त्या तरुणीला सोफ्यावर ढकलुन तो दुकानवाला निघुन गेला.
कबिरचं डोकं सॉल्लीड ठणकत होतं, त्यातच त्या तरुणीला जिना चढवुन आणल्याने त्याला सॉल्लीड धाप लागली होती. डोक्याला हात लावुन तो खुर्चीत बसतच होता तोच त्याचा फोन खणखणु लागला. चार शिव्या हासडत त्याने फोन उचलला..
“कबिर सर.. रोहन बोलतोय…, काय म्हणतंय गोवा…”
धाप लागल्याने कबिरला निट बोलताच येत नव्हते.. “ठिक.. ठिके.. ठिके गोवा…”
“अरे काय रे? काय झालं?”, रोहनने काळजीच्या सुरात विचारलं..”अश्या धापा का टाकतोयेस…? एव्हरीथिंग ऑलराईटना?”
“एक मिनीटं थांब, मी जरा पाणी पितो आणि मग बोलतो ओके?”, कबिर..
“ओके.. ओके, मी होल्ड करतो..”, रोहन म्हणाला
टेबलावरचा पाण्याचा जग कबिरने तोंडाला लावला, गटागटा पाणी प्यायल्यावर त्याला थोडी हुशारी आली..
हनुवटीवर ओघळलेले पाणी हाताने पुसत त्याने परत फोन कानाला लावला..”हं..बोल..”
“काय झालं.. सगळं ठिक आहे ना? हॉटेल मस्त आहे कि नै..”, रोहन
“तोंड उघडायला लावु नको माझं त्या हॉटेलचं नाव काढुन..”, कबिर संतापाच्या स्वरात म्हणाला…
“म्हणजे..?”
“सांगतो.. सगळं सांगतो..”, असं म्हणुन गोव्याला आल्यापासुन ते त्या तरुणीला खोलीमध्ये आणेपर्यंतचा सगळा वृत्तांत त्याने रोहनला ऐकवला..
“च मायला.., म्हणजे ती तरुणी आत्ता तुझ्या रुम मध्ये आहे?”, रोहन
“हो ना.. अरे तो म्हातारा ऐकायलाच तयार नाही.. आणि तिला असं रस्त्यावर एकटीला सोडुन येणं…”
“ते ठिके रे.. पण.. कशी आहे दिसायला.. म्हणजे..”
“सोड ते.. मला तर कॉल गर्ल वाटतेय.. नकोच ती ब्याद.. शुध्दीवर आली की लगेच देतो घालवुन..”
“लेका.. नशिबाने संधी दिलीय.. घाई करु नकोस.. मी काय म्हणतो..”
“ओह शिट्ट..”, कबिर अचानक किंचाळलाच…
“काय रे.. काय झालं असं ओरडायला..”, रोहन
“अब्बे.. काही तरी झोल आहे.. तिचे केस…”, कबिर खुर्चीवरुन हळुच उठत म्हणाला…
“काय झालं तिच्या केसांना?”,
एव्हाना कबिर त्या तरुणीच्या जवळ गेला होता…
“अबे खोटे आहेत ते केस..”
“कश्यावरुन..”, रोहनची उत्सुकता ताणली गेली होती..
“अरे कश्यावरुन काय.. ते निळसर केस एका बाजुने निघाल्यासारखे वाटताएत..आणि…”
“अरे असा थांबु नको.. आणि काय…?”
“आईच्या गावात रोहन.. गळ्यात मंगळसुत्र आहे.. पायात जोडवी… च्यायला मॅरीड आहे कोण तरी..”, कबिर
“कबिर, मला वाटतं घरातुन पळुन वगैरे आलेली केस आहे.. कोणी ओळखु नये म्हणुन हा असला गेट-अप केला असेल..”
“असेल रे.. मला पण तसंच वाटतंय..”, कबिर
“कबिर, मला वाटतं, तुला तुझी स्टोरी सापडली.. स्टे विथ हर… बघ काय झोल आहे..”, रोहन
“ए प्लिज.. असला फालतु पणा मला जमणार नाही, आणि मला ‘दिल है के मानता नही’, ‘जब वुई मेट’ वगैरेंसारखी कथा तर बिलकुल लिहायची नाहीए..”, कबिर भडकुन म्हणाला..
