दुःखी..
पांडुरंग सदाशिव साने
१. साधू
नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्या वगैरे पुष्कळ होत्या. त्यामुळे नंदगावचे महत्त्व. शिवाय तेथे एक मोठा तुरुंग होता. लांबलांबचे कैदी नंदगावच्या तुरुंगात आणून ठेवण्यात येत.तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरक. आज तुरुंग थोडे तरी सुधारलेले आहेत; परंतु त्या काळी तुरुंगांत अपरंपार हाल असत. कैद्यांना पशूंहूनही वाईट रीतीने वागवण्यात येई. जरा काही झाले की शिक्षा व्हायच्या. हातापायांत जड साखळदंड पडायचे. फटके केव्हा बसतील त्याचा नेम नसे.तुरुंगातून मोठी शिक्षा झालेला कैदी जिवंतपणे बाहेर पडणे जवळजवळ अशक्य असे. तुरुंगातील हालअपेष्टा बाहेरच्या जगात सांगण्यासाठी तो कधी येत नसे. निराशेने त्याचे आयुष्य कमी होई व तो तुरुंगातच मरे. तुरुंगातील जीवन म्हणजे भयाण जीवन. कैदी रडला नाही असा एक दिवस जात नसे. सुस्कारे व अश्रू यांचेच वातावरण तुरुंगात असे.एके दिवशी सायंकाळच्या वेळी नंदगावात एक मनुष्य हिंडत होता. तो उंच होता. हाडपेर मजबूत होते; परंतु तोंडावर चिंता होती. त्याच्याजवळ काही नव्हते. अंगावर फाटके कपडे होते. तो रात्रीपुरती निवार्याची जागा बघत होता. तो एका हॉटेलात शिरला. त्याने थोडे खायला मागितले. तेथील एका जागेवर तो बसला.
'पैसे आहेत का रे भिकार्या?''आहेत दोन आणे.''दोन आण्यांत काय देऊ?''जे देता येईल ते द्या.'इतक्यात कोणीतरी त्या हॉटेलात आला. तो मालकाच्या कानात काही पुटपुटला व निघून गेला.'ए भिकार्या, इथं नाही तुला काही खायला मिळणार. इथून चालता हो, असशील चोरबीर. खाशील दोन अण्यांचं परंतु नेशील दोन हजारांचं. मोठे हुशार असता तुम्ही या कामात. चल नीघ, ऊठ.''एवढं खाऊन जाऊ दे. पुढं आणलेला घास मागं नेऊ नका.''ते काही नाही, तू आधी ऊठ.'तो भिकारी बाहेर पडला. तो आणखी एका हॉटेलात शिरला; परंतु तेथेही मघासारखाच अनुभव आला. त्याला कोणत्याही खाणावळीत किंवा हॉटेलात जागा मिळेना. शेवटी एका मोठया घराच्या बाहेरच्या ओटयावर तो बसला. थोडया वेळाने तेथेच पडून राहिला; परंतु मालकाचा भय्या बाहेर आला. तो कुत्र्यापेक्षाही मोठयाने अंगावर गुरगुरला. त्याने त्या अनाथाला हाकलून दिले.आता तो गरीब बापडा गावाबाहेर निघाला. या गावात आपणास कोणीही निवारा देणार नाही असे त्याला वाटले. गावाबाहेर जावे, एखाद्या झाडाखाली पडावे असे त्याने ठरवले. तो आता दमून गेला होता. पोटात अन्न नव्हते, तरी चालत होता. शेवटी एका झाडाखाली तो बसला. त्याच्या डोळयांतून पाणी आले. तुरुंगातून सुटल्यावरही हे पोलिस का सारखे मागे, का यांचा ससेमिरा, असे त्याच्या मनात आले. एकदा चोर म्हणजे का कायमचा चोर? आम्हाला या जगात मग कोठेच का आधार नाही मिळायचा? अशा विचारात तो होता.परंतु त्याचे अश्रू पाहून आकाशाला जणू वाईट वाटले. आकाशाचे तोंड काळवंडले. एकाएकी ढग जमा झाले. तारे दिसेनासे झाले. टप् टप् असा जाड थेंबांचा पाऊस पडू लागला. वाराही जोराने वाहू लागला. देवही आपल्या पाठीस लागला आहे असे त्या दुर्दैवी माणसास वाटले. देवाच्या आकाशाखाली तरी रात्रभर पडू, असे त्याला वाटत होते; परंतु ते आकाशही का रागावले? माझ्याखाली निजू नको, भिजवून टाकीन, नाही तर ऊठ, असे का आकाश त्याला सांगत होते?
