Pahile Swatantra in Marathi Moral Stories by Swapnil Tikhe books and stories PDF | पहिले स्वातंत्र्य

Featured Books
Categories
Share

पहिले स्वातंत्र्य

(बंटी, एक शाळकरी मुलगा... शाळेतून आनंदाने बागडत बागडत घरी पोचतो. दारावर कुलूप असते. ते बघून निराश होतो. शेजारच्या काकूंकडून घराची किल्ली घेतो, घरात निराशेने फिरत असताना पाठीवरचे दप्तर, पाण्याची बाटली, शाळेचा गणवेश काढून रागाने भिरकावून देतो. असेच फिरत असताना त्याला आईने टीव्हीपाशी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्याच्या हाती लागते.)

(आईची चिठ्ठी आईच्या आवेशात वाचावी, किंवा मुलगा आईची नक्कल करत आहे अशी वाचावी.)

“मला काही निमित्ताने अचानक बाहेर जावे लागते आहे.” (आपण आल्यावर आई घरी नाही म्हणून बंटी निराश होऊन पुढची ओळ वाचतो.) “बाबांनाही घरी यायला उशीर होणार आहे.” आम्ही येई पर्यंत नीट वाग. स्वत:ची आणि घराची काळजी घे.”

“आई घरी नाही (निराशेने), बाबाही उशिरा येणार आहेत (आनंदाने). म्हणजेच मी घरी एकटा आहे. म्हणजेच हा पवारांचा राजवाडा मा‍झ्या जबाबदारीवर सोपवण्यात आलेला आहे. (राजकुमारच्या आवेशात) आता मला अडवणारे इथे कोणीच नाही, मीच आहे या घराचा सम्राट (राजाच्या अवेशात).”

(बंटी राजाच्या कल्पनेतून बाहेर येत चिठ्ठीतील पुढची ओळ वाचतो.)

“तुझ्या करता फ्रीज मध्ये दूध बनवून ठेवले आहे. रोजच्या-प्रमाणे नाटके करू नकोस. मी आल्यावर मला दुधाचा ग्लास रिकामा दिसला पाहिजे...” (आईच्या आवेशात)

“दूध संपवायचे आहे काय?” (मुलाच्या आणि राजाच्या आवेशात दूध सिंक मध्ये ओतून देत)

“हे घे. दूध संपवले.”

“आणि आता राजांना आवडणारे सरबत त्यांच्यासाठी पेश करावे.” (स्वगत) (बंटी फ्रीज मधील बाटली काढून स्वत:साठी सरबत बनवतो. ते करताना थोडी धडपड होऊन किचन मध्ये पसारा होतो. त्याकडे दुर्लक्ष करत खोलीतील सोफ्यावर तंगड्या पसरून बसतो. सरबताचा एक घोट घेतो. आनंद झाल्याचे दर्शवतो आणि पुढची ओळ वाचतो.)

“शाळेचा गृहपाठ वेळीच करून ठेव. परीक्षा जवळ येते आहे.”

(ही ओळ वाचून नाराज होतो. तरीसुद्धा या सूचनेकडे दुर्लक्ष करतो आणि पुढची ओळ वाचतो.)

“कोणीच घरी नाही आहे म्हणून टीव्हीवर मोठ्याने गाणी वाजवत बसू नकोस.”(आईच्या आवेशात)

(आईची प्रत्येक सूचना मोडीतच काढायची असे ठरवल्यामुळे ती सूचना वाचून बंटी टीव्ही मोठ्याने चालू करतो. आवडीचे गाणे सुरू असते म्हणून आवाजही वाढवत आणि मनसोक्त धिंगाणा घालून नाचही करतो. आणि दमल्यावर पुढची ओळ वाचतो.)

“घरी कोणी नाही आहे तर उगाच कपाटात उचका पाचक करत बसू नकोस. मी सगळे घर स्वच्छ आवरून ठेवले आहे, मी परत आल्यावर मला ते तसेच दिसले पाहिजे.”

“असे काय? बाबांचे कपाट तर मला कधी बघून देत नाहीत. चिंटू तर नेहमीच सांगत असतो की त्याच्या बाबांच्या कप्प्यात खूप भारी मासिके असतात त्याने परवा आणलेले मासिक तर लैच झ्याक होते. आपल्या बाबांकडे पण नक्कीच काहीतरी चांगली मासिके असतीलच की.”

(असे म्हणून बंटी बाबांचे पुस्तकांचे कपाट उघडतो. एक एक पुस्तक बाहेर काढतो. प्रत्येक पुस्तकावरचे नाव वाचतो.)

”टाइम्स, आउट-लुक इ.” (बहुतेक पुस्तके अर्थविषयक किंवा गंभीर विषयांची असल्यामुळे नाराजीने दूर फेकतो.)

“च्या मारी!! आपले बाबा लैच बोर आहेत. एवढ्या मोठ्या कपाटात एक पण कामाचे पुस्तक नाही.” (असे म्हणून निराशेने परत एकदा सोफ्यावर येऊन बसतो आणि सरबताचा पुढचा घोट घेतो आणि चिठ्ठीतील शेवटचा भाग वाचतो) (हा भाग मात्र तो स्वत:च्याच आवाजात वाचतो.)

“बंटी मला माहिती आहे, मी दिलेली एकही सूचना तू कदाचित पाळली नसशील. दुधाऐवजी तुला सरबत आवडते. अभ्यासाऐवजी टीव्ही बघणे आवडते आणि बाबांच्या कपाटात काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता पण आहे. हे सगळे मला समजत नाही का? आम्ही घरी नाही हे समजून तू स्वत:ला आवरू शकला नाहीस तर मी तुला दोष देणार नाही. त्यामुळेच एव्हाना घरात सगळी कडे पसारा झाला असेल, टीव्ही मोठ्याने सुरू केला असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही.

पण तू जर असे वागला असशील तर त्याचा अर्थ असा होईल की तू अजून जबाबदार झालेला नाहीस. काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही इथपर्यंत ठीक आहे. पण बरोबर काय आहे? हे समोरच्याने सांगून सुद्धा तू चुकीची निवड केलेली असशील या गोष्टीचे दु:ख मला नक्कीच होईल.

आयुष्यात चूक किंवा बरोबर याची समज करून देण्यासाठी दर वेळी तुझ्याकडे आई, बाबा किंवा इतर कोणी हितचिंतक असतीलच अशी खात्री देता येत नाही, म्हणूनच ही पारख तुझी तूच शिकावीस, समजावीस आणि त्याचे अनुसरण करावे हेच अधिक उत्तम राहील.

आज योग्य रस्ता दाखवण्याचे काम मी केले होते, तू जर त्यावरून चालला नसशील तर हरकत नाही. कारण घर आवरणे काम सोपे आहे, ते मी रोजच करत असते.

पण तुझ्या आयुष्याचा बाबतीत तू असे वागू नयेस इतकीच प्रार्थना मी देवाकडे रोज करेल.”

(शेवटची वाक्य गंभीरपणे वाचताना, बंटीला आपली चूक समजते. त्याच्या डोळ्यात पाणीही येते आणि चिठ्ठी बाजूला ठेवून तो घर आवरायला घेऊन अभ्यासाला बसतो.)