[ पडदा उघडतो…]
प्रसंग – ७ स्थळ.. केतनचे घर..
स्टेजवर सुशांत आणि सखाराम बसले आहेत. केतन स्टेजवर येतो…
केतन : सुशांत दा.. हे बघ तुझ्यासाठी खास येताना आणले होते…
सुशांत वळुन केतनकडे बघतो. केतन हातातली वस्तु पुढे करतो.
सुशांत : ओह माय गॉड.. स्कॉच?? वंडरफुल.. थॅक्स यार.. सखाराम आज घरी कोणी नाहीये.. आपली ताई मावशी आहे ना, तिच्या नातवाचं बारसं आहे उद्या. सगळे आज तिकडे गेले आहेत.. एकदम उद्याच येतील. चल होऊन जाउ दे.. जा ग्लास घेऊन ये..
सखाराम उठुन जायला लागतो..
सुशांत : आणि हो.. येताना जरा कपाटातुन काही तरी शेव-चिवडा घेऊन ये…
सखाराम : (सुशांतच्या हातातील बाटलीकडे बघत) आयची आन.. ऐवज..(हाताने पिण्याची खुण करतो..) व्हय जी.. आन्तो की लगीच
सखाराम धावत धावत स्वयंपाक घरात जातो.
केतन : अर्रे.. आत्ता?
सुशांत : हो… त्याला काय होतंय.. तसंही घरी कोण नाहीये.. का काय झालं?
केतन : अरे… मुड नाहीये आत्ता… नंतर बसु ना कधी तरी…
सुशांत केतनला हात धरुन खाली बसवतो..
सुशांत : अरे मग तर आत्ताच घ्यायला हवी.. म्हणजे मुड येईल तुला.. बसं रे…
केतन सुशांत शेजारी बसतो.. सखाराम स्वयंपाक घरातुन साहीत्य घेउन येतो आणि समोरच्या टेबलावर मांडतो. सुशांत बाटली उघडुन पेग भरतो आणि केतन, सुशांत आणि सखाराम आपले आपले ग्लास घेतात.
सुशांत : (एक घोट घेतो).. आहा.. अह्हा आहाहा.. केतन शेठ.. मज्जा आणलीत.. व्वा.. झक्कास…
केतन एक घोट घेतो आणि नुसताच हसतो…सखाराम एक मोठ्ठा घोट घेतो आणि अतिव आनंदाने मस्त डोकं हलवतो आणि हसतो…
सुशांत : एअरपोर्टवर घेतलीस का रे?
केतन : हो.. ड्युटी-फ्री शॉप्स असतात तेथे घेतली…
सखाराम : (अजुन दोन तीन घोट घेतो आणि) चमायला… केतन दादा…त्ये अमेरीकेला म्हणे मुली छोट्या छोट्या चड्या घालुन रस्त्यावरुन फिरत्यात म्हणे..
केतन आणि सुशांत सखारामच्या ह्या अनपेक्षीत प्रश्नाने चमकुन त्याच्याकडे बघतात.
केतन : चड्या?? सखाराम अरे.. शॉर्ट्स म्हणतात त्याला शॉर्ट्स…
सखाराम : व्हयं. व्हयं… पन काय वो.. तुम्हास्नी त्रास नाय का व्हतं मग..?
सुशांत: त्रास? कसला त्रास..?? सख्या लेका पहीलाच पेग चढला काय तुला?
सखाराम : तसं नाय.. पण असं रस्त्यानं फिरायचा म्हंजी…
केतन : अरे अमेरीकेत भोगवादी संस्कृती आहे.. तेथे नग्नता अश्लील मानत नाहीत.. तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे… तेथील लोकं सेक्स बद्दल ओपनपणे बोलतात.. मुलांना त्यांच्या लहान वयातच शाळेत ह्या गोष्टी शिकवल्या जातात..
सखाराम : व्हय.. व्हय.. पन काय ओ केतनदादा.. त्ये इलेक्शनला कोणत्या चित्रापुढं बटन दाबला म्हणजे भोगवादी का कसली ती संस्क्रुतीला शपोर्ट देनारं शरकार येईल आपल्या हिथं?
केतन आणि सुशांत दोघंही डोक्यावर हात मारुन घेतात..
सखाराम : तुम्ही काय बी म्हणा केतनदादा.. पन त्या गोर्या गोर्या बाया बघायला मस्त मज्जा येत असेल नव्हं..
केतन : मज्जा.? अरे अश्या मस्त सेक्सी असतात ना तिथल्या पोरी…
सुशांत : ओ अमेरीका रिटर्न्ड.. शब्दावर जरा बंधन ठेवा.. तुम्ही भारतात आहात आणि ते पण आपल्या घरात. ह्या सख्याला काय कळत नाही.. उद्या नको तेंव्हा.. नको तेथे, नसते शब्द उच्चारेल आणि परत तुमच्याकडे बोट दाखवुन मोकळा होइल…
(सर्व जण ग्लासमधील घोट घेत काही वेळ शांत बसतात…)
सखाराम : केतनदादा.. माझं एक खात उघडुन द्या नव्ह.. त्या थोबाडपुस्तीकेवर… गण्या सांगत होता लै भारी भारी बायकांचे फोटू असत्यात म्हणे तिथं ’तुमची वाट बघत आहेत’ म्हणुन…
केतन : थोबाड्पुस्तीका? हा काय प्रकार?? ओ हो.. फेसबुक म्हणायचं आहे का तुला?
