Nirbhaya - 19 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया - १९

Featured Books
Categories
Share

निर्भया - १९

                                          निर्भया- १९ -
     शिल्पा तिच्या   खोलीत जाऊन काॅलेजला जाण्याची तयारी करतेय  याची  खात्री  करून   घेऊन  सुशांत    बोलू लागले, 
      "अशा गोष्टी मुलांकडे बोलू नयेत हे तुझंच मत आहे ; मग आज शिल्पाला सर्व का सांगत होतीस? ती लहान आहे अजून! "
   " माझा नाइलाज झाला! तुमची डायरी चुकून तिच्या हातात पडली, शिल्पा वाचलेल्या गोष्टींविषयी उलटसुलट विचार करत राहिली असती. अर्धवट ज्ञान  नेहमी नुकसान करतं! म्हणून मी  तिला सगळं सांगून टाकलं.  चांगलं - वाईट ठरवण्याइतकी ती नक्कीच सुजाण आहे. तिने आज जे काही ऐकलं ,त्याचा तिला पुढच्या वाटचालीमध्ये फायदाच होईल. आज मला  तुम्हालाही  काही सांगायचंय  पण तुम्ही थकून आला आहात....! मी चहा घेऊन येते; मग बोलू आपण! सुशांतला घरी आल्या- आल्या त्रास देणं दीपाला योग्य वाटत नव्हतं.
   " मी  तुमचं दोघींचं सगळं  बोलणं  ऐकलंय. मलाही तुला काही सांगायचंय. हा विषय मी नेहमीच टाळत होतो, पण विषय निघालाच आहे, तर चर्चा झालेली बरी! तू इथेच थांब!.." ते थोडा वेळ बोलायचे  थांबले. दीपाच्या मनाला त्रास होणार नाही अशा शब्दांची ते जुळवाजुळव करत असावेत. नंतर शांत स्वरात त्यांनी दीपाला भुतकाळातल्या आठवणी सांगायला सुरुवात केली,
    " मी लिहिलेली डायरी वाचून तू अस्वस्थ झालीस. पण ती डायरी तपासाच्या प्राथमिक टप्प्यात लिहिलेली होती. तो सर्व गुंता सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणं शक्य होतं का?  महेशने ज्या हाॅटेलमधून समोसे घेतले होते, तिथूनच बर्फ घेतला होता. तिथे कोल्ड ड्रिंकमध्ये ज्यांनी बर्फ घालून घेतला त्या सगळ्यांनाच लहानमोठ्या प्रमाणात उलट्यांचा आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. पण वेळेवर उपचार मिळाल्यामुळे ते सगळे वाचले होते. महेश आणि त्याच्या मित्रांच्या आइसबाॅक्समधल्या बर्फातच ती पाल होती, त्यामुळे त्यांच्या पोटात जास्त प्रमाणात वीष गेलं, आणि त्यांना उपचार घेण्याएवढा अवधी मिळाला नाही.त्यावेळी वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली होती. पण तू त्यावेळी स्वतःच त्या भीतिदायक क्षणांमध्ये एवढी गुंतून गेली होतीस, की तुला त्या काळात इतर कशाकडेच  तुझं  लक्ष नव्हतं. हे  घडत  होतं तेव्हा  तू  तिथे होतीस हे नक्की! मी  तुझ्या  नकळत  तुझ्या  बोटांचे ठसे घेऊन फार्महाऊसवरील   ग्लासांवर  मिळालेल्या फिंगरप्रिंटबरोबर मॅच करून पाहिले. त्या तिन्ही ग्लासांवर तुझ्या हाताचे ठसे होते. पण त्या तिघांच्या मृत्यूशी तुझा काही