Swaraja Surya Shivray - 22 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | स्वराज्यसूर्य शिवराय - 22

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

स्वराज्यसूर्य शिवराय - 22

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग बावीसवा

प्रतापरावांचा प्रताप

बहलोलखान आदिलशाहीतील एक हुकमी एक्का! एक प्रभावी अस्त्र ! अतिशय नीडर, बेडर, खुनशी अशी ख्याती असलेला एक सरदार. शिवरायांकडून, त्यांच्या मावळ्यांकडून अनेकवेळा आदिलशाहीतील बड्याबड्या सरदारांनी जबरदस्त पराभवाची चव चाखली होती. अनेक मानहानीकारक पराभव आदिलशाहीच्या खात्यावर जमा झाले होते. शिवरायांचा पराभव कसा करावा हा फार मोठा प्रश्न आदिलशाहीसमोर पडलेला असताना त्यावर विचारमंथन चालू असताना, प्रत्येक पराभवाची शहानिशा चालू असताना 'शिवरायांच्या वाघांनी पन्हाळा जिंकला' ही अजून एक चिंतेत टाकणारी, लाजीरवाणी बातमी विजापूरावर तोफेच्या गोळ्याप्रमाणे येऊन धडकली. दरबारात स्मशानशांतता पसरली. खवासखान हा आदिलशाहीचा मुख्य सरदार अत्यंत चिडला, रागावला, संतापला. अशाच भावना कित्येक वर्षांपासून व्यक्त करण्यात येत होत्या परंतु शिवरायांचा पूर्ण बिमोड करून, त्यांना संपविण्याचे स्वप्न काही प्रत्यक्षात उतरत नव्हते. शिवरायांकडून मी..मी म्हणवणाऱ्या सरदाराचा दारूण पराभव व्हावा आणि आदिलशाहीने हात चोळत बसावे असेच चालले होते. मोठ्या दिमाखात जाणारा, बलाढ्य फौज घेऊन जाणारा प्रत्येक सरदार मावळ्यांनी दिलेली सणसणीत चपराक खाऊन, रक्तबंबाळ अवस्थेत सर्वस्व गमावून परत यायचा त्यावेळी आदिलशाही दरबाराची स्थिती पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे होत असे. आपण शिवाजीसमोर कायम वाकत असतो, शरणागती पत्करत असतो, प्रचंड मोठ्या पराभवाची चव चाखत असतो ही जाणीवच दरबाराला कायम अस्वस्थ करीत असे.

संतापलेल्या खवासखानाने दरबार बोलावला. झाडून सारे सरदार जमा झाले. खवासखान कठोरपणे म्हणाला, "अजून किती पराभव आपण पचवणार आहोत? पराभव, पराभव आणि पराभव ! मोठ्या आवेशाने त्वेषाने,फुशारक्या मारून जाणारा सरदार हरणार, सैनिक मरणार, दरबार भरवून आपण रागावणार, चिडणार हे किती दिवस चालणार? हे असेच चालत राहिले तर तो सिवा या इथे विजापूर दरबारात पोहोचून आपल्या नरडीचा घोट घेईल. आदिलशाही संपुष्टात आणणार. आजपर्यंत आपण ही आदिलशाही जिवंत ठेवली आहे. ती तशीच पुढेही जिवंत ठेवावी लागणार आहे....." खवासखानाच्या उद्विग्नतेमुळे, त्याच्या चिंतातूर स्वरामुळे सारे सरदार चिंतेत पडले. काळजीचे ढग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दाटून आले. खवासखान म्हणतो त्याप्रमाणे खरोखरीच शिवाजी विजापूरवर चालून आला तर आपला, आदिलशाहीचा टिकाव लागणार नाही ही भीती सर्वांना सतावत होती. दरबारात बहलोलखान हा पठाणी सरदार हजर होता. त्यावेळी त्याच्याकडे मिरज आणि पन्हाळा ह्या भागाची सुभेदारी होती. आपल्या भागातील पन्हाळगड शिवाजीने जिंकला या लाजिरवाण्या गोष्टीने तो शिवरायांवर प्रचंड चिडला होता. शिवरायांचे नाव ऐकताच त्याचा चेहरा संतापाने लालभडक होत होता. हात वळवळत होते. दरबारात असलेल्या अनेक सरदारानी इच्छा व्यक्त केली की,'सरदार बहलोलखान हा अत्यंत शूरवीर आहे. शिवाय तो तिकडचा सुभेदार आहे. तेव्हा आता आदिलशाही वाचवण्यासाठी बहलोलखानानेच काहीतरी करावे.' दरबारातील सरदारांच्या मतांचा कल पाहून खुद्द खवासखान म्हणाला,"खाँसाहेब, आदिलशाहीच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरबारातील सरदारांच्या मतांशी मी सहमत आहे. आपण ही मोहीम हाती घेऊन शिवाजीला चांगलाच धडा शिकवावा. सद्य स्थिती पाहता आपणच हे धाडस, हे साहस करु शकता."

