Karunadevi - 7 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | करुणादेवी - 7

Featured Books
Categories
Share

करुणादेवी - 7

करुणादेवी

पांडुरंग सदाशिव साने

७. सासूसासर्‍यांची समाधी

दुष्काळ संपला. देवाला करुणा आली. आकाश भरभरुन आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली.राजा यशोधराने दुस-या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बीयाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. शेतकरी शेतात दिसू लागली. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली.सुबत्ता आली. धान्य पिकले. करुणा सासूसास-यांस आता पोटभर जेवण वाढी. त्यांचे पाय चेपी. तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या. एक मामंजींच्या खाली तिने घातली, एक सासूबाईंच्या. ती म्हाता-यांची दाई बनली, आई बनली.परंतु ती पिकली पाने गळणार असे आता दिसू लागले. सासूबाई एके दिवशी अंग धुवून येत होत्या. तो त्या धपकन् पडल्या. करुणा त्या वेळेस घरात नव्हती. सास-यानेच उठून सावित्रीबाईंस घरात आणले, परंतु सावित्रीबाईंस शुद्ध येईना.दुपारी करुणा घरी आली, तो हा प्रकार. ती धावत प्रेमानंदाकडे गेली. प्रेमानंद कसलीतरी मुळी घेऊन आला. एक मात्रा घेऊन आला; परंतु कशाचा उपयोग नव्हता. सासूबाई देवाघरी निघून गेल्या होत्या.आता वृद्ध सुखदेव राहिले. तेही जणू आपली वाट पाहात होते.‘ती गेली. आता मलाही बोलावणे येईल. करुणे, तू जा. तुला देव आहे. शिरीष तुला भेटल. निराश नको होऊ. मरणोन्मुख माणसाचा मनापासून दिलेला आशिर्वाद खोटा नाही होणार.’ ते करुणेला म्हणत.एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले. जरा छातीत कळ आली आणि सारे खलास.सासूसासरे, दोघे गेली. करुणा एकटी राहिली. ती कर्तव्यातून मुक्त झाली होती. जी शपथ तिने घेतली होती, ती तिने अक्षरशः पाळली होती; परंतु अद्याप एक कर्तव्य राहीले होते. शेवटचे कर्तव्य.त्या काळात मृतांच्या अस्थीवर लहानशी चार दगडांची समाधी बांधायची प्रथा होती. राजे-महाराजे प्रचंड समाध्या बांधीत. गोरगरीब चार दगड तरी उभारीत. जेथे मृतांना जाळले, पुरले, त्या जागेवर पाप पडू नयेत म्हणून ही व्यवस्था! गावोगाव अशा लहानमोठ्या समाध्या दिसत असत. चबुतरे दिसत असत. कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या.

परंतु करुणा कशी बांधणार समाध्या? ती गरीब होती. राहाते घरही गहाण होती. कोठून मिळणार कर्ज? मोलमजुरीतून कितीसे उरणार? ते किती पुरणार? अश्रूंची बांधता आली असती, तर अमर समाधी तिने बांधली असती. मोत्यांसारखे अश्रू; परंतु त्यांची कशी बांधणार समाधी? अश्रूंची आरसपानी समाधी हृदयांगणात बांधता येईल ; परंतु जगाच्या अंगणात दगडाधोंड्यांचीच समाधी हवी.करुणेने निश्चय केला. दगडधोड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला. दिवसभर ती पोटासाठी काम करी; परंतु रात्री ती मोकळी असे. ती रात्री उठे. जंगलातून, रानातून हिंडे. सुरेख दगड गोळा करीत हिंडे. गुळगुळीत चपटे दगड. तिला भीती वाटत नसे. अस्वलालांडग्यांची, तरसावाघांची तिला भीती वाटत नसे. भुताखेतांची, खवीससमंधाची तिला भिती वाटत नसे.एखादा सुरेखसा दगड सापडला की, तिला आनंद होई. कधी कधी चांदणे असावे आणि त्या चांदण्यात करुणा दगड वेचीत हिंडे. थकून भागून चांदण्यातच उशाला दगड घेऊन ती रानात निजे. चंद्र तिच्यावर अमृतमय किरणांची वृष्टी करी. वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूचे पाणी लावून तिला उठवी. पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाई.दगड बरेच जमा झाले. दोन लहानसे चबुतरे आता बांधता येतील, असे करुणेला वाटले. तिने एके दिवशी माती खणली. गारा तयार करण्यात आला. तिने माती तुडविली. मातीत भाताचा भुसा वगैरे तिने घातला होता. गारा पक्का होऊ दे.आज रात्री समाध्या बांधण्याचा आरंभ ती करणार होती. दोन्ही समाध्यांचा एकदम आरंभ. ती एक दगड सास-यांच्या समाधीसाठी लावी. दुसरा सासूच्या. दोन्ही समाध्या एकदम पु-या झाल्या पाहिजेत. तोंडाने गाणे म्हणत होती. तन्मय झाली होती.एका रात्रीत ते काम थोडेच पुर्ण होणार! दोनतीन रात्री गेल्या. अद्याप समाध्या अपु-या होत्या. दगड कमी पडणार वाटते? त्या रात्री करुणा सारखे बांधकाम करीत होती. दगड संपले. आज काम पुरे करायचे असे तिने ठरविले होते. ती दगड धुंडीत निघाली. सापडला की ती आणीत होती; परंतु थकली. त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी येऊन पडली! कर्तव्यपरायण करुणा!