संबंध नव्हता. तो एक दुर्दैवी अपघात होता; हे माहीत असल्यामुळे तुला दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण अशा जागी तशा चारित्र्याच्या तरुणांबरोबर जाऊन तू मोठं धाडस केलं होतंस! कदाचित्  त्यांना पकडून देण्यासाठी तू जिवावर उदार झाली होतीस, खरं आहे नं?" यावर दीपाने होकारार्थी मान हलवली. स्वतःशीच हसून  सुशांत पुढे बोलू लागले,
   "माझ्या मनात गेली अनेक वर्षे एकच शंका होती! राकेशच्या विषयी तुझ्या मनात एवढा राग का असेल? आज त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मी आताच तुम्हा दोघींच्या  बोलण्यातून ऐकलं---; तुला राकेशच्या  हृदयशून्य स्वभावाचा राग  आला आणि तू सरबतात विष   घालून  त्याला   प्यायला   दिलंस,  हा   तुझ्या संस्कारांचा पराभव  होता. जर  ते   सरबत   राकेश प्याला  असता, तर  त्याच्या  मृत्यूने    तुझं  आयुष्य  बदलून   टाकलं   असतं.  तुला    गुन्हेगार     सिद्ध  केल्याशिवाय पोलिस खातं  गप्प बसलं  नसतं. खरं म्हणजे , मी तुला ओळखतो, त्याप्रमाणे  तू  स्वतःच   गुन्ह्याची कबूली  दिली  असतीस  आणि  तुझं  पूर्ण  आयुष्य गजाआड गेलं असतं, पण तुझ्या नशीबात वेगळंच काही होतं. त्यामुळेच परमेश्वराने  प्रकरणातून  तुला  अलगद  बाहेर  ठेवलं , आणि    राकेशला    त्याच्या  कर्मांची  शिक्षा   दिली. ती   डायरी   लिहिताना  माझ्या मनात अनेक प्रश्न होते. पण माझी ट्रान्सफर  नाशिकला झाल्यानंतर  एकदा विचार  करता - करता  अचानक्   सर्व  गोष्टींचा उलगडा  झाला ." दीपाच्या प्रश्नार्थक चेह-याकडे पहात ते पुढे बोलू लागले,
  " तिथे पंचनाम्याच्या वेळी सरबताने पूर्ण भरलेला ग्लास मिळाला होता. पण जर राकेशने सरबतात विष स्वतः  घातलं  असतं, तर  विषाची बाटली किंवा पुडी तिथे आजूबाजूला मिळायला हवी होती.. ती  नष्ट   करण्याइतका  वेळ   राकेशकडे   नव्हता. पण आम्हाला   तिथे  असं   काही    मिळालं    नाही. तुझ्याशिवाय  दुसरं  कोणी  तिथे  आलेलं  असण्याची  शक्यता कमी होती. म्हणजेच हे तूच केलं असावंस अशी माझी खात्री झाली होती. पण त्यामागचं कारण काय  असावं हे  लक्षात  येत  नव्हतं.  पण तू त्यावेळी  ज्या मानसिक तणावाखाली वावरत असतानाही  स्वतःला आणि घराला सावरण्याचा प्रयत्न करत  होतीस, ते लक्षात घेता अचानक्  तुझ्या  सहनशक्तीचा  अंत पहाणारं  काहीतरी  मोठं  कारण घडलं असावं असा तर्क मी  केला, आणि   तुझ्यावर  'खूनी'  असा शिक्का बसू  नये, अशी नियतीची इच्छा होती, हे लक्षात घेऊन तुला  त्या  प्रकरणापासून लांब  ठेवलं. पुढचं आपलं सुखी  सांसारिक जीवन   हा देवाने तुला दिलेला मोठा आशीर्वाद  आहे. परमेश्वराच्या   निर्णयाच्या विरोधात जाऊन  तुला शिक्षा करणारा मी कोण?"