दरबारातील बड्या सरदारांची इच्छा, खवासखानाने एकप्रकारे केलेली विनवणी ऐकून बहलोलखान मनोमन खुश झाला. सध्या आदिलशाहीत माझ्यापेक्षा पराक्रमी आणि शिवाला टक्कर देऊ शकणारा दुसरा सरदार नाही हे सर्वांच्या बोलण्यातून सिद्ध झाले असे समजून बहलोलखानास स्वर्ग दोन बोटे उरल्याप्रमाणे झाला. कोणताही विचार न करता त्याने ती मोहीम हाती घेतली. त्यावेळी आदिलशाहीच्या तख्तावर केवळ चार वर्षे वयाचा बादशहा सिकंदर आदिलशाहा होता. या बादशहाच्या हाताने बहलोलखानास विडा देण्यात आला. बहलोलखान मोठ्या ऐटीत, दिमाखात बारा हजाराची फौज घेऊन निघाला....

शिवराय त्यावेळी साताऱ्याच्या मोहिमेवर होते. त्यांच्या हेरांनी शिवरायांना बातमी दिली की, बहलोलखान मोठी फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघाला आहे. शिवरायांनी वेळ न गमावता आपल्या मातब्बर सरदारांना एकत्र केले आणि म्हणाले,

