मोबाईलच्या अलार्मने रेवतीची झोप मोडली.. तो बंद करून ती एका कुशीवर झाली.. कालचा अस्वस्थपणा बहुधा तिच्या उठण्याची वाट पाहत.. उशाशीच ठाण मांडून बसला असावा.. ती जागी होताच काही सेकंदातच कालचा तो अस्वस्थपणा रेवतीला परत जाणवू लागला..
ती बेडवर उठून बसली.. डोके जड वाटत होते तिला.. दोन्ही हातांनी केसांना मागे घेऊन क्लच लावले.. नंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासले.. त्या निर्माण झालेल्या ऊर्जेचा शेक डोळ्यांना आणि चेहऱ्याला देत तिने आपल्या नवीन दिवसाची सुरुवात केली..
खिडकीचे पडदे बाजूला करून सूर्याच्या कोवळ्या किरणांना खोलीत प्रवेश करण्यास तिने वाट मोकळी करून दिली.. खिडकीची काच उघडली तसा सकाळचा प्रदूषणविरहित मंद वारा खिडकीच्या पडद्यांशी खेळू लागला.. वाऱ्याची अलवार झुळूक रेवतीच्या चेहऱ्यावर आली.. ती झुळूक तिच्यासोबत बागेतील मोगऱ्याचा सुगंध घेऊन आली.. समोरच्या बंगल्याच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला दिसत होता..
पक्षांची मधुर किलबिल त्या वातावरणाला पार्श्वसंगीत देत असल्याचा भास रेवतीला होत होता.. त्यांची दिनचर्या सुरू झाल्याने निरभ्र आकाशात त्यांचे थवे भरारी घेत असलेले दिसत होते.. निरनिराळ्या रंगांचे , आकारांचे पक्षी.. पण सगळ्यांचा आकाशाला गवसणी घालण्याचा उत्साह तोच.. कुठून बळ येत असेल या चिमुरड्यांच्या पंखात!
रेवतीला काही क्षणांच्या त्या निसर्गरम्य आल्हाददायक सफरीने प्रसन्न वाटले.. मनाची मरगळ आणि अस्वस्थपणा झटकून टाकण्याच्या दिशेने दिवसाची सुरुवात तरी अतिशय उत्तम झाली होती..
रेवती निसर्गाशी समरस होऊन स्वतःशीच विचार करत होती..
प्रत्येक नवीन दिवस हा नवीन आशा.. नवीन आकांक्षांना संपूर्ण निरभ्र आकाश बहाल करत असतो..
त्या आकाशातील नको असलेले ढग बाजूला सारून.. ते आकाश पुन्हा नव्या तारे तारकांनी सजवण्याचे काम ज्याचे त्याने करायचे असते..
त्याच आकाशात तिला तिचा ध्रुवतारा काहीसा विस्थापित झाल्यासारखे वाटत होते.. तसे होण्यामागचे कारण शोधायचे होते..
तिने मनाशी काहीतरी ठरविले.. हसऱ्या चेहऱ्याने बाथरूमकडे गेली..
रेवती तयार होऊन प्रसन्न चित्ताने घरातून बाहेर पडली..
तिने आज प्रतीकला या सर्व प्रकाराबद्दल विश्वासात घेण्याचे ठरविले होते..
अपघातानंतर किती सुखद काळ तिने सुहास सोबत घालवला होता.. लग्नाची सुखद स्वप्ने रंगविली होती..
मग आत्ता सुहासला नेमके काय सलत आहे हे प्रतीकला नक्की ठाऊक असणार.. आपल्या मित्राजवळ तरी सुहासने नक्की आपले मन मोकळे केले असणार.. आणि त्यामुळेच त्याच्याशी बोलूनच पुढे काय करायचे ते आपल्याला ठरविता येईल असे रेवतीला वाटत होते..
ती प्रतीकला कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच्या कॉलेज मध्ये भेटायला आली होती.. प्रतीक कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होता..
रेवतीने प्रतीकला फोन लावला.. पण पलीकडून कोणताच रिस्पॉन्स आला नाही.. कदाचित तो लेक्चर मध्ये असण्याची शक्यता होती..
रेवती नंतर कॉलेज मध्ये दाखल झाली आणि प्रतीकची चौकशी केली.. त्याचे लेक्चर सुटायला अजून अर्धा तास शिल्लक होता..
तिच्याकडे वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता.. ती तिथेच कॉरिडॉर मध्ये प्रतीकची वाट पाहत थांबली..
बरोबर ४० मिनिटांनी तो समोरून येताना दिसला..
त्याने फोन बघितला नसल्याने तो रेवतीला अचानक समोर पाहून आश्चर्यचकित झाला.. थोडा थबकला..
"रेवती अचानक इथे कशी? मला भेटायला आली असेल की तिचे इतर काही काम असेल? "
त्याने विचार करत करतच खिशातून मोबाईल बाहेर काढला.. रेवतीचा मिस्ड कॉल होता..
"म्हणजे रेवती मलाच भेटायला आली आहे तर.. काय काम असेल तिचे माझ्याकडे.." प्रतीक विचार करत असतानाच रेवती त्याच्याजवळ आली..
प्रतीक रेवतीला कँटीन मध्ये घेऊन गेला..
रेवतीने सरळ विषयलाच हात घातला. पण प्रतीकने आपलीही सुहासाशी इतक्यात भेट झाली नसल्याचे सांगितले..
त्याच्याशीही सुहास हल्ली तुटक तुटकच वागत असल्याचे आणि भेटी टाळत असल्याचे तसेच त्याचे हल्ली नक्की काय चालू आहे काही कळण्यास मार्ग नसल्याचे प्रतीकने सांगितले..
प्रतीक बोलताना चाचरल्या सारखा रेवतीला जाणवले..
म्हणजे प्रतीकही काहीतरी लपवत असावा का? रेवती विचार करत सुन्न अंतःकरणाने हॉस्टेल वर परतली..