सखाराम : व्हयं व्हयं.. त्येच त्येच.. तिकडं द्या ना एक खातं बनवुन…
केतन : बरं बरं बनवु आपण उद्या हा…
सखाराम : केतन दादा…
केतन : आता काय?
सखाराम : तिकडं अमेरीकेला लय थंडी असती म्हणं?
केतन : नेहमी नसते.. त्यांच्या हिवाळ्यात असते. पण त्यांचा उन्हाळा गार असतो एवढंच..
सखाराम : असं.. असं.. आन म्हणं.. तिकुडं बरफ पन पडत्यो?
केतन : हो.. म्हणजे कोस्टल एरीयात नाही पडत पण इतर ठिकाणी थंडीच्या दिवसात पडतो..
सखाराम : असं.. परं म्या तर असं ऐकलय,… (दोन क्षण घुटमळतो..)
केतन : बोला.. आता काय ऐकलत आपण?
सखाराम : म्हंजी, तिकुडं इतकी थंडी असतीया की आपन बोललो नव्हं.. तर तोंडातुन बरफच पडत्यो नुस्ता.. शब्दांची बरफच बनतोया.. आपन बोलत राहत्यो अन समोर ह्यो मोठ्ठा बर्फाचा ढीग जमतोया, अन मग समोरच्यानं तो बरफ गोळा करायचा अन आगीत टाकायचा आन मग आपल्याला त्ये काय काय बोलला व्हंता त्ये ऐकु येताय.. खरं हाय व्हयं ह्ये??
केतन आणि सुशांत खो खो करुन हसायला लागतात.
सखाराम तोंड पाडुन पित बसतो.
(थोड्यावेळ शांतता)
सुशांत : अरे चिडु नको सख्या, बरं बोल, अजुन काही प्रश्न आहेत का तुझे.. केतन तु न हसता उत्तर दे रे त्याला.. (बोलता बोलता सुशांत स्वतःच हसु दाबण्याचा प्रयत्न करतो).
केतन : बोला सखाराम शेठ बोला.. आहेत का अजुन काही प्रश्न?
सखाराम : हायेत जी.. अमेरीकेत म्हणे आधी पोरं व्हतात आन मग लगीन..
केतन : हो.. तेथे लग्न आणि एकुणच समाजसंस्था महाग आहे. लग्न केल्यावर घटस्फोट झाला तर पोटगी दाखल खुप पैसे द्यावे लागतात. त्यामुळे एकुणच जोपर्यंत खात्री होत नाही की हीच्याशीच, किंवा ह्याच्याशीच लग्न करायचं, तोपर्यंत लग्न होत नाहीत..
सखाराम : ह्ये काय बराबर नाय बगा.. माझं सपष्ट मत हाय.. पुरुषांन बायकांस्नी समान समजला पायजेल सामान नाय….
केतन : (हसु आवरत..) बरोबर आहे तुझं सख्या.. पण प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते.. कदाचीत त्यांच्या देश्याच्या दृष्टीने हे बरोबर असेल…
सखाराम : तुझ्यायला म्हणजे पोरं आपल्याच बापाच्या लग्नाच्या वरातीमंदी नाचत असतील ‘आज मेरे बाप की शादी है.. आज मेरे बाप की शादी है…’
सखाराम गाणं म्हणता म्हणता उठुन डोक्यावर ग्लास घेऊन नाचायला लागतो.
केतन : (सुशांतकडे बघत) ए पण खरंच तसंच असतं हा.. म्हणजे माझा बॉस जॅक्सन त्याच्या लग्नात त्याची दोन्ही पोरं होती..
सखाराम : (नाचता नाचता) आताशा मला कळतंय.. ह्यो इलायती लोकांची नावं अशी जॅक्सन, सॅम्सन का असत्यात..
केतन आणि सुशांत सखारामच्या नवीन फटकेबाजीकडे उत्सुक्तेने पाहु लागता.. : का?? का??
सखाराम : अवं का म्हंजी काय? आता तुमी म्हंता लगीन झाल्याबिगर बी पोरं व्हत्यात.. मग त्या आयांना कळाया नको कोण पोरगं कोनाचं त्ये.. म्हंजी.. जॅस्कन – जॅकचा सन जॅक्सन, आन सॅमचा सन सॅम्सन नव्हं?
केतन ह्यावेळेला मात्र गडाबडा लोळत हसत रहातो.
सखारामला एव्हाना चढु लागलेली असते. केतन आणि सुशांत एकमेकांशी बोलत असतात तेंव्हा स्टेजवर हातामध्ये हंटर घेउन पार्वती अवतरते. अर्थात तो केवळ सखारामचा एक भास असतो.. केतन आणि सुशांतला पार्वती दिसत नसते.
पार्वती हंटर घेउन सखारामसमोर येउन उभी रहाते. डर्टी पिक्चरमधले आरा..रा.. नाक्क.. मुका गाणं सुरु होतं पार्वती तसाच ओठ चावुन.. कमरेला झटके देत.. हंटरशी खेळत सखारामसमोर नाचत रहाते.. सखाराम आ.. वासुन तिच्याकडे पहात रहातो.
गाणं संपताच पार्वती निघुन जाते… सखाराम मात्र तसाच आ वासुन बसतो..
सुशांत : सख्या.. ए सख्या.. अरे कुठं तंद्री लागली आहे?
सखाराम : पारो… कुठे तरी बोट दाखवत म्हणतो…
सुशांत : पारो? कोण पारो?
सखाराम : पारो.. अवं म्हंजी.. पार्वती…
सुशांत: (चिडुन..ओरडतो) सखाराssssssssम…….
केतन आणि सखाराम आश्चर्याने सुशांतकडे बघतात.. सुशांत परत जागेवर बसतो.
सुशांत : अरे म्हणजे.. पार्वती नाव आहे ना तिचं.. एकदम पारो??
सखाराम : (लाजत लाजत) अवं म्या आपला लाडानं म्हणतो तिला…
केतन : अरे पण तुला काय एव्हढं चिडायला होतय मोलकरणीला तो बोलला तर…
सुशांत : अरे मी चिडलो बिडलो नाही.. मी आपलं… (मग विषय बदलत).. अरे तुझा ग्लास रिकामाच आहे.. घे ना..
केतन आपला ग्लास पुढं करतो. शंतनु दोघांचेही ग्लास भरुन देतो.
सुशांत : पण काय रे केतन.. तु पुढं त्या मुलीबद्दल काही बोललाच नाहीस..
केतन : मुलीबद्दल? कुठल्या मुलीबद्दल?
सुशांत : अरे? असं काय करतो आहेस? ती.. तुला शांघाय एअरपोर्टवर भेटलेली.. तु म्हणला तुला फक्त नावच माहिती आहे आणि ती मुंबईची आहे म्हणुन..
केतन : ओह.. ती.. सोड रे.. तिचं काय घेऊन बसला एव्हढं?
सुशांत : अरे!! पण तुला आवडली होती ना ती? ते काही नाही.. लाव, फोन लाव तिला…
केतन : सोड रे सुशांतदा… ते आपलं तात्पुर्त आकर्षण होतं.. मी काही माझा निर्णय-बिर्णय बदलला नाहीये.. मला आपली अमेरीकेचीच मुलगी हवी…
सुशांत : ए.. काय उल्लु समजतोस का तु मला? तुझ्या चेहर्यावरुन कळत होतं.. ते काही नाही.. चल नाव आणि नंबर दे.. तुला नसेल बोलायचं तर मला सांग मी बोलतो…
केतन : (वैतागुन) फx यु सुशांतदा.. तुला सांगुन कळत नाहीये का एकदा.. मला इंटरेस्ट नाहीये…? तुला मनासारखी मुलगी मिळाली, तुझं लग्न ठरलं म्हणजे इतरांचही व्हायला हवं का? आणि माझं लग्न ठरवायचा ठेका दिलाय का तुला? माझं मी बघण्यास समर्थ आहे कळलं????
सुशांत आणि सखाराम आचंबीत होऊन केतनकडे बघत बसतात..
केतन : सॉरी.. आय एम सॉरी.. मी ओव्हररीअक्ट झालो..
सुशांत अजुनही स्तब्ध होऊन केतनकडे बघत असतो. मग थोड्या वेळाने..
सुशांत : इट्स ओके… माझंच चुकलं.. तुला उगाच फोर्स करत बसलो..फक्त तुमच्या अमेरीकेतील शिव्यांना जरा आवर घाला.. कृपया इथे नको.. ओके?
केतन : हम्म.. (हातातला ग्लास रिकामा करतो)..
सुशांत : एनीवेज.. मला बास्स.. मी जातो झोपायला…
सखाराम : अवं खाऊन तर जा काही तरी..
केतन : नाही.. नको सख्या.. मला नकोय जेवायला.. तुमचं चालु द्या.. मी जातो..
केतन एकवार सुशांतकडे बघतो. दोघांची काही क्षण नजरानजर होते आणि मग सुशांत निघुन जातो.
सखाराम आणि केतन अजुन दोन चार पेग काही न बोलता रिचवतात. सखाराम काही तरी घ्यायला उठतो, पण त्याचा तोल जातो आणि तो खाली बसतो.
केतन त्याला सावरायला उठतो… सखारामला पडताना बघुन तो जोरजोरात हसतो.