'उपहास बघ. एकेकाळचा इतका श्रीमंत माणूस आज त्यांच्यावर ही वेळ यावी?! बाबाराव देसाईंसारखा धाडसी, महान आणि समाजाला आदर्श असणारा व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त व्हावा ही गोष्ट जर समाजाला कळली असती, तर त्यांच्या प्रतिमेला तडा गेला असता. म्हणून मी माझे निर्दोषत्व सिद्ध करणारी ती चिठ्ठी नाहीशी केली. आणि म्हणूनच मला हा सारा प्रपंच रचावा लागला. हा एक एवढा मोठा खेळ...'
एका व्यक्तीचा स्वाभिमान टिकवण्यासाठी याने संपूर्ण देश ढवळून काढला होता...
'बाबारावांच्या नातेवाईकांचा इतका मोठा काय गुन्हा होता, की मी या सगळ्यांना मारले असे तुला वाटते होय ना?
'एका म्हाताऱ्याला सांभाळणे या लोकांना इतके जड झाले होते, की त्या म्हाताऱ्याला मरणाची इच्छा व्हावी?
'हे असे लोक जगत नाहीत. किड्यांसारखे फक्त सर्वाईव्ह करतात, मग हे असले स्वार्थी अप्पलपोटी लोक मेलेच तर काय वाईट?!'
पत्रातून त्याने मला विचारलेला हा प्रश्न वाचून मीही अंतर्मुख झालो. आणि मग ही घटना सर्वांसमोर ठेवायचीच असं ठरवून ही कथा लिहून काढली...
पत्रात पुढे,
'मला माहित आहे एवढ्या उत्तरावर तुझं समाधान होणार नाही. लेट्स सम ऑफ धिस इव्हेंट, म्हणजे मी हे का केलं ते तुझ्या लक्षात येईल.
'दिनेशने बाबारावांची जबाबदारी नाकारलीच. पण तो बाबारावांना वाट्टेल ते अर्वाच्य बोलला. यातून त्याने आपल्या उन्मत्तपणाच आणि माणूस म्हणून जगण्यास तो किती नालायक आहे याचं दर्शन घडवून आणलं. शेखरसाठी त्यांनी जमीन विकली हा राग त्याला होताच.
'विरेनला ऑब्शन होता लीलावतीबाईंचे व्हेंटिलेटर रीतसर काढण्याचा. पण त्याचा स्वार्थ त्याला नडला. बाबारावांना सांभाळण्यासाठी त्याने नकार दिला, तो त्याच्या आईची लीलावतीबाईंची त्याला काळजी घ्यायची म्हणून नाही; तर त्यांनी त्यांची जमीन प्रभाच्या नवऱ्यासाठी शेखरच्या उपचारासाठी विकली. त्याला त्यातून काही मिळाले नाही म्हणून.
'विरेनची बायको वरकरणी निष्पाप वाटते, पण नीट विचार केल्यास, तर लक्षात येईल, की विरेन त्याच्या आईला मारणार आहे हे तिला आधीपासून माहिती होते, तरी ती गप्प बसली. त्यामुळे तीही त्या दोषात सहभागी झाली. आणि मृत्यूस पात्र ठरली.
'शेखर आणि प्रभाचे पाहिले, तर बाबाराव ज्या रात्री मला भेटले, त्या रात्री त्याच्या जेवणातून त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. ही गोष्ट बाबारावांना माहीत होती. म्हणून तर त्यांनी निर्णय घेऊनच टाकला, की आता बास! संपवावं हे सगळं. त्यांचा राग मात्र कुणावरच नव्हता. आपल्याला इतके दिवस सांभाळणाऱ्या शेखर आणि प्रभावर त्यांच्याच खुनाचा कलंक लागू नये म्हणून ते मला भेटले होते. आणि हे सगळं त्यांनी मी निर्दोष असल्याच्या पत्रात नमूद केले होते.
'मला माहिती आहे, प्रभाच्या मुलीविषयी तुला काळजी वाटत असेल, पण काळजी करू नको. तिला मी काहीही केलेलं नाही. बऱ्या - वाईटाची समज अजून तिला यायची आहे. त्यामुळे ती माझ्या नजरेत निष्पापच आहे. तिची मी एक चांगल्या अनाथाश्रमात सोय केली आहे. बाबारावांची केस सोल्व्ह करण्यासाठी मिळालेला सगळा पैसा मी तिच्या नांवे ठेवला आहे. या उपर तिची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी जबाबदारी आता माझी आहे..."
मिस्टर वाघ मला कळलाय असं जेव्हा - जेव्हा मला वाटायला लागतं, तेव्हा तो असं अनपेक्षित काही तरी वागतो. आणि माझ्या समजुतीवर पाणी फिरते...
त्याने त्याला कमी - जास्त प्रमाणात गिल्टी वाटत असलेल्या माणसांना त्याच क्रमाने संपवले होते.
कमी गिल्टी असलेल्याला जरा जास्त जगण्याची मुभा... पण मिस्टर वाघकडून मृत्यू अटळ...
मला खात्री आहे, लिलावतीबाई ज्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या हॉस्पिटलचे सर्जन्स्, डीन, ओनर्स्, बोर्ड मेम्बर्स्, इत्यादी हॉस्पिटलशी रिलेटेड् सगळे देखील मिस्टर वाघचे शिकार होतील. त्यांच्यामुळेच, तर विरेनने आपल्या सख्या आईचा खून केला होता...
पण वाटते, जर हे मिस्टर वाघ असंच वागत राहिला, तर उद्या कोणी रस्त्यावर थुंकलं तरी हा त्याचा खून करेल... हा सायको तर नाही ना?...
नाहीच! असा इतका बुद्धिमान व्यक्ती सायको कसा असू शकतो?!
आजपर्यंतच्या आयुष्यात मी पाहिलेल्या लोकांमध्ये मिस्टर वाघ हा सर्वांत संयमी आणि स्थिर बुध्दीचा माणूस मला भेटला आहे.
पण मिस्टर वाघसाठी भीतीही वाटते, गुन्हेगारांना मृत्यू देणाऱ्या मिस्टर वाघचा स्वतःचा मृत्यू कसा असेल?...
समाप्त...