Sarasvati in Marathi Short Stories by Aaryaa Joshi books and stories PDF | सरस्वती

Featured Books
Categories
Share

सरस्वती

विवाह सोहळा सुरू होत होता. सनातनी पद्धतीने वत्सलेचा विवाह केशवरावांशी होत होता. सगळे पुरुष नातेवाईक जमले होते. सरस्वती ही होतीच घरची करवली म्हणून.विधींना सुरुवात करण्यापूर्वी केशवरावांचे वडील बंडोपंत, वत्सलेच्या वडिलांना घेवून थोडे मंडपाच्या बाहेर आले. सर्व जमलेल्या मंडळीत चर्चा सुरू झाली. तसही सरस्वतीच्या येण्याने कुजबुज झाली होतीच त्यात ही भर पडली.
ब्रिटिशांच्या अंमलाखाली सनातनी आणि सुधारणावादी अशा दोन वर्गांचे अस्तित्व समाजात ठळकपणे दिसू लागले होते. बंडोपंत आणि त्यांचे कुटुंब हे सनातनी वळणाने जाणारे. हुंडा द्यायचा नसला तरी रूपाने बेतासबेत असलेल्या  वत्सलेच्या रूपापोटी तरी तिच्या वडिलांनी काहीतरी वरदक्षिणा द्यावी असा आग्रह केशवरावांच्या वडिलांनी धरला.वत्सलेचे वडील चिंतेत पडले... अहो तुम्ही सुधारक समाज मंडळीत एकीकडे व्याख्याने देत असता आणि दुसरीकडे हे असे विचार!!! त्यातूनही आमची कन्या रूपाने डावी आहे हे तुम्हास आधीच माहिती होते!!! आता भर मंडपात ही सर्व चर्चा!!!
प्रश्न तत्वाचा आहे बंडोपंत. आम्ही वधूपक्षाची मंडळी म्हणून हे स्वीकारूही लेकीच्या भल्यासाठी... पण तुमचे चिरंजीव घरची शेतीवाडीही पाहत नाहीत. शिक्षणही सुमार आहे.असे असताना आम्हीही आमच्या मुलीला समजावले आहे. आमच्या घरात आम्ही सुधारकी वळणाची पुरोगामी मंडळी आहोत त्यामुळे तिचे लग्न लहान वयात लावले नाही इतकेच..
पण बंडोपंत या बोलण्याने अपमानित झाले... हा विवाह होणे नाही....
आत खालमानेने आत्याजवळ बसलेली वत्सला या वाक्याने भेदरून गेली... कुटुंबाचा अपमान आणि समाजात कटुता... नानांचे काय झाले असेल या वाक्याने????
ते ऐकून सरस्वती मात्र सरसावली...
दाराआडूनच नेमकं पण ठामपणे म्हणाली" लहान तोंडी मोठा घास घेते आहे म्हणून क्षमा करा. पण आता काळ बदलतो आहे. त्यामुळे वरपक्षानेही विचार करायला हवा... बाहेर आपले धोरण एक आणि कुटुंबात एक असे हे वागणे झाले आहे... हे समाज मंडळीत पसरायला वेळ लागणार नाही.त्यामुळे उभय कुटुंबाच्या हिताचा विचार करता हा विवाह विनाशर्त पूर्ण होणे योग्य वाटते...
सरस्वतीचे वडील आबासाहेब केळकर या अचानक वक्तव्याने चकीत झाले.
तिच्या बोलण्यावर सर्वजण चपापले असतानाच आबासाहेबांनी बंडोपंतांची माफी मागण्यासाठी पुढे यायचं ठरवलं... तोच.,.
दिनकर वझे पुढे आला.... वकिलीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेला दिनकर... थोडा प्रौढत्वाकडे आलेला पण उमदा... रुपाने डावाच पण कर्तृत्वाने करारी... समाज मंडळामधे त्याची व्याख्याने लोकप्रिय होत होती. ब्रिटीशांचा अंमल झुगारून देण्यासाठी ज्या योजना होत होत्या त्यात दिनकरही होता.. पण तो आपल्या संयमाने आणि हुशारीने काम करीत असल्याने त्याच्याबद्दल कोणताही पुरावा हाती मिळत नव्हता... त्याचा जिवलग मित्र गंगाधरही त्याच्यासोबत या सर्व मोहिमेत होताच..
दिनकरने सरस्वतीचं म्हणणं योग्य आहे आणि बंडोपंतांनीही ते मान्य करावं असं निग्रही शब्दात सांगितलं....
पुढे चर्चा होणे नव्हतेच...
विवाह पार पडला.. 
दाराआडून सरस्वतीने डोकावून पाहताना तिची आणि दिनकरची क्षणिक नजरानजर झाली.....
सरस्वतीला आबासाहेबांनी मुलाप्रमाणेच लहानाची मोठी केली.. भरल्या घरात सुखवस्तू कुटुंबात सरस्वतीला मोठ्या भावानेच घरी शिकवलं... तिची आईही थोडंफार शिकली होती...
