२२. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ४
* राजस्थान प्रेक्षणीय स्थळे-
३. जैसलमेर- "द गोल्डन सिटी"
पाकिस्तान बॉर्डर च्या जवळ स्थित जैसलमेर ही जागा पर्यटकांची आवडती जागा आहे. जैसलमेर अगदी थर वाळवंटाच्या मध्यभागी नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी प्रेदेशांत आहे. पर्यटकांना वाळवंटासारखं निसर्गाचं अनोखं रूप पाहण्यातही एक वेगळ आकर्षण असत. वाळूच्या टेकड्यांसह तिथं असलेली कलाकुसरतेची कमाल पाहायलाच हवी अशी आहे. दगडावर केलेली भन्नाट कलाकृती पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. मोठ्मोठ्ठे राजवाडे आणि वाळवंटातील जहाज म्हणून ज्याची ख्याती असलेल्या उंट पर्यकांना भुरळ पाडतात. भारताच्या वायव्येकडील आणि पश्चिमेकडील वाळवंट निसर्गाच्या प्रतिकूलतेतही पर्यटकांना खुणावतांना दिसतो. भारताच्या एकूण क्षेत्रापैकी फारच थोडा भाग कच्छचे रण आहे. राजस्थान प्रामुख्याने पूर्वकडील मेवाड आणि पश्चिमेकडील मारवाडने भरलेलं आहे. मारवाडच्या जसजसं पश्चिमेकडे जावं तसतशी वाळू अधिकाधिक सैल होत जाते आणि उष्णवाऱ्यांनी वाळू सर्वत्र उडून त्याच्या टेकड्या बनतात. त्याला सँड ड्युन्स (Sand dunes) असं म्हणतात. आणि ह्याच मुळे जैसलमेर ला "गोल्डन सिटी" म्हणून ओळखले जाते. या ठिकाणांहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं पर्यटकाला वेगळचं नेत्रसुख देतं. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली मऊ लुसलुशीत वाळू, तिचा सोनेरी रंग आणि हलक्याशा वार्यानेही त्यावर उमटणारी नाजूक लाटांची नक्षी हा सौंदर्याचा इथे अनुभवता येतो. अतिशय सुरेख अशी ही जागा आहे. जैसलमेर मध्ये काय पाहाल-
* डेझर्ट सफारी- जैसलमेर मधले प्रमुख आकर्षण हे डेझर्ट सफारी आहे. जैसलमेर ला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी ९५% पर्यटक ही सफारी घेण्यासाठी उत्सुक असतात. वाळवंटात हिरवाई अजिबात नसल्यामुळे उन्हाचा तडाखा जरा जास्तीच जाणवतो. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी ह्या टूर्सला सकाळी किंवा संध्याकाळी जाण्यात येते. ह्या टूर मध्ये चवदार जेवण अनुभवता येते आणि त्याच बरोबर, जिप्सी म्युझिकल डान्सची मजा घेता येते. ही सफारी उंट किंवा जीप ने करता येऊ शकते. उंटाच्या सफारीसाठी ९० मिनिटे लागतात. तसाच जीप सफारीसाठी ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. जैसलमेर ला जाऊन डेझर्ट सफारी मिस केली तर खूप काही गोष्टी मिस झाल्याची भावना मनात नेहमीच राहील. त्यामुळे जैसलमेर ला डेझर्ट सफारी करणे जणू मस्ट आहे. आणि ही सफारी केल्यावर खूप सारे नवीन अनुभव तुमच्या गाठीशी राहतील आणि ते कधी न विसरता येण्या सारखे असतात हे अगदी नक्की!!
* जैसलमेर चा किल्ला - २०१३ मध्ये जैसलमेर जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले. राजस्थानमधील जैसलमेर हे शहर प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. जैसलमेरचा शब्द अर्थ म्हणजे राजा जैसलने बांधलेला टेकडीवरचा किल्ला. हा किल्ला जगातला सगळ्यात मोठा किल्ला आहे. जो सोनार किल्ला किंवा स्वर्ण किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. जैसलमेर किल्ला पिवळ्या वालुकाश्मातून बांधला गेला आहे. सूर्यप्रकाशात तो सोनेरी रंगात चमकतो आणि सोन्याचाच बनलाय असा भास करून जातो. राणा जैसल याने बांधलेला हा पिवळ्या दगडातील किल्ला गेली हजार वर्षे जैसलमेर मध्ये मानाने उभा आहे. या किल्ल्यात प्रवेश मोफत आहे. किल्ल्यात अतिशय सुरेख बांधकाम असणारा राजवाडा आहे. खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या देशातला हा एकमेव किल्ला आहे ज्यात अजूनही त्या गावातील निम्म्याहून अधिक जनता किल्ल्यामध्ये वस्ती करून राहते. किल्ल्यामध्ये चारपाच जैन मंदिरे आहेत. सूर्यास्ताच्या वेळी इथले दृश विलोभनीय असते. किल्ल्यांतील भक्कम तटबंदी, बुरुजं, तोफा आणि बंदुकांसाठी बुरुजांना आणि भिंतींना असलेले भरपूर झरोके त्याकाळच्या संरक्षक व्यवस्थेचे साक्षीदार आहेत. या किल्ल्यासाठी सिमेंटचा वापर केलेला नसूनही पाच शतक झाली तरी ते भक्कम आहेत. आणि हेच ह्या किल्ल्याच वैशिष्ट आहे. जैसलमेर किल्ल्यावर आधारित एक डिटेक्टीव नॉव्हेल सत्यजित रे ह्यांनी लिहिले होते आणि नंतर त्यावर सोनार किल्ला ह्या नावाचा चित्रपट सुद्धा काढला होता. ह्या किल्याचा आकार त्रिकोणी आहे आणि त्रिकुट टेकडीवर आहे त्यामुळे ह्या किल्ल्याच जुन नाव त्रिकुट गड असे होते. नंतर ह्या किल्ल्याचे नाव सोनार किल्ला असे झाले आहे.
