नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा मंडळी. क्रिसमसच्या सुट्या आणि नविन वर्षाचं स्वागत जोरदार झालं ना? तुमच्या सर्वांच्या ढीगभर प्रतिक्रिया आणि ई-मेल्स वाचुन मज्जा वाटते. काही ई-मेल्समध्ये विचारणा झाली होती की राधा नक्की कशी दिसते, किंवा माझ्या लेखी, सिने-तारकांपैकी राधासारखं दिसणारं असं कोण? खुप मजेदार ई-मेल्स होत्या. बर्याचजणांनी विचारलं म्हणुन मी माझा ह्या बाबतीतला शोध आरंभला आणि राधाला साजेशी एक तारका सापडली खरी. ‘सपना पब्बी’, इथे क्लिक करुन बघा तिचा फोटो.. अर्थात हे माझं व्हर्जन आहे, तुम्हाला काय वाटतं? राधा कोणासारखी दिसते?
असो.. तर चला कथेकडे वळु…
भाग ८ पासुन पुढे>>
“कसा आहेस?”, मोनिकाने वेटरला ऑर्डर देऊन कबिरला विचारलं.
“मी मस्त.. तु?”, कबिर
“मी पण एकदम मस्त…”
“तु अजुन वेट कमी केलंस का? झिरो फिगर वगैरे करायचीय का काय? हडकुळी वाटायला लागलीयेस…”
“हो म्हणजे अरे पण ठरवुन वगैरे नव्हते केले.. मी साऊथ-अफ्रिकेला होते दीड महीना..”
“वॉव्व.. कधी?”
“लास्ट मंथ.. रिअॅलीटी-शो चे स्टील्स करायचे होते.. सो असाईन्मेन्ट्स साठी गेले होते. तुला माहीते एक तर मी नॉन-व्हेज तितकेसे खात नाही.. त्यामुळे खाण्याचे जरा हालच झाले तेथे…”
“सहीच की.. बोलली नाहीस काही..”
“हम्म.. विचार आला होता मनात तुला करावा फोन.. पण मग गडबडीत राहुन गेले… ए पण.. तु पण म्हणे मेहतांच बुक करतोएस..?”
“कुणी सांगीतलं? रोहन का?”
“हो.. पण ग्रेट रे.. मेहता म्हणजे एकदम भारी पब्लिकेशन.. जाम पैसे कमावले असशील नै…”
“हो.. वेल नोन आहे.. आणि माझं गोवा पण त्यांनीच स्पॉन्सर केले..”
“कुsssssल.. सो धिस डिनर इज फ़ॉर सेलेब्रेशन ऑफ़ युअर सस्केस..”
पुढचा दीड तास दोघांनी भरपुर गप्पा मारल्या.. लाईक ओल्ड टाईम्स. जणु काही मध्ये घडलेच नव्हते. सुरुवातीला असलेला थोडा नर्व्हसनेस नंतर निघुन गेला. जुने मित्र भेटल्यासारखे दोघं एकमेकांच्या सानिध्यात रमुन गेले.
“सो.. इट्स ओके इफ़ आय व्हॉट्स-अॅप यु?”, मोनिकाने बाहेर पडल्यावर विचारले
“मी बंद केले व्हॉट्स-अॅप वापरणे..”, कबिर म्हणाला…
“का? कधीपासुन?”, आश्चर्याने मोनिकाने विचारले..
“बस्स.. असंच..”, कबिर
“का? सारखी मी ऑनलाईन दिसल्यावर माझी आठवण यायची का?”, डोळे मिचकावत मोनिकाने विचारले..
“कशी आलीयेस..”, विषय टाळत कबिर म्हणाला..
“होन्डा-सिटी घेतली नविन…”, हातातली किल्ली नाचवत मोनिका म्हणाली..
“गुड-गुड.. सो.. तु खरंच तुझी विश-लिस्ट पाळतीयेस की काय? आधी साऊथ-अफ्रिका.. मग होन्डा सिटी.. आय लाईक्ड इट..”, कबिर
“हम्म.. आणि म्हणुनच मी आज तुला भेटायला आलेय..”, मोनिका थोडी सिरीयस होत म्हणाली..
“म्हणजे?”, कबिर
“कबिर.. आय रिअल्ली मिस्ड यु..”, कबिरचा हात हातात घेत मोनिका म्हणाली… “हे बघ आपल्या दोघांकडुनही काही चुका झाल्या…”
“दोघांकडुन?”, तिचं बोलणं मध्येच तोडत कबिर म्हणाला..
“ओके.. माझ्याकडुन.. आय एम सॉरी.. खरंच सॉरी.. मी चुकीची वागले.. हे बघ, तो काळ वेगळा होता.. मी खरंच माझ्या करिअरच्या नशेत वाहवत गेले.. पण नंतर मला खुप गिल्टी फिल झालं.. आत्ता अफ्रिकेत, सगळ्यांपासुन दुर असताना खुप एकटं वाटलं कबिर.. आजुबाजुला वावरणारी सगळी माणसं जणु खोटे-नाटकी मुखवटे चढवलेले पुतळे होते…”
“एनिवेज.. आता ते बोलुन काय उपयोग आहे का?”
“आहे.. हे बघ, माझ्याकडुन चुक झाली.. मला एक संधी तरी दे कबिर..”
कबिर थोडा अस्वस्थ झाला..
“हे बघ.. मी लगेच सांग असं नाही म्हणत.. पण निदान विचार तरी करावास असं मला वाटतं. लेट्स थिंक ऑफ़ अ पॅच-अप हम्म?”, भुवया उंचावुन मोनिकाने विचारलं..
लाईक-ओल्ड टाईम्स, कबिरला मोनिकाचा हा निरागसपणा खुप आवडायचा, विशेषतः तिचे डोळे, न बोलताही खूप काही बोलुन जायचे. कबिर जसा अंमळ उंच होता, तितकीच मोनिका छोट्या चणीची होती. कबिरकडे अशी मान वर करुन बोलताना कबिरला ती अधीकच क्युट वाटायची.
क्षणभर कबिरला सगळं विसरुन मोनिकाला मिठीत घ्यायचा मोह झाला. पण त्याने मोठ्या मुश्कीलीने मनावर ताबा मिळवला.
“आय वोन्ट प्रॉमीस.. पण मी विचार करेन.. निघुयात?”
मोनिकाने काही क्षण कबिरकडे एकटक पाहीले आणि मग म्हणाली.. “ओके.. पण निदान आपण आत्ता एकमेकांचे चांगले मित्र आहोत.. ना?”
“येस्स.. नक्कीच..”, हसुन कबिर म्हणाला
“ए.. बाय द वे.. तुझं पुस्तकाचं प्रकाशन कधी आहे?”, मोनिका
“अम्म.. तारीख अजुन नक्की ठरली नाही, पण महीन्याभरात असेल..”
“कुल.. इन्व्हाईट कर मला नक्की हं…”
“येस नक्कीच…”
“चलो देन.. बाय फॉर नाऊ..”
“बाय…”
दोघांनी एकमेकांना मैत्रत्वाचे अलिंगन दिले आणि दोघं आप-आपल्या मार्गाने निघुन गेले..
जेंव्हा कबिर घरी पोहोचला तेंव्हा त्याच्या मोबाईलचा एस.एम.एस. चा दिवा लुकलुकत होता. कबिरने मेसेज ओपन केले, मोनिकाचा मेसेज होता –
My heart was really racing when i meet you after so long.. felt the spark in between our relationship again. Dying to meet you again sooooon.. anyways, gn dear, sweet dreams- Mona
पुढचा एक आठवडा कबिरसाठी कंटाळवाणाच गेला. बहुतेक वेळ त्याने घरात बसुनच घालवला. त्यात डोक्याला त्रास म्हणजे मेहतांच्या ऑफीसमधुन प्रुफ़-रिडर डिपार्टमेंटची ई-मेल आली होती. त्यांना ‘मीरा’ आणि कथेच्या नायकामध्ये अजुन काही नविन प्रसंग हवे होते. त्यांच्या मते पेज-लेआऊटसाठी अजुन काही कंटेंन्ट्स हवे होते.
कबिर आणि राधामध्ये जे काही घडलं ते सगळं त्याने कथेत उतरवलं होतं. त्यामुळे अजुन काही लिहायचं असेल तर काही काल्पनीक कथानक लिहीण आवश्यक होतं आणि त्यासाठी त्याला पुन्हा राधाचा विचार करणं भाग होतं. अर्थात तो राधाला विसरला होता किंवा विसरायचा यशस्वी प्रयत्न करत होता अश्यातला भाग नव्हता. परंतु नविन प्रसंग लिहीताना त्याला निश्चीतच राधाला पुर्णपणे अंतर्मनात उतरवणे आवश्यक होते. त्या दोघांमध्ये इंटीमेट अर्थात रोमॅन्टीक असे काही घडले नव्हते, पण कथेचा आशय लक्षात घेता कथेच्या नायक-नायिकांमधील प्रेम-प्रसंग गरजेचे होते.
सोफी-ऑन्टीच्या घराच्या मागे जी नदी होती ती कबिरला खुप भावली होती. अनेकदा कबिर स्वतःला राधाबरोबर त्या नदीकिनारी एखाद्या संध्याकाळी इमॅजीन करायचा. कथेसाठी लागणारा प्रसंग रंगवण्यासाठी कबिरने तीच जागा निवडली. समोरचा लॅपटॉप त्याने चालु केला आणि लिहायला सुरुवात केली.
नदी-काठाकडे जाणारा रस्ता खुपच चिंचोळा होता, त्यात दोन्ही बाजुने दाट झाडी असल्याने पायवाट अधीकच लहान झाली होती. कबिर राधाच्या मागे चालत होता.
“तुला माहीते कबिर, ही नदी ना सोफी-ऑन्टीच्या कॉटेजचा यु.एस.पी. आहे.. नुसते ह्या भागातले फोटो काढुन फेसबुकवर एक पेज बनवले ना तरी दिवसाला हजारोंने फोन येतील.. मी जेंव्हा केंव्हा इथुन जाईन ना तेंव्हा एक पेज नक्की बनवुन ठेवणारे, आयुष्यभर टुरीस्ट येथे येत रहातील..”, राधा बोलत होती. पण कबिरचे कुठे तिच्या बोलण्याकडे लक्ष होते, कबिरचे मन गुंतले होते तिच्या काळ्याभोर केसांमध्ये. चालता चालता राधा आपल्या केसांशी खेळत होती. कधी वार्याच्या झुळकीबरोबर मोकळे सोड, कधी केसांच्या टोकांशी स्प्लिट-हेड्स तर नाहीत ना बघ.. कधी उगाचच त्याची बोटांभोवती गुंडाळी कर तर कधी उगाचच मान हलवुन केसांना ह्या बाजुने त्या बाजुला करत बस. कबिर पार वेडा झाला होता.
तो चिंचोळा रस्ता संपला आणि नदीचे विशाल पात्र कबिरच्या नजरेस पडले तसा तो भानावर आला.
“बघ्घ.. कस्सं आहे? आवडलं ना?”, एखाद्या लहान मुलाने मोठ्या कष्टाने काढलेले चित्र समोर धरुन फक्त आणि फक्त चांगल्याच प्रतिक्रियेच्या अपेक्षेत पहावे तसे भाव राधाच्या चेहर्यावर होते.
गुलाबी रंगाच्या टी-शर्टवर राधाने पांढर्या रंगाचा सी-थ्रु शर्ट आणि खाली आकाशी रंगाची स्लॅक्स घातली होती. घरातुन निघताना लावलेला जॅस्मीनचा पर्फ्युम वार्याच्या झुळकीबरोबर अधीक तिव्रतेने कबिरच्या अंगाअंगात भिनत होता. डोळ्यावरचा गॉगल केसांमध्ये लावत राधा म्हणाली… “हॅल्लो… सांग ना आवडली का जागा?”, तसा कबिर भानावर आला..
“ओह येस… खुप्पच मस्त आहे.. कॉफीचा अनलिमीटेड सप्लाय आणि लॅपटॉपला बॅटरी बॅक-अप मिळाला ना तर आठवड्याभरात मी इथे बसुन गोष्ट लिहुन काढेन…”, कबिर समोरच्या विहंगम दृष्याकडे बघत म्हणाला..
“यु नो व्हॉट कबिर, समटाईम्स वुई निड टु गेट लॉस्ट टु फाइंड आवरसेल्फ्स… इथे आल्यावर ना मला सगळं विसरायला होतं…”
थोडं पुढे चालल्यावर दगडी चिरांच्या बांधकामाची एक छोटीशी भिंत होती. राधा त्यावर बसली.
“तुला भाकर्या पाडता येतात?”, कबिरने मातीतला एक चपटा दगड उचलत विचारलं..
“भाकर्या? यु मिन स्वयंपाकातल्या ना?”
“नाही नाही.. हे बघ असं..” अस्ं म्हणुन कबिरने तो चपटा दगड नदीपात्रात भिरकावला. पाण्याच्या पृष्ठभागावर ७-८ वेळा आपटत तो दगड लांबवर गेला..
“भाकर्या काय मग !.. चकत्या म्हणतात त्याला… भाकर्या काय???!!!!”, असं म्हणुन राधा हसायला लागली
“असेल.. मी भाकर्याच म्हणतो..” तोंड फुगवुन कबिर म्हणाला…
“बरं बरं.. भा…क….” असं म्हणुन राधा पुन्हा हसायला लागली..
कबिर तिच्या हसण्याने बेभान झाला होता. त्याला आजुबाजुचे काहीच सुधरत नव्हते. पक्ष्यांची किलबील, वार्याने झाडांची होणारी सळसळ, दुरवरुन ऐकु येणारी सागराची गाज.. काही-काहीच ऐकु येत नव्हते.
कबिर ताडताड पावलं टाकत राधाच्या जवळ गेला, त्याने तिला जवळ ओढले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले….
बस्सं.. हाच तो क्षण.. हाच तो क्षण ज्याला ईटरनिटी म्हणत असावेत.. हाच तो क्षण जेंव्हा पुर्ण जग स्तब्ध होऊन जाते, कदाचीत ह्याच क्षणामध्ये पृथ्वीने सुध्दा आपली आवर्तने थांबवली असावीत…..
लिहीता लिहीता कबिर अचानक थांबला.. नुसत्या लेखनाने त्याच्या सर्वांगावर रोमांच उठले होते.. नुसत्या विचाराने त्याच्या हृदयाची धडधड अनेक पटींने वाढली होती.
कबिर खुर्चीतुन उठला आणि फ्रिजमधुन ज्युसचा एक कॅन घेउन आला. ज्युसचे काही घोट गटागट घश्याखाली उतरवले आणि तो डोळे मिटुन शांतपणे खुर्चीत बसुन राहीला..
असं नाही की कबिरने आयुष्यात कधी कुणाला ‘किस्स’ केले नव्हते. मोनिकाबरोबर तो अनेकदा ‘किस्स’च्याही पुढे गेला होता. पण हा अनुभव कबिरसाठी पुर्णपणे नविन होता. असेही नाही की राधाबद्दल त्याला शारीरीक आकर्षण होते.. किंबहुना ह्या आधी त्याने राधाबद्दल कधी ‘तसला’ विचारही केला नव्हता. केवळ पब्लीशरकडुन मागणी होती म्हणुन त्याने हा काल्पनीक प्रसंग उतरवायला सुरुवात केली होती….
मन शांत झाल्यावर, त्याने पुन्हा लॅपटॉप जवळ ओढला आणि लिहायला सुरुवात केली..
राधाने कबिरला थांबवायचा कसलाही प्रयत्न केला नाही. मोकळे सोडलेले तिचे केस, कबिरने अचानक जवळ ओढल्याने विस्कटुन कबिरच्या चेहर्यावर जाऊन बिलगले होते.
“सॉरी.. रिअली सॉरी…”, आपण अनवधानाने काय केलंय हे लक्षात येताच कबिर बाजुला सरकला
राधा काही क्षण डोळे मिटुन स्तब्ध बसुन राहीली आणि मग जणु काहीच घडलं नव्हतं अश्या मस्करीच्या स्वरात कबिरला म्हणाली, “अपमान झाला की तुमच्यात असं करतात का?”
“रिअली सॉरी राधा.. मलाच माहीत नाही मी असं का केलं.. रिअली वॉज नॉट इंटेंन्शनल….”, कबिर
“ईट्स ओके.. मला अचानक चार्लीची आठवण झाली बघ..”, राधा
“चार्ली..?? कोण?”
