Shyamachi Patre - 14 in Marathi Letter by Sane Guruji books and stories PDF | श्यामचीं पत्रें - 14

Featured Books
Categories
Share

श्यामचीं पत्रें - 14

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र चवदावे

कला व जीवन

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.मागे तूं वर्धा योजनेविषयी विचारलेस. आज पुन्हा तूं असाच एक प्रश्न विचारला आहेस. आजकाल साहित्य व जीवन यांची चर्चा फार होत असते. हाच प्रश्न निराळया दृष्टिने मांडला तर कला व जीवन असा मांडावा लागेल. कारण साहित्य म्हणजे एक कलाच आहे. साहित्य या शब्दाचा अर्थच मुळी जें सदैव जीवनाच्यासह असतें ते. जीवनापासून वाङमयाची किंवा कोणत्याच कलेंची फारकत करतां येणार नाही.

जीवनाची कला ही सर्वश्रेष्ठ कला. या जीवनाच्या कलेंभोवती बाकीच्या इतर कलांनी उभे राहिलें पाहिजे. सात भिन्न भिन्न सुरांतून जो संगीत काढतो त्याची आपण वाहवा करतो. मग आजूबाजूच्या विविध अशा अनंत जीवनांतून संगीत निर्मिण्याची जो खटपट करतो तो केवढा बरे कलावान ! आज महात्माजी किंवा माझी काँग्रेस हिंदुस्थानांतील नाना धर्म, नाना जातीजमाती, नाना वर्ग यांच्यामध्ये मेळ निर्माण करुं पहात आहेत. हिंदुस्थानातील चाळीस कोटी कंठांतून प्रमाचे ऐक्याचे, आनंदाचे असं संगीत बाहेर पडावें म्हणून खटपट करीत आहेत. महात्माजी जीवनाच्या कलेंच उपासक आहेत. ते सर्व थोर कलावान.

एकदां पूज्य विनाबाजींकडे एक मित्र सुंदरसे चित्र घेऊन गेला. विनाबाजींना संगीत, चित्रकला, साहित्य सर्वांची अपार गोडी आहे. परंतु जीवनाच्या कलेची गोडी त्यांना सर्वांत अधिक आहे. हा मित्र विनोबाजींस म्हणूं लागला, 'हे पहा उत्कृष्ट चित्र. हे पहा त्यांतील रंग ! हा गुलाबी रंग येथे किती खुलून दिसतो.'

विनोबाजींनी क्षणभर ते चित्र पाहिले. पुन्हा ते सूत कातूं लागले. ते काही बोलेले नाहीत. तो मित्र रागावला. म्हणाला 'तुम्ही गांधीचे लोक असेच अरसिक. तुम्ही जड-भरत आहांत !'

पू. विनांबाजी त्याला म्हणाले, 'आम्हीही कलेचे उपासक आहोंत. चल, दाखवतो तुला रसिकता!' असे म्हणून ते उठले. तो मित्रही त्यांच्याबरोबर निघाला. जातां जातां दोघे हरिजन वस्तीकडे वळले.

"इकडे कोठे नेता मला? इकडे तर घाण आहे.'

"माझी कला इकडेंच आहे.' शांतपणे विनांबाजी म्हणाले.

विनोबाजी तेथे जाताच हरिजन मुले त्यांच्याभोवती प्रमाने जमली. विनोबाजी त्या गृहस्थास म्हणाले, 'तू तुझें ते चित्र ५० रु. स. विकत घेतलेंस. ते ५० रुपये या मुलांना रोज दूध देण्यात खर्चिले असतेस तर हया मुलांच्या गालांवर गुलाबी छटा आली असती. ही देवाची चित्रे जरा सुंदर दिसली असती. चित्रांतील गुलाबी रंग महत्वाचा की या दरिद्री मुलांच्या मुखांवर गुलाबी असा अरोग्याचा रंग आला तर तो अधिक महत्वाचा?'

वसंता, आसमंतातले जीवन सुंदर करणे याहून थोर काय आहे? हे जीवन सुंदर व आनंदमय करण्यासाठी सा-या कलांनी झटले पाहिजे. जीवन म्हणजे राजा. या राजाची सेवा कलांनी करावी. ज्याप्रमाणे ग्रहोपग्रह सूर्याभोंवती फिरतात व प्रकाश मिळवितात, त्याप्रमाणें जीवनाच्या सूर्याभोवती कलांनी फिरुन प्रकाशित व्हावें. ती कला धन्य जी जीवनाची सेवा करावयास उभी राहिली आहे.संगीत कला घे. तुला माहित असेल की समावेद म्हणून एक वेद आहे. ऋ ग्वेंदांतील मंत्र संगीतांत म्हटले म्हणजे त्यांचा सामवेद होतो. हें सामवेद नांव मला फार आवडतें. संगीत साम्यावस्थां निर्माण करतें. दिवाणखान्यांत संगीत सुरुं होते व सार्वांच्या मनाची समता होते. सारे आनंदांत तल्लीन होतोत. सर्वांच्या तोंडातून एकदम 'वाहवा' असे धन्योद्गार बाहेर पडतात.माझ्या मनांत येते दिवाणखान्यांतसंगीत निर्माण करणारा जीवनांत संगीत आणतो का? माझे एक शिक्षकमित्र चांगले गाणारे, संगीत तज्ञ असे आहेत. त्यांचा आवाज मूळचा चांगला नव्हता. परंतु तपश्चर्येने, अभ्यासाने कमावून त्यांनी तो सुधारला. त्यांचे गाणे मला फार आवडे, ते सुंदर गात. परंतु ते शाळेतील मुलांना मारुन रडवीत. आपल्या गळयांतून गोड आवाज जे काढायला शिकले त्यांनी मुलांच्या गळयातून 'भो' आवाज का काढावा? त्याला आपल्या वर्गांत, आपल्या घरांत का बरे संगीत निर्माण करता येऊ नये? मेळ का घालता येऊ नये?मला कधी कधी वाटते की हिंदुमुसलमानांचा दंगा सुरु झाला की एकदम 'हे बहारे बाग दुनिया चंद रोज' असे गाणे म्हणत त्या गर्दीत घुसावे. त्या विरोधांत संगीत न्यावे. एखादा गंधर्व जर आलाप घेत विमानांतून एकदम त्या गर्दीत उतरला तर परस्परांस मारणारे हात एकमेकांस मिठया मारु लागतील ! संगीताने पाषाणही म्हणजे पाझरतात. जनतेंत संगीत निर्मिझ्यासाठी, मेळ घालण्यासाठी माझ्या जीवनाची तंबोरी फुटूं दे. कृतार्थ होईल ती तंबोरी.टॉलस्टॉय एका सुप्रसिध्द चित्रकाराच्या सुंदर चित्राविषयी लिहितो : 'ते अत्यंत सुंदर चित्र होते. काय बरें होतें त्या चित्रांत? त्या चित्रात रस्त्यांतून लढाईसाठी जाणा-या सैनिकांची मिरवणूक आहे. गच्चीत खुर्ची टाकूरन एक माता बसली आहे. तिन तोंडावर रुमाल घेतला आहे. तिला ती मिरवणूक पाहवत नाही ! जवळच तिचा लहान मुलगा आहे. तो जिज्ञासेने थोडे मिरवणुकीकडे, थोडे आईकडे बघत आहे.' किती सूचक चित्र ! जीवनावर केवढा प्रकाश त्या चित्राने पाडला ! मुत्सद्यांच्या महत्वाकांक्षेसाठी युध्दे होतात. बिचारे शिपाई ! त्यांचे का कोणाशी वैर असतं! परंतु मातृभूमीसाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, चला, मरा असे त्यांना सांगण्यात येते. परंतु देश म्हणजे कोण? देश म्हणजे कोटयावधी लोक. ते तर दरिद्री आहेत. हजारो लढाया झाल्या. परंतु गरीबांची गरीबी जात नाही. शेतसारे कमी होत नाहीत. त्यांचे जीवन पूर्वीप्रमाणेच कलाहीन व निस्तेज. देश म्हणजे लॉईड जॉर्ज, देश म्हणजे हिटलर, देश म्हणजे मुसोलीनी ! देश म्हणजे कोटयावधी जनतेचा संसार नव्हे. पंरतु शिपायांना भ्रामक भावनांची दारु पाजून दुस-या देशांतील तशाच लोकांवर सोडण्यात येते. परिणाम काय? सेनापतीचे पुतळे होतात आणि लाखो शिपायांच्या घरी रडारड होते. मुले पोरकी होतात. पत्नीचा पति मरतो. बहिणीचे भाऊ मरतात. म्हणून त्या चित्रातील माता त्या मिरवणूकीकडे पाहू शकत नाहीत. ती डोळे झांकते. तिचा पति का अशा लढाईतच मेलेला असतो?

