि कोक त्याने शेजारच्या डस्ट-बीन मध्ये टाकुन दिले आणि हात झटकुन तो गाडीत बसला.
राधा मोबाईलवर मेसेज करण्यात मग्न होती. त्याने गाडी चालु केली आणि तो घराकडे परतायला निघाला.
दुसर्या दिवशी कबिर थोडा उशीराच ऑफीसमध्ये गेला तेंव्हा रोहन त्याची वाटच बघत होता. कबिरला बघताच तो आनंदाने उभा राहीला, पण तो काही बोलणार त्याच्या आधीच कबिरने त्याला थांबवले.
“प्लिज काही बोलु नकोस…”
“का रे? काय झालं? पहील्याच दिवशी वहीनींशी भांडलास की काय?”, कबिरचा पडलेला चेहरा पाहुन रोहनने विचारले.
“वहीनी?? हा हा हा…”, निराशाजनक स्वरात हसत कबिर म्हणाला…
“जरा कळेल असं बोलशील का?” कबिरच्या केबीनमध्ये त्याच्या समोरची खुर्ची ओढुन त्यावर बसत रोहन म्हणाला..
पुढच्या तासाभरात कबिरने त्याला इथुन निघुन.. ते इथे परतेपर्यंतचा सर्व प्रवास ऐकवला.
“कठीण आहे बाबा तुझं खरंच.. काय नशीब घेऊन आला आहेस तु…”, रोहन काहीश्या त्रासीक स्वरात म्हणाला.. “मोनिका मिळाली.. मोनिकाने तुला सोडलं.. तु गोव्याला गेलास.. राधा मिळाली.. राधा हरवली.. मग परत राधा मिळाली.. कुठे? तर पोलिस स्टेशनमध्ये.. मग परत राधा मिळाली.. मग तिने तुला किस्स केलं.. आय.लव्ह.यु. म्हणाली.. आणि मग? तरीही राधा परत हरवली…? अरे काय चाल्लंय काय??”
“मी तरी काय करु तुच सांग, खरंच माझी कुंडली तपासुन घ्यायची वेळ आली आहे..”
“मग आता काय? परत आपला मोर्चा मोनिकाकडे का? ती आहेचे रिकामी तुझ्यासाठी नाही का?”, रोहन
“मोनिका? ती कुठुन मध्येच उगवली? आणि तु का इतका चिडतो आहेस?”
“नाही तर काय? तुझंच नक्की ठरत नाहीए राधा की मोनिका..”
“पण मी मोनाबद्दल काहीच बोललो नाहीए..”
“नाही कस? मध्ये तुम्ही दोघं भेटत नव्हतात परत?”
“आम्ही दोघं नाही, ती.. ती भेटत होती मला..”
“मग तु नाही म्हणु शकला असतास तिला भेटायला.. कश्याला तिला तंगवुन ठेवतोस.. सरळ सांग तिला की मला तुझ्यात इंटरेस्ट नाही म्हणुन…”
“ते माझं मी बघेन.. पण तु का एव्हढी तिची बाजु घेतो आहेस..?”
“म्हणजे काय? तु वापरतो आहेस मोनिकाला.. राधा नसली की तिच्याकडे.. राधा असली की कोण मोना ! असा प्रकार आहे तुझा…”
“हे बघ रोहन..”, कबिर काही बोलणार एव्हढ्यात त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला आणि दोघांच बोलणं तिथेच खुंटलं..
त्या दिवशी घरी आल्यावर कबिरने रोहनच्या बोलण्याचा खुप विचार केला. रोहन म्हणत होता तसं खरोखरंच तो वागत होता का? मुद्दाम नक्कीच नाही.. पण नकळत?
एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवुन तो मोनाला दुखवत होता का?
पहील्यासारखं प्रेम त्याला मोनाबद्दल नक्कीच वाटत नव्हतं आणि राधा भेटल्यानंतर ते प्रेम मोनाबद्दल भविष्यात पुन्हा कधी मनामध्ये निर्माण होईल ह्याची धुसर आशाही त्याला वाटत नव्हती. अर्थात त्याने कधी हे स्पष्टपणे मोनिकाला सांगीतलेही नव्हते. कदाचीत रोहन म्हणतो तसं मोनिका अजुनही त्याची वाट बघत असेल.
