मृण्मयीला आज खूप कंटाळा आला होता. डिसेंबरची सुखद गारेगार दुपार होती. मैत्रिणीकडे काल रात्री राहून आज दुपारचं जेवण तिकडेच उरकून ती घरी परतली आणि अर्ध्या तासातच कंटाळली.
आई बाबा दोन दिवस बाहेरगावी गेले होते आणि त्यामुळेच मृण्मयीला कंटाळा आला होता. सगळेच मित्र मैत्रिणी कुठेनाकुठे जाणार होते त्यामुळे आपण एकटीनेच काय करायचं अख्खी संध्याकाळभर असा गहन प्रश्न तिला पडला होता.रात्री उशिराने सुकन्या येणार होती सोबतीला तिच्या पण तोपर्यंत काय?
मूव्हीला जाउया??? पण एकटीने!!! नकोच.
मग तुळशीबागेत फेरफटका??? मागच्या रविवारी तर जाऊन आलो आपण...
घरात बसून टीव्ही पाहूया??? छे.अत्यंत कंटाळवाणा उद्योग...
तिने विचार केला चला आज मस्तपैकी एकटीनेच माॅल फिरायला जाऊया.येताना तिथूनच पार्सल आणू. सुकन्या येईल म्हणून छानपैकी आईस्कीम आणि पेस्टीही आणूयात.
ती तयार होऊन निघाली. गारगार वार्यात गाडी चालवताना तिला टवटवीत वाटायला लागलं.एकटेपणा कुठच्याकुठे पळून गेला.
दुपार संपून संध्याकाळ सुरु होत होती.. लोकांचे जथ्थे आज माॅलकडे वळत होते. तिला एकदम लक्षात आलं की परवा तर नाताळ आहे. माॅलमधेही नाताळच्या स्वागताची तयारी केलेली दिसत होती.
गाडी पार्किंगला लाऊन ती वर यायला जिना चढली त्याचवेळी तिला सिग्नलला फुगे आणि नाताळच्या टोप्या विकणार्या जोडप्याच्या दोन मुली दिसल्या. तिच्या नजरेत त्या आल्या तरी तिने दखल घेतलीच असं नाही. ती झरझर वरती आली.
सुरेल सुरावटीच्या धुनेने माॅलचं वातावरण चैतन्यमय झालं होतं.काचेआडच्या निर्जीव वस्तूही सजीव होऊन डोलत होत्या. मोठ्या दोन रेनडिअरच्या कटआऊटसमोर उभं राहून खराखुरा सांटा घंटा वाजवत होता.मुलांना चाॅकलेट देत होता.भलीमोठी ख्रिसमस ट्री रंगीबेरंगी सजावटीने आणि दिव्याच्या माळांनी लखलखत होती.
लहान मुलं जंपिंग जॅकवर उड्या मारत होती. कुणी
संटाकडून गप्पा मारत भेटवस्तू घेत होती.कुणाला त्याचे आईबाबा आवडती वस्तू विकत घेउन देत होते तर कुणी छान आवडता खाऊ खात होते.
मृण्मयी बालपणात शिरली.तिच्या बाबांना दोन वर्ष कंपनीने बेल्जिअमला पाठवलं होतं.त्यातलं एक वर्ष बाबांनी तिला आणि आईला नाताळ पहायला बोलावून घेतलं होतं... ते दिवस आठवून मृण्मयी सुखावली.
तिनेही मनोमन खरेदी केली.एक छानसा टाॅप तिने ट्रायलरूम मधे जाऊन घालून पाहिला.छान दिसतो आहे म्हटल्यावर खरेदीही केला. त्याला साजेसे कानातलेही घेतले विकत हो नाही करत.
मनमुराद हिंडल्यावर आणि गर्दीची आणि नाताळची झगझगाटी दुनिया पाहिल्यावर आता ती दमली.छानपैकी काॅफी पिऊया आणि एक चीज सँडवीच... या पदार्थांवर आपण आयुष्यभर जिवंत राहू..... आपल्या आवडीची तिलाच गंमत वाटली.
काऊंटरला आॅर्डर देऊन वाफाळती काॅफी आणि सँडवीच घेऊन ती बसली.काचेच्या तावदानातून एकीकडे गजबजलेला रस्ता आणि दुसरीकडे माॅलचा सरकता जिना आणि गर्दी ती पाहत होती.
तेवढ्यात तिच्या बाजूच्या काचेला नाक लावून त्या मगाशी पाहिलेल्या दोन मुली तिला दिसल्या!!!
त्यांच्या नजरेत उत्सुकता आणि पोटात भूक तिला दिसली... नव्हे जाणवली...
आपल्या समृद्ध जगाच्या पलीकडचं हे वास्तव पाहून ती कासावीस झाली... काय करावं,काय पाहतो आहोत या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत राहिली. पर्समधे दोन हजार रूपये आणि कार्डही होतं.
ती काॅफी आणि सँडवीच तसंच ठेऊन बाहेर गेली.तिने मुलींना आत आणलं.जगाची प्रलोभने आणि फसवी दुनिया त्या मुलींना अजून माहिती नसावी. त्या नाचतच मृण्मयीमागे आल्या.आई वडिलांनाही कल्पना नव्हती की आपल्या मुली कुठे आहेत???
त्या नव्या दुनियेत शिरताना दोघी भांबावल्या पण मृण्मयीने हसूनच त्यांना दिलासा दिला.
दुकानातही नाताळची प्रतीकं सजली होती.मुलींनी ती हात लावून पाहिली... मृण्मयीने दोन पेस्टी आणि दोन सँडवीचेस विकत घेतली.दोघींनाही खुर्च्यांवर उचलून बसवलं. आजूबाजूचे लोक कुतुहलाने या सगळ्या घटनेकडे पाहत होते.पण मृण्मयी आणि त्या अनोळखी मुलींचं भावविश्व तयार झालं.. तिघींनी शब्दांशिवाय एकमेकींना खूप काही सांगितलं. मुलींना पेस्टी आणि सँडवीचेस तिने उघडून दिली आणि आपण कसे खातो तसं खा असं खुणेनेच शिकवलं...
तुडुंब भरलेल्या पोटाने आणि मनाने मुली खुर्चीवरून ऊतरल्या आणि व्यावहारिक जगात वावरण्याचे संकेत माहिती नसल्याने कळकट फ्राॅकना हात पुसून बाहेर धावल्याही...
मृण्मयीला त्या दिसेनाशा होईपर्यंत ती पाहतच राहिली. कोण कुठल्या... नाव गाव माहिती नाही...
पण यावर्षीचा नाताळ त्या मुलींच्याही नकळत छान होता.सांताच्या टोप्या विकणारे आई वडील... पण आज मृण्मयीच्या रूपाने सांता त्यांना भेटला होता...
अतीव समाधानाने मृण्मयीने गाडी सुरु केली.भर थंडीतही स्वेटर न घालता बोचरी थंडी झेलत मनातून नाचतच मृण्मयी घरी आली.. कोणता ऋणानुबंध होता हा की जो तिला आणि त्या मुलींना बांधून गेला!!!? त्यांचं माहिती नाही पण मृण्मयीच्या मनात तरंग उमटवून गेला...