पाऊस जरा थांबला; परंतु रात्री खूप येणार अशी लक्षणे दिसत होती. इतक्यात तिकडून एक मनुष्य आला. तो नंदगावात जात होता. झाडाखाली एक दु:खी मनुष्य आहे असे पाहून तो थांबला.'रात्रीच्या वेळी इथं का रे बसलास? आज मोठा पाऊस येणार.''मग कुठं जाऊ? मला घर ना दार, सगा ना सोयरा. कुठं जाऊ? या गावात कुणीही रात्रीपुरता आधार देईना.''असाच सरळ जा. मग उजव्या बाजूला वळ. तिथं एक लहानसं घर आहं. घराभोवती बाग आहे. त्या घरी तुला जागा मिळेल. तिथं सर्वांना परवानगी आहे. तिथं कधीही कोणाला नकार दिला जात नाही. जा, तिथं जा. त्या घरात एक साधू व त्याची बहीण राहातात. अनाथांचं ते घर आहे. जगानं टाकलेल्यांचं ते घर!'असे सांगून तो भला मनुष्य निघून गेला. आमचा हा दुर्दैवी मनुष्य उठला व चालू लागला. काही वेळ चालल्यावर त्याला ते घर दिसले. कुत्री वगैरे तेथे नव्हती. तो घराजवळ आला. त्याने दार लोटले. तो ते उघडले. दाराला कडी नव्हती एकदम कोणी तरी उठले. दिवा लावण्यात आला.'कोण तुम्ही?' साधूने विचारले.'मी एक अनाथ आहे. रात्रीपुरता आधार हवा. गावात कुणीही जागा देईना, शेवटी तुमच्याकडे आलो. तुम्ही तरी निराश करणार नाही असं मनात धरून आलो आहे.''या, बसा. हे घर तुम्हा सर्वांचे आहे. बसा हो, बसा इथं. निजायची वेळ झाली म्हणून आताच दिवा मालवून पडलो होतो. तुमचं जेवण वगैरे झाले आहे का?''नाही.''मग आधी जेवा. थांबा, मी ताईला उठवतो. तिला ताजा स्वयंपाक करायला सांगतो. अहो, तुम्ही म्हणजे देवच. देवाला का शिळंपाकं वाढायचं? आधी आज उरलंसुरलं नसेलही काही. तुम्ही इथं बसा. नाही तर पडा. तुम्हाला पाय धुवायला पाणी देतो हो आणून.' असे म्हणून तो साधू आत गेला. त्याने दुसरा दिवा लावला. घरातून बादलीभर पाणी आणून दिले. त्या दुर्दैवी माणसाने पाय धुतले.