“मी गोव्यात आले ना? तेंव्हा हिप्पी बनायचंच हेच डोक्यात घेऊन…किंबहुना अजुनही तो प्लॅन ऑनच आहे.. तर.. एकदा फिरताना, बिचवर मला असाच एक हिप्पींचा ग्रुप भेटला.. रंगेबिरंगी कपडे.. अस्ताव्यस्त वाढलेले केस, खुरटी दाढी, हाता गिटार किंवा ड्रम्स.. मुलीही अगदीच ह्या…. पण मला मस्त वाटली लोकं.. एकदम फ्री.. म्हणुन मी भेटायला गेले अशी मुर्खासारखी हिप्पी बनण्यासाठी काय कॉलीफिकेशन लागत विचारायला.. तर त्या चार्लीने असंच एकदम जवळ ओढलं आणि मला किस्स केलं…”, राधा..
“मग?”
“मग काही नाही.. मी एकदम त्याला दुर ढकलंल.. तेंव्हा म्हणाला.. यु आर नॉट रेडी फॉर धिस..”
“म्हणजे? हिप्पी व्हायला काय किस्स करता यायला पाहीजे वगैरे काही क्रायटेरिआ आहे का?”
“नाही.. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की, आपण असं एकदम फ्रि वगैरे असलं पाहीजे.. ना जगाची, ना मनाची तमा.. कोण काय म्हणेल.. कुणाला काय वाटेल ह्याची फिकीर करत बसलो तर तो हिप्पी कसला…”
लिहीता लिहीता कबिर अचानक थबकला.. शेवटचं लिहीलेलं पान त्याने पुन्हा डोळ्याखालुन घातलं…
अचानक हा हिप्पी.. आणि चार्ली नाव कुठुन आलं त्याच्या लक्षात येईना.. मग एकदम त्याला आठवलं..राधा त्याला हिप्पी आणि चार्लीबद्दल खरंच बोलली होती. हे संभाषण काल्पनीक नव्हते. त्याने पट्कन फोन उचलला आणि रोहनचा नंबर फिरवला..
“रोहन.. मला परत गोव्याला जायला हवं..”, कबिर
“का? काय झालं?”, रोहन
“आय थिंग आय नो.. राधा कुठे असेल…”, कबिर
“म्हणजे?”
मग कबिरने रोहनला शेवटचे ते पान वाचुन दाखवले आणि तो म्हणाला.. “राधा मला म्हणाली होती.. आय एम शुअर ती नक्कीच त्या हिप्पी ग्रुपकडे गेली असणार…”
“अरे पण त्याला पण आता महीना होत आला.. कश्यावरुन राधा अजुनही तेथेच असेल.. तुला माहिते हे हिप्पी लोकं.. कधी एका ठिकाणी ते थांबत नाहीत…”, रोहन
“आय नो.. बट इट्स वर्थ ट्रायींग..”, कबिर
“आणि ते राइट-अपचे..? मला वाटतं कबिर.. तु मेहतांच काम पुर्ण करुनच जा.. मला माहीते तुझ्या राधाबद्दलच्या भावना.. पण बी प्रोफ़ेशनल.. तु जो पर्यंत कंटेंन्ट्स देत नाहीस तो पर्यंत मेहतांच काम अडुन राहील.. मागे तु असाच गायब झालास आणि इथे मला त्यांच ऐकावं लागलं..”, रोहन
“मी गायब नव्हतो रोहन.. उलट मी वेळेच्या आधी त्यांना कथा पुर्ण करुन दिली आहे.. नसतीच दिली तर?”, कबिर
“आय नो.. आय नो.. पण तु मला विचारशील तर मी म्हणेन काम पुर्ण करुनच जा.. एकदा तु गेलास कि तिकडे किती वेळ लागेल माहीत नाही… लेट्स प्ले इट सेफ कबिर.. प्लिज…”, रोहन..
रोहन बोलत होता त्यात तथ्य होतं. कबिरकडे दुसरा मार्ग नव्हता…
“पण मग काय करायचं? दुसर्या कुणाला तरी पाठवता येईल का?”, कबिर व्याकुळ होऊन म्हणाला..
“मी बघतो काही मार्ग सापडतो का ते.. पण तोपर्यंत तु प्लिज कथेवर फोकस कर…ओके?”, रोहन..
“ओके !”, कबिरने फोन ठेवुन दिला, लॅपटॉप पुढे ओढला आणि तो पुन्हा कथा लिहीण्यात मग्न झाला..
[क्रमशः]