ती गाढ झोपेत होती की, बेशुद्ध अवस्थेत होती! बेशु्द्ध नाही. झोप आहे. श्वास चालला आहे. झोप हो, करुणे! भूमातेच्या मांडीवर जरा झोप. धरित्रीआई तुझे काम पुरे करील. ती धावून येईल.

आणि खरेच धरित्रीमाता आली. मुलीच्या मदतीला आली. सीतादेवीला पोटाशी धरणारी धरित्रीमाता आली. करुणेच्या स्वप्नात धरित्रीमाता आली व म्हणाली, ‘मुली, थकलीस हो तू. धन्य आहेस तू. तूझ्यासारखी कर्तव्यपरायण मुलगी मी पाहिली नाही. आजपर्यंत किती श्रमलीस, कष्टलीस. झोप हो तू. तुझ्या समाध्या मी पु-या करविते. मी नागोबा व वाघोबा ह्यांना सांगते की, जा रे त्या समाध्या नीट बांधा. सुंदर बांधा. करुणे, तू सकाळी उठशील तेव्हा समाध्या बांधलेल्या असतील. चिंता नको करु. झोप, माझ्या मांडीवर झोप.’आणि खरेच नागोबा व वाघोबा आले. त्या दोन्ही समाध्या ते बांधू लागले. वाघाने दग़डांवर अंग घासून ते आरशासारखे गुळगुळीत केले. नागोबा लांब होई व मोजमाप करी, अंगाचा गुण्या करी.‘नागोबा, कशा आकाराच्या बांधाव्या रे?’‘वाघोबा, कमळाकृती बांधाव्या. अष्टपत्री बांधाव्या. जणू भूमातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाषाणमय कमळे.’मनोहर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व वाघोबा गेले. त्या समाध्यांची वृक्षवेलींनी पूजा केली. वा-याने स्तुतिस्तोत्रे म्हटली. त्या समाध्यांची निसर्गाने पहिली पूजा केली.उजाडले. दिशा फाकल्या, सूर्याचे प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली. जणू प्रेमळ पित्याने जागे केले. करुणा उठली. जणू स्वप्नसृष्टीतून उठली. तिचे हृदय आनंदाने, सुखाने भरुन आले होते. जणू ती माहेरुन आली होती. आईचा हात अंगावरुन फिरुन आली होती.ती समोर पाहू लागली. तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या! आजूबाजूस इवलीही घाण नाही. दगडधोंडा उरलेला नाही. मातीचा गारा पडलेला नाही. सारे स्वच्छ व सुंदर, ती अनिमिष नेत्रांनी समाध्यांकडे पाहात होती. खरेच का भूमातेने ह्या पु-या केल्या? तिने त्या समाध्यांस हात लावला. तो त्या ख-या होत्या. स्वप्न नाही. भ्रम नाही.तिने त्या समाध्यांना प्रदक्षिणा घातल्या, आणखी रानफुले घेऊन आली. पिवळी, निळी, पांढरी फुले, वेलीच्या दोरात ती फुले गुंफून तिने माळा केल्या. त्या समाध्यांवर तिने त्या रमणीय माळा घातल्या. तिने भक्तिमय प्रणाम केला आणि ती निघाली.