'हा घ्या फडका. याला पुसा पाय आणि आता इथं पडा. जरा विश्रांती घ्या. आता होईल स्वयंपाक. ताई व मी पटकन करू. आता घरच्यासारखं राहा. संकोच नको, बरं का?'साधू आत गेला. ताईही उठली, चूल पेटली. ताजा ताजा स्वयंपाक तयार झाला. ताईने एक पत्रावळ मांडली; परंतु तिचा तो भाऊ म्हणाला, 'ताई, पत्रावळ नको. ते कपाटात चांदीचं ताट आहे ना, ते मांडू. त्या ताटाचा आज उपयोग करू आणि तो चांदीचा दिवा आहे ना, तो लावू. या पाहुण्यासमोर दिवा लावू. हसतेस काय ताई? या गरिबाला सर्वांनी हाकलून दिलं. आपण त्याचं सर्वोत्तम स्वागत करू. आपल्याकडे येऊन-जाऊन या दोन मोलाच्या वस्तू आहेत. चांदीचं ताट, माझ्या एका वाढदिवसी मागं मित्रानं दिलेलं आणि तो दिवा. तोही असाच एकानं दिला होता. आठवतं का तुला?''हो. 'तुम्ही सर्व हतपतितांना प्रेमाचा प्रकाश देता; सुष्ट दुष्ट म्हणत नाही, तुम्हाला काय देऊ? एक दिवा देतो; तुमचं जीवन म्हणजे प्रेमाचा दीप,' असं म्हणून त्या एका गृहस्थानं तो दिवा दिला होता. मी कशी विसरेन? मग काढू तो दिवा? तो लावू?''हं, काढ व लाव. मी त्यांना बोलावतो.'पाट मांडण्यात आला, चांदीचे ताट ठेवण्यात आले. तो चांदीचा दिवा लावण्यात आला. किती सुंदर प्रकाश पडला होता. जणू त्या साधूच्या अंतरात्म्याचा तो प्रकाश होता. तो निराधार पाहुणा आत आला. ते स्वागत पाहून त्याचे हृदय उचंबळून आले. तो जेवायला बसला.'आता पोटभर जेवा.''महाराज, माझं एवढं स्वागत कशाला? मी कोण आहे हे जर कळलं तर तुम्ही माझा तिरस्कार कराल. मी एक पापी, दुष्ट -''काही बोलू नका. मला काही ऐकवू नका. तुम्ही चांगले आहात. उगीच स्वत:ला वाईट का समजता? मनुष्य परिस्थितीनं वाईट होतो. सामाजिक रचनेमुळं वाईट होतो. तुम्ही चांगले आहात. जेवा स्वस्थ मनानं. ताई, त्यांना वाढ ना!' साधू म्हणाला.
जेवण झाले. ताईने ताट लगेच घासून ठेवले. तो दिवाही तिने पुसून ठेवला. ती भावाला म्हणाली, 'भाऊ, हे कपाटात ठेव.''असेना का खालीच. ठेव भिंतीशी.' भाऊ म्हणाला.'मी आता निजते.' ताई म्हणाली.'थांब, आपल्या पाहुण्यांना पांघरायला लागेल ना! त्या गाठोडयात एक शाल होती ना? ती दे काढून.'ताईने शाल काढून दिली. दमलीभागलेली ताई झोपी गेली. साधूने पाहुण्यासाठी स्वच्छ सुंदर अंथरूण तयार केले. त्यावर ती शाल पांघरण्यासाठी ठेवली. नंतर तो त्या पाहुण्यास म्हणाला, 'या, आपण दोघे प्रार्थना करू.' पाहुणा आला. साधू व तो, दोघे शांतपणे बसले. त्या साधूने एक सुंदर प्रार्थना म्हटली. प्रार्थनेनंतर काही वेळ तो साधू डोळे मिटून बसला होता. नंतर तो पाहुण्यास म्हणाला, 'पाहा, आता तुम्हाला उशीर झाला. दमलेभागलेले तुम्ही, शांतपणं झोपा.'दिवा मालवला गेला. साधू झोपी गेला. पाहुणाही झोपला. रात्री पाऊस फार पडला नाही. त्या झाडाखालून साधूच्या घरी या अनाथ माणसाने यावे, एवढयाचसाठी जणू तो पाऊस आला होता. आता आकाश निर्मळ होते. तारे चमचम करीत होते.त्या पाहुण्याची एक झोप झाली. तो जागा झाला. त्याला आता झोप येईना. त्याच्या मनात निरनिराळे विचार येत होते. 'किती या साधूचा प्रेमळ स्वभाव! कसं यानं मला वागवलं, जणू मी त्याचा जावई, त्याचा देव! मला चांदीचं ताट, समोर चांदीचा दिवा! खरंच ते चांदीचं ताट खाली भिंतीशी ठेवलेलं आहे. तो दिवाही तिथंच आहे. त्या दोन्ही वस्तू मी लांबवल्या तर? काय हरकत आहे? मी भांडवलाशिवाय उद्या धंदा तरी कोणता करू? जवळ दिडकी नाही. साधूला काय करायच्या या चांदीच्या वस्तू? या झोपडीत चांदी शोभत नाही. पळवाव्या या दोन्ही जिनसा; परंतु ही कृतघ्नता आहे. ज्यांनी इतकं प्रेम दिलं, त्यांच्याच घरी का चोरी करू?
सर्व जगानं मला दूर लोटलं. या माहात्म्यानं पोटाशी धरलं. त्यानं माझ्यावर विश्वास टाकला. 'तू वाईट नाहीस, चांगला आहेसं,' असं मला म्हटलं. त्याच्याकडे का चोरी करू? त्या साधूला काय वाटेल? त्याची ताई काय म्हणेल? काही का म्हणत ना! म्हणशील, 'त्याला जरूर होती म्हणून त्या वस्तू त्यानं लांबवल्या.' नाही तर मी उद्यापासून जगायचं कसं हा प्रश्न आहे माझ्यासमोर! ही सदसद्विवेकबुध्दी कशाला कुरकुर करते? गप्प बस ग.' असे त्या पाहुण्याच्या मनात चालले होते. हो ना चालले होते. सदसद्वृत्तींचा झगडा चालला होता. शेवटी असदवृत्ती विजयी झाली.तो पाहुणा हळूच उठला. पाय न वाजवता मांजराप्रमाणे आत गेला. जरा थांबला. दोघांचे झोपेतील श्वासोच्छ्वास ऐकू येत होते. साधू शांतपणे झोपला होता. आत ताईही गाढ झोपेत होती. त्या पाहुण्यानं हळूच ते ताट व तो दिवा उचलून घेतला. तो बाहेर आला. सारे शांत होते. पांघरायला दिलेल्या शालीत त्या चांदीच्या वस्तू गुंडाळून तो बाहेर पडला. कोणीही बघत नव्हते. वरून तारे फक्त पाहात होते. कोणी कुत्री तेथे भुंकायला नव्हती, परंतु आत सदसद्विवेकबुध्दी ओरडत होती.
पहाट झाली. साधू उठला. त्याने नित्याप्रमाणे शौचमुखमार्जन केले. त्याचा कार्यक्रम ठरलेला असे. बारा महिने तेरा काळ त्याप्रमाणे चालायचे. तो पहाटे उठे. नंतर झाडांना पाणी घाली. फुलझाडांना पाणी घाली. काही सुंदर फुले तोडून घेई. मग थोडी भाकर खाऊन तो गावातील गरीब वस्तीत हिंडायला निघे. साधू येण्याची लहानमोठी माणसे वाट बघत असत. सूर्याचे किरण येताच फुले फुलतात, त्याप्रमाणे साधूची प्रेमळ मुखमुद्रा पाहाताच सर्व गोरगरिबांना आनंद होई. तो सर्वांची चौकशी करी. कोणी आजारी वगैरे नाही ना? विचारी. कोणी आजारी असेल त्याच्याकडे जाई. त्याचे जरा पाय चेपी; तोंडावरून, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवी. केव्हा एखादे सुवासिक फूल त्याच्या अंथरुणाजवळ ठेवील. खिडक्या उघडया टाकील, घाण असली तर दूर करील, काही औषध सांगेल, जवळ असेल तर देईल, मुलांना गोष्टी सांगेल. कोणाला खाऊ देईल, अशा रितीने त्याचा वेळ जाई. अकरा वाजेपर्यंत सर्व दरिद्रीनारायणाच्या वस्तीतून हिंडून आल्यावर तो स्नान करी. नंतर प्रार्थना करून जेवे. थोडा वेळ वामकुक्षी करी. नंतर काही वाची. पुन्हा एकदा गावातून हिंडून येई. सायंकाळी घरी येई. पुन्हा झाडांना, फुलझाडांना पाणी. नंतर बाहेर खाट टाकून पडे. जेवण व प्रार्थना झाल्यावर तो बाहेरच निजे. पाऊस असला तरच तो आत निजे. बाहेर खाटेवर पडून आकाशातील मंगल व पवित्र तारे पाहात पाहात तो झोपी जाई. साधू म्हणे, 'माझं काम एकच. दिवसा पृथ्वीवर फुलं फुलवणं व रात्री देवाच्या अंगणात आकाशातील फुलं बघणं.' साधू याप्रमाणे खरोखर वागे. तो पहाटे व सायंकाळी फुलझाडांना पाणी घालून त्यांच्यावर फुले फुलवी. इतकेच नव्हे तर गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन तेथील स्त्री-पुरुषांना, लहानथोरांना सहानुभूतीचे पाणी देऊन त्यांची जीवने फुलवी, त्यांची मुखकमले फुलवी.साधूची मोठी बहीण होती ती विधवा होती. तिला ना मूल ना बाळ. ती आपल्या भावाला मदत करी. तिचे त्याच्यावर फार प्रेम. त्याचे दुखले खुपले ती बघे. स्वयंपाक करी. मिळेल वेळ तेव्हा जप करीत बसे.
साधूच्या घराला कधी कुलूप नसे. तो प्रथम कडी लावी; परंतु पुढे कडी-कोयंडेही त्याने काढून टाकले. 'आपल्याला कसलं भय? आहे काय आपणाजवळ?' असे तो म्हणे. एखादे वेळेस ताई त्याला रागावे. 'तुला व्यवहार अगदीच कळत नाही' असे म्हणे; परंतु साधू हसे, गोड हसे.आजही साधूचा तो कार्यक्रम सुरू झाला. तो फुले तोडीत होता. घरात ताई उठली. तिने चूल सारवली. सडासारवण तिने केले. ती चांदीची भांडी नीट पुसून कपाटात ठेवावी म्हणून ती आली. चांदीची भांडी दिसत ना! तो पाहुणाही कोठे दिसेना. 'भाऊ, अरे भाऊ!' तिने हाक मारली.'काय ग ताई?' 'ते पाहुणे कुठं गेले?''अकस्मात आले. अकस्मात गेले. आपल्याकडून त्यांची अधिक सेवा व्हायची नव्हती. दुर्दैव आपलं.''खरंच दुर्दैव. अरे, तो लफंग्या होता. बहुतकरून चांदीचं ताट व दिवा घेऊन गेला! घरात दोन्ही वस्तू नाहीत. चोर असावा तो.''तरी तुला कधीपासून मी सांगत होतो की, या दोन वस्तू विकून टाकाव्या व पैसे गरिबांना द्यावे; परंतु तू ऐकलं नाहीस. प्रेमाच्या देणग्या का कुणी विकतो, असं आपलं तुझं सदानकदा सांगणं. आपल्या घरात त्या वस्तू होत्या, म्हणून ना चोरी करण्याचा त्या पाहुण्याला मोह झाला? आपणच वाईट. गरीब लोक जगात उपाशी असता घरात सोनं-चांदी ठेवण्याचा अधिकार काय? ती गरिबांना रोटी आपण चोरून ठेवली होती. ताई, बरं झालं. घर निर्मळ झालं! आपल्यामुळं त्या पाहुण्याच्या हातून चूक झाली. आपला दोष; परंतु आता काय करायचं? असो.'''तू घरात वाटेल त्याला घेतोस. मनुष्य कोण कसा असेल याचा विचारही तू करीत नाहीस. तू अगदी बावळट आहेस. जरा तरी विचार नको का करायला?''ताई, आपण स्वत: वाईट नाही ना वागत, एवढाच माणसानं विचार करावा! दुसर्यांची चिकित्सा मी कशाला करू? मला माझं जीवन निर्मळ करू दे. जगाला आपण चांगलंच म्हणावं. आपली श्रध्दा जगावर लादावी. आपला संकल्प जगावर लादावा. त्याचा आज ना उद्या केव्हा तरी परिणाम होईल. आपण अविश्वासी माणसावरसुध्दा विश्वास टाकावा. त्याचा केव्हा तरी सत्परिणाम झाल्यावाचून राहाणार नाही. मनुष्याला सुधारायला हाच मार्ग. असो. मी आता जातो.'
'भाकर खाऊन जा. विसरलास वाटतं?' 'कर लवकर.'बहीणभावांचे असे बोलणे चालले होते, तो तिकडून काही पोलीस एका माणसाला मारीत मारीत आणीत होते. ते साधूकडे येत होते. साधू अंगणात उभा राहिला. ताईही तेथे उभी राहिली.'का मारता? मनुष्याला पशूप्रमाणं वागवू नये!' साधू म्हणाला.'साधूमहाराज, यानं तुमच्याकडच्या वस्तू चोरल्या आहेत. चांदीचं ताट व चांदीचा दिवा. त्यांच्यावर तुमचं नाव आहे. हा चोर आहे. मोठा बदमाष आहे. कालच तो सुटला. आम्ही त्याच्या पाळतीवरच होतो. गावात त्याला कुठं जागा मिळू दिली नाही. तुम्ही त्याला जागा दिलीत, परंतु जिथं जेवला तिथं *** फ़टके मारले पाहिजेत हरामखोराला!' मुख्य पोलिस म्हणाला.'मी यांना ओळखतो. माझ्याकडे ते रात्री झोपले. मीच त्यांना ते ताट व तो दिवा देऊन टाकला. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी कुठं जावं? जवळ एक दिडकी नाही. मी त्यांना या दोन वस्तू देऊन म्हटलं, या वस्तू विका. जे पैसे मिळतील त्यांच्या आधारे काही उद्योग करा. भाजीपाला विका. चिवडा-शेव विका. काही प्रामाणिक उद्योग करा. त्यांनी या वस्तू चोरलेल्या नाहीत. उगीच संशयावरून त्यांना मारलंत. आधी तुम्ही मला विचारलं पाहिजे होतंत. सोडा त्यांना. एकदा कानफाटे नाव पडलं म्हणजे कायमचं पडतं. मनुष्य का नेहमीच वाईट असतो? आपल्या अशा दुष्ट वर्तनानं मात्र निराश होऊन तो खरोखरच वाईट बनेल. एवीतेवी चोर चोर नेहमी म्हणतात, तर करूच या चोरी; एवीतेवी दुष्ट दुष्ट म्हणतात, तर होऊच या दुष्ट, असं मनुष्य म्हणू लागतो. म्हणून दुसर्याविषयी नेहमी सत्संकल्प करावा. असो. जा तुम्ही. सोडा त्याच्या दंडाच्या दोर्या.' साधू म्हणाला.'मग हा सांगत होता ते खरं एकूण?' पोलिस म्हणाले.
'काय सांगत होता?' साधूने विचारले.
'की त्या साधूबोवानं मला या दोन्ही वस्तू दिल्या आहेत. मी चोरल्या नाहीत, परंतु त्याच्या सांगण्यावर आमचा विश्वास बसेना. आता तुम्हीच सांगत आहा तर सोडतो याला; परंतु साधुमहाराज, जग काही फार चांगलं नाही.''ते चांगलं केलं पाहिजे. त्याला प्रेम हाच मार्ग.' साधू म्हणाला.पोलिस निघून गेले. तो चोर तेथे उभा होता. त्याची मान खाली झाली होती. त्याच्या डोळयांतून पाणी येत होते.'गडया, हे पाणी तात्पुरत्या पश्चात्तापाचं न होता खर्या शेवटच्या पश्चात्तापाचं असू दे. तुझा आत्मा आज मी वाचवला आहे. पुन्हा तो मलिन होऊ देऊ नको. समजलास ना? तुझ्यासाठी काल रात्री प्रार्थना केली. पुन्हाही करीन.'असे म्हणून साधूने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. तो चोर ते दिवा-ताट परत देऊ लागला. 'नकोत ती. खरंच मी तुला दिली आहेत. जा आता. तुझं नाव काय?' साधूने विचारले.'वालजी' असे तो थरथरणारा चोर म्हणाला. साधू कामाला गेला. ताई घरात गेली. वालजीही कृतज्ञतेने ओथंबून निघून गेला.