जीवनांत सुंदरता, मधुरता, समता, आनंद, न्याय इत्यादी आणण्यासाठी कलांनी झटले पाहिजे. मग ती कला कोणतीही असो. कलांनी आतां दिवाणखान्यांत नाही रहातां कामा. गंगेच्या प्रवाहाचा आकाशांतून खाली भूतलावर अवतार झाला म्हणून तिचे महत्व. त्याप्रमाणे साहित्य, संगीत, चित्रकला ह्यांनी बहुजनसमाजाच्या संसारांत अवतरावें. त्या फाटक्यातुटक्या संसारात आनंद आणण्यासाठी झटावे.वसंता, धान्य दिवणखान्यांत पेरले तर ते उगवते का? धान्य उघड्यावर शेतांत पेरले पाहिजे. तर ते फोफावेल. त्याचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे कला आता वरिष्ठ वर्गाच्या दिवाणखात्यांत नकोत. कला खाली उतरु देत. कलांचा दरिद्रनारायणासाठी अवतार होऊ दे.कलेचे काम आनंद देणे, असे सारे कलावान म्हणतात. मीही तेंच म्हणतो. मीही आनंदमीमांसा मानणारा आहे. परंतु आनंद म्हणजे का दु:खाचा क्षणभर विसर पाडणे? अशाने का जीवनांत आनंद येईल? आपली काही साप्ताहिके क्षणभर आठवडयांतून हसवतात. त्यांचे म्हणणे असे की ' कारकून, कामगार, यांना रोज दु:ख व चिंता आहेतच. आठवडयांतून एक दिवस तरी त्यांना हसूं दे. एक दिवस तरी त्यांना दु:खाचा विसर पडूं दे.' असे म्हणणा-यांना माझे म्हणणे आहे की ते जें सहा दिवस दु:ख होते तें कायमचें कसें दूर होईल व ' अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक ' असं कधी होईल, याचा कां नाहीं तुम्ही विचार करीत? श्रमणा-या लोकांना आठवडयांतून क्षणभर आनंद देऊं पाहतां. तो सदैव कसा मिळेल याचा शोधबोध तुम्ही कां करीत नाही? त्याचा मार्ग त्या दु:खी जनतेंस तुम्ही का दाखवीत नाही? कामगाराला चिंता कां? शेतकरी रडता कां? कारकुनाला रविवारीहि कचेरीचें काम घरी कां आणावें लागतें? त्या दिवशीहि मुलांबाळांजवळ खेळण्याबोलण्याचा आनंद त्याला उपभोंगतां येत नाही. त्याला मुलांवर ओरडावें लागतें. ही अशी भिकार समाजरचना कां? हें जें सभोंवती विराट दु:ख आहे त्याची मीमांसा तुमच्या लेखणीला करुं दे. तुमची प्रभावी लेखणी जनतेला क्रांतीसाठी उठवूं दे. नवीन प्रकाश व नवीन आशा देऊं दे. आठवडयांतून क्षणभर करमणूक केल्यानें कामुक विनोद दिल्यानें, थोडया गुदगुलया केल्यानें संसार सुखाचा थोडाच होणार आहे? या क्षणिक आनंदाच्या मृगजळानें कोणाची तृप्ती होणार? वसंता, तुला तुरुंगांतील एक अनुभव सांगू?एके दिवशी एक कैदी माझ्याकडे आला व म्हणाला, '' माझें पत्र लिहून द्या. '' तो कैदी अस्पृश्य होता. तो एक दरिद्री महार होता. त्यानें काय बरें लिहायला सांगितले? त्याच्या घरीं काय परिस्थिती होती? त्याची पत्नी घरीं होती. त्याला दोनचार मुलेंबाळें होती. मोठा मुलगा चौदा-पंधरा वर्षाचा हाता. दुसरा एक दहाबारा वर्षांचा होता. परंतु हा मोठा मुलगा आईला मारी. आई त्याला कोठें तरी मजुरी करण्यासाठीं जा म्हणे. परंतु रोज रोज कामाला जाऊन तरी मुलगा कंटाळे. एखादे दिवशीं आईला अंगावर धांवून जाई व म्हणे '' नाहीं जात कामावर. '' परंतु मुले मजुरी करणार नाहींत तर घरीं खायचें काय? ती माता सर्वांचें पोषण कसें करणार? त्या मुलांनीं नको का जायला काम करायला? परंतु तीं मुलें आहेत दहाबारा वर्षांची. त्यांना नाचावें, कुदावें असें वाटतें, हिंडावें असें वाटतें. सृष्टीतील आनंद लुटावा असें त्यांना वाटतें. परंतु घरी दारिद्र्य आहे. त्यांना कोठला आनंद? तो महार पुढील मजकूर सांगत होता ---

''नंदा, आईला मारुं नकोस. अरें जिने जन्म दिला तिला का तूं मारावेंस? पाप रे पाप. असें पुन्हां करुं नकोस. कामाला जात जा. तुझ्या आईला मदत कर. लहान भावंडास सांभाळ. बहिणीस माहेरी आणा. तान्ही बरेंच दिवसांत माहेरीं आली नाहीं. तिला बोलवा. ती तुझी बहीण. तूं मोलमजुरी कर व बहिणीला चोळी-बांगडी कर.''असा मजकूर तो सांगत होता. त्या दिवशी मला रडूं येत होतें. माझें मन उदास झालें होतें. मायलेंकरांचें प्रेमळ संबंध आपण काव्यांत वाचतों. परंतु या हरिजनाच्या झोपडींत कोठें आहे ते प्रेम? त्या नंदाला आईविषयीं का भक्ति नव्हती? प्रेम नव्हतें? परंतु तें प्रेम दारिद्र्याने गारठून गेलें. त्या मातेला का मुलाविषयीं प्रेम नव्हतें? परंतु कठोरपणें त्याला मोलमजुरीसाठी तिला पाठवावें लागे. आईबापांचें प्रेम, मुलाबाळांचें प्रेम, भावंडाचे प्रेम, स्नहासोबत्यांचें प्रेम या सर्वांचा विकास दारिद्र्यांत नीट होऊं शकत नाहीत. हृदयातील प्रेमळ भावनांचे झरे दारिद्र्यामुळें सुकून जातात. मातृप्रेमाला धन्यतम आनंद, परंतु तो दारिद्रयांत अनुभवतां येत नाही. हे वत्सल व कोमल आनंद हेहि आज वरिष्ठ वर्गांसाठींच उरले आहेत. ज्यांना थोडी फुरसत आहे, त्यांनाच अश्रू ढाळायला सवड आहे. ज्यांना खाण्याची ददात नाहीं, तेच प्रेमळ कोमल भावनांचे आनंद उपभोगतील. त्या भावनांसाठी उचंबळतील, वाचतील, रडतील. परंतु गरिबाला हे आनंदहि वर्ज्य आहेत. त्यांना रडायला तरी कोठें वेळ आहे? आजा-याला कुरवाळित बसायला कोठे वेळ आहे? मृताजवळ बसायला कोठें वेळ आहे ! सा-या भावना दारिद्र्यानें मरतात. आईबापांना मुलांना जवळ घेतां येत नाही. बाप कामाला जातो तेव्हां मुलें झोंपी गेलेलीं असतात. सुटीच्या दिवशीं मुलांना हा आपला बाप असें कळणार ! कोठलें मुलांजवळ प्रेमाचें बोलणें, त्यांना मांडीवर घेणें? कोठलें पत्नीजवळ प्रेमानें बोलणें, तिच्याबरोबर फिरायला जाणें? दारिद्र्यानें सर्व संसाराला कठोर अशी प्रेतकळा येते. वसंता, दारिद्री जनतेला हें आनंद मिळावे असें तुम्हांस वाटतें ना? आईबापांचे व मुलांबाळांचे प्रेमळ संबंध का फक्त कादंब-यांतून वाचायचे? प्रत्यक्ष संसारांत तसे अनुभव नाही का घेता येणार? येतील. परंतु त्यासाठी क्रान्ति हवी. सारी समाजरचना बदलली पाहिजे. श्रमणा-याची संपत्ति हा नैतिक कायदा स्थापला गेला पाहिजे. नवीं नीतिमूल्यें आलीं पाहिजेंत. श्रमणा-याला प्रथम मान, प्रथम स्थान. दुस-यांच्या श्रमांवर पुष्ट होणार म्हणजे शेणगोळा वाटला पाहिजे. तो तुच्छ वाटला पाहिजे. हें सारें करण्यासाठीं कलांनीं कंबर बांधली पाहिजे. कलेनें आतां क्रान्ति आणवी तरच जीवनांत खरी कला येईल. आणि जीवनांत क्रान्ति होऊन जीवन आनंदमय होऊ लागलें कीं कल पहा कशा बहरतील? कोटयवधि लोकांच्या अंगांत का निरनिराळया कला नाहींत? त्यांना का संगीत आवडत नसेल, चित्र काढावें असें वाटत नसेल, गोष्ट लिहावी अशी स्फूर्ति येत नसेल? परंतु त्यांच्या कला-कोकिळेच्या गळा दारिद्र्यानें पिरगाळून टाकला आहे. ना निघत आवाज, ना उठत तान. परंतु ही परिस्थिति जर बदलली तर किती सुंदर आहे. खरी लोक-कला मग जन्मेल. आम जनतेची कला. आजची कला मूठभर प्रतिष्ठितांची आह. आजच्या कलानिर्मितींत सर्व जनता थोडींच भाग घेत आहे?मागें रत्नागिरीला साहित्य संमेलन झालेलें तूं ऐकले असशील. तेथें जी साहित्यप्रेमी मंडळी जमली, तिने काय केलें, काय पाहिलें, काय ऐकलें? रत्नागिरीचे सुंदर कलमी आंबे म्हणे मंडळींनीं भरपूर खाल्ले. त्या रसाळ आपुसच्या आंब्यांची त्यांनीं वाहवा केली. परंतु ज्या रत्नागिरी जिल्हयांत असे रसाळ आंबे पिकतात, त्या जिल्हयांतील जनतेचें जीवन कसें आहे हें त्यांनीं पाहिलें का? त्या जीवनांत रस आहे कीं नाहीं तें त्यांनीं पाहिलें का? या साहित्यभक्तांनी खेडयांना प्रदक्षिणा घालाव्या. दरिद्रनारायणाची कष्टमूत्रि पहावी. त्याला अन्नवस्त्र आहे का तें पहावें. त्याला सरकार, सावकार, खोत, जमीनदार कसे छळतात तें पहावें. त्याच्या अब्रूचे धिंडवडे बघावे. रत्नागिरीला गेलेले साहित्यिक त्या अत्यन्त दरिद्री जिल्यांत हिंडते तर त्यांच्या कलेला केवढें खाद्या मिळालें असतें ! किती दारिद्रय आहे त्या कोंकणात ! सृष्टिसौंदर्य भरपूर आहे. परंतु तें कोण पाहणार? काजूच्या दिवसांत काजू खाऊन पहा. करवंदांच्या दिवसांत करवंदें खाऊन दिवस न्या. कधी फणसाच्या आठिळयाच खा. कधीं आंब्यांच्या कोयाच भाजून खा. अशा रीतीनें ते लोक जगतात. साहित्यिकांनी जनतेचा हा विकल संसार पाहिला असता तर .... कोंकणातील शेतक-याला नेसूं धोतरहिं नसतें. ही गोष्ट तें पाहते तर ..... कोंकणात सृष्टिसौन्दर्य भरपूर आहे. परंतु पोटाची चिंता आहे, सदैव विवंचना आहे.

मागें मुंबईला कामगारांची प्रचंड सभा झाली होती. कांही प्रसिध्द साहित्यिक ती सभा पाहायला आले. एक दिवस तरी लेखणीचें ललित परब्रम्ह गरीबाच्या भेटीस आलें ! परंतु तेवढयानें काय कळणार? गरिबांत जा, त्यांच्यांत मिसळा, त्यांची सुख:दुखें रोज पहा. मग तुमची लेखणी निराळें लिहील. त्या लिहिण्यांत प्रचंड शक्ति येईल. परंतु तोंपर्यंत तुमची लिखाणें चार पांढरपेशे तरुन व तरुणी वाचतील. महाराष्ट्र म्हणजे का चार गुलजार तरुण? महाराष्ट्र तर हजारों खेडयांत मरत पडला आहे. त्याला उपासमारीचा क्षयरोग जडला आहे.धुळयाच्या तुरुंगांत ३०-३२ सालीं काहीं कांदब-या आमच्या खानदेशी सत्याग्रहींनी वाचल्या. लोढूभाऊ नांवाचे एक थोर खानदेशी प्रचारक म्हणाले, '' या कादंब-यांतून आमचें कोठेंच कांहीं नाहीं! '' त्या थोर प्रचारकाचे ते शब्द मला नेहमी आठवतात. खरा जो महाराष्ट्र त्याच्या संसाराचें कोठेंच कांही चित्रण नाहीं.आमचे कलावान् म्हणतील, ''शेतक-याच्या, कामक-याच्या जीवनांत काय नवीन आहे? त्यांच्या जीवनांत रंगवण्यासारखें काय आहे?''मी विचारीत,'' तुम्हां प्रतिष्ठितांच्या जीवनांत तरी काय नवीन आहे? तें टेनिस, तेंच ब्रिज, त्याच नटया, तेच बोलपट, तीच बाजाची पेटी, तेंच ' वळखलं ग ' काय आहे नावीन्य? उलट शेतक-याच्या जीवनांतच किती विविधता आहे ती पहा. आज पावसांत तो भिजला. आज कापणी आहे. आज लावणी आहे. उद्यां कोळपणी आहे, परवां निंदणी.आज थंडीनें त्याचा केळयांचा मळा करपला. दुस-या दिवशी गारा पडून आंब्याचा मोहोर झडला. आज पुरांतून त्याला आपली गायीगुरें आणावीं लागली. परवां त्याला रानांत एकदम वाघ भेटला. आज धान्याला भाव नाही म्हणून तो संचित आहे. उद्यां सणाला घरीं काय करायचें म्हणून मुलें निजल्यावर तो बायकोशीं बोलत आहे. सावकाराची जप्ती येणार म्हणून तो कधीं रडतो. कधी तो नवीन झाडा लावतो. बैलांना थोपटतो. नवीन माल विकत घेतो. किती प्रसंग ! तसेच शहरांतील कामगारांच्याहि जीवनांत. परंतु ज्याला डोळे आहेत व कान आहेत त्यालाच श्रमणा-यांची हीं करुणगंभीर जीवनें समजणार. इतरांना काय?अरे महाराष्ट्रांतील कलावंतांनो ! तुम्ही महाराष्ट्रांतील खेडोपाडी हिंडा. ते कलाहीन संसार बघा. ती खोल गेलेली पोटें बघा. खोल गेलेले डोळे बघा. आणि ही दुर्दशा दूर करण्यासाठीं लेखणी उचला. तुमच्या लेखणीचें ललित गरिबांचे सुंदर करण्यासाठी असूं दे.वसंता, प्रतिभा व प्रज्ञा या दोन्हीं वस्तु क्वचितच एकत्र दिसतात. मी प्रतिभावान असेन, सहृदय असेन पण प्रज्ञावान असेनच असें नाहीं. प्रज्ञावान मनुष्य समाजाला ध्येयें देत असतो. समाजानें आजच्या क्षणी कसें वागावें, काय करावें तें तो सांगतो. व्यास, वाल्मीकि, रवीन्द्रनाथ हे प्रज्ञावान होते व प्रतिभावानहि होते. त्यांनीं समाजाचीं ध्येयें निर्मिली व ती प्रतिभेने रंगवून घरोघर नेलीं. साहित्य संसाराय सुंदरता देते. आज हिंदु कुटुंबांत जें समाधान आहे तें रामायणानें दिलें आहे. आमच्यांत जी अहिंसा कृति आह ती साधुसंतांच्या वाड्मयानें बायकांच्या संपत शनिवारच्या किंवा नागपंचमीच्या कहाण्यानीं निर्माण केली आहे. भारतीय समाजांत आज जी मंगलता आहे, ती पूर्वीच्या वाड्मयानें निर्मिली. आजच्या वाड्मयानें उद्यांचे संसार मंगल होतील असे करावे.

भारताचें आजचें ध्येय गांधीजी दाखवीत आहेत. कोणतें ध्येय खरें मानावें? जें ध्येय जास्तींत जास्त जनतेचें कल्याण साधूं पाहील तें थोर ध्येय. हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यांवर, खादी, गरिबांचे स्वराज्य, गरिबांची सेवा अशीं महान् ध्येयें उत्पन्न झाली आहेत. या ध्येयांना सुंदर पोषाख घालुन ती सर्वत्र नेणें हें कलावंताचें काम आहे. मी चित्रकर असून तर हिंदू मुस्लिम ऐक्याचें चित्र रेखाटीन. खादीमुळें गरिबांस कसा घास मिळत आहे ते दाखवीन. हरिजन डबक्यांतीलच पाणी कसें नेत आहे तें दाखवीन. जर सर्व प्रकारचे कलावान् महान् प्रज्ञावंतानीं जीं ध्येयें निर्माण केली, बहुजनसमाजाला सुखी करण्यासाठी जीं ध्येयें निर्माण केली, त्या ध्येयांना जर आपल्या ब्रशानें, लेखणीनें, वाणीनें रंगवतील तर जीवनाला कळा चढेल. जीवन सुंदर होईल. जीवनांत खरा टिकणारा आनंद