"बहलोलखान फार मोठी फौज घेऊन चालून येतो आहे. तो जसजसा जवळ येईल तसे त्याला अजून काही सैन्य मिळत जाईल. तो अजून प्रबळ, सशक्त होण्यापूर्वीच त्याला घेरून जेरीस आणले पाहिजे. त्याला, त्याच्या फौजेला थोडीही हालचाल करण्याची संधी न देता मारले पाहिजे. यासाठी आम्ही प्रतापराव गुजर यांची नेमणूक करतो आहोत. बहलोलखानास गाठून काम फत्ते करावे."प्रतापरावांनी शिवरायांचा आदेश शिरसावंद्य मानला. मुजरा केला. सोबत बडेबडे सरदार घेतले. पंधराहजारापेक्षा मोठी सोबत घेऊन निघाले. तितक्यात त्यांना समजले की, खान उमराणी गावाजवळ येणार आहे.प्रतापरावांनी विचार केला की, खानाची फौज मोठी आहे. दिवस उन्हाळ्याचे आहेत. उमराणी गावाजवळ असलेला जलाशय आपण आपल्या ताब्यात घेतला तर खानाच्या सैन्याला पाणी न मिळाल्याने त्यांची कोंडी होईल, ते पाण्यासाठी तडफडतील. हा विचार करून प्रतापरावाने सिद्दी हिलाल याजकरवी तो जलाशय स्वतःच्या ताब्यात घेतला.दुसरीकडे प्रतापरावांनी काही सरदारांकरवी खानाच्या छावणीपासून थोड्या लांब अंतरावर आपल्या फौजा उभ्या केल्या. जणू खानाच्या छावणीला वेढा घातला. नेहमीप्रमाणे बहलोलखानाचे काही सैनिक जनावरांना घेऊन पाणवठ्याकडे निघाले. काही अंतर चालून जातात न जातात तोच त्यांची बोबडी वळली. अंगावर भीतीचे शहारे आले. त्यांना समोर जिकडेतिकडे मराठे वीर दिसले. त्यांच्या हातात तळपत्या,नंग्या तलवारी पाहून खानाच्या माणसांचे हातपाय थरथर कापू लागले. तितक्यात त्यांना दूरवर धुळीचे लोट, घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येत होता.कोण होती ती माणसं?ते होते शिवरायांचे शूरवीर,लढवय्ये, गनिमीकाव्यात अग्रेसर असणारे शिपाई. त्या तुकडीचे नेतृत्व करीत होते, प्रतापराव गुजर! एक महत्त्वाकांक्षी, सच्चा मावळा. शिवरायांवर प्रचंड निष्ठा, भक्ती असणारा,जीवलग मित्र ताकदवर, हिंमतवान अशा प्रतापराव गुजरांच्या मावळ्यांनी बहलोलखानाच्या छावणीवर अचानक धावा बोलला. अचानक शिरलेल्या त्या वादळामुळे खानाची छावणी कोलमडली, गोंधळली, बावरली, आश्चर्यात पडली. स्वतःची शस्त्रास्त्रे शोधत असताना कापल्या जाऊ लागली. फार मोठा, घणाघाती हल्ला झाला होता. तलवारीचे वार, बाणांचा टणत्कार अशी लढाई सुरु झाली. हाती पडेल ते घेऊन खानाची माणसेही प्रतिकार करू लागली. बहलोलखानाच्या पठाणी सैन्यानेही कडवा प्रतिकार सुरु केला. घनघोर युद्ध चालू असताना कदाचित शस्त्रास्त्रांच्या आवाजाने, सैन्यांच्या फुत्काराने, जखमी होणारांच्या आक्रोशाने मजबूत साखळदंडांनी बांधलेला खानाचा एक हत्ती बिथरला. घाबरून त्याने जोराचे धक्के देऊन साखळदंड तोडला. स्वतःची सुटका होताच त्या हत्तीने बहलोलखानाच्याच फौजेवर हल्ला चढवला.तो मदोन्मत्त हत्ती समोर येईल त्या व्यक्तीस पायाखाली तुडवत निघाला. सोबतच साखळदंडांचे सणसणीत वार करून सैनिकांना मारत सुटला. बहलोलखानाचे अनेक सैनिक हत्तीच्या तडाख्यात सापडून जीवाला मुकू लागले. खानाच्या माहुताने प्रयत्नांची शिकस्त करुन त्या हत्तीला काबूत आणले. दुसरीकडे मावळ्यांनी त्या हत्तीभोवती असलेले पठाण कापून त्या हत्तीला स्वतःच्या ताब्यात घेतले. बहलोलखान प्रयत्नांची शिकस्त करीत होता. त्वेषाने लढत होता. त्याच्यासोबत असलेला महंमद बर्की हा सरदार जिकरीने लढत असताना दिपाजी राऊतराव या शूरवीराने त्यास यमसदनी पाठवले. बहलोलखानाचे सरदार, सैनिक एकापाठोपाठ एक कोसळत असताना एक फार मोठे संकट पठाणी सेनेपुढे उभे राहिले. ते म्हणजे पिण्याचे पाणी! उन्हाळ्याचे दिवस. रणरणत्या उन्हात लढाई करताना, जखमींना पाणी तर पाहिजे ना, परंतु प्रतापराव गुजर यांनी त्यांचे पाणीच तोडले होते. उमराणी जवळ असलेल्या एकमेव जलाशयापर्यंत जाणाऱ्या साऱ्या वाटांची मावळ्यांनी नाकेबंदी करुन टाकली होती. सैन्य, हत्ती, घोडे सारेजण पाण्यासाठी व्याकूळ झाले, तळमळू लागले. पाण्याशिवाय शरीराची लाहीलाही होऊ लागली. बहलोलखानाने ओळखले पाण्याविना मराठ्यांच्या फौजेचा सामना करणे अवघड आहे. तो मनोमन गोंळला, हरला. दीनवाणे तो आपल्या सैन्याची होणारी ससेहोलपट पाहात होता. काय करावे? कुठून आणावे पाणी? कुठून जावे पाणवठ्याकडे? कशी भागवावी तहान? दुसरीकडे मावळे तर पठाणांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी, जणू त्यांचे रक्त प्राशन करण्यासाठी तहानलेले होते. खानाच्या सैन्याला लोळवून ते स्वतःची तृष्णा भागवत होते. अशा अडचणीच्या वेळी बहलोलखानास एकच मार्ग सुचत होता तो म्हणजे शरणागती! असे नाही केले तर पाण्यावाचून तळमणारे सैनिक मावळ्यांच्या घणाघाती हल्ल्यात ठार होतील. त्यापेक्षा पांढरे निशाण स्वीकारले तर सैनिकांचा प्राण तर वाचेल. या विचाराने बहलोलखानाने एक वकील प्रतापरावांकडे पत्र लिहून पाठवला. पत्रात लिहिले होते,

