Aayushyache Paan in Marathi Magazine by Sadhana v. kaspate books and stories PDF | आयुष्याचे पान

Featured Books
Categories
Share

आयुष्याचे पान

आयुष्याचं  पान ! 

एखादी नवीन वही खरेदी केल्यावर आपण किती उत्सुक असतो नाही त्यावर लिहिण्यासाठी. नव्या वहीचा नवा कोरा वास ही आवडतो आपल्याला. त्या वहीचे  कव्हर किती आकर्षक आहे किंवा नाही यावरून बरेच जण ती वही वापरायची कि नाही ठरवतात. आवडतं कव्हर आवडत्या विषयाला. नावडते कव्हर नावडत्या विषयाला. पण खरी गम्मत असते ती वहीच्या आत. वहीच्या पानांमध्ये. कारण वरून जरी प्रत्येक पान सारखं दिसत असलं तरी प्रत्येक पानं हे वेगळं असतं. एखाद्या पानावर रेषा स्पष्ट उमटलेल्या नसतात. काही पानं कोरीच सुटलेली असतात. काही पानावरील रेषा अर्धवट सरळ आणि अर्धवट नागमोड्या असतात . तर काही रेषांची सुरुवात जरी व्यवस्थित सरळ झाली असली तरी त्या अचानक मधूनच गायब झालेल्या असतात. काही रेषा इतर रेषांच्या तुलनेत गडद असतात. काही पानांवर कसलेतरी डाग असतात. काही पानं कुजलेली असतात. काही पानांना मार्जिन नसते. काही पानं वहीची असूनही वहीतून आपोआप गळून पडतात. त्यांना वहीच आपलेपण अनुभवताही येत नाही आणि नाकारताही येत नाही. काही पानांवर कविता लिहिल्या जातात, तर काही पानांवर गुन्हे दाखल होतात. काही पानांवर प्रेम कोरलेलं असत तर काही पानांवर चळवळी कोरलेल्या असतात. काही पानं मनात जपली जातात तर काही कपाटात आणि काही कचर्यात फेकली जातात. 
      मानवी आयुष्य हे ही मला या पानांसारखं वाटतं . बाळ जन्माला आलं की प्रत्येकाला त्याच्या येण्याचा आनंद असतो.(अपवाद सोडून) बाळाचा तो ओला वास प्रत्येकाला मोहून टाकतोच. बाळ देखणं असलं की नातेवाईक खोटंखोटं का असेना पण आम्ही सून/ जावई करून घेऊ असे आश्वासन देतात. नकुशी मुलगी झाली तर तिला आयुष्यभर परक्या सारखं वागवलं जातं. माणूस म्हंटल की  डोकं, दोन हात पाय.. याप्रमाणे सर्व माणूस जात सारखी वाटत असली तरी प्रत्येकजण वैयक्तिक वेगळा दिसत असतो. कुणी परिपूर्ण पानाप्रमाणे सोन्याचा चमचा आणि रूप घेऊन जन्माला येतं. तर कोणी अर्धवट छापलेल्या पानाप्रमाणे अपंग जन्माला येतो. कुणाच्या अंगावर जन्मखूण असते तर कुणाच्या अंगावर कसलेतरी डाग असतात. जशी काही पानं कोरीच सुटलेली असतात तसेच काही लोकं कोरे मन , कोरी बुद्धी (मतिमंद,गतिमंद) घेऊन येतात. निर्मितीकाराच्या प्रिंटर मधून कदाचित ती अलगद बाजूला पडतात. काही लोक जन्मापासून फार सुखात असतात पण ऐन तारुण्यात कोणत्या तरी कारणाने मृत्यूला बळी  पडतात. जसे काही रेषा मधूनच अचानक गायब होतात. काही लोकांचे बालपण सुखाचे सरळ असते पण मध्य खूप डगमगलेला असतो पण शेवटी ते नीट काठावर पोहचतात. काही ओळी गडद असतात तसेच काही लोकांना एखादं अंग जास्त मोठं असतं. कधी डोकं मोठं असतं , तर कधी कुणाला बोटे जास्त असतात, कुणाला पोक निघालेला असतो. काही पानांना मार्जिन नसते, तसेच काही जणांना कुटुंब, नाती नसतात. काही जणांना जन्मदात्यानेच दूर भिरकावलेलं असतं. आपली माणसं असूनही त्यांना परक्यांमध्ये राहावं लागतं. अनाथ असतात ही  आणि नसतात ही . काही लोकांच्या आयुष्यावर आत्मचरित्रे, धडे,भाषणं लिहिले जातात. तिथेच काही जणांच्या आयुष्यावर गुन्हे दाखल होतात. कुणाच्या वाट्याला फक्त प्रेम आलेलं असतं. कुणाच्या वाट्याला घृणा , तिरस्कार, अवहेलना आलेली असते. काही जण लोकांच्या मनात अजरामर बनून राहतात. काही ऑफिस च्या भिंतीवर फोटो स्वरूप जिवंत राहतात. काही पुस्तकाच्या रूपाने, कोणी कलेच्या रूपाने आठवणीत राहतात. आणि काही मात्र मृत्यूनंतर बेवारस पडून राहतात.काही ओळी ह्या प्रिंटर च्या चुकीमुळे स्वतःच्या हद्दीतून अचानक दुसऱ्या ओळीच्या हद्दीत जाऊन मिसळतात आणि त्यांचं स्वतःच अस्तित्व संपतं. तसेच काही लोक इतर कुणाच्या चुकीमुळे अश्या ठिकाणी जाऊन पडतात कि ते स्वतःच सोडून इतरांचं आयुष्य जगात राहतात.    
       थोडक्यात वहीचे पानं  आणि आयुष्याचे पानं यात खूप साम्य आहे. वहीच्या कोणत्या पानावर किती ओळी छापायच्या, कुठे डाग लावायचा, किती खाणाखुणा करायच्या हे जस प्रिंटर च्या हातात नसून त्या त्या वेळेवर अवलंबून आहे तसेच माणसाच्या आयुष्याचेही त्या त्या वेळेवर, परिस्थितीवर अवलंबून आहे. आपल्या वाट्याला काय येईल हे कुणालाच माहित नसते. त्या एका क्षणाला आपल्या झोळीत काहीतरी पूर्ण असेल कि अपूर्ण ? क्षणिक असेल कि निरंतर ? हे माहित नसतं . पण ज्या क्षणाला आपल्या वाट्याला जे येईल ते आपलं आणि गोड़ मानून  चालायचं. अपूर्ण असेल तर त्या अपुर्णत्वाचा आनंद घ्यायला शिकायचं. डाग असतील तर ते वेगळं सौंदर्य मानून स्वीकारायला शिकायचं. क्षणिक असेल तर त्यात निरंतर राहायला शिकायचं. शेवटी निसर्गाचा नियम आहे कि कोणीच परिपूर्ण नसतं. चंद्र सुंदर आहे पण त्यावर डाग आहे. सूर्य प्रखर आहे. हवा अदृश्य आहे, अग्नी अस्पर्शित आहे. पाणी निरंग आहे. दरी कधी उंच असू शकत नाही. डोंगर कधी खोल असू शकत नाही. अपूर्णतेमध्येच एक पूर्णत्व लपलेलं असतं ! स्वतःला जसे आहात तसे, गुणदोषासंकट, चांगल्या वाईट परिस्थिती सोबत   स्वीकारा. प्रामाणिकपणे काम करा आणि आयुष्याच्या पानाचा आनंद घ्या. 
           - साधना वालचंद कसपटे © ☘