       सुशांत बोलत असताना ते दिवस आठवून दीपाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. अंग शहारलं होतं, ती जणू स्वतःशीच बोलू लागली,
"तो दिवस माझ्या  आणि  माझ्या   कुटुंबाच्या   आयुष्याला कलाटणी  देणारा  दिवस होता. जर मी ठरवल्याप्रमाणे आत्महत्या केली असती, किंवा जर राकेशने ते  विष घेतलं  असतं, आणि  मी गुन्हेगार ठरले असते, तरी नितिनचं   करिअर  बाद  झालं असतं, आईला मी कायमचं दुःखी केलं  असतं , हे नंतर   भानावर   आल्यावर  माझ्या  लक्षात  आलं. केवढी मोठी चूक करून बसले होते  मी!"  बोलताना दीपाच्या अंगावर  शहारा आला  होता. ती  रात्र  तिच्या नजरेसमोर मूर्तिमंत उभी राहिली होती. 
  कालपासून  थोपवून धरलेला अश्रूंचा बांध  फुटला होता.  दीपा  विक्रांतच्या  मिठीत   शिरून हुंदके  देऊ  लागली. पण हे  आनंदाचे  अश्रू  होते. कित्येक वर्षांपासून तिने मनात साठवलेलं गौप्य आज अचानक् उघड झालं होतं. तिचं मन हलकं झालं होतं.
    "तो  क्षण  तुझ्या आयुष्यातला महत्वाचा  क्षण होता. त्या  क्षणी जणू  तुझा नवा  जन्म  झाला. हे  सगळे   नियतीचे  आपल्या आकलनापलिकडचे  खेळ आहेत. पण त्यामागचा  संकेत  आपण  मान्य  करायलाच हवा."  सुशांत   भारावून  बोलत  होते.  ते    पुढे बोलू लागले, 
   " अजूनपर्यंत निर्भयपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरी गेलीस. तुझ्यावर झालेल्या  अन्यायाच्या  विरोधात  तुला  समाजाकडून  सहानुभूती  मिळाली नाही,  उलट  तुझी  अवहेलना  झाली, पण  तू  मात्र  मनात  कधीच  कोणाविषयी  किल्मिष  ठेवलं नाहीस. तुझ्या मनातला सेवाभाव जराही कमी झाला नाही . जग किती खोटं आहे कळूनही तू नेहमीच सत्याची  कास  धरलीस." जरा  थांबून  ते  पुढे बोलू लागले,
    "आजही  माझी  प्रतिक्रिया  काय असेल, याची   जराही    पर्वा  न करता   सत्य  सांगण्याचा निर्णय घेतलास. दीपा! या  घरात येताना , तू नावाप्रमाणेच  आनंदाचे  लक्षदीप  घेवून आलीस.   मी तुझ्याशिवाय जगण्याची  कल्पनाही करू शकत नाही दीपा! "
"तू माझी पत्नी आहेस याचा मला अभिमान आहे."  सुशांत  तिच्या  डोळ्यात  पहात  म्हणाले. त्याच्या नजरेत  अथांग  प्रेम होतं.
  "पण आज मला माझं मन मोकळं करायचं आहे. आईंनाही मी सर्व काही सांगणार आहे. यापुढे मला मुक्त आयुष्य जगायचं  आहे. 'कोण काय म्हणेल...'  या भीतीची  बंधनं  नसलेलं  आयुष्य  हवंय  मला. " दीपाने आपला निर्णय त्याला सांगितला.
      मार्केटमधून भाजी घेऊन आलेल्या वसुधाताई  दोघांचं  बोलणं ऐकून दरवाजात थबकल्या होत्या. त्या आत येत म्हणाल्या,
   " मला कहीही सांगायची गरज नाही. तुझा भूतकाळ मला अनेक वर्षांपूर्वी समजला होता. मुलांना तुम्ही  दत्तक  घेतलं,  तेव्हा  आपण  पार्टीला  तुझ्या हाॅस्पिटलच्या  स्टाफला  बोलावलं होतं.  मी त्यावेळी  थोडी नाराज होते, ते लक्षात आल्यामुळे  त्यांच्यापैकी एक मला म्हणाली, 
" तुम्ही खरंच मोठ्या मनाच्या आहात. एकतर तुम्ही दीपाला सून करून घेतलं आणि आता मूल दत्तक घ्यायलाही परवानगी दिली."
