Vaasna ek n ulgadnare satya in Marathi Horror Stories by Vaibhav Karande books and stories PDF | वासना एक न उलगडनारे सत्य ...!

Featured Books
Categories
Share

वासना एक न उलगडनारे सत्य ...!

वासना एक न उलगडनारे सत्य...!

निनाद आणि चेतनाचं नुकतंच लग्न झालेलं. निनादचे आई वडील गावाला होते. नोकरीच्या निमित्ताने निनाद मुंबईत स्थायीक झाला होता. आता निनाद आणि चेतना नवीन घराच्या शोधात होते. किती दिवस भाड्याच्या घरात दिवस काढणार. आपलं स्वत:चं घर असावं असं दोघांनाही वाटत होत. इस्टेट एजंट त्यांना घर दाखवत होते पण कधी घर पसंत पडायचं नाही आणि पडलं तर बजेटच्या बाहेर जात होत. एक दिवस मात्र इस्टेट एजंटने रमणिकलालने दाखवलेलं घर दोघांनाही पसंत पडलं. ऐसपैस बंगलाच होता तो. चार खोल्यांचा. दोन खोल्या वर दोन खाली. बाहेर मोठ्ठ अंगण. घर पाहून चेतना हरखली. बाहेरच्या अंगणात सुंदर बाग फुलवायची असं तिने मनोमन ठरवलं. किचनच्या खिडकीबाहेर तिला एक डेरेदार वृक्ष दिसला. त्याच्या भोवती पार बांधलेला होता. त्या पारावर एक सुंदर बाई बसलेली होती. तिला पाहून चेतना बाहेर गेली. त्या बाईला भेटली. कोण तुम्ही? त्या बाईने स्मित केले आणि म्हणाली मी ललिता. इथेच राहते. इथून किती छान दिसतो नं परिसर. जेव्हा केव्हा मला निराश वाटत, तेव्हा मी इथे माझं मन शांत करायला येते.

‘ओहो चला आपली ओळख झाली या निमित्ताने. हे घर आहे नं, ते घ्यायचा विचार करतोय आम्ही.’ ‘अरे वा फार उत्तम झालं. या लवकर रहायला. तेवढीच मला सोबत’ ती बाई म्हणाली. निनाद रमणिकलालशी व्यवहाराच्या गोष्टी करत होता तेवढ्यात त्याचं लक्ष बाहेरून येणाऱ्या चेतनाकडे गेलं. काय, आवडली नं जागा? निनाद विचारत होता. ‘हो हो खूप छान आहे. आपण हाच बंगला घेऊयात. इथे शेजार पण चांगला आहे. आत्ताच माझी एका बाईंशी ओळख झाली’ चेतनाने सांगितलं.

निनाद आणि चेतना तिथे रहायला आले. निनादला ऑफिस थोडं लांब पडतं होतं पण तेवढ अॅडजस्ट केलं तर दिवस खूप उत्तम जात होते. काही दिवसांनी मात्र चेतना निनादला सांगायला लागली की तिला बंगल्यात कोणीतरी वावरतय असं सारखं वाटतं. कधी कधी किचनमधला नळ आपोआप चालू होतो किंवा लाईट चालू बंद होतात. निनाद तिला सांगायचा तुला एकटं रहायची सवय नाही ना त्यामुळे असेल असं कदाचित. तू जरा घराबाहेर पड म्हणजे तुला बरं वाटेल. एक दिवस चेतना सांगायला लागली मला त्या ललिताबाई परत भेटल्या आज. आम्ही खूप गप्पा मारत होतो. त्या इथे जवळच रहातात. त्यांनी मला त्यांच्या घरी यायचं आमंत्रणही दिलयं. काही दिवसांनी चेतनाच्या तक्रारीही बंद झाल्या. निनादला वाटलं चला बरं झालं चेतना इथे रुळली. पण तिच्यात झालेला बदल निनादला जाणवू लागला. तो जेव्हा ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा ती एकदम तयार होऊन बसलेली असायची. सुरवातीला निनादने विचारलही,

‘कुठे बाहेर जातेयस का?’ तर म्हणाली, ‘नाही रे, तू येणार होतास नं, मग मी छान दिसायला नको का? आणि खळखळून हसली. चेतनला असं हसताना निनाद प्रथमच पहात होता. चेतनाचा कपड्यांचा चॉइसही बदलला. तिचं वागण बोलणंही आता मादक व्हायला लागलेलं. चाल मस्तानी व्हायला लागली. तिला पाहिलं की निनादला वाटायला लागलं ऑफिस बिफीस सोडून बस्स तिला मस्त मिठीत घेऊन दिवस घालवावा. आता तर त्यांच्या रात्रीही जरा जास्तच रंगायला लागल्या. कधी नव्हे ते चेतना आता पुढाकारही घ्यायला लागली होती. काही दिवसांनी मात्र निनादला या सर्व गोष्टींचा वीट यायला लागला. तरीही चेतनाचा रागरंग बघून तो तिला साद देत होता.

एक दिवस मात्र निनाद तिला म्हणाला, ‘चेतना आज नको गं प्लीज. ऑफिसमध्ये खूप लोड होता. मी खूप दमलोय. पण चेतना काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. निनाद नको म्हणत असतानाही तिने त्याच्यावर जबरदस्ती केली. हळूहळू तर ती हिंसक व्हायला लागलेली. रात्रभर ती निनादला सोडतचं नव्हती. सकाळी ऑफिसमध्ये निनाद एकदम थकलेल्या अवस्थेत दिसायचा. त्याच्या मित्रांनीही त्याला चिडवायला सूरवात केली, रात्री झोप झाली नाही वाटत अशी. आता तर निनादला ऑफिसमधून सुटलं की घरी जावंसं वाटायचंच नाही. तो असाच इकडे तिकडे फिरत रहायचा. तो कितीही उशिरा घरी गेला तरी चेतनाच्या तावडीतून सुटायचा नाही. त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे हे तो कोणाला सांगूही शकत नव्हता. यातून कसं बाहेर पडायचं तेच त्याला कळतं नव्हतं. माझी निरागस हसरी चेतना मला किती जपत होती. कुठे हरवून गेली ती, ही कोणीतरी दुसरीच आहे असं त्याला वाटायला लागलं.

शेवटी निनादने त्याच्या मित्राला सचिनला त्याची परिस्थिती सांगितली. सगळं ऐकून सचिनचा आपल्या कानावर विश्वास बसेना. शेवटी तो म्हणाला, आज मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येतो. काही मार्ग सुचतो का पाहूयात. सचिनला निनादबरोबर बघून चेतना नाराज झाली आणि काहीच न बोलता तडक बेडरूममध्ये निघून गेली ती बाहेरच आली नाही. सचिन आणि निनादला तिचं वागणं खटकलं पण ते काहीच बोलले नाहीत. निनादने किचनमध्ये जाऊन बघितलं तर जेवणही बनवलेलं नव्हतं. शेवटी त्या दोघांनीच खिचडी बनवली. निनाद चेतनाला जेवायला बोलवायला गेला. तब्येत बरी नाहीये का तुझी चेतना? ये थोडी गरम गरम खिचडी खा म्हणजे बरं वाटेल तुला,’ निनाद काळजीने म्हणाला. चेतना एकदम निनादच्या अंगावर धावून गेली. मला काय धाड भरलीये, ठणठ्णीत आहे मी. तू तुझ्या त्या मित्राला कशाला आणलयसं?