मुंबई ईलाख्यातून आवर्जून पुस्तकं मागवून आबासाहेबांनी आपल्या लेकीला लिहितं वाचतं केलं. वेगवेगळी नियतकालिकं वाचायला शिकवलं.आजूबाजूला घडणार्‍या घडामोडींवर ते तिच्याशी बोलत असत. परकरातून ही पोर नऊवारीत आल्यावर लग्नासाठी मागण्या येऊ लागल्या पण मला योग्य वर सापडेपर्यंत मला लग्नच नाही करायचं हे सरस्वतीचं ठाम मत..
आई अन्नपूर्णाबाई या प्रकाराने व्यथित होत असे.अशाने एखादा म्हातारा बीजवरच मिळेल हो सरू... पण आबासाहेब ठाम होते.
गोड गळ्याची सुस्वरूप सरु पहाटे विठ्ठलाच्या मंदिरात अभंग गाई, जात्यावर दळताना ओव्या म्हणे आणि दादाबरोबर इंग्रजीत तिला बोलताही येत असे...
एकूणातच काळाच्या थोडं पुढे असलेली सरु आणि तिचे आबासाहेब...
या घटनेनंतर घरात सरूच्या धिटाईची चर्चा झाली नसेल तर नवलच...
सरुची मैत्रीण म्हणजे शेजारची रुक्मिणी... दोघी सोबतीच्याच. रुक्मिणीचं लग्न खूप आधी झालं होतं आणि आता रूक्मीणी गरोदरपणासाठी माहेरी आली होती.शेजारच्याच गावात दिली होती..
सरु दोन दिवस झाले... काहीतरी बिनसलय तुझं....
छे ग.. वत्सलाच्या लग्नाने अस्वस्थ आहेस नं... नको काळजी करूस... पण सरुची सावित्री झाली होती... सत्यवान क्षणभरच दिसला पण मनाचा ठाव घेऊन गेला..
घरी येऊन पाहते तो गंगाधर आणि नानासाहेब वझे घरात... ती मागल्या दारातून आत गेली...
हातपाय धुते तोच आईची हाक आली...
सरू जाऊन फक्त पाया पडून आली... गोधळलेल्या चेहर्‍याने तिने गंगाधरकडे पाहिलं... काही कळेना...
आत गेली धडधडत्या हृदयाने...
आई.... तू गप गं... आबा बोलत आहेत नं... जा वर माडीवर जाऊन बैस बरं...
रात्री आबांनी तिला बोलावलं... सरु दिनकररावांचं स्थळ आलं आहे.....
तिला गारठून गेल्यासारखंच झालं... हे खरं आहे का??? मनात मोर नाचायला लागले...
थोडं अधिक अंतर आहे वयात आणि त्यांची पहिली पत्नी बालपणीच निवर्तली आहे.संसारसुख माहितीच नाही. शिक्षणही उत्तम आहे आणि कर्तृत्व लौकिकही....
सरु.... तू काही बोलत नाहीस....
आबा....  
अग तुझा करारीपणा त्यांना भावला आहे.अशाच मुलीच्या शोधात होते ते.पण दिनकररावांना शिकलेली आणि संस्कारी पत्नी हवी म्हणून अनेक सुस्वरुप आणि खानदानी मुली नाकारल्या त्यांनी.एका टप्पायावर त्यांचं लग्न होणार की नाही अशीच विवंचना होती... पण तू भावली आहेस त्यांना... पण एक अडचण आहे....
त्यांना विवाहापूर्वी तुला भेटायचं आहे... आपल्याकडे अशी  रीत नाही बाळा... तुझ्या आईला ते पटणार नाही आणि आजीलाही...
गंगाधर योग्यवेळी चित्रात आला. महाशिवरात्रीला भरणार्‍या उत्सवात तो निधर्मी दिनकराला घेऊन आला... सरुला तिचा दादा घेऊन आला...
पारापाशी भेट झाली... काही क्षणच...
तुम्हाला हे लग्न मान्य आहे नं सरस्वती???
मला माझ्या स्वातंत्र्यकार्यात पाठिंबा देणारी, घरातच का होईना पण माझ्याकडून शिकू इच्छाणारी आणि स्वतच्या विचारांनी वागणारी पत्नी मला हवी आहे. मी दुर्दैवाने बीजवर आहे पण मला माझ्या पहिल्या पत्नीचा फक्त खेळकर चेहराच आठवतो. लग्नाच्या दिवशी पाहिली.त्यानंतर दुसर्‍या दिवशी माहेरी गेली.पंधराव्या दिवशी तिला खेळताना घेरी आली आणि पडली तोच गेली... तिच्या माहेरहून निरोप यायलाही दोन दिवस गेले. मीही शाळकरी वयातच होतो.
न्यायममूर्ती रानडेंसारख्यांच्या सहवासात मीही सुधारकी विचारांचा झालो आहे.अभ्यासातून विचारातून काहीसा कठोरही आहे मी...पण मृदुपणाची कसर तू भरून काढशील....
मला मान्य आहे.....
सरुचा आश्वस्त चेहरा आबासाहेबांना दिलासा देऊन गेला... वझे कुटुंबही आता सरूच्या सुमंगली पावलांची वाट पाहू लागलं....
आणि एका संध्याकाळी सरस्वती दिनकररावांची प्रेरणा बनून वझ्यांच्या घरात आली... शिवमंदिराच्या दारातला पिंपळ हसला आणि लग्नघरातून परत जाणारा गंगाधरही...