रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. "अजुन कसा आला नाही बरे हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच मिनिट हजर असतो". पंधरा मिनिट होऊन गेले तरी आला नव्हता. रेवतीने बॅगेतून मोबाईल काढला आणि फोन लावू लागली. पण फोन संपर्क क्षेत्राबाहेर होता. तिला वाटले गाडी चालवत असेल किंवा रेंज नसेल.. म्हणून ती तशीच परत वाट पाहत उभी राहिली. अर्धा तास झाले तरी सुहासचा काही पत्ता नव्हता. आता मात्र तिचा जीव घाबरा घुबरा होऊ लागला. तिने परत फोन लावण्याचा प्रयत्न केला.. परत लागला नाही. काही कळण्यास मार्ग नव्हता. "हा मुलगा आहे कुठे? ही काय पद्धत असते का. एक फोन तरी करायला हवा होता. मोबाईल असून काय उपयोग.. तो ही लागत नाही आहे". एक तास होऊन गेला होता.. आता मात्र रेवतीला रडू येऊ लागले. तिला कळेना सुहासला संपर्क कसा करावा. तो सुखरूप तर असेल ना.. अपघात वगैरे.. नाही नाही असे काही नसेल. म्हणतात ना "मन चिंती ते वैरी ही ना चिंती". पण या मुलाला संपर्क करायचा तरी कसा. विचार करत करतच तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
ती तशीच परत हॉस्टेलवर आली. पण काही केल्या तिला चैन पडेना. तिच्या डोक्यात आले की त्याच्या मित्राला विचारावे. पण नंबर कुठे होता तिच्याकडे. तिने इंटरनेट ऑन केले. फेसबुक वर गेली. त्याच्या फ्रेंडलिस्ट मधून त्याच्या जिवलग मित्र प्रतीकचा नंबर शोधून काढला. त्याला फोन लावला. प्रतीकने तिला जे सांगितले ते ऐकून बोलत बोलतच ती चक्कर येऊन पडली. प्रतीक तिकडून हॅलो हॅलो म्हणत राहिला..
रेवतीला तिच्या मैत्रिणींनी चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा करून जागे केले. ती जागी झाली तसे तिला प्रतीकचे शब्द आठवले. तिने स्वतःला सावरले आणि ती हॉस्टेल मधून बाहेर पडली ते थेट संजीवनी हॉस्पिटल मधे गेली. ती गेली तर सुहासला बेडवर पाहून तिला खूप कसे तरी होऊ लागले. प्रतीक बसला होता त्याच्या उशाशी. रेवतीला पाहताच तो उठला. ती सुहास जवळ येऊन बसली. सुहास अजुनही बेशुद्ध होता. हाता-पायाला फ्रॅक्चर आणि डोक्याला ही जोराचा मुक्कामार लागला होता. नशीब डोक्याला जास्त लागलेले नव्हते. तिला ती अवस्था पाहून रडू कोसळले. पण आपण हॉस्पिटल मधे आहोत हे लक्षात येऊन तिने स्वतःला सावरले. तिने प्रतीकला विचारले की अपघात कसा झाला. त्याने सर्व प्रसंग वर्णन करून सांगितला.
“लोक कसे काय दुसर्याचा विचार न करता गाड्या चालवतात देव जाणे” असा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिने तो प्रतीकला बोलूनही दाखवला.
तेवढ्यात डॉक्टर राउंड साठी आले. रेवती बेडपासून दूर जाऊन उभी राहिली. प्रतीकने डॉक्टरांना विचारले की किती दिवस हॉस्पिटल मधे राहावे लागेल सुहासला.. खाण्या-पिण्याचे पथ्य असेल का.. गोळ्या-औषधे,फळे तो मगाशीच घेऊन आला होता. तो डॉक्टरांशी बोलत बोलतच बाहेर गेला.
तो परत आल्यावर रेवतीने त्याला त्याच्या आई-बाबांना कळवलेस का विचारले. प्रतीकने सांगितले ते निघाले आहेत. पोहोचतीलच इतक्यात. रेवतीला बरे वाटले की त्याची काळजी घ्यायला त्याचे आई-बाबा असतील. तसे ही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजुन दोघांच्या ही घरी सांगितले नव्हते. म्हणून तिला कितीही वाटले तरी ती हॉस्पिटल मधे राहू शकत नव्हती. ते येण्यापूर्वी तिला निघणे भाग होते. प्रतीकला सुहासची काळजी घेण्यास सांगून.. एमर्जेन्सी आली तर कळव आणि तब्बेतिबद्दल कळवत राहा असे सांगून सुन्न अंतकरणाने..जड पावले टाकीत..डोळ्यांच्या किनारा भिजवीत रेवती हॉस्टेलवर येण्यास निघाली.
हॉस्टेल वर पोहोचली तरी तिचे लक्ष सगळे सुहासकडेच होते. त्याला शुद्धा आली असेल का.. त्याने काही खाल्ले असेल का.. त्याचे आई-बाबा आले असतील का.. एक ना अनेक विचार तिच्या डोक्यात घोळत होते..