तुला काय वाटलं, असं त्याला बरोबर आणलसं तर माझ्या तावडीतून सुटशील? शक्य नाही ते. आत ये. मला तू आत्ताच्या आता हवायस. निनादला आश्चर्य वाटलं तो म्हणाला ‘अग चेतना असं का वागतेयस? आज किती दिवसांनी सचिन आपल्या घरी आलाय. गेल्या वेळेला तो आलेला तेव्हा त्याचं किती भरभरून स्वागत केलेलंस तू ? खाली येवून थोडं बस नं आमच्याबरोबर. हे काय भलतचं चालू आहे तुझं? ते काही मला माहित नाही आधी तू आत ये, असं म्हणून चेतनाने निनादचा हात धरला. तिच्या हाताला झटकून निनाद खाली गेला.

निनाद आणि सचिनने जेवून घेतलं आणि ते हॉलमध्येच गप्पा मारत बसले. अचानक हॉलमधला टीव्ही चालू झाला. निनादने तो बंद केला तरी परत टीव्ही चालू झाला. हे काय होतय निनाद वैतागून म्हणाला पण सचिनला आता भीती वाटायला लागली होती. तेवढ्यात वरती लटकलेल झुंबर खाली पडताना निनादला दिसलं त्याने पटकन सचिनला धक्का मारून बाजूला केलं नाहीतर ते झुंबर डोक्यात पडून सचिनचा कपाळमोक्षचं होणार असता. जोराचा वारा सुटला. बाहेरच्या झाडांची सळसळ ऐकू यायला लागली. जोरदार पाऊस सुरु झाला. ‘अवेळी पाऊस कसा काय सुरु झाला?’ सचिन म्हणाला. विजा जोरजोरात चमकायला लागल्या आणि घरातले लाईट गेले. मेणबत्ती शोधायला निनाद किचनमध्ये गेला. सचिन हॉलमध्ये बसून होता तेवढ्यात त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या अगदी जवळ उभं आहे. ती चेतना होती. चेतनने हळू हळू सचिनला स्पर्श करायला सुरवात केली. सचिन ओरडला ‘वहिनी तुम्ही हे काय करत आहात?’ त्याचा आवाज ऐकून निनाद बाहेर आला. त्याच्याकडे बघून चेतना म्हणाली ‘तू नही और सही. निनादच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. तू माझी चेतना असूच शकत नाही. कोण आहेस तू? तो म्हणाला. चेतनाने विकट हास्य केलं आणि म्हणाली आता कसं बरोबर ओळखलसं.

तुझी चेतना तर तुला कधीच सोडून गेली. आता फक्त मीच आहे ललिता. सचिन निनादला म्हणाला ‘चल निघ इथून’ आणि त्याला खेचत दरवाजापाशी घेऊन गेला पण दार काही उघडायला तयार नाही. ‘आता तुम्ही दोघंही माझ्या तावडीतून सुटून जाऊ शकत नाही’ असं म्हणून चेतना त्यांच्या जवळ यायला लागली. सचिन आणि निनादला काय करावं ते सुचेना. तेवढ्यात निनादने धावत जाऊन टेबलावरची सुरी उचलली आणि चेतनच्या शरीरावर सपासप वार केले. एक मोठी किंकाळी मारून चेतना तिथेच कोसळली.

निनादला पोलिसांनी अटक केली. ते त्याला परत परत विचारत होते ‘तू तुझ्या बायकोचा खुन का केलास? आणि तो एकच उत्तर देत होता ‘माझी चेतना किती सालस गुणी होती हो मी तिचा खुन का करेन. मी मारलं ती चेतना नव्हतीच ती ललिता होती. निनादच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं निदान करून निनादला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथे त्याने माझी चेतना, माझी चेतना असं म्हणत दम तोडला.

सचिन सुन्न झाला होता. या सर्व अतार्किक गोष्टींचा तो एकमेव साक्षीदार होता. त्याच्या मित्राला त्याला न्याय मिळवून द्यायचा होता. सचिनला ही ललिता कोण असा प्रश्न पडलेला. त्याने शेवटी इस्टेट एजंट रमणिकलालला पकडलं पण त्याला ललिताबद्दल काहीच माहिती नव्हती. सचिनने आजूबाजूला चौकशी करायला सुरवात केली. आधी त्याला कोणीच काही सांगत नव्हतं तरी त्याने हींमत हरली नाही. एक दिवस तो अशीच आजूबाजूला चौकशी करत होता. आता हा एकच बंगला राहिला आहे दारावरची पाटी वाचत सचिन विचार करत होता. इथे तरी काही माहिती मिळते की नाही अशा साशंकतेने त्याने त्या बंगल्याची डोअरबेल वाजवली. दरवाजा एका म्हातार्याशा गृहस्थांनी उघडला. ‘काय पाहिजे तुम्हाला?’ सेफ्टीडोअरच्या पाठून त्या गृहस्थांनी विचारलं.

काका मला थोडी माहिती हवी होती. ‘बोला कसली माहिती?’ तो पुढच्या वळणावर गुलाबी बंगला आहे नं त्याबद्दल थोडसं विचारायचं होतं. कोण तुम्ही? तो बंगला चांगला नाहीये. तो घेण्याचा विचार करत असाल तर आत्ताच सावध व्हा. सचिनने त्या गृहस्थांना आपली निनाद आणि चेतनाबद्दल सांगितलं. काका प्लीज तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा. मला माझ्या मित्राला न्याय मिळवून द्यायचा आहे’ सचिन म्हणाला. त्या गृहस्थांनी सचिनला घरात घेतलं आणि पुढे माहिती पुरवली खूप वर्षापूर्वी प्रधान नावाच्या गृहस्थांनी अगदी हौसेने हा बंगला बांधलेला. त्या प्रधानांच्या पत्नीचं नावं ललिता होतं. त्यांना एक मुलगाही होता. या ललिताबाई एक दिवस घरातून नाहीश्या झाल्या. कुठे गेल्या कोणालाचं कळल नाही. काही दिवसातच प्रधानांनीही हा बंगला विकला. ‘त्यानंतर ते कुठे गेले काही माहित आहे का काका तुम्हाला? सचिनने विचारलं. नीटस माहिती नाही पण मध्ये एकदा त्यांचा मुलगा राजस माझ्या मुलाला सोशल मेडियावर भेटलेला. मला वाटत तो माझ्या मुलाच्या संपर्कात आहे. त्या काकांनी सचिनला आपल्या मुलाचा विनीतचा मोबाईलनंबर दिला. विनीतकडून राजसची माहिती मिळाल्यावर सचिनने राजसला फोन केला आणि त्याला सांगितलं की त्याचं राजसकडे अत्यंत महत्वाचं काम आहे.

एका रेस्टोरंटमध्ये राजस आणि सचिन भेटले. हं बोला काय काम होत माझ्याकडे. सचिनने राजसला निनादबद्दल सांगितलं. राजसच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आमचं आयुष्य उध्वस्त केलं तिने आणि आता मेल्यावरही आपले उद्योग थांबवलेले नाहीत. आय हेट हर. राजसच्या चेहऱ्यावर राग अगतिकता दु:ख अशा संमिश्र भावना उमटल्या. सचिनने त्याला शांत करायचा प्रयत्न केला. राजसने पुढे बोलायला सुरवात केली. माझे वडील एक पापभिरू व्यक्ती होते. इमानेइतबारे आपला बिझनेस सांभाळून माझे वडील माझ्या आईच्या सगळ्या मागण्या पुर्या करायचे. माझ्या आईला स्वत:च्या सौदर्याचा गर्व होता. माझे वडील जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचे तेव्हा आमच्या घरी अनोळखी माणसांचा राबता असायचा. मी लहान होतो तेव्हा मला कळायचं नाही पण थोडा मोठा झाल्यावर आईने माझ्या वडिलाना सांगून मला होस्टेलमध्ये ठेवलं. मी गेल्यावर तिला तर रानच मोकळं झालं. मी जेव्हा सुट्टीत घरी यायचो तेव्हा आजूबाजूचे लोकं माझ्याकडे विचित्र नजरेने बघतं असतं कुजबुजतं असतं. माझ्या वडिलांचीही काही वेगळी अवस्था नव्हती.

एक दिवस मात्र ती आमच्या घरातून नाहीशी झाली. ती गेल्यावर माझ्या वडिलांना भ्रमाचे झटके यायला लागले. शेवटी आम्ही ते घर विकून दुसरीकडे रहायला गेलो. मागच्याच वर्षी माझ्या वडीलांचं निधन झालं. जायच्या एक दिवस आधी त्यांनी मला जवळ बोलावलं आणि सांगितलं की माझी आई कुठेही निघून गेली नव्हती. माझ्या वडिलांनीच तिचा खून करून तिला त्या झाडाखाली पुरलं. वरून पार बांधून घेतला. माझी आई कोणाबरोबर तरी निघून गेली असं त्यांनी सगळीकडे पसरवलं. तिच्या मृत्यूनंतरही ती माझ्या वडीलांना दिसत होती. मी तूला सोडणार नाही अशी धमकी ती माझ्या वडिलांना द्यायची. त्यामुळे वडील भ्रमात असल्यासारखे वागत होते. माझ्या आत्याने आम्हाला सावरायला मदत केली. राजसचा निरोप घेऊन सचिन तिथून निघाला.

ललीताला धडा शिकवायला हवा होता. तीची चुणूक सचिनने पहिली होती. तिच्या तोडीस तोड अशा व्यक्तीचा सचिन शोध घेत होता आणि त्याला गुरुदेवांबद्दल कळलं. त्याने सगळया गोष्टी गुरुदेवांना सांगितल्या. गुरुदेव सचिनबरोबर त्या बंगल्यावर यायला तयार झाले. रमणिकलालकडे सचिनने बंगल्याची चावी द्यायची विनंती केली. रमणीकलालने सांगितलं अरे तो बंगला तर मी विकला. सचिनच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ‘काय करू साहेब, माझा धंदा आहे तो’ रमणीकलाल म्हणाला. ‘तूला लोकांच्या जिवापेक्षा तुझा धंदा जास्त महत्वाचा वाटतो काय? सचिनने त्याला जाब विचारला पण आता काही उपयोग नव्हता.

गुरुदेव आणि सचिन तयारीनिशी त्या बंगल्यावर गेले. दरवाजा उघडल्यावर समोरची तरुणी ओळखीचं हसली आणि म्हणाली ‘तू परत आलास?’ अचानक एक मादक सुगंध’ पसरला. सचिनला त्या तरुणीच्या जागेवर त्याची स्वत:ची बायको दिसायला लागली. ‘काय हे सचिन, मी किती वाट पहिली तुझी. ये ना. ती तरुणी म्हणाली. सचिनचा त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्या तरुणीजवळ जाण्यासाठी सचिनने पाऊल उचलले. तेवढ्यात गुरुदेवांनी सचिनवर अभिमंत्रित पाणी टाकले. सचिन आवर स्वत:ला गुरुदेवांच्या आवाजाने सचिन भानावर आला. त्या तरुणीने जोरात किंचाळी मारली आणि म्हणाली ‘तू मध्ये पडू नकोस. माझं काहीही बिघडवू शकत नाहीस तू. गुरुदेव शांतपणे म्हणाले. तूला मुक्ती देतो. ती जोरजोरात ओरडायला लागली आणि म्हणाली मला फक्त माझं सावज हवं आहे आणि ते मला मिळालंय. त्याच्या आणि माझ्यामध्ये आता कोणंच येऊ शकत नाही. तिने सचिनला स्पर्श करायचा प्रयत्न केला पण सचिनला गुरुदेवांनी आधीच संरक्षण दिलेलं असल्यामुळे ती सचिनला काहीच करू शकली नाही. शेवटी तिने गुरुदेवांवर हल्ला करायचा प्रयत्न केला पण गुरुदेवांनी तिच्यावर अभिमंत्रित पाणी टाकून तिला तिथेच खिळवून ठेवलं आणि तिच्यावर मंत्रांचा मारा केला. ती जोरजोरात ओरडायला लागली आणि बेशुद्ध पडली. तेवढ्यात त्या तरुणीचा नवरा गेटमधून आत आला.

गुरुदेवांनी त्याला सांगितल तुझ्या पत्नीला घेऊन ताबडतोब या ठिकाणापासून लांब जा. तुझ्या पत्नीच्या जीवाला धोका आहे. ते दोघ ताबडतोब तिथून निघून गेले. गुरुदेवांनी ललिताला समजवायचा प्रयत्न केला. फक्त सचिनच काय तू कोणाच्याच वाट्याला जावू नकोस. या सर्व गोष्टींना अंत नाही. माझं ऐक. तू स्वत:चचं नुकसान करून घेत आहेस. किती दिवस या योनीमध्ये अडकून पडणार आहेस. शेवटी सचिनने गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या राजसला बोलवून घेतलं. आधी राजस इथे यायला तयार नव्हता पण गुरुदेवांनी त्याला समजावलं. तुझ्या आईची क्रियाकर्म झालेली नाहीत ना पिंडदान झालेलं. हे सर्व झाल्याशिवाय तिला मुक्ती मिळणार नाही. या गोष्टीचा तिला स्वत:ला तर त्रास होतोच आहे पण त्याचबरोबर बाकीच्यांनाही भोगायला लागतं तूला कितीही वाटलं तरी ती तुझी आई आहे. तुझे वडील ह्यात नसल्यामुळे तिची क्रियाकर्म करण हे तुझं आद्यकर्तव्य आहे.

गुरुदेवांनी अभिमंत्रित पाण्याच्या सहाय्याने एक रिंगण आखून घेतलं. गुरुदेव सचिन आणि राजस तिघेही त्या रिंगणाच्या आत बसले. ललिताच्या व्यतिरिक्त तिने बळी घेतलेल्या इतरही आत्म्यांची तिथे वस्ती होती. त्यांचा विरोध जाणवत होता. अचानक आजुबाजूचं वातावरण बदललं. सोसाट्याचा वारा सुटला. तो वृक्ष रिंगणाच्या एकदम जवळ उन्मळून पडला. गुरूदेवांचं संरक्षण नसतं तर त्या दोघांचा अंत झाला असता. दूरवर कुत्रांच्या विव्हळण्याचा आवाज येवू लागला. राजसने मात्र विधी चालू ठेवले. ललिताची बाहुली समोर ठेवली होती. विधी पूर्ण झाल्यावर त्या बाहुलीने अचानक पेट घेतला. त्यानंतर गुरुदेवांनी इतर बाहुल्यांवरही विधी करायला सुरवात केली. एकेक करून सर्वच बाहूल्यांनी पेट घेतला. त्यानंतर राजस आणि गुरुदेवांनी भाताच्या मुदी करून पिंडदान केलं. गुरुदेवांनी स्मितहास्य करून सांगितलं आपले विधी पूर्ण झाले. रिंगणाच्या आजूबाजूचे वातावरणही आता सर्वसामान्य झालं होतं

गुरुदेवांच्या मदतीने ललिताला आणि इतर आत्म्यांना मुक्ती मिळाली. सचिनने राजसचे आभार मानले. राजस म्हणाला ‘का लाजवतोस हे करणं ही माझी जबाबदारी होती. तुझ्यामुळे आज माझ्या आईला मुक्ती मिळाली. आपल्या मित्राची निनादची सचिनला फार आठवण येत होती. आज कितीतरी दिवसांनी ते घर मोकळा श्वास घेत होतं पण निनाद आणि चेतना या सुखी जोडप्याचा मात्र हकनाकचं बळी गेला.