आई : अरे हे बघ.. ये तुला लावुन बघु कसे दिसते आहे.
असं म्हणुन आई सुशांतला मुंडावळ्या बांधुन बघते. केतन मात्र रागाने सुशांतकडे बघत रहातो.
आई : हम्म.. आत्ता कसं लग्नाचा मुलगा वाटतो आहेस.. काय अनु? कसा दिसतोय सुशांत?
अनु : (चेहर्याची एक बाजु तळहाताने झाकत).. इश्श…..
आई : सुशांत… नशीबवान आहेस तु.. बघ.. बघ कश्शी लाजते आहे ते….
अनु : काय हो आई.. (असं म्हणुन अनु आईंना बिलगते..)
सखाराम : (नाचायला लागतो) मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी सदा खुश राहो ये दुआ है हमारी
सगळेजण हसत हसत सखारामकडे बघत असतात.
सखाराम नाचत नाचत तो केतनपाशी येतो, त्याचा हात धरुन त्याला उठवतो आणि त्याला पण नाचण्यात ओढतो. पण केतन चिडुन त्याचा हात बाजुला ढकलतो.
आई : अनु.. हे घे तुझ्यासाठी आणलं आहे (असं म्हणुन पिशवीतुन एक पुस्तक काढुन अनुकडे देतात)
अनु : काय आहे हे आई?
आई : अगं उखाण्यांच पुस्तक आहे. आत्तापासुनच पाठ करायला लाग, ऐन वेळेला आठवत नाही बघ.
अनु : अहो पण अवकाश आहे अजुन..
आई : अवकाश कसला.. विसरशील ऐन वेळेस. तुला सांगते, अगं माझ्या लग्नात किनई अस्संच झालं होतं. ऐन वेळेस मी उखाणाच विसरले बघ..
अनु : (डोळे मोठ्ठे करुन) अय्या होssss!! मग?
आई : मग काय? केला शब्द जुळवुन असाच तयार. त्यावेळेस आमचे हे इतके बारीक, हडकुळे होते ना, मग मी उखाणा घेतला..
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे…
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे…
घास भरवते मरतुकड्या तोंड कर इकडे..
सगळं खो खो खो करत हसायला लागतात. हसता हसता एक एक करत सगळे आतमध्ये निघुन जातात. अनु उरले-सुरले सामान गोळा करते, केतनकडे बघुन एकदा हसते आणि आतमध्ये निघुन जाते.
केतन अनु गेली त्या दिशेकडे बघत बसतो.
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)
तो इतका तल्लीन आणि स्वतःच्या विचारात गुंग होतो की त्याच्या मागे पार्वती येऊन उभी राहीली आहे हे सुध्दा त्याच्या लक्षात येत नाही.
पार्वती एकदा त्याच्याकडे आणि एकदा अनु गेली त्या दिशेकडे दोन-तिनदा पहाते. मग हसते आणि..
पार्वती : गेली ती…
केतन : (दचकुन) अं…
पार्वती : अनु कडे बघत होतास ना? गेली ती आतमध्ये…
केतन : हो.. नाही.. मी .. मी कुठं अनुकडे बघत होतो.. मी आपलं असंच.. (डोक्यावरुन हात फिरवत उठुन बसतो)
पार्वती : आत्ता आतमध्ये निघुन गेलीय.. काहीच केले नाहीस तर कायमचीच निघुन जाईल.. हातातुन…
केतन विचारात गढुन जातो… पार्वती स्वतःशीच हसत हसत आतमध्ये निघुन जाते…
स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो.
प्रसंग -५ स्थळ तेच.. केतनचे घर..
अनु काहीतरी काम करण्यात मग्न आहे.. केतन जिन्यावरुन खाली येतो. अनुला बघुन काही वेळ विचार करतो (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) आणि मग तिच्या शेजारच्या सोफ्यावर जाऊन बसतो..
अनु वळुन केतन कडे बघते. दोघंही एकमेकांकडे बघुन हसतात. केतन तेथेच चुळबुळ करत बसतो.
थोड्यावेळाने..
अनु : काय रे? काही बोलायचं आहे का?