“कबिर.. एक काम कर.. तिची पर्स उघड.. बघ लायसन्स वगैरे काही आहे का? तिचं नाव, गाव, पत्ता वगैरे कळेल तरी..”, रोहन
“गुड आयडीआ.. होल्ड कर…”
फोन कान आणि खांद्याच्या मध्ये अडकवुन कबिर सावकाश त्या तरुणीपाशी गेला.. तिची पर्स सोफ्याच्या खालीच पडली होती. कबिरने ती पर्स अलगद उघडली आणि तो आतमध्ये लायसन्स शोधु लागला. त्याचवेळी ती तरुणी अचानक उठुन बसली. कबिर फोनवर बोलत असतानाच ती तरुणी शुध्दीवर येत असलेली कबिरला दिसलेले नव्हते.
थाड्कन तिन कबिरच्या हातातली पर्स हिसकावुन घेतली. कबिर काही बोलणार ह्याच्या आतच त्या तरुणीने पर्समधुन एक स्प्रे-सदृश्य बाटली बाहेर काढली आणि कबिरच्या डोळ्यात फवारली.
लक्षावधी मुंग्या डोळ्याला चावाव्यात तश्या वेदना कबिरला झाल्या आणि तो किंचाळत मागे सरकला. त्या तरुणीने त्याला जोरात भिंतीवर ढकलले आणि पर्स उचलुन तिने खोलीच्या बाहेर पळ काढला.
बेसावध कबिरचे भिंतीवर जोरात डोकं आपटलं आणि त्याची शुध्द हरपली..
नक्की काय घडतंय ह्याचा अंदाज नसलेल्या रोहनचा फोनवर “हॅलो.. हॅलो कबिर.. आर यु ओके?.. कबिर.. काय झालं कबिर..” एव्हढाच आवाज त्या शांत खोलीमध्ये ऐकु येत होता.
“कबिर, अरे बोल काहीतरी, असा मख्खा सारखा नको बसुन राहुस नुसता…”, मोनिका कबिरला म्हणत होती
“मग काय करु म्हणतेस? तुझ्यासारखा आक्रस्ताळेपणा करु?”, कबिर..
“आक्रस्ताळेपणा? कबिर मी जस्ट बोलतेय तुझ्याशी..”, मोनिका
“इट्स वन अॅन्ड द सेम..”, कबिर
“कबिर प्लिज.. खरं सांग काय प्रॉब्लेम आहे तुझा? का वागतो आहेस असा तु? माझं काही चुकलं असेल तर तसं सांग… गप्प राहुन प्रश्न सुटणार नाहीएत कबिर..”
“खरं आहे मोना, गप्प राहुन प्रश्न सुटणार नाहीत.. पण मला प्रश्न सोडवायचेच नाहीएत. माझं काही चुकलं असेलच तर, मी इतके दिवस गप्प राहीलो, पण…”
“ओह, म्हणजे तुला म्हणायचंय काही चुकलं असेल तर माझं.. तु १००% बरोबर.. असंच ना?”
“कोण चुक? कोण बरोबर.. मला ह्यात पडायचं नाहीए मोना. जसं मी तुला समजुन घेतो तसंच तु मला घ्यावंस एवढीच माझी अपेक्षा आहे. मान्य आहे, बर्याचदा तुझ्या पार्टींमध्ये मी एकटाच कोपर्यात बसुन असतो. पण मी एक लेखक आहे मोना.. बर्याचदा पुढची कथा मला काळ-वेळ न ठरवता सुचते. अश्यावेळी मला खरंच एकांत हवा असतो. कित्तेकदा आपण फिरायला जातो तेंव्हा तु काही सुंदर गोष्टी असतील तर फोटो काढण्यात मग्न होतेसंच ना? इतकी की तुला माझा विसर पडतो.. मग तेंव्हा मी दोष देतो का तुला? नाही.. कारण आय कॅन अंडरस्टॅन्ड कॅमेरा इज युअर फिल्ड..”
