आत्महत्या
एवढ्यातच झालेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्येनं एक जुनी घटना आठवली.
शेखर अतिशय हुशार मुलगा.गावात पहिला आलेला.इंजिनिअरिंग केलं.बस्स दोन महिने जॉब लागण्याची वाट पहावी लागली.एवढंच नैमित्तिक कारण.आकुर्डीला रेल्वेखाली झोकून दिलं स्वतःला. तुकडे झालेलं शरीर पोत्यात भरुन आणलं गेलं.चेहराही बघायला मिळाला नाही. साधासरळ ,हुशार, बऱ्या आर्थिक स्थिती असणाऱ्या घरातला मुलगा.
आईवडील रडत रडत एवढाच प्रश्न विचारताहेत...
"आमचं चुकलं कुठे?"
काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं?
आपल्या समाजात काही गोष्टींवर अजूनही वेळीच विचार केला जात नाही हे लक्षात येतंय.
की,संवेदनशील मनांना वेळोवेळी त्रास होत असतो.कुणाचा लवकर लक्षात येतो तर कुणाचा लक्षात येईपर्यंत खूप उशीर होऊन जातो.
सुरूवातीला जर ह्या हळव्या मनाच्या तक्रारींकडे लक्ष दिलं गेलं तर त्यांचं मोठ्या दुर्धर आजारांमध्ये रुपांतर होत नाही. मन मोकळं करता येईल अशी नाती मिळाली नाहीत तर विध्वंसक प्रव्रुत्ती वाढत जाते.आभासी जगात हजारो फ्रेंड्स आणि मनातलं बोलायला कुणीच नाही असं असल्यावर काय उपयोग?
असो!
डॉक्टरकी शिकत असताना मानसिक आरोग्याकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षातून घडलेल्या दोन वाईट केसेस मला ठळक आठवतात. एका पेशंटनं मूलगी झाली म्हणून स्वतःला जाळून घेतलं होतं (तिच्या रुममध्ये चेकअप करण्यासाठी जाताना मला अक्षरशः काटा फूटत असे) आणि दुसरी केस म्हणजे दुसरीही मुलगीच झाली म्हणून एकीनं आपल्या अवघ्या सतरा दिवसांच्या बाळाला विहीरीत फेकून दिलं होतं.नंतर पोलिसांसमोर बाळ कुणीतरी उचलून नेल्याचा बेमालूम कांगावा केला होता.
कुठून येतं हे इतकं अनैतिक वागण्याचं बळ?
काही अंशी मूळचा हळवा स्वभाव, कदाचित भूतकाळात दडपले गेलेले काही सल,आणि प्रेग्नन्सी, डिलीवरीनंतरची प्रचंड शारीरिक, मानसिक उलथापालथ ह्या सगळ्याचं पर्यवसान अतिशय क्रूर अमानुष गुन्ह्यात झालं होतं.
त्यावेळी खूप तिरस्कार, भीती वाटली होती पण प्र्याक्टीसमध्ये पडल्यानंतर कित्येक पेशंट्सच्या अनुभवांति,ह्या सगळ्या घटनाक्रमांची कारणमीमांसा लक्षात आल्यावर त्या टोकाच्या भावनांची जागा सहानुभूती व सहवेदनेनं घेतली.
आमच्या ग्रामीण भागात एक मोठा गैरसमज आहे की, मूल झाल्यावर सुनेची घरातील जागा बळकट होते ,
"आन् मग आता हिचा खुट्टा बळकट झालाय प्वॉर झाल्यावर. आता ही अशीच चराचरा बोलल''
पण ह्या चिडचिडेपणाचं मूख्य कारण म्हणजे त्या काळात होणारे प्रचंड मोठे हार्मोनल बदल आणि बाळ सांभाळताना येणारा मानसिक ,शारीरिक थकवा ,होणारी जागरणं.
ह्याला पोस्टनाटल डिप्रेशन अशी संज्ञा आहे.पण शारीरिक आजारांकडेच इतकं दुर्लक्ष केलं जातं की, मानसिक आरोग्याकडे कोण लक्ष देणार? आणि मग असे गुन्हे घडतात.
ठरवलं तर फार अवघड नाहीत ह्या गोष्टी.
मानसिक आणि शारीरिकद्रुष्ट्या स्त्री काही विशिष्ट कालखंडात कमी पडते,
जसे की वयात येताना,पाळी यायच्या आधी,
गर्भारपण,प्रसुतीनंतर,आणि रजोनिवृत्तीचा काळ.
ह्या काळात तिच्याकडून काही चुका झाल्या तरी सांभाळून घ्या.ह्या काळात ती जे सहन करते त्या तुलनेत तुमचे कष्ट काहीच नाहीत.
हे झालं स्त्रियांच्या बाबतीत.
पुरूषांच्या बाबतीत त्यांच्या वयात येण्याच्या काळात विशेष लक्ष द्यायला हवं आहे.पण हे तर अजिबातच होत नाही. एकवेळ स्त्रियांना खाजगीतम विषय बोलायला आई, बहिण, मैत्रीण तरी असते. त्या रडून ,बोलून मोकळ्या होतात पण पुरुषांना ही मुभाही नसते.
खरं तर त्यांनाही त्या वयात होणारे काही विशिष्ट त्रास होतातच,वेगवेगळे प्रश्न पडतात पण त्यांचं निरसन करायला अक्षरशः कुणीच नसतं.
पुरूषांच्या मनस्वास्थ्याची अजूनच हेळसांड आहे.त्यांनी रडणं किंवा हळवं असणं हा थट्टामस्करीचा विषय असतो.त्यांच्या त्रासाबद्दल ना त्यांना मार्गदर्शन मिळतं ना सहानुभूती. मग वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी, वाढती व्यसनाधीनता, तब्येतीच्या तक्रारी सगळ्याचं प्रमाण वाढत जातं.
या सगळ्या गोष्टींची मुळं बऱ्याच वेळा चुकीच्या किंवा अति नाजूक मानसिक जडणघडणीत असते किंवा काही दुर्मिळ मानसिक आजारांच्या अनुवंशामुळे असते हे कोणी लक्षातच घेत नाही.कारण बऱ्याच वेळा जाणवणारी लक्षणे ही निव्वळ शारीरिक असतात. पण मनोकायिक आजार हा आजाराचा आख्खाच्या आख्खा एक स्वतंत्र प्रकार आहे हे माहित नसतं.ग्रामीण भागात शारीरिक गोष्टींकडेच इतका दुर्लक्ष असतं की मानसिक ,मनोकायिक आजार अशीही काही संज्ञा असते हेच त्यांना माहीत नसतं .
या विषयावर खूप लिहिण्यासारखं आहे .इतकं की त्यावर एक स्वतंत्र लेखमाला होऊ शकेल .
पण आता एवढंच सांगू इच्छिते की ,घरातील माणसांचे मनाच्या दृष्टीने नाजूक कालखंड समजून, सांभाळून ,सावरून घ्या. त्यांच्या छोट्या छोट्या तक्रारी हसण्यावारी न नेता गांभीर्याने किमान ऐकून तरी घ्या .आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर घरातल्या घरात हे मॅनेज होत नसेल ,तर
" तिचाच स्वभाव कुरकुरा/त्याचाच स्वभाव तिरसट .हा काय नुसताच पोरीसारखा रडत बसतो"
अशी सरसकट विधान न करता, न लाजता त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा .कारण त्या आपल्या प्रिय व्यक्तीला हसरं पाहण्यात जास्त आनंद आहे हार घातलेल्या हसऱ्या फोटोपेक्षा.
©डॉ क्षमा शेलार