तिचे हृदय कृतज्ञतेने भरुन आले होते. तिचे जीवन आनंदाने ओसंडत होते. कोणाला सांगू हा आनंद? कोणाला दाखवू? हा आनंद मी एकटी कशी भोगू? शिरीष, कोठे आहेस तू? ये, ये. तुझा हात धरुन तुला तिकडे नेते; परंतु शिरीष लांब लांब, शेकडो कोस दूर होता.

परंतु शिरीषचा मित्र आहे, प्रेमानंद आहे. करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न वदनाने निघाली. दुःखी कष्टी करुणा आज इतकी आनंदी का ते लोकांस कळेना. स्त्री-पुरुष तिच्याकडे पाहात होते.‘प्रेमानंद,’ करुणेने हाका मारल्या. ‘काय करुणे ?’‘प्रेमानंद-, आनंदाची वार्ता. मी त्या दोन समाध्या बांधीत होते ना ? त्या अकस्मात रात्री पु-या झाल्या. मला रात्री तेथे झोप लागली, स्वप्नात भूमाता आली व म्हणाली, ‘रडू नको, नीज. माझे नागोबा व वाघोबा तुझे काम पुरे करतील.’ प्रेमानंद, खरेच पु-या झाल्या आहेत. सुंदर समाध्या. येता बघायला ? चला.’प्रेमानंद निघाला. गावात सर्वत्र ही बातमी गेली. सारा गाव निघाला. स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्व निघाले. जणू मोठा उत्सवच होता. सर्व मंडळी त्या ठिकाणी आली. त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले. सर्वांनी त्या समाध्यांवर फुले उधळली.‘धन्य आहे ही करुणा,’ असे सारे म्हणाले.करुणेचे कौतुक करीत गाव माघारा गेला. करुणा एकटीच हळूहळू घरी आली. ती एकटी बसली होती. आया-बाया आल्या. तिच्याभोवती जमल्या. तिची स्तुती करु लागल्या. ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर जगाची होते.

करुणेला आता काही कमी पडत नसे. सावकाराने तिचे घर तिला दिले, मळा ज्याने घेतला होता त्याने तो परत दिला. कोणी तिला सुंदर रेशमी वस्त्रे भेट म्हणून आणून देत. कोणी अलंकार अर्पीत. कोणी बायका आपली मुले आणीत व तिच्या पायांवर घालीत. करुणा अंबरगावची जणू देवता बनली.परंतु देवता दुःखीच होती. देवतेचा देव कोठे होता ? शिरीष ! कोठे आहे शिरीष ? जुन्या बागेतील शिरीषवृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे, ‘फुलांनो, सांगा रे शिरीष कोठे आहे तो. तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे. प्रेमळ व कोमल आहे. परंतु आज तो दगडासारखा झाला, लोखंडासारखा झाला ! शिरीष, ने रे मला. तू म्हणाला होतास की, तुझे प्रेम मला खेचून आणील. का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणीत नाही ? माझे प्रेम कमी का पडते ? शिरीषच्या फुलांनो, तुम्ही मला प्रिय आहात. कारण शिरीषचे नाव तुम्हाला आहे. त्याने माझ्या केसांत शिरीष फुलच जाताना खोवले होते.’एके दिवशी रात्री करुणा एकटीच त्या समाध्यांजवळ बसली होती. विचारात रंगली होती. तिने शेवटी त्या समाध्यांना प्रार्थना केलीः‘पवित्र आत्म्यांनो, प्रेमळ आत्म्यांनो! मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल, कधी कंटाळल्ये नसेन, कर्तव्यात टंगळमंगळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटवा. शिरीष जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की, जा, करुणा रडत आहे. तिला जाऊन भेट. पवित्र आत्म्यांनो, ह्या मुलींची ही प्रार्थना पुरी करा.’समाध्यांना फुले वाहून ती घरी आली. ती अंथरुणावर पडली. शांत झोपली. जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल ह्या विश्वासाने ती झोपली होती. आज तिला लवकर जाग आली नाही. कितीतरी दिवसांत अशी शांत झोप तिला लागली नव्हती आणि पहाटे तिला स्वप्न पडले. सासूसासरे शिरीषला हाताला धरून आणीत आहेत, असे तिने पाहिले. ती लाजली आणि स्वप्न भंगले. प्रेमात रंगलेले स्वप्न भंगले; परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात ?