Dukhi - 11 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | दुःखी.. - 11

Featured Books
Categories
Share

दुःखी.. - 11

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

११. अंमलदाराचा शेवट

वालजी लिलीला भेटायला गेला. तो अंमलदार गाडीत होता. आकाशात आता चंद्र उगवला होता. अंधारात आकाशातील प्रकाश आला. तो अंमलदार विचारू करू लागला, 'या वालजीला का मी पुन्हा पकडू? पुन्हा त्याला जन्मठेप मिळेल. कितीदा पळून गेलेला; किती आरोप; परंतु हा का चोर? हा दरोडेखोर? हा महात्मा आहे. या महात्म्याला का पुन्हा नरकात लोटू? काय आमचे हे पोलिसांचं जीवन! नेहमी दुसर्‍यांच्या पाठीमागं असायचं. जीवनातील ध्येय काय, तर कैदी पकडला, गुन्हेगार पकडला! आमची हृदयं शुष्क होतात, भावना मरतात. माणुसकी नष्ट होते. आम्ही पशू बनतो. गरिबांसाठी झगडणारे, त्यांच्यावर आम्ही पाळत ठेवतो. त्यांना क्रांतिकारक म्हणून पकडायचं, फाशी चढवायचं! आणि हे दुसरे गुन्हेगार यांचाही छळ आम्ही चालवायचा! परंतु ते क्रांतिकारकही गुन्हेगार नाहीत, हे चोर दरोडेखोरही गुन्हेगार नाहीत. ही समाजरचना गुन्हेगार आहे. एक श्रीमंतीत लोळतो. दुसरा अन्नाला मोताद होतो. का हे असं व्हावं? चोर, कोण चोर? चोरी करणारा चोर की आजूबाजूस उपासमार असूनही कोठारं भरून ठेवतो तो चोर? समाज ज्यांना चोर म्हणून शिक्षा ठोठावतो, ते चोर किती कर्तृत्वशाली, किती उदार, किती मोठया मनाचे! परंतु त्यांच्या अंगातील हे गुण मातीमोल होतात!'

'आजपर्यंत मी किती पाप केलं! कितीकांना पकडलं; तुरंगात लोटलं. गुन्ह्यांचा शोध लावण्यात मी पुरुषार्थ मानी. माणसांतील दिव्यता पाहाण्याचा शोध मी कधी लावला नाही; परंतु वालजीनं ती दिव्यता दाखवली. त्यानं माझ्यावर सूड घेतला नाही. मला जा म्हणाला आणि त्याला का मी पुन्हा अडकवू? छे! फुकट माझं जीवन. हे जीवन समुद्रात फेकू दे. जगेन तर ही लागलेली सवय का जाईल? आणि आज हाती सापडलेला वालजी मी सोडला असं कळलं तर? बेअब्रू व्हायची. ती प्रतिष्ठाही जायची. नको, जगणं नकोच. मेल्याशिवाय या जन्मातील पाप विसरता येणं शक्य नाही. मला मरू दे. समुद्राच्या अनंत लाटा माझं जीवन स्वच्छ करतील. जा, वालजी जा. मला क्षमा कर. आजपर्यंत ज्यांना ज्यांना मी छळलं - त्या सर्व आत्म्यांनो, मला क्षमा करा.'

त्या अंमलदाराने हात जोडले. तो गाडीतून उतरला. त्याने त्या गाडीवानाला 'जा' सांगितले. गाडी गेली आणि तो अंमलदारही गेला.

कोठे गेला? तो समुद्रकाठी गेला. समुद्र उचंबळला होता. चंद्र मिरवत होता. त्या अंमलदाराचाही हृदयसिंधू उचंबळला होता, डोळयांतून धारा लागल्या होत्या. तो समुद्रात शिरला. पुढे पुढे चालला. सुटले पाय. लाटांनी त्याला नाचवले, उचलले, बुडवले, हृदयाशी धरले.

दुसर्‍या दिवशी ते प्रेत तीराला लागले. पोलिस आले तो तो अंमलदार! पंचनामा झाला. आत्महत्या - असा निकाल देण्यात आला. ती आत्म्याची हत्या होती का तो आत्म्याचा उध्दार होता? आंधळया दुनियेला काय कळणार, काय दिसणार?

'पोलिस अंमलदाराची आत्महत्या.' अशा शीर्षकाखाली दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून ती बातमी आली. वर्तमानपत्र विकणारे ओरडत होते. वालजीने ऐकले. त्याने वर्तमानपत्र विकत घेतले; ते घेऊन तो खोलीत आला. त्याने तो मजकूर वाचला. त्याने ते पत्र खाली ठेवले. तो गंभीरपणे बसला

'आजोबा, असे का बसलेत?' लिलीने विचारले.

'संपलं सारं.' तो म्हणाला.

'काय संपलं? आता तर सुरू होईल सारं!'

'तुझं सुरू होईल. तुझा संसार सुरू होईल. परंतु आमचा संपला. तो गेला. आता मीही बहुधा लवकरच जाणार. माझंही जीवितकार्य जवळजवळ संपल्यासारखंच आहे. उगी, रडू नको लिल्ये. अगं; जन्मला तो जायचाच एक दिवस! वेडी कुठली, उगी.'