“इनफ़ कबिर.. आय गेस.. आपण ह्यावर कित्तेक महीने, वर्ष वाद घालत बसु आणि त्यातुन निष्पन्न मात्र काही होणार नाही.. सो आय गेस.. आपण इथेच थांबाव.. तुला तुझा मार्ग मोकळा आहे.. मला माझा…”
कबिरच मन आतुन आक्रंदत होतं, मोनाला थांबवावं, तिला नेहमीप्रमाणे समजावुन सांगावं, तिला मिठीत घ्यावं.. तिच्या कुरळ्या कुरळ्या केसांमध्ये आपली बोटं गुंतवावीत.. पण त्याला हे सुध्दा माहीती होतं की, कदाचीत नेहमीप्रमाणे ह्या वेळेस सुध्दा मोना थांबेल.. त्यांच्यातले हे भांडण मिटेल.. पण पुन्हा कधीतरी दोघांमधील स्वभावातला फरक भांडणांच्या रुपाने उफाळुन येणारच. गेले काही महीने ह्या ना त्या कारणाने दोघांमधल्या कुरबुरी वाढल्याच होत्या आणि त्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग कबिरला आता सुचत नव्हता..
कदाचीत.. कदाचीत मोना म्हणत होती तोच योग्य मार्ग होता..
कबिर काहीच बोलला नाही.
“ऑलराईट मिस्टर रायटर… गुडबाय देन…”
मोनिकाने घराचे दार उघडले, एकवार कबिरकडे पाहिले आणि धाडकन दार लावुन ती निघुन गेली.
दाराच्या आवाजाने कबिर एकदम जागा झाला. आपण कुठे आहोत त्याला काहीच सुधरत नव्हते. भिंतीवर डोकं आपटुन शुध्द हरपल्यावर कबिर आत्ता शुध्दीवर आला होता. त्याचं डोकं अजुनही ठणकत होतं.
“सर.. ब्रेकफास्ट रेडी आहे..” बाहेरचा दरवाजा अजुनही वाजत होता..
“हम्म.. येस.. येतो मी..”, कबिर जमीनीवरुन उठुन बसला. डोळ्यात तिखटाचा स्प्रे गेल्याने डोळे भयानक चुरचुरत होते.
भिंतीचा आधार घेत कबिर बेसिनपाशी गेला आणि थंड पाण्याचे ५-६ सपकारे त्याने चेहर्यावर मारले.
त्याने घड्याळात नजर टाकली, सकाळचे ८.३० वाजुन गेले होते. रुम सोडायला फक्त २ तास उरले होते. गोव्यात आल्यापासुन एक गोष्ट धड होतं नव्हती. आधी त्या सो-कॉल्ड इंटरनॅशनल हॉटेलमधला घोळ, मग इथे ते टॅक्सीचे दार डोक्यावर काय आपटले.. ती चित्र-विचीत्र फॅशन केलेली तरुणी.. तिच्या भल्यासाठी म्हणुन कबिर तिला रुम वर घेऊन येतो काय, ती कबिरच्या डोळ्यात तिखटाचा स्प्रे मारते काय, कबिर भिंतीवर आपटुन बेशुध्द होतो काय आणि आता २ तासात आवरुन पुन्हा रुम शोधण्याच्या तयारीला लागतो काय.
कुठुन त्या मेहता आणि रोहनचं ऐकुन इथं आलो असं त्याला क्षणभर वाटुन गेलं.
भराभर आंघोळ उरकुन कबिर बाहेर आला. परंतु तेथील एकूणच तेथील स्वच्छता आणि खाद्यपदार्थ बघुन त्याने ब्रेकफास्ट न करताच रुम सोडली आणि आपलं सामान घेऊन तो टॅक्सीसाठी रस्त्यावर येऊन थांबला. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. गोव्याला आल्यापासुन त्याने काही खाल्लं पण नव्हतं. आधी पेटपूजा आणि मग हॉटेलशोध असं ठरवुन त्याने मिळालेली रिक्षा पुन्हा मार्केटकडे घेतली.
सकाळी काही तरी मस्त, चमचमीत खाण्याची कबिरची इच्छा कुठलं फ़ाईव्ह-स्टार हॉटेल पुर्ण करण्याची शक्यता नसल्याने त्याने वाटेतलं एक बर्यापैकी छोटे, पण निटसे हॉटेल बघुन कबिर आतमध्ये शिरला.
आतमध्ये तुरळकच गर्दी होती. रंगेबिरंगी आणि चित्रविचीत्र फॅशनच्या पर्यटकांचीच वर्दळ बहुतांश होती. कबिरने अगदीच कोपर्यातलं एक टेबल पकडलं आणि त्याने फटाफट जे सुचेल त्याची ऑर्डर देऊन टाकली.
ब्रेकफास्ट गपागप हाणल्यावर कबिरचं भणभणणार डोकं थोडं शांत झालं. पोटात उसळलेली आग कमी झाली. कबिरने स्ट्रॉंग कॉफीचे दोन कप रिचवले आणि मग तिसरा मग घेऊन तो खुर्चीत रेलुन बसला. दोन क्षण त्याने डोळे मिटून घेतले. त्याची तंद्री भंगली ती पडलेल्या भांड्यांच्या आवाजाने. त्याने डोळे उघडुन बघीतलं हॉटेलच्या दरवाज्यातुन एक तरुणी येताना वेटरला धडकली होती.
“सॉरी.. सॉरी.. आय एम एस्क्ट्रीमली सॉरी..”, ती परत परत वेटरला म्हणत होती.
पिवळ्या रंगाचा फुलाफुलांची नक्षी असलेला लॉंग स्कर्ट, वरती नेव्ही ब्ल्यु रंगाचा शॉर्ट शर्ट, खांद्यापर्यंत रुळणारे कुरळे केस.. डोळ्यावर नर्ड स्टाईलचा जाड फ़्रेमचा काळा चश्मा, खांद्याला एक छोटीशी सॅक आणि पेपर्सचा गठ्ठा असलेली एक फाईल.
कबिर तिच्याकडे बघतच राहीला.
“कर दे अपने इश्क मै मदहोश इस तरह की,
होश भी आने से पहले इजाजत मांगे..”
व्हॉट्स-अप वर फॉरवर्ड आलेली नुकतीच वाचलेली एक शायरी कबिरला आठवली.
वार्याने उडणारे केस सरळ करायला तिने आपला हात मागे घेतला इतका वेळ स्कर्टला खेटुन बसलेला तिचा शॉर्ट शर्ट किंचीतसा वर उचलला गेला आणि नेव्हल भागावर काढलेला टॅटू कबिरच्या नजरेस पडला.
राधा…
बासरीला बिलगुन बसलेली ती अक्षरं कबिरला वेड लावुन गेली..
“राधा.. कबिरची राधा..”, कबिर स्वतःशीच पुटपुटला.
तिचे थोडीशी घारी छटा असलेले डोळे… उफ़्फ़ ! कबिरला वाटलं, आपण तिच्या डोळ्यांत बघत बसलो तर दोन मिनीटांत आपण स्वतःला विसरुन जाऊ. वार्याच्या हलक्याश्या झुळुकीने उडणारे तिचे केस.. कबिरच्या हृदयाची धडकन जणु त्या केसांच्या उडणार्या लयीवर होत होती.
कबिरला आपला श्वास अडकल्यासारखे झाले, पाण्याचा घेतलेला घोट त्याच्या घश्यातच अडकला. आजुबाजुचे विश्व जणु `स्टॅच्यु’ केल्यासारखे जागच्या जागी थिजुन गेले होते.
किती वेळ.. किती वेळ उलटून गेला होता कुणास ठाऊक. त्या पिवळ्या स्कर्टला लटकलेले गुलाबी रंगाचे लोकरीचे गोंडे, त्याच्यावर लावलेली छोटीशी किणकिण करणारी घुंगरं, हातातल्या चंदेरी रंगाच्या बांगड्या, कानातलं, गळ्यातलं पेंडंट, नाकातली ती छोटीशी नोज रिंग.. कित्ती कित्ती गोष्टींच कबिरने त्या काही क्षणात लक्ष वेधुन घेतलं होतं.
तिने अचानक कबिरकडे पाहीलं. वेगाने जाणारी ट्रेन अचानक ’सडन जॉल्ट’ घेउन थांबावी आणि त्या लयीत भान हरपलेले आपण क्षणार्धात भानावर यावं, तसं कबिरचं झालं.
कबिरने पट्कन आपली नजर दुसरीकडे वळवली.
परंतु डोळ्यांच्या कॉर्नरवरुन कबिरने ताडलं ती तरुणी कबिरच्याच दिशेने येत होती.
“च्यायला, ही मला ओळखते वगैरे की काय? आय मीन.. अफ़्टर ऑल, आय एम अ रेकग्नाईझ्ड रायटर…”, कबिरच्या मनात विचार येऊन गेला.
कबिर सावरुन बसला.
[क्रमशः]