'आम्ही बादशहाचे चाकर. त्याच्या हुकुमानुसार येथपर्यंत आलो. परंतु आता तुमचा झालो आहे. यापुढे कधीही शिवाजीराजांवर किंवा त्यांच्या मुलुखावर स्वारी करणार नाही. तेव्हा सोडून द्यावे, परत जाऊ द्यावे. ' बहलोलखानाची ती शरणागतीची भाषा ऐकून, त्याने दिलेले पुन्हा स्वारी करणार नाही हे वचन वाचून प्रतापराव गुजर या मराठी वीराचे मन द्रवले. वास्तविक पाहता बहलोलखानास पकडून आदिलशाहीला जबरदस्त तडाखा देण्याची संधी त्यानिमित्तानं प्रतापराव गुजर आणि मावळ्यांना मिळाली होती. परंतु गुजरांकडे असलेली सहानुभूती, क्षमाशील वृत्ती जिंकली आणि प्रतापरावाने बहलोलखानास आणि त्याच्या सैन्यास माघारी फिरण्याची संधी दिली. बहलोलखान आणि त्याचे फुशारक्या मारत आलेले सैन्य पराभूत होऊन, अपमानित होऊन परत निघाले.

प्रतापराव गुजर या आपल्या कडव्या सरदाराने बहलोलखानाची आणि कंपनीची केलेली फटफजिती शिवरायांच्या कानावर गेली. पठाणांचा केलेला पराभव शिवरायांना आनंद देऊन गेला परंतु पाठोपाठ आलेल्या 'बहलोलखानास सोडून दिले' या बातमीने शिवराय प्रचंड संतापले. गुजराने परस्पर घेतलेला निर्णय शिवरायांना मुळीच पटला नाही. त्यांनी प्रतापरावास एक खरमरीत पत्र लिहून झालेल्या प्रकाराची निंदा केली. प्रतापरावास चांगले खडसावले. शिवरायांचे ते डोळ्यात अंजन घालणारे पत्र वाचून प्रतापरावास केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. चुकीची जाणीव झाली. त्याहीपेक्षा शिवराय रागावले, त्यांची खपामर्जी झाली हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. शिवरायांनी लिहिले होते,'तुम्ही सापाला अर्धवट मारून सोडून दिले. अपमानित झालेला, दुखावलेला तो सापरुपी बहलोलखान पुन्हा स्वराज्यास नुकसान पोहोचवू शकतो, रयतेला वेठीस धरू शकतो.' या वाक्याने आपण केवढी मोठी चूक केली याची जाणीव प्रतापरावास झाली परंतु आता काही उपयोग नव्हता. शत्रू निसटला होता. तो पुन्हा थोडाच सहजासहजी सापडणार होता? प्रतापराव गुजर यांनी शिवराय आपल्यावर नाराज आहेत ही गोष्ट फार मनावर घेतली. त्याने मग आदिलशाही ठाण्यांवर, भागांवर, सुभ्यांवर जोरदारपणे हल्ले करायला सुरुवात केली.