केतन : नाही विशेष असं काही नाही. म्हणलं आठवड्यावर येऊन ठेपले लग्न.. कसं वाटतं आहे?
अनु केतनकडे बघुन हसते आणि परत कामात मग्न होते.
केतन : म्हणा तुला तसा फारसा फरक पडणार नाही.. तुझं घर इथंच समोरच आहे ना.. आणि तुला इथंही सवय आहे तशी.. म्हणजे मी बघतोय ना.. सगळ्यांना तुच हवी असतीस…
अनु : (हसते) हम्म.. पण शेवटी लग्न हा मुलींच्या आयुष्यातील एक वेगळा टप्पाच असतो रे.. शेवटी आपलं घर ते आपलं आणि नवर्याचे घर ते नवर्याचंच ना.. आणि आता सुशांतचे हे अमेरीकेचं चालु आहे.. आम्ही नाही म्हणलं तरी वर्ष दोन वर्ष तिकडं जाणार.. मग कुठले आई-वडील आणि कुठले सासु-सासरे..
केतन : तुला नाही जायचं अमेरीकेला? मग सांग तसं सुशांतदा ला.. सांग त्याला अमेरीकेचे खुळ काढुन टाक म्हणुन….
अनु : अरे.. असं कसं.. त्याचं स्वप्न आहे ते.. आणि तु सांग.. तु गेली आठ वर्ष आहेच ना अमेरीकेत.. तुला मी म्हणलं अमेरीका सोडुन इकडे ये रहायला.. येशील???
केतन : दुसर्या दिवशी येईन…
अनु चमकुन केतनकडे बघते
अनु : ऐ है.. म्हणे दुसर्या दिवशी.. आणि तुझं झालं आहे अमेरीकेत आठ वर्ष राहुन, म्हणुन कदाचीत तु म्हणत असशील.. सुशांतचे तसे नाहीये.. तो कधी गेला नाहीये अमेरीकेला.. त्याला क्रेझ असणारच ना.
असो.. ते जाऊ देत.. झाली का तुझी दुपारची झोप??
केतन : नाही गं.. झोपलो नव्हतो.. पिक्चर बघत होतो टी.व्ही. वर..
अनु : हो? कोणता रे?
केतन : डी.डी.एल.जे..
अनु : वॉव.. काय मस्त मुव्ही आहे नाही तो? कित्ती ही वेळा बघा.. कंटाळाच येत नाही.. शाहरुख आणि काजोल.. एव्हरग्रीन पर्फ्रोमंन्स नाही..
केतन : हो.. खरंच कित्ती वेळा पाहीलाय पिक्चर.. पण लागला की परत पहावासा वाटतोच..
अनु आपल्या कामात पुन्हा मग्न होते.. केतन पाय पसरुन.. सोफ्यावर डोकं टेकवुन विचार करत बसतो. मागुन दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे मधील तो प्रसंग ऐकु येत रहातो जणु तो प्रसंग केतनच्या मनात पुन्हा पुन्हा येतो आहे…
‘कौन है वो लडकी?’ अनुपम खेर
‘सिम्रन…!! कौन लडकी??” शाहरुख..
“वही.. जिसकी सुरत तुम चांद मै धुंडनेकी कोशीश कर रहे हो..” अनुपम खेर..”देखो बेटा मै तुम्हारा बाप हु..बताओ मुझे कौन है वो लडकी..”
“पॉप.. सिम्रन नाम है उसका”, शाहरुख
“प्यार करते हो उससे?”, अनुपम खेर
शाहरुख मान डोलावतो..
“और वो..”, अनुपम खेर
“पता नही.. और वैसे भी उसकी शादी तैर हुई है”, शाहरुख
“तैर हुई है ना.. अभी तक हुई तो नही? जावो.. बतादो उसे की तुम उसीसे प्यार करते हो..और ले आओ उसे इस घरकी दुल्हन बनाके.. बेटा एक याद रखना.. दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए..” अनुपम खेर..
अनु : ए पण काय रे.. तुला कशी मुलगी हवी? तु सांगीतलच नाहीस.
एव्हढ्यात तायडी स्टेजवर येते.
तायडी : अगं त्याला काय विचारते आहेस.. आम्हाला विचार ना. त्याला हवी असलेली मुलगी इथली नसणारच आहे.. तिकडची.. विलायतेतली.. ब्लॉड-फिंड हवीय त्याला..
अनु : हो.. सुशांत म्हणाला होता मला…
तायडी : मग काय.. एक-सो-एक स्थळ आली होती ह्याच्यासाठी. तसा गुणाचा आहे तो. वडील लहानपणीच सोडुन गेले. सुशांत होताच म्हणा पाठीशी.. पण तरीही स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहीला, कंम्युटर शिकला.. साता-समुद्रापार अमेरीकेतील कंपनीत नोकरी काय मिळवली आणि आज एका मोठ्या हुद्यावर काम करतोय.. गम्मत नाही.
अनु आळीपाळीने एकदा तायडीकडे तर एकदा केतनकडे पहात रहाते.
तायडी : अनु, तुला म्हणुन सांगते, तुझं आणि सुशांतच जमलं होतं म्हणुन, नाही तर खरं केतनसाठीच तु आम्हाला पसंद होतीस.
(अनु आणि केतन दोघंही चमकुन तायडीकडे बघतात) पण ह्या साहेबांना काहीच पटत नव्हतं..
केतन : तायडे, पण तु मला हीचा कुठं फोटो दाखवलास..? दाखवला असतास तर कदाचीत…
तायडी : चल रे.. डॅंबीस कुठला.. आता बस हातावर हात चोळत….
तायडी आणि अनु दोघीही हसायला लागतात. आणि हसता हसताच आतमध्ये निघुन जातात.
दुसरीकडुन स्टेजवर सखाराम घाईगडबडीत येतो. सख्याला बघुन केतन त्याला थांबवतो..
केतन : अरे सख्या.. थांब ना..
सखाराम : नगा थांबवु दादा.. लै काम हाईत..
केतन : अरे होतील रे काम.. किती धावपळ करशील एकटा.. (मग थोडा विचार करुन) जरा त्या पार्वतीला पण सांगत जा की कामं.. ती तर कधीच कामं करताना दिसत नाही.. तुच एकटा धावपळ करत असतोस बिच्चारा…
सखाराम : (आनंदाने) व्हय ना.. तुमास्नी बी असंच वाटत्ये ना.. (मग हळुच केतनच्या जवळ जात हळु आवाजात) अवं पण सुशांतदादांची वार्नींग हाय.. पार्वतीला जास्ती कामं नाय सांगायची..
केतन : (आवाजात खोटं आश्चर्य आणत).. हो?? का रे? का असं का? ती पण कामवालीच आहे ना?
सखाराम : व्हयं जी.. काय म्हाईत नाय बा..
केतन : (अगदी हळु आवाजात) सख्या.. सुशांतदा आणि पार्वतीच काही…
सखाराम : (तोंडावर हात मारत) अव्वाव्वाव्वा… काय बोलताय दादा.. नाय वो.. तसं काय नाय.. पार्वती सुशांतदादांच्या हाफीसातील कुणाचीतरी बहीन हाय नव्ह… म्हनुन असेल.. चला जाऊ द्या मला.. लै कामं खोळंबली हाईत..
सख्या निघुन जातो.
केतन उठुन उभा रहातो आणि दोन्ही हात पसरुन जोरात म्हणतो…
केतन : (स्वगत) “…दुल्हन उसीकी होती है जो उसे डोली मै बिठा के घर ले आए………”
शेजारच्या टेबलावर ठेवलेली जत्रेत मिळतात तसली दिवे लागणारी शिंग उचलुन डोक्याला लावतो. हातामध्ये एखादे त्रिशुळ..
केतन : (स्वगत).. आय एम डेव्हील.. डर्टी डेव्हील.. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ऍंन्ड वॉर’ असं सगळेच म्हणतात, मग आपण तरी कशाला मागे रहायचं. पुढे काय होईल ते होईल. पण निदान अनुला माहीती तरी करुन देण आवश्यक आहे की माझ्या मनात काय आहे ते.. हे असे जगु नाही शकत.. नाही जगु शकत मी…
स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो.