Kavale - 5 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | कावळे - 5

Featured Books
Categories
Share

कावळे - 5

कावळे

पांडुरंग सदाशिव साने

५. दुर्दैवी मानव

यमराज, त्याचा महिष आणि हे कावळ्यांचे शिष्टमंडळ देवलोकात येऊन दाखल झाले. तो त्यांना कोलाहल व आरडाओरडा ऐकू आला. मानवांची अफाट गर्दी दिसू लागली. ईश्वराचे दूत त्यांना भराभर खाली लोटत होते. तो पहा एक गयावया करीत आहे. अहो माझ्या मालकीच्या 30 गिरण्या आहेत. हजारोंना मी पोटास दिले. मला घ्या आत.

फेका याला; म्हणे हजारोंना खायला दिले. परंतु लाखोंना बेकार केलेस ते? त्यांना खेड्यापाड्यांतील हवेतून दूर शहरात आणून त्यांचे आरोग्य बिघडवलेस. देवाने दिलेली शरीरे लौकर विशीर्ण केलीस. त्यांना व्यसनांत पाडलेस. तू चैनीत लोळलास, पोटाला नको असता खाल्लेस, लोक उपाशी मरत होते आणि तू लाडू-जिलब्या झोडीत होतास. लोक थंडीने कुडकुडत मरत होते आणि तू हजारो रुपये कपड्यांत दडवीत होतास. फेका, पाप्याला फेका. हजारो, लाखो मुलाबाळांच्या हाय! हाय!यांच्यावर आहेत. दुर्भिक्ष्य, चो-या, अनीती याला हा जबाबदार आहे. फेका.तो लक्षाधीश चेंडूसारखा फेकला गेला. इतरांची तीच दशा.

ते कोणी मुत्सद्दी आहेत वाटते. ते म्हणत आहेत –‘मी तर राष्ट्राचा फायदा केला. आमच्या व्यापाराला दुस-या देशांत सवलती मिळवल्या. मला देशभक्ताला आत सोडा. मला देवाजवळ जाऊ दे.

फेका खाली या करंट्याला. देशभक्ता ही येथे शिवी आहे. दुस-या राष्ट्रांच्या माना मुरगळल्या, त्यांचे धंदे बसवले, त्यांना गुलाम केले! आपल्या लोकांचे गगनचुंबी बंगले उठवलेस आणि गरिबांच्या झोपड्यांना आग लावलीस! ही तुझी देशभक्ती! हजारोंना मरायला पाठवलेस आणि तू चोरा, मागे राहिलास. देशभक्त म्हणे! ठेचा याला आधी. अनेक जन्म हा लायक व्हायचा नाही.

अहो मी प्रोफेसर होतो. माझा सात्विक धंदा. मला घ्या आत.एक प्रोफेसर म्हणाले.

प्रोफेसर होतास? मग ज्ञानात काय भर घातलीस? ज्ञानात किती रंगलास? ज्ञानासाठी किती वेडा झालास? नोट्स लिहून दिडक्या मिळवणारा तू. ज्ञानाची विक्री करणारा तू का आचार्य? विद्यार्थ्याला उदात्त ध्येय दाखवलेस? ज्ञान म्हणूजे काय थट्टा? ज्ञान म्हणजे जीवनाचे दान आहे. तू काय केलेस? फेका, फेका या करंट्याला. विद्यार्थ्यांना गुलाम करणारा. दुस-याच्या नोक-या करा, मिंधे व्हासांगणारा! जा किड्या. हजारो जन्म खितपत पड. रड. जा.

मी वकील होतो. मी न्यायाच्या कामी मदत केली.एक वकील म्हणाले.

फेका याला. न्याय म्हणजे काय रे? पैसेखाऊ चोरा! भांडणे तू लावलीस. ख-याचं खोटे नि खोट्याचे खरे तू केलेस. सदसद्विवेक बुद्धि गुंडाळून ठेवलीस. असत्याची पूजा सुरू केलीस. हा काय न्याय? गरिबांना लुटून बंगले उभारलेस, त्यांना रडवून पुन्हा त्यांचा हितकर्ता म्हणून मिरवलास. कर तोंड काळे!हे कोण? यांचे तोंड सांगत आहे हे कोण ते. यांनी स्त्रियांना छळले, रडवले. त्यांना मारले. तोडा याचे हात; फेका खाली!

अशा रीतीने पंड्ये, भटजी, व्यापारी, जागीरदार भरभर खाली फेकले जात होते. ते पहा एक गलेलठ्ठ संन्यासी येत आहेत. अरे, त्यांना इकडे नका आणू. त्यांना डाग द्या. विषयात रंगलेला, घृतकुल्या मधुकुल्या करणारा! हा संन्यासी फेका त्याला.

मी गरीब कारकून. मी काय करू?” एक कारकून म्हणाला.

कारकून ना? पाप्याला साहाय्य करतो तोही पापीच. फेका यालाही.देव म्हणाला.

***