फायनली ट्रूथ वॉज् रिविल्ड्
दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये,
"निकम फौंड्रीचे मालक सुशांत निकम हे 'घोणस' या अत्यंत विषारी जातीचा साप चावल्याने घरी मृत आढळले..."
या मथळ्याची ही भली मोठी बातमी.
मी समजून चुकलो. काल मिस्टर वाघने माझ्यासमोरून जी पेटी नेली, त्यात 'घोणस' होती...!
अजूनही बरीच प्रश्न अनुत्तरीत होते. एक तर त्याने बाबाराव देसाईंना का मारले? ते तर समाजासाठी काम करायचे. त्यांनी कोणता गुन्हाही केला नव्हता.
दोन, त्यांच्या नातेवाईकांचे काय अपराध होते, की त्याने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणले.
आणि तीन म्हणजे बाबारावांवर चालवलेली माऊसर समर नकातेकडे सापडली. त्याच्याकडील रेकॉर्ड्सनुसार बाबू सुतारने बाबारावांना ठार मारण्याची सुपारी दिली होती. पण मग उंचीचे काय? शिवाय बाबारावांच्या अटॉप्सी रिपोर्टनुसार त्यांचा खुनी त्यांच्यापेक्षा उंच असणार होता. समरची उंची तेवढीच होती का? असणारच त्याशिवाय समरच बाबारावांचा खुनी आहे यावर नवीन, कार्तिक, वरुण यांनी विश्वास ठेवला नसता.
इकडे मिस्टर वाघ म्हणतोय, की त्यानेच बाबारावांना मारलंय. हे त्याने कसे साध्य केले?
खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले, की शेवटच्या प्रश्नाचे मिस्टर वाघने या उत्तर मला आधीच दिले आहे.
मिस्टर वाघने बाबारावांचा खून करण्याआधी समर नकाते मिस्टर वाघकडे दुसऱ्याच एक केस संदर्भात आला होता. म्हणजे बाबारावांना मारतेवेळी या प्रकरणात समर नकातेला अडकवायचे हे त्याने आधीच ठरवले असणार आणि म्हणूनच त्याने समर नकातेची उंची लक्षात घेऊन बाबारावांच्या लंबर व्हर्टिब्रेवर गोळी मारली होती!
पण मग अजून एक प्रश्न उभा राहतोच, की त्याने इतक्या जवळून बाबारावांवर गोळी चालवली कशी? आणि तेही त्यांच्याच माऊसरने?
असे तर नाही, की मिस्टर वाघच्या क्रूर कृत्यांमुळे बाबाराव देसाईच त्याला मारायला गेले असतील आणि मग त्यानेच बाबारावांना मारले?
नाही! मिस्टर वाघ असे कधीच सत्याची बाजू असणाऱ्या माणसाला मारत नाही. तसं नसतं, तर त्याने नवीन, कार्तिक, वरुण यांना जीवंत सोडलंच नसतं...
शिवाय मिस्टर वाघ इतकं बेमालूम काम करतो, की कोणाला त्याची भणकही लागत नाही. मग बाबारावांना मिस्टर वाघबद्दल कळेलच कसे?
दुसरी गोष्ट अशी दिसून येते, की उतार वयानुसार बाबाराव देसाई मवाळ झाले होते. नाही तर बाबूला त्याचा धंदा बंद करण्यासाठी त्यांनी विनंती केली नसती. त्याला मारूनच टाकले असते...
ते मवाळ होते म्हणूनच तर त्यांना सांभाळण्यासाठी नातेवाईक नकार देण्याची हिंमत करू शकले होते...
विचार करत बसलो होतो. हातात पेपर तसाच होता. पानही पालटले नव्हते. ती बातमी तशीच समोर होती आणि मी शून्यात...
इतक्यात दारावर टकटक झाली. आईला मी बघतो म्हणून सांगून बाहेर आलो. समोर इन्वेलोप पडले होते. इन्वेलोपवर आमचा किंवा पाठवणाऱ्याचा पत्ता नव्हता. पोस्टमनने नक्कीच टाकली नसणार. मग कोण? मी इन्वेलोप उघडला. त्यात एक चिठ्ठी आणि युस्ड् बुलेट होती. मी चिठ्ठी उघडून पाहिली...
"सूरज!"
चिठ्ठी वरचं मी माझं नांव वाचलं आणि मिस्टर वाघने मला हाक मारल्याचा मला आभास झाला.
ती चिठ्ठी मिस्टर वाघची होती. म्हणजे ही गोळी बाबारावांना मारण्यासाठी वापरलेली तर...
पुढे लिहिले होते,
"मी तुझ्याकडे का येतो माहिती आहे तुला?"
मी नकारार्थी मान हलवली.
"कारण मी स्वतःला तुझ्यात पाहतो! याला कारण काय हे मला नाही सांगता येणार, पण मी ज्यावेळी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा मी तुझ्यासारखाच होतो. त्यामुळे मला तूच लोकांपर्यंत नीट पोहोचवू शकशील असे मला वाटते...
"होय! तू म्हणतोस तसा मीही गिल्टी आहे. म्हणूनच तर मलाही वाटते कुठे तरी मोकळे व्हावे म्हणून तर येतो तुझ्याकडे. रिता होण्यासाठी!
"मला सांग, गुन्हेगारांना शिक्षा करणे चूक आहे का? माझा सिस्टीमवर विश्वास नाही. मला एक सूंदर जग बनवायचंय. म्हणून मग मीच कायदा हातात घेतला!
"चूक - बरोबर याच्या मी खूप पलीकडे गेलो आहे!"
आज आई घरात होती. म्हणूनच तो घरात आला नव्हता.
तो जवळपासच कोठेतरी असेल, असे वाटून मी इकडे तिकडे पाहिले. दूर उभारून तो माझाकडे पाहत होता. मी त्याच्याकडे पाहिले, पण माझ्या नजरेत गिल्ट होता. हे पाहून तो गंभीर झाला.