दुसरीकडे झालेल्या पराभवाने दुखावलेला, चवताळलेला बहलोलखान विजापूरकडे गेलाच नाही. प्रतापराव गुजर यास दिलेला शब्द तो सुरक्षित स्थळी येताच विसरून गेला. त्याने कोल्हापूरच्या आसपास ठाण मांडले. तितरबितर झालेल्या फौजेची जमवाजमव करायला सुरुवात केली. पाठोपाठ खानाने रयतेला त्रास देणे, लुटणे, मारहाण करणे, शेतातील पिकांना, घरांना आग लावणे इत्यादी करामती करायला सुरुवात केली. त्याच्या तक्रारी शिवरायांपर्यंत येऊ लागल्या. रोजच्या रोज त्याच त्याच तक्रारी ऐकून शिवराय बहलोलखानावर चिडले, संतापले. त्यांचा राग बहलोलखानावर असला तरीही चांगला गोत्यात आलेल्या बहलोलखानास प्रतापरावाने सोडले ही सल शिवरायांना होती. सुरुवातीला शिवरायांचा प्रतापरावांचा राग आला परंतु नंतर त्यांनी राग आवरला. आताही खानाने घातलेला धुमाकूळ ऐकून त्यांना प्रतापरावांचा राग आला नाही तर खानाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रतापरावांना पत्र लिहिले. पत्राचा आशय जरी प्रतापरावांवर संताप व्यक्त करणारा असला तरी शिवरायांचा त्यामागे एक विचार होता, एक भूमिका होती. पत्रातील शिवरायांची भाषा समजून, शिवराय आपल्यावर अजूनही रागावलेले आहेत हे ओळखून प्रतापराव काहीही करून बहलोलखानास आता सोडणार नाही, त्याचा खात्मा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशा भूमिकेतून प्रतापरावाने चवताळून उठावे आणि रागारागाने बहलोलखानावर हल्ला बोलावा याविचाराने शिवरायांनी पत्रात लिहिले होते,"तुम्ही बहलोलखानास माफी दिली, सोडून दिले. काय फायदा झाला उलट तो आता शिरजोर झाला असून उठसूठ रयतेवर हल्ले बोलून रयतेला सतावत आहे. तुम्ही आता पुन्हा बहलोलखानावर हल्ला चढवा. त्याला चांगला हिसका दाखवा. सोडू नका. खानास अद्दल घडविली नाही तर आम्हाला तोंड दाखवू नका."