*जैन मंदिर- जैसलमेर किल्ल्यात जैन मंदिरे सुद्धा आहेत. ही जागा जैसलमेर मधील टॉप ४थी जागा आहे. इथे भारतीयांना निशुल्क प्रवेश आहे पण फोरेनरना १० रुपये द्यावे लागतात. कॅमेरा असेल तर त्याचे वेगळे पैसे भरावे लागतात. ही मंदिरे इतकी सुंदर आहेत की ह्या मंदिरांना भेट देण हे मस्ट आहे अस म्हणंत येईल. ह्या मंदिरात अतिशय सुरेख कोरीव काम पाहायला मिळते. ही मंदिरे अतिशय जुनी आहेत आणि त्यांना धार्मिक महत्व आहे. दिलवरा स्टाईल मध्ये बांधलेली ही मंदिरे पूर्ण जगभरात आर्किटेक्चर साठी प्रसिद्ध आहेत. इथे ७ मंदिर एकमेकांना जोडलेली आहेत आणि ही मंदिरे गोल्डन यलो जैसलमेरी दगडांचा वापर करून बांधली गेली आहेत. ज्यांना इतिहासाची आवड आहे आणि ह्या मंदिरांचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी ज्ञान भांडार आहे. हे ज्ञान भांडार म्हणजे छोटीशी आकर्षक लायब्ररी आहे आणि जी अंडरग्राउंड आहे. भार्पुत वेळ काढून ह्या जैन मंदिरांना नक्की भेट दिली पाहिजे
* गडीसर तलाव - राजा रावल जैसल याने बांधलेला हा तलाव जैसलमेरचा पाण्याचा एकमात्र स्त्रोत होता. तलावाकाठी असणारे मंदिर आणि कमान अतिशय सुंदर आहे. असे सांगितले जाते की एका नर्तकीने ही कमान बांधून घेतली. राजाने ही कमान तोडू नये म्हणून तिने या कमानीच्या वरच्या मजल्यात एक श्रीकृष्णाचे मंदिर बनवले. राजाला, नर्तकीने बनवलेल्या कमानीतून जाणे अपमानास्पद वाटल्याने त्याने बाजूने एक वेगळाच जिना बनवून घेतला. सूर्योदयाच्या वेळी इथून दिसणार दृश अतिशय सुंदर असत. ह्या तलावाच्या चारी बाजूला निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात. इथे बोटी मधून पाण्यात चक्कर मारता येते. तुम्ही लकी असाल तर इथे जवळच असलेल्या भरतपूर अभयारण्यातून येणारे मायग्रेटरी बर्डस सुद्धा दर्शन देऊ शकतात. इथे येऊन स्वतःसाठी आणि कुटुंबासोबत मस्त वेळ घालवता येऊ शकतो.
* कुलधारा गाव- जैसलमेर पासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव पर्यटकांना फार माहिती नसलेले गाव आहे. पण ह्या गावाबद्दल काही गोष्टी खूप रंजक आहेत. ह्या रहस्यमय गावाला शापित गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची निर्मिती जवळजवळ 13 व्या शतकातली पालीवाल ब्राह्मणांनी केली. हे १९व्या शतकामध्ये पाणी कमी झाल्याने संपूर्ण गाव नष्ट झाले असा एक समाज आहे पण काही किवदंती सांगितल्यानुसार या गावाच्या विनाशाच कारण सलमेरचे राज्याचा मंत्री सलीम सिंह होते. ते गावातल्या लोकांबरोबर खूप सक्तीने वागत असे. या कारणामुळे गावातल्या लोक वैतागली आणि रातोरात गाव सोडून निघून गेले आणि जातांना शाप देऊन गेले म्हणून हे गाव शापित गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या गावाला देशातले तसेच विदेशी पर्यटक सुद्धा भेट देत असतात त्यामुळे ह्या जागेला राजस्थान सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.
* ताजिया टॉवर आणि बादल पॅलेस- बादल पॅलेस मध्ये स्थित ५ मजल्याचा ताजिया टॉवर ला जैसलमेर मध्ये वेगळच महत्व आहे. ताजिया टॉवर अतिशय सुंदर आहे. हा टॉवर राजपुताना स्टाईल पेक्षा वेगळ आहे. हे स्मारक मुस्लीम कारागिरांनी बनवले होते आणि राजा महारावल बेरीसाल सिंह यांना भेट म्हणून दिले होते. बदल पॅलेस अद्भुत कलाकृतीचा नमुना आहे.
अस जैसलमेर हे राजस्थान मधील ठिकाण पर्यटनासाठी अतिशय उत्तम जागा आहे. ह्या जागेला भेट देऊन तुम्ही खूप काही बरोबर घेऊन जाऊ शकता. इथे वाळवंटापासून ते शाही महाल आणि सुंदर कलाकुसर असलेली जैन मंदिरे देखील पाहायला मिळतात. त्यामुळे राजस्थान मधील जैसलमेर ही जागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते.