श्वास
कुठल्याही केसमध्ये व्यवस्थित तपासणी करणं खूप महत्त्वाचं असतं.कारण खूपवेळा बाह्य लक्षणे जरी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आजाराकडे निर्देश करत असली तरीसुद्धा मूळ कारण अगदी वेगळं असू शकतं.ह्याबाबतीत प्रत्येक व्यक्तीनं सजग असलं पाहिजे आणि डॉक्टरनेपण प्रत्येक रूग्णाच्या बाबतीत अशी सजगता बाळगली पाहिजे. पण हा झाला नियम आणि तो अपवादानेच सिद्ध होतो.अशाच दोन केसटेकींग मधल्या त्रुटींमुळे जिवावर बेतलेल्या काही केसेस.
गुलाबराव देशमुख...साधारण ४०-४५ चे गृहस्थ.माझ्या दवाखान्यात आले त्यावेळी त्यांचा आजार चांगलाच बळावला होता.सततचा खोकला,थोड्याशा श्रमानंही लगेचच धाप लागणं ह्या जुन्याच तक्रारी आणि त्यात भर पडली होती ती ताप ,सर्दी आणि घसा दुखण्याची.वय ४५चं असूनही ते ह्या सतत रोगट असणाऱ्या तब्येतीमूळे वृद्ध दिसत होते.
मी त्यांना त्यांच्या acute तक्रारींसाठी औषधं दिली. दुसऱ्या दिवशी औषधांमुळे घशाचा त्रास जरा कमी झाला होता. ते बोलू शकत होते.त्यावेळी त्यांची सखोल केसटेकींग घ्यायला सुरुवात केली.कारण आदल्या दिवशी त्यांच्या पत्नीकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गोष्टी अर्धवट स्पष्ट झाल्या होत्या.
"ह्या बाबाशी लगीन झाल्यापासून मी पाहते.ह्ये असंच रोगाट हाये.पहिलीनं बी ह्ये वळखलं आन् गेली सोडून.मंग मला केली.माज्या आईबापाची गरीबी.म्हनून मी बळंच राह्यले याच्यापाशी.माहेरी जाऊन तरी काय करू.इथंय राबायचं आन तिथंय राबायचंच.'उघड्यापाशी नागडं गेलं आन सारी रात हिवानं मेलं'...आशी तऱ्हा."
" काही व्यसन वगैरे आहे का त्यांना?"
"नाय नाय.वेसन फिसन नाय.त्याच्या दवाखान्यालाच पैसा पुरत नाई.वेसन कवा करायचा?"
"म्हणजे हे आजारपण कधीपासून सुरू आहे?"
"काय माहीत? माज्या लगनाच्या आधीपासून ह्ये आसंच किडीचं रताळू"
जास्त काही विचारण्यात अर्थ नव्हता.
तिला बिचारीला दवाखान्यात जाणारे पैसे...दवाखान्यात सतत जावं लागण्यामूळे रोज बुडणार हेच टेन्शन होतं.गुलाबरावाला तब्येतीमूळे कुठलंच जडीपाचं काम होत नसायचं त्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावरच.तिचं वैतागणं साहजिकच होतं. पायाखालीच अंधार असल्यावर पुढच्या वाटेचा विचार करणं दुरापास्तच.' हे पैसे घ्या आनि नीट करा' अशी वृत्ती झालेली.तिला मी अधिक समजून घेऊ शकले ते प्रत्यक्ष गुलाबरावाशी बोलल्यानंतर..
"अवो म्याडम..माझी लक्षुमी आहे ती.
ती राबती म्हनून आमची पोटं तरी भरत्यात.मला तब्येतीमूळं शेतीचं काम व्हत नाई.धंदापानी पन जमत नाई.आपलं जमल तसं घासाचे वझे उचलून आनतोय दोन टाईम.तेवढीच तिला मदत.काईच नाई केलं तर बराबर नाई वाटत.बायकोच्या जिवावर तुकडा तोडतोय असं व्हतं ते.एकाद्दिवशी घास काढायला जमलं नाई तर घासच गिळत नाई.तुकडा तोंडातच फिरत राहतोय."
हे इतकं बोलायलाही त्यांना खोकतखाकत,घसा खाकरत बोलायला वीस मिनिटे लागली.त्यांना जास्त वेळ बोलायला लावणं चुकीचं वाटत होतं.समोर पडलेले त्यांचे नवेजुने रिपोर्ट्स बघून डोक्यात खळबळ माजली होती.व्यसन नाही, क्षयरोग नाही मग फुफ्फुसं एवढी कमकुवत व्हायचं काय कारण असावं.छातीला स्टेथो लावल्यावर आत झालेलं नुकसान सहज समजून येत होतं.फुफ्फुसे आंकूचनप्रसरण पावण्याची क्षमता बऱ्याच अंशी गमावून बसली होती.त्यामुळे श्वास घेताना छातीचा भाता हलण्याऐवजी पोटच वरखाली होत राही.झोपून फार वेळ शक्यच व्हायचं नाही. लगेचच जीवघेणी ढास लागे आणि त्यांना उठून बसावं लागे.घरात कुणालाही दमा नसताना त्यांना हा श्वसनाचा त्रास का होतोय ? हा प्रश्न मला छळत राहिला.त्यांच्या तब्येतीसाठी ते पुण्यामुंबईच्या नावाजलेल्या डॉक्टरांकडेही जाऊन आले होते.कुणालाही त्यांचं अचूक निदान झालं नव्हतं.वर्षानुवर्षं त्यांनी दमा,क्षयरोग वगैरे आजारांसाठीचीच औषधं आलटूनपालटून खाल्ली होती.कोणत्यातरी डॉक्टरांनी तर त्यांना कॅन्सर स्क्रीनिंगचा देखील सल्ला दिला होता.शेवटी ह्या सर्व गोष्टींना कंटाळून ते गावाकडे परत आले होते.
दुसऱ्या दिवशी परत त्यांना अधिक बोलतं करून ह्या आजाराच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि शांत मनाने पुढच्या पेशंटला आत बोलावलं.
दुसऱ्या दिवशी मी परत त्यांना काय काय विचारत राहिले. त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं होतं.पण ह्यापूर्वी ते कुठल्या पद्धतीची कामं करत होते हे विचारल्यावर ते म्हणाले,
"सगळ्यात पहिलं पिठाच्या गिरनीत काम करीत व्हतो .पन् तिथं ईळ ईळ उभं राह्यचं,जड जड दळनांची उचलटाक करायचं मला जमंना.मग दिलं सोडून"
"ओह! मग नंतर काय केलं?"
"मंग नंतर दगड फोडून जाती बनवनं,पाटावरवंटा बनवनं सुरू केलं"
"ते किती दिवस केलं?"
"मस लयी धा वर्ष केलं."
ते थोडा वेळ विचारमग्न झाले आणि थोडं थांबून विचारलं,
"म्याडम ! पन तुमी ह्ये सगळं मला का विचारताय? येवढ्या मोठ्या मोठ्या हास्पीटलानी गेलो पन् तिथं कोनीच मला येवढे प्रश्न विचारले नाई.काय काम करीत व्हते ? ह्ये तर कोनीच विचारलं नाई."
मी हसले फक्त... आणि मनाशी म्हटले तोच तर प्रश्न सर्वात महत्वाचा होता ना!"
कारण....
गुलाबरावांना झालेला श्वसनविकार हा निव्वळ त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे होता. ज्याला occupational hazards म्हटलं जातं.जो सतत सतत छोटे छोटे कण श्वासनलिकेत जात राहिल्यानं होतो.आधी दहा वर्ष पिठाची गिरणी की,जिथे सतत पिठाचे कण वातावरणात तरंगत राहतात.नंतर तिथे त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी व्यवसाय बदलला तर तो ही कणांशीच संबंधित. दगड घडवतांना त्याचे कण कण (कच) नाकातोंडात जात राहिले..आणि त्यांचा आजार बळावत राहिला.
मोठ्यामोठ्या दवाखान्यात देखील दुर्दैवाने हा प्रश्न विचारला गेला नाही. ते त्याच स्वरूपाचं काम परत परत करत राहिले आणि आता फुफ्फुसं निकामी व्हायला आली तेव्हा ही माहिती उजेडात आली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता...आता उपचारांचा काही फायदा नव्हता.
त्यानंतर अगदी काही महिन्यांतच गुलाबरावाची प्राणज्योत मालवली.दर शब्द बोलतांना वेदनेनं पिळवटणारा तो चेहरा आता शांत झाला होता.. कायमचा
डॉ.क्षमा शेलार
बेल्हा