तिकडे बहलोलखानाच्या करामती प्रतापरावांच्या कानावर जात होत्या. तेही त्याच्यावर दात खाऊन होते. अनेक वेळा त्यांनी बहलोलखानास गाठून ठोकण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतापराव पोहचेपर्यंत खान आणि त्याची फौज हवा तसा धुडगूस घालून स्वराज्याला,जनतेला हानी पोहोचवून निघून गेलेली असे. त्यामुळे प्रतापराव अधिकच चिडत, रागावत असत. आपण केलेली चूक त्यांना वारंवार आठवत असे, ते हताश होत, स्वतःवरच चिडत असत. तितक्यात शिवरायांचे ते खरमरीत पत्र गुजर यांना मिळाले. ते वाचून प्रतापराव मनोमन नाराज झाला. शिवराय आपल्यावर नाराज आहेत ही बोचणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पत्रातले एक वाक्य त्याला सलत होते, 'खानास अद्दल घडविली नाहीतर आम्हाला तोंड दाखवू नका....' शरीरावर शत्रूंचे असंख्य वार झेलूनही हार न मानणारा तो शूरवीर शिवरायांच्या पत्रातील भाषेमागे असलेली भूमिका समजू शकला नाही. पत्र वाचून त्याचा जीव कासावीस झाला. त्याच्यापर्यंत एक फार मोठी बातमी पोहोचली होती की, लवकरच शिवरायांना राज्याभिषेक होणार आहे. ती बातमी ऐकून प्रतापरावांना खूप आनंद झाला होता परंतु शिवरायांच्या त्या पत्रामुळे त्याच्या आनंदावर पाणी फेरले. त्याला वाटले,' आपण राज्याभिषेकाच्या आधी बहलोलखानास संपवले नाहीतर आपणास त्या आनंदी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. मी शिवरायांचा सरसेनापती असूनही मला त्या कार्यक्रमाला हजर राहता येत नाही. माझ्यासारखा अभागी मीच. नाही. नाही. हे होणे शक्य नाही. ज्यामुळे हे सारे घडते आहे त्या बहलोलखानास मी सोडणार नाही.'

त्या दिवशी काही कामानिमित्त प्रतापराव आपल्या सहा मित्रांसह छावणीपासून बराच दूरवर आला होता. तितक्यात त्याला खबर आली की, बहलोलखान फार मोठ्या सैन्यासह चालून येत आहे. खान नेसरीच्या भागावर चालून येतोय हे ऐकताच प्रतापरावांच्या अंगाचा तीळपापड झाला. संतापाने हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. कपाळावरची शीर तडतडू लागली. तो मनाशी म्हणाला,

'आला. आला. गनीम आला. याला ठेचलेच पाहिजे. खानास मारल्याशिवाय मला शिवरायांना भेटता येणार नाही. ठरले. खानावर झडप घालायची....' असा विचार करत असताना त्याने घोडा नेसरीच्या दिशेने वळवला. घोड्याला टाच मारली. पाठोपाठ सहा शिलेदाराही निघाले. असा धाडसी निर्णय घेतांना प्रतापराव गुजराने साधा विचारही केला नाही की, आपण जे कृत्य करायला जातोय तो बहलोलखान एकटा नसून हजारो सैनिक त्याच्यासोबत आहेत आणि आपण सहा...केवळ सहा! कसा निभाव लागेल?

निघाले! म्हटलं तर सात वीर, त्यांचा विचार, त्यांचे धाडस पाहिले तर ते सात वेडेच ! धाडस म्हणावे, शौर्य म्हणावे, आत्मविश्वास म्हणावे किंवा काय म्हणायचे ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. परंतु एका वेगळ्याच त्वेषाने, इर्षेने, बदला घ्यायचा या महत्त्वाकांक्षेने पेटलेले, संतापलेले ते शूरवीर दौडत निघाले. पोहोचले. पोहोचले. ते सात वीर खानाच्या सैन्याजवळ पोहोचले. ती बातमी बहलोलखानास समजली. तो आनंदला. तसाच आश्चर्यचकित झाला. फक्त सात मराठे चालून येत आहेत . महत्त्वाचे म्हणजे त्यात प्रतापराव गुजर आहे. ज्याने आपल्या सैन्याची वाताहात केली होती. पाण्यावाचून आपल्या फौजेला तळमळत, तडफडत ठेवले होते. पांढरे निशाण घेऊन शरण यायला भाग पाडले होते तोच प्रतापराव गुजर सहा जणांना घेऊन चालून येतोय. व्वाह। क्या बात है, बदला घ्यायला यापेक्षा दुसरी कोणती संधी मिळू शकेल.