    ती काय बोलत होती ते मला कळत नव्हतं, हे पाहून ती मला एका बाजूला  घेऊन गेली. नववर्षाच्या दिवशी तुझ्याबाबतीत जे घडलं, ते तर सांगितलंच पण तुझं राकेशबरोबर ठरलेलं तुझं  लग्न कसं मोडलं, त्याचा संशयास्पद मृत्यु कसा झाला  ते सुद्धा मीठ मसाला लावून सांगितलं. हे सर्व ऐकून प्रथम मी गांगरून गेले.  पण  नंतर  लग्नानंतर  तुझ्याकडून  मिळलेली    आपुलकी  आणि  प्रेम आठवलं. विचार केला, ....जर दीपाच्या जागी  माझी  मुलगी  असती, आणि तिच्यावर असा प्रसंग आला असता, तर मी तिला वा-यावर सोडलं असतं का? कधीच नाही... आणि तुला नकळत तुझ्या पाठीशी उभी राहिले."
    "पण तुम्ही हे मला का सागितलं नाही?" दीपाच्या आश्चर्याला सीमा नव्हती.
 " तुझा स्वभिमान दुखावला जाईल; असं  वाटलं , म्हणून मी याविषयी तुला काही सांगितलं नाही. दोन वर्षात तू आमची सून राहिली नव्हतीस;  मुलीची जागा घेतली होतीस. सुशांतनं तुझ्याविषयी काही सांगितलं नाही, म्हणून मला सुरूवातीला राग आला होता, पण  नंतर  वाटलं, तुझ्या   स्वभावाची ओळख  होण्यासाठी  थोडा वेळ मिळाला, ते बरं झालं. तुझी नीट पारख करता आली. आणि म्हणूनच मी तुला साथ देण्याचा निर्णय घेऊ शकले. "   वसुधाताई म्हणाल्या.
   त्यांचे  मायेने ओथंबलेले  शब्द  ऐकून दीपाचे डोळे भरून आले. हे तिचं घर होतं. ही  तिची  माणसं  होती!  तिच्यापासून  कधीही  दूर  न जाणारी! तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाणारी! डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी... " चहा आणते..." म्हणत ती किचनकडे निघाली. वसुधाताईसुद्धा आणलेल्या भाज्या  घेऊन तिच्या पाठोपाठ गेल्या; आणि  शिल्पा  काॅलेजला  जाण्यासाठी तयार  होऊन बाहेर आली. 
          हातातली डायरी  तिने सुशांतकडे  दिली. पण  ती  देताना   तिचा हात का थरथरतोय हे त्यांना कळेना! त्यांनी डायरी  उघडून  पाहिलं. दीपाने त्यांच्या डायरीतील निरिक्षणाखाली  लिहिलं  होतं, ' हो! राकेशच्या सरबतात मीच विष मिसळलं होतं. तुम्ही  द्याल ती शिक्षा मला मान्य आहे.' सुशांतने ते पान फाडून केराच्या टोपलीत टाकलं. आणि शिल्पाकडे पहात म्हणाले, " हा अध्याय आता संपला आहे! आता तुझी  भिती  गेली नं?  हा  विषय  आपल्या  घरात  यापुढे कधीही  काढायचा नाही."
      शिल्पाने आनंदाने त्यांचे हात  घट्ट धरले आणि  म्हणाली, " पप्पा! तुम्ही  किती चांगले आहात!  जगातले सगळ्यात चांगले पप्पा! "
       बाहेरून नेहाच्या हाका ऐकू आल्या,आणि शिल्पा सुशांतला बाय करून बाहेर पडली. सुशांतला खात्री होती, यापुढे तिचं प्रत्येक पाऊल सावध असेल आणि  त्याबरोबरच  आत्मविश्वासाने  परीपूर्ण   असेल. कालपासून  घरातलं वातावरण ढवळून निघालं होतं, पण या मंथनातून परस्परांविषयीचे प्रेम आणि विश्वासाचं अमृत  घराला लाभलं होतं. आज आभाळ स्वच्छ झालं होतं.
                                         - End -