Santa bhetato tevha in Marathi Love Stories by Aaryaa Joshi books and stories PDF | सांता भेटतो तेव्हा

Featured Books
Categories
Share

सांता भेटतो तेव्हा

सांता भेटतो तेव्हा

तिच्या चिमुकल्या डोळ्यात नीज उतरली होती. खरं तर ती ख्रिस्ती परंपरेतली नव्हती पण अनेक देवांना पूज्य मानत असलेल्या तिच्या परंपरेबद्दल तिच्या वडिलांना आदर होता. त्यांनी तिला लहानपणीच ख्रिसमसचं खोटं झाड आणून दिलं.ते सजवायला चांदण्या!रंगीत काठ्या,घंटा,चेंडू असं खूप खूप काही. त्या चमचमत्या झाडाशेजारी तिने मोजा टांगून ठेवला होता. आणि चोवीस डिसेंबरच्या रात्री ती झोपली सांताची वाट पाहत. दरवर्षी सांता तिला हवं ते ठेऊन जात असे खाऊ खेळणी पुस्तकं पेन्सिली असं खूप खूप छान.
सकाळी आईलासुद्धा माहिती नसे की हे सांता कधी ठेऊन गेला ते!
पाहता पाहता वर्ष सरली. दरवर्षी न चुकता झाड सजवलं जाई. वस्तू आता ती आणू लागली सजावटीच्या.आता घरात केक खाऊ मित्र मैत्रिणीही यायला लागले.
या सगळ्यात तिला कळलं होतं की या स्वप्नमयी दुनियेचा अनूभव परदेशात लोक घेतात. सजलेल्या आणि उत्साहाने भरलेल्या बाजारपेठा, खरेदी,खर्‍या सूचिपर्णी वृक्षांची सजावट,प्रार्थनेसाठी सज्ज धर्मस्थळं हे तिला एकदातरी अनुभवायचं होतं आणि भेटायचं होतं सांताला....
मोठी झाली तरी स्वप्न परीकथेतलंच होतं.शिक्षण झाल.नोकरी लागली,घरात लग्नाची चर्चाही सुरु झाली.
परदेशातला नवरा केलास की दरवर्षी हे मिळेल अनुभवायला... पण तिला भारतातच रहायचं होतं... तिच्या कलेसाठी, पालकांसाठी..
कथकची नृत्यांगना म्हणून कार्यक्रम करायला नाताळच्या सुट्टीत बाहेरगावी जातानाही ती ख्रिसमसचं झाड आणि मोजा लावूनच गेली होती.नक्की त्यात काहीतरी असणार... बाबा ठेवणारच नक्की आपल्यासाठी छान काहीतरी...
ते वर्ष सरलं... पुढच्या वर्षी तिचा एक बालमित्र भारतात आला कॅनडाहून.. सर्वांना भेटला. हिची ख्रिसमसची ओढ आजही कायम आहे आणि तिला तो बर्फातला White Christmas अनुभवायचा आहे आजही हे त्याला समजलं आणि लक्षातही राहिलं.
दोघे संपर्कात होते.अधूनमधून बोलायचे पण फार घट्ट होते असं नाही.पण तरी आता या टप्प्यावर त्याला तिचा अजूनही जिवंत असलेला निरागस स्वप्नाळूपणा आवडला...
अचानक एक दिवस एक पाकिट आलं. त्यात परदेशी जायचं आमंत्रण होतं.. नाव होतं तिच्या मावशीचं.
इतक्या वर्षात मावशीला नाही जमलं पण आता शक्य असेल म्हणून पाठवलं असेल हे सगळं... आईशी मावशीचं बोलणं झालं होतच आणि बाबाही तयार होते खर्च करायला. त्यामुळे आई आणि ती परदेशी जातील अशी योजना झाली. नाताळच्या दिवसात परदेशी जाणं म्हणजे मोठा आर्थिक भुर्दंड!! पण बाबाने विचार केला की एकुलती एक लेक.कधी तिने अनाठायी हट्ट नाही केला. त्यामुळे लग्न करुन जाण्यापूर्वी ही हौस पुरवूया... थोडा चिमटा काढून...
पंधरा डिसेंबरला ती उडली आईसोबत बाबाचा निरोप घेऊन.कॅनडात पोहोचली आणि बर्फाने आनंदून गेली गारठून काकडूनही गेली. मावशी लग्न होउन तिकडे गेली आणि आता तिकडचीच झाली होती.त्यामुळे मावशीची सहजता आणि हिचा उत्साह यातून मावशीचं मराठमोळं घरही नाताळमय झालं. घरून जाताना आपलं झाड आणि मोजा तिने लावलाच होता. बाबा सांता त्यात ठेवणार होताच काहीतरी खात्रीने छोटंसं का होईना.
मावशीसह ती फिरली,हुंदडली. बर्फाचा माणूस तयार झाला.त्याच्या डोक्यावर टोपी सजली.
बाजारपेठेत गल्लोगल्ली दिसणारे सांता खुणावू लागले.त्यांच्याशी हस्तांदोलन करताना ती पुन्हा लहान झाली. तिचा वेडेपणा नव्हे स्वप्नाळूपणा पाहताना आईही वेडी झाली.खरंच कशाने नक्की हिला वेडावलं आहे लहानपणापासून....
रात्री झोपली ती उद्याची स्वप्नं पाहत. शेकोटीच्या जागेवर मोजा टांगून.... खिडकीतून भुरभुरणारं बर्फ, टीव्हीवर दिसणार्‍या प्रार्थनांचं प्रक्षेपण, वातावरणात भरून राहिलेलं नाताळचं उत्साही वातावरण... ती तरंगत राहिली.
सकाळी उठली आणि धावत खाली आली.
तिचा सांता भेटण्याची खूण सांगणारं पाकिट ठेवून गेला होता.
तिने वाचलं आणि चक्रावली.कुठे आहे हे ठिकाण? मावशी आणि आईला विचारून ती निघाली. मावशीने भावालाही बरोबर पाठवल. नक्की कुणाला भेटणार आहोत आपण? आणि कुणी ठेवलं असेल पाकिट? पण सावधपणाने मावशीने आणि आईने भावाला पाठवलय बरोबर म्हणजे त्यांना माहिती असेल का?
भावाच्या गाडीतून ती उतरली. बाजारपेठेतल्या एका काॅफीच्या हाॅटेलाचा तो पत्ता होता..
भावाने तिला उतरू दिलं आणि गाडी लावायला तो गेला.
दोघे शोध घेत निघाले. भावाला कदाचित माहिती होतं पण मग हिला का भासवत होता तो हे असं??
गजबजलेल्या नाच गाण्यात रंगलेल्या जत्थ्यातून ती पुढे गेली. सजवलेल्या झाडापाशी सांता उभा होता.मुलांना शुभेच्छा देत चाॅकलेट देत होता.
तिनेही हात पुढे केला....
सांताने तिचा हातच धरला... भाऊ लांबून पाहत होता...
सांताने मुखवटा बाजूला केला... तो तिचा बालमित्र होता...
माणसं बुरखे पांघरून जगताना मी पाहिलं अनूभवलं. स्वार्थासाठी खोटी नाती जगतानाही पाहिलं. पण तुझा प्रामाणिक निरागसपणा मला स्पर्शून गेला.अंतर्मुख करून गेला. मला माहिती आहे तुला भारतातच राहायचं आहे पण कला इथेही सांभाळता येईल तुझी... लग्न करशील माझ्याशी..?
बाहेर बर्फ भुरभुरत होतं.पाश्चात्य वाद्यांच्या आवाजातही तिला आता घुंगरांचे तत्कार ऐकू येऊ लागले...