कबिरने बराच विचार केला आणि मग त्याने मोनिकाला फोन लावला..
“हाय कबिर.. व्हॉट अ प्लिजंट सर्प्राईज…”, मोनिका आनंदाने म्हणाली..
“हाय मोना.. कशी आहेस?”
“मी मस्त.. बोल.. कशी आठवण काढलीस?”
कबिरला खरं तर असं फोनवर ब्रेक-अप करणं बरोबर वाटत नव्हतं. निदान शेवटचं का होईना… प्रत्यक्ष भेटुन ह्या गोष्टी स्पष्ट कराव्यात अशी त्याची इच्छा होती. पण .. पण कदाचीत तो प्रत्यक्षात मोनाला समजावुन सांगण्यात यशस्वी झाला नसता.. तिच्या निरागस चेहर्यासमोर त्याचे शब्द घश्यातच अडकले असते..
“मोना थोडं बोलायचं होतं..”, काहीसा गंभीर होत म्हणाला..”
“बोलं ना.. ब्रेक-अप करायंचंय?”, अगदी सहजतेने मोनिका म्हणाली खरी, पण कबिरच्या पायाखालची जमीनच सरकली.
“ब्रेक तर केंव्हाचं झालं ना आपलं? तुच तर केलं होतंस”, कबिर म्हणाला…
“हो ना? मग कश्यासाठी बरं फोन केलास तु?”
“हे बघ मोना.. मला माहीती आहे.. तुला अजुनही वाटतं की आपण दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं.. तुझ्या जागी मी असतो तर कदाचीत मलाही तसंच वाटलं असतं…”
“माझ्या जागी म्हणजे? म्हणजे अशी मी एकटी.. बेसहारा..अबला.. माझ्या आयुष्यात कोणीच नाही… असं?”
“नाही.. तसं नाही.. म्हणजे तुला तुझी चुक उमगली आहे.. आधीचा ब्रेक-अप हा आपल्या चुकीने झाला होता तर..”
“आहे ना मान्य तुला.. की मी माझी चुक कबुलली आहे.. मग का पुन्हा पुन्हा आठवण करुन देतो आहेस…?”
“तु भांडणारच आहेस? का मला बोलुन देणारेस?”
“ओके.. बोल..”
“मला असं वाटतं की आपल्यात असलेलं प्रेम केंव्हाच संपलं आहे.. निदान माझ्याबाजुने तरी.. मग त्याला ओढुन-ताणुन.. माफ़ीच्या चिकटपट्या लावुन उगाच प्रयत्नांनी उभं करण्यात काय अर्थ आहे?”
“तुला हे खरंच असं वाटतं आहे का? राधा..”
“राधाला मध्ये आणु नकोस मोना.. तिचा यामध्ये काहीच संबंध नाही.. आपण आपल्या दोघांबद्दल बोलतो आहोत.. आणि तो विषय आपल्या दोघांमध्येच रहावा.. प्लिज..”
“…”
“मला वाटतं उगाच कॉम्प्रमाईज करुन.. एकमेकांवर आपल्या अपेक्षा लादुन, प्रयत्न करुन पाहुयात म्हणत हे नातं टिकवण्याचा काय उपयोग.. प्रेम ही प्रयत्न करुन निर्माण होणारी गोष्ट नाही ना मोना..”
“नाही? मग तु राधाच्या बाबतीत ‘प्रयत्न’ ह्या शब्दापासुन कोसो-दुर आहेस तर…”
“मोना प्लिज.. राधाला ह्यात नको आणुस.. परत सांगतोय..”
“एनिवेज.. तु ठरवंलच आहेस सगळं तर बोलुन तरी काय उपयोग पुढे..”, मोनिकाचा आवाज बोलताना कापरा झाला होता..
“मोना.. ऐक ना.. मी फक्त एव्हढंच म्हणतो आहे की.. आपण आपल्यातुन प्रेम हा शब्दच बाद करुयात ना… आपण एकमेकांचे चांगले मित्र तर होऊ शकतो..”
“प्लिज कबिर.. मला हे असलं फ्रेंड-झोनच प्रकरण जमत नाही.. म्हणजे.. असं नाही की उद्या तु मला रस्त्यात दिसलास तर मी रस्ता बदलुन पळुन वगैरे जाईन.. एनिवेज.. सो कबिर.. ऑल-द-बेस्ट.. तुला तुझं प्रेम जरुर मिळो ही मी तुझ्यासाठी रोज प्रार्थना करेन..”
“कश्याला अशी निरवा-निरवीची भाषा करतेस.. तु पण इथेच आहेस.. मी पण इथेच आहे.. नसेल ते फक्त आपल्यातले तुला अपेक्षीत असलेले नातं.. इतकंच..”
“इतकंच? फक्त ‘इतकंच’ कबिर?”, मोनिका अचानक संतापुन म्हणाली..
“मी तुझं पुस्तक वाचल्ं कबिर.. राधाबद्दलच्या तुझ्या भावना तु ‘इतकंच’ ह्या एका शब्दात मांडु शकतोस? नाही ना?.. माफ़ कर.. तु नाही म्हणलास तरीही मी पुन्हा पुन्हा राधाचा विषय काढते आहे… पण मला असं वाटतं आज मी जेथे आहे.. तेथेच तु सुध्दा आहेस.. मला माहीते तेंव्हा मी चुकले.. मी हजार काय लाख वेळा ती चुक मान्य करेन.. केली आहे.. तुझं प्रेम समजण्याइतकी मी मॅच्युअर नव्हते.. तु माझ्यावर निस्वार्थी प्रेम करत राहीलास आणि मी सेल्फीशपणे तुझ्याकडुन फक्त अपेक्षा करत राहीले.. तुला तुझं माझ्याकडुन अपेक्षीत असलेलं प्रेम तुला मिळावं, आपण एकमेकांच्या चुका विसरुन एकत्र यावं एव्हढंच मला वाटत होतं.. बट यु आर राईट.. मी कितीही प्रयत्न केले तरीही तुझ्यातलं माझ्यासाठीचं आटलेलं प्रेम कितीही प्रयत्न केले तरी कदाचीत मी परत निर्माण करु शकणार नाही.. अॅन्ड आय डोन्ट वॉंन्ट टु लुक लाईक अ बिच.. तुझ्याकडे प्रेमाची भिक मांगणारी.. मलाही माझा सेल्फ एस्टीम जपायला हवा आणि त्याचबरोबर तुझ्या भावनांचा तुझ्या मतांचा आदर करायला हवा.. सो.. गुड बाय रायटर.. तुला तुझा मार्ग मोकळा आहे.. ह्यापुढे तुझ्या आयुष्यात मोना येणार नाही….”
कबिरने बोलण्यासाठी तोंड उघडले.. पण त्याच्या तोंडातुन शब्दच फुटेना… दुःखाने त्याचा कंठ दाटुन आला होता.. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण फोन कधीचाच बंद झाला होता…
कबिरने फोन ठेवुन दिला आणि तो खिडकीत उभा राहीला… खिडकीचं दार उघडताच गरम हवेचा एक झोत आतमध्ये आला. मार्चमहीना सुरु झाला होता आणि आधीच ‘मे’महीन्याचा उन्हाळा जाणवु लागला होता. झाडांची पानगळ सुरु झाली होती.. रखरखलेल्या रस्त्यांवरुन पाला-पाचोळा आणि धुळ उडवत गाड्या वेगाने धावत होत्या…
दुरवर कबिरची नजर आकाशात उडणार्या पतंगावर स्थिरावली.. वार्याच्या लहरींबरोबर सरसरुन उंच-उंच जाणारा पतंग.. अचानक कटला जातो.. त्याच्याशी बांधल्या गेलेल्या मांज्याचा आणि त्याचा संबंध तुटतो आणि तो पतंग बेभान, स्वैर होतो.. वार्याच्या लहरींवर स्वार होऊन मनसोक्त तरंगणारा तो पतंग आता त्याच वार्याच्या लहरींनी भरकटुन जातो.. जो वारा त्याला उंच उंच न्हेत असतो.. तोच वारा आता त्या पतंगाची चिरफाड करु लागतो..
दिशाहीन पतंग हेलकावे खात कबिरच्या नजरेआड होतो.. कबिरची नजर मात्र अजुनही त्या निळाशार आकाशात अजुनही भरकटत रहाते.. दिशाहीन…
[क्रमशः]