18. Himachal Pradesh - n visarta yenyasarkhi jaga - 4 in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | १८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४

Featured Books
Categories
Share

१८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४

१८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४

४. डलहौसी-

डलहौसी हे हिमाचल प्रदेश मधील सगळ्यात प्राचीन हील स्टेशन आहे. हे शहर १९५४ मध्ये इंग्रजांनी स्थापन केले होते. ब्रिटिश गव्हर्नर डलहौसी याने हे ठिकाण शोधून काढले. म्हणून ते आजही त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. डलहौसी ब्रिटिश स्थापत्यकलेचे नमुने आजही आपणास येथे बघायला मिळतात. तुरळक काही सुरेख चर्चेस, बंगले आपल्याला जुन्या स्वातंत्रपूर्व काळात घेऊन जातात. देवभूमी हिमाचल प्रदेशाचा प्रवास हा नेहमीच भव्यत्व व दिव्यत्वाचा साक्षात्कार घडविणारा ठरतो. त्यात डलहौसी प्रमुख आकर्षण मानले जाते. अतिशय मनोरम्य अशी ही जागा आहे. आणि इथे आल्यावर तुम्ही नक्कीच इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल. आकाशाशी स्पर्धा करू पाहणार्‍या देवदार वृक्षांनी व्यापलेले आणि एकमेकांत समरस होऊन आपल्या सदासतेज अस्तित्वाने या भूमीत येणार्‍या सगळ्याच पर्यटकांना आपल्यासमोर नतमस्तक व्हायला लावणारे डोंगर म्हणजे आपल्या देशाचे वैभवच आहे. निसर्गाने नटलेला असा हा प्रदेश आहे. इथे आल्यावर थंडीचा आणि हिरव्या निसर्गाचा अनुभव घेता येतो. या हिरव्या चैतन्याला पार्श्‍वभूमी लाभलेली आहे उंचच उंच अश्या हिमशिखरांची. हिमालयच कौतुक आपल्या सगळ्यांनाच आहे.

हिमाचलमधील एक शांत, निसर्गसंपन्न छोटेखानी गाव म्हणजे डलहौसी. निसर्गसंपन्न असा हा प्रदेश आहे. रावी नदीच्या काठी २००० मीटर उंचीवर पाच टेकडय़ांवर चंबा खोऱ्यात हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. पाईन, देवदारचे वृक्ष डलहौसीच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. आणि डलहौसी ला देखण रप देऊन जातात. रात्री आजूबाजूला टेकडय़ांच्या उतारावरून लुकलुकणारे दिवे बघितले की एवढी घरे सकाळी कुठे धुक्यात लुप्त होतात कळत नाही. सगळ पाहून गम्मत वाटते. मनात साठवून ठेवाव्या अश्या आठवणी इथे मिळतात. आपल्या पाचगणीसारखी इथे अनेक प्रशस्त पब्लिक स्कूल आहेत. डलहौसीमध्ये अतिशय दाट, उंच देवदारची झाडे थेट तुमच्या हॉटेलच्या बाल्कनीतून आत डोकावत असतात. झाडावरच्या खारूताई सतत अखंड कामाच्या गडबडीत असल्यासारखे इकडून तिकडे फिरत असताना बघण्यात मोठी गंमत असते. ज्या गोष्टी धकाधकीच्या जीवनात दिसत नाहीत त्या गोष्टी डलहौसी ला आल्यावर नजरेस पडतात आणि मन प्रसन्न करतात.

डलहौसी आजूबाजूच्या पाच टेकडय़ांवर पसरलेले आहे. सतत बदलणारी हवा वेगळाच आनंद देऊन जाते. अगदी एका क्षणात धुके तर दुसऱ्या क्षणी हलका पाऊस, मधेच कुठून सुरेख इंद्रधनुष्य तर थोडय़ाच वेळात शुभ्र कापसाच्या मोठय़ा मोठय़ा ढगांनी आसमंत भरून जातो. आकाशाची निळाई तर नुसती पाहतच राहावी, अशी आहे. उंचावरून फक्त आकाशातील तो निळा रंग, धुके आणि हलका पाऊस अनुभवताना वेळ कसा जातो, हे कळतच नाही. निसर्गाचे वेगवेगळे रंग इथे अनुभवायला मिळतात. जवळच खज्जार नावाचे खोरे आहे. इथे झाडांची दाट गर्दी आहे. डलहौसीपासून एका तासावर असलेले हे खोरे दिवसाच पाहावे. संध्याकाळी चार वाजल्यानंतर कुणीही इथे गाडी घेऊन येण्यास तयार होत नाही. कारण अचानक घाटीमध्ये इतके धुके पसरते की समोरचे काहीही दिसत नाही. चांगल्या मोठय़ा आरामदायी गाडीने प्रवास केला तर घाटाचा, प्रवासाचा अजिबात त्रास होत नाही. कारण हिमाचलमधल्या चंबा खोऱ्यात रस्ते फार सुरेख आहेत. खास पर्यटकांसाठी म्हणून आभाळभरारी घेण्यासाठी पॅराग्लायडिंगची व्यवस्थाही येथे होती, पण जोखीम असलेल्या गोष्टीमध्ये नेहमीच काळजी घेतलेली चांगली. इथली हवा अतिशय स्वच्छ न प्रदूषणरहित असते. घोड्यावर बसून या पठारापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर असलेल्या खज्जी नागमंदिराला तसेच महाकाय अशा शंकराच्या मूर्तीला भेट देता येते. धातूपासून बनविलेली ही मोठी शंकराची मूर्ती हे इथले आकर्षण आहे. तलाव, निसर्ग हे इथले वैभव. मनाचा थकवा घालविण्यासाठी व हिरवाईचे वेगवेगळे विभ्रम टिपण्यासाठी या परिसरात कितीही वेळ आपण चालत राहिलो तरी थकवा कसला तो जाणवत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती जागा म्हणून ही जागा ओळखली जाते. लहान मुलांना मनसोक्त बागडता येते म्हणूनच ही जागा त्यांना मनापासून आवडते. खाली मऊ लुसलुशीत हिरवे तृणांकुर असल्याने पावलांना चालण्याची मजा इथे अनुभवता येते. वेगळाच अनुभव इथल्या निसर्गात मिळतो. खज्जार हा प्रदेश म्हणजे बाजूने दाट झाडी व मध्ये विस्तीर्ण हिरव्यागार गवताचे कुरण. त्या भल्या मोठय़ा हिरव्या गालिच्यावर मग कुणी भुट्टा विकतो तर कुणी फोटो काढून देत असतो. पर्यटकांची फोटो काढून घ्यायची लगबग चालू असते. अतिशय नयनरम्य अस हे वातावरण असत. सुट्टीचा पुरेपूर आंनद इथे घेता येतो. इथल्या निसर्गात आल्यावर धकाधकीच्या जीवनाची आठवण सुद्धा येत नाही. सुंदर निसर्ग बघत बाजूच्या धाब्यावर गरम गरम दाल-तडका आणि तंदुरी रोटी कधी फस्त होऊन जाते कळतच नाही. हिमाचल प्रदेशामध्ये जेवण सुद्धा पर्यटकांच्या खास लक्षात राहते.

घोडेस्वारी करण्यासाठी ही उत्तम जागा. ज्यांना घोडेस्वारी आवडते त्यांनी इथे मनसोक्तपणे ती करावी. खज्जार इथे काही हेरिटेज हॉटेल्स आहेत. ती वर्षभर फुल असतात. त्यामुळे बुकिंग करून जाते श्रेयस्कर. आणि इथली थंडी अनुभवायला इथे जरूर भेट देऊ शकता. पठाणकोट हा जवळचा विमानतळ व रेल्वे स्टेशन आहे. कांगा खोऱ्यातदेखील एक विमानतळ आहे.

बरेच लोक वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन कत्राहून इथे आराम करण्यास येतात. कत्रा ते डलहौसी पाच तासांचा रस्ता आहे. पहाटे निघून दुपारच्या जेवणापर्यंत इथे पोहोचू शकतो. दिल्ली व हरयाणाहून अनेक बसेस नियमित इथे येतात. हौसेने पाहण्यासारखे डलहौसी नक्कीच शांत व सुंदर आहे. तिथला निसर्ग शांतपणे अनुभवावा असाच आहे. आणि आखीव-रेखीव व नितळ निळ्या-हिरव्या-पांढर्‍या रंगांनी विनटलेल्या या स्थळांना म्हणूनच ‘भारताचे स्वित्झर्लंड’ असेच संबोधले जाते. आणि इथे जाण्यासाठी पर्यटकांचा ओढ नेहमीच दिसून येतो. बऱ्याच वेगवेगळ्या जागांना भेट दिल्यावर मन तजेलदार होते हे अगदी नक्की.

५. मनाली अभयारण्य-

मनालीला भेट दिली पण अभयारण्याला भेट दिली नाही तर साहजिकच तुमची मनाली ट्रीप अर्धवट राहील असे म्हणणे वावग ठरणार नाही. अभयारण्यात फिरायला सगळ्यांनाच आवड आणि चालत जाण्याच्या अंतरावर मनाली अभयारण्य आहे. आणि तिथे गेल्यावर तिथली निसर्गसंपदा पाहून मन तृप्त होत. विविध प्रकारचे झाडे आणि प्राणी पक्षी इथे पाहायला मिळतात. निसर्गाची आवड असणार्या प्रत्येकालाच इथे आल्यावर खूप काहीतरी घेऊन जातोय ही जाणीव जिवंत राहील. आणि स्वर्गात जाऊन आल्याची भावना नक्कीच तुमच्या मनात राहील. हे अभयारण्य मानली गावाला लागून आहे आणि टेकडीवर पसरलेलं आहे. मनाली अभयारण्य, २६ फेब्रुवरी १९५४ ला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला. इथे हिमालयन ब्लॅक बेअर, काश्मिरी फ्लाईंग स्क्विरल, फ्लाईंग फॉक्स इत्यानी प्राणी पाहायला मिळतात. कधी सरडे, साप सुद्धा दर्शन देऊ शकतात. आणि त्यांना पाहिल्यावर तोंडातून वॉव नक्कीच बाहेर पडेल. स्नो कॅप्ड माऊंटंस, अल्पाईन ट्रीज पाहून मन प्रसन्न झाल्याखेरीज राहणार नाही. ही जागा हनिमून साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. इथे जोडीने करण्यासारख्या बऱ्याच गोशी आहेत ज्या मनात साठवून ठेवता येतील. इथे बर्ड वॉचिंग, ट्रेकिंग, नेचर ट्रेल्स इत्यादीची मजा अनुभवता येते.

अस हिमाचल प्रदेश! अप्रतिम निसर्ग इथे पहायला मिळतो. अप्रतिम निसर्गाने सगळ्यांना मोहिनी घालतांना दिसतो. निसर्गाच अतिशय देखण रूप इथे पाहायला मिळते. नागमोडी रस्ते प्रवास अतिशय थरारक करतात. म्हणजेच, हिमाचल प्रदेशच्या ट्रिपमधली सदैव लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे तिथला हिरवा निसर्ग. कारण हल्लीच्या प्रदूषणाच्या जगात हा नितळ आणि स्वच्छ निसर्ग टिकून राहणं आणि तो बघायला मिळाणं म्हणजे अहोभाग्यचं! सध्या सगळीकडे बिल्डींगच जंगल पाहायला मिळते आहे त्यात अजूनही निसर्ग जपला आहे तो हिमाचल प्रदेश मध्ये! इथली हवा अतिशय सुंदर असते आणि त्यामुळेच ही जागा पर्यटकांनी गजबजलेली असते. मातीचा वास, गुलाबी पण बोचरी हवा, वरून पडणाऱ्या गारा आणि हिरव्या रंगात सजलेला निसर्ग या समीकरणाने अक्षरशः वेड लावत आणि हीच हिमाचल प्रदेशाची खासियत आहे. हिमाचल प्रदेश एकदातरी अनुभवायला हवाच.. आणि ही हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यातली सहल मनात सदैव ताजी राहील यात शंका नाही.