खरोखरीच सात मावळे खानाच्या बलाढ्य, असंख्य सेनेत घुसले, एका चक्रव्युहात शिरले. बरे, घुसले तर बाहेर कसे पडणार? पण हा प्रश्न त्या सातांपैकी कुणालाही पडला नाही. दिसेल त्या गनिमावर घाव घालत सुटले. समोरूनही असंख्य घाव त्यांच्या शरीरावर कोसळत होते. खानाच्या सैनिकांनी त्या सातांना घेरले. घावावर घाव घालायला सुरुवात केली. हिंमत होती, शक्ती होती, इच्छा होती परंतु संख्याबळ नसल्यात जमा होते. ते संख्याबळ शत्रूकडे होते तेही प्रचंड प्रमाणात. कसा टिकाव लागणार? शेवटी व्हायचे तेच झाले. एक-एक वीर कोसळत होता. धारातीर्थी पडत होता. शेवटी प्रतापराव गुजर हा स्वराज्याचा सरसेनापती, शिवरायांचा शूरवीर साथीदारही पडला. बहलोलखानाचे फावले. आयती शिकार त्याच्या छावणीत शिरली होती...

अखेर ती बातमी, सरसेनापती कोसळल्याची बातमी शिवरायांना समजली. सर्वांना फार मोठा धक्का बसला. शिवराय खूप उदास झाले, निराश झाले. आपल्या पत्राचा वेगळा अर्थ काढून प्रतापरावाने अघोरी प्रकार केल्याचे दुःख शिवरायांना झाले. ही अपरिमित हानी कशी भरून काढावी, त्या बहलोलखानाचा बंदोबस्त कसा करावा? शिवराय अशा विचारात असताना प्रतापरावांसोबत मोहिमेवर असलेल्या आनंदराव या सरदाराने शिवरायांना पाठवलेल्या पत्रात लिहिले होते, 'महाराज, आपण निश्चिंत असावे. प्रतापराव गुजर गेले हे वाईट झाले असले तरीही मी त्या बहलोलखानाचा बदला घ्यायला समर्थ आहे. आपण बेफिकीर असावे.'

शिवरायांना दिलेल्या शब्दानुसार आनंदराव सैन्यासह निघाले. ही बातमी बहलोलखानास समजली तशीच ती दिलेरखानाला समजली. त्याने आनंदरावाच्या फौजेचा पराभव करण्यासाठी मोठी कुमक बहलोलखानाकडे रवाना केली. आनंदरावाच्या हेरांनी ही बातमी आनंदरावास दिली. या दोघांच्या प्रचंड सैन्याचा मुकाबला करण्यापेक्षा त्यांना वेगळ्या रीतीने जेरीस आणावे असा विचार करून आनंदराव थेट बहलोलखानाच्या जहागीरीत घुसला आणि त्याने संपगाव येथील बाजार लुटला. फार मोठी संपत्ती त्याच्या हाती लागली. सोबत शेजारची अनेक गावे लुटली. मिळालेली ती अपार संपत्ती घेऊन आनंदराव निघाला. ती बातमी बहलोलखानास समजली. तो रागाने लालेलाल झाला. त्याचे डोळे आग ओकू लागले. स्वतः बहलोलखान आनंदरावाच्या फौजेवर चालून गेला. सावध असलेल्या आनंदरावाने उलट जबरदस्त पलटवार केला. प्रतापराव गुजर या आपल्या सरसेनापतीच्या बलिदानाचा बदला घ्यायचा या इर्षेने पेटून उठलेल्या मावळ्यांनी खानाची फौज कापून काढायला सुरुवात केली. खानाच्या सैन्याची वाताहात झाली. सैन्य वाट मिळेल तिकडे पळत सुटले. स्वतः बहलोलखानाही शस्त्र टाकून पळत सुटला. आनंदरावाचा, त्याच्या कडव्या सहकाऱ्यांचा फार मोठा विजय झाला. मिळालेली लुट, विजयाची बातमी घेऊन आनंदराव रायगडावर पोहोचला. शिवरायांनी सर्वांची पाठ थोपटली. हा आनंद साजरा करत असताना त्या आनंदावर विरजण पडले. एक दुःखदायक घटना घडली. शिवरायांच्या पत्नी काशीबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला....…

नागेश सू. शेवाळकर