रेवती तशीच विचार करत करत बेड वर पडून होती. संध्याकाळ झाली होती.तिने सकाळ पासून काहीही खाल्लेले नव्हते. जुई केव्हाची तिला उठून काही तरी खाऊन घे म्हणून सांगत होती.चल जरा चक्कर मारुन येऊ म्हणजे तुला बरे वाटेल म्हणाली. पण रेवतीला कसालाच उत्साह नव्हता. ती पडल्या पडल्या फक्त एकटक मोबाईल कडे बघत होती.
जुईने तिला थोडे हलवल्यावर ती कशीबशी बेडवर उठून बसली. दोन्ही हात लांबवून एक मोठा आळस दिला..घड्याळावर एक नजर टाकली..
तिने चेहऱ्यावर पाण्याचे ३-४ सपकारे मारले..
तेवढ्यात तिचा फोन वाजला..सुहास शुद्धीवर आला होता..
रेवतीला फार बरे वाटले..
त्याचे आई-बाबा पण आले आहेत हे ऐकून रेवतीची काळजी बऱ्यापैकी कमी झाली.
तिला सुहासला भेटण्याची खूप इच्छा होती. पण हॉस्पिटल मधे तिला जाता येत नव्हते. म्हणून तिने प्रतीकला सांगितले की तू उद्या गेलास तर सुहासला फोन लावून दे म्हणजे मला बोलता येईल त्याच्याशी.
सुहासची नजर शुद्ध आल्या पासून रेवतीलाच शोधत होती. प्रतीक कडे त्याने प्रश्नार्थक नजरेने पहिले तेव्हा प्रतीकने डोळ्यांनेच रेवती येऊन भेटून गेल्याचे खुणावले. मग तो थोडा शांत झाला. पण तरीही त्याला रेवतीला पाहण्याची प्रबळ इच्छा झाली होती.. पण त्याने आपल्या इच्छेला तुर्तास तरी मनातच दाबले..
थोड्या वेळात विचार करत करत औषधाने परत त्याचा डोळा लागला.
दिवस आपल्या वेगाने सरत होते..
सुहासच्या अपघाताला आता एक महिना होत आला होता..सुहास कुबड्यांच्या साहाय्याने हिंडू-फिरू लागला होता.
त्याचे आई-बाबा त्याला घरी.. त्यांच्या मूळगावी नगरला घेऊन आले होते. इकडे नगरला आई-बाबा त्याची चांगली काळजी घेऊ शकत होते..
तिकडे पुण्यात त्याची काळजी कोण घेणार.. पुणे या शहराशी त्यांचा दुरान्वये संबंध नव्हता.. पुणे हे त्यांच्या कौटुंबिक नकाशावर अवतरले ते सुहासच्या तेथील वास्तव्यामुळे..
सुहास पुण्याहुन नगरला निघण्यापूर्वी रेवतीला त्याला भेटताही आले नव्हते. ते दोघे केवळ फोनवरच संपर्कात होते. सुहास दिवसभर फोनवर लागलेला असायचा. त्याच्या आईच्या अनुभवी दृष्टीतून हे सुटलेले नव्हते. तिने एकदा सुहासचे बाबा घरात नसताना त्याच्या आईने हळूच त्याच्या जवळ विषय काढला होता. तेव्हा त्याच्या जवळ सुहासने उडवा-उडवीचे उत्तर देऊन विषय टाळला होता.
बऱ्याच काळानंतर सुहासची प्रकृती मूळपदावर येत होती..
सुहास पूर्ण बरा होऊन पुण्याला परत आला. त्याने पहिली रूमवर बॅग ठेवली नि तडक रिक्षा करून रेवतीला भेटायला गेला.
काहीही न कळवता सुहास अचानक रेवतीच्या समोर आला होता.. रेवतीला विश्वासच बसत नव्हता स्वतःच्या डोळ्यांवर.. भास की सत्य याचा उलगडा व्हायला तिला बराच वेळ गेला..
त्याला समोर पाहून रेवतीचा आनंद गगनात मावत नव्हता. काय करू आणि काय नको असे तिला झाले होते..
दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या..बाहेरच जेवण केले. सारसबगेच्या गणपतीला जाऊन आले.. रेवतीने मनोमन गणपती बाप्पाचे आभार मानले..
रेवतीला त्याला भेटल्या पासून आपल्यातही पुन्हा नव्याने प्राण संचारले आहेत असे वाटू लागले.
जगण्यातला पूर्वीचाच उत्साह परत आला होता.
सुहास ऑफीसला जाऊ लागला. सगळे सुरळीत सुरू झाले. सगळे छान चालू होते. अगदी अपघातापूर्वी सुरू होते तसेच.. किंबहुना अपघाताने त्यांचे प्रेम अजून दृढ झाले होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..
नेहमीप्रमाणे काम, फिरणे, सिनेमा, गप्पा गोष्टी आणि भविष्यातील सुखावणारी स्वप्ने..
दोघेही आपल्याच धुंदीत बेधुंद.. जगाचा संपूर्ण विसर पडलेले..
काळ आपल्या गतीने पुढे चालत होता..
पण काळाच्या पोटात काय दडले आहे हे किणी सांगू शकले आहे का आजवर!
रेवतीला काही तरी बदल जाणवत होता हल्ली सुहास मधे. काय तो तिला नीटसा कळत नव्हता. पण काही तरी होते जे त्याला आपल्याला सांगायचे आहे किंवा तो काही तरी लपावतो आहे असे तिला वाटत होते. हल्ली रेवतीने भेटायला बोलावल्यावर ही तो करणे देऊ लागला होता हे देखील रेवतीच्या लक्षात आले होते. काय बरे असेल. तिला काही समजत नव्हते. पण पाणी कुठे तरी मुरत होते..
नक्की कुठे? ते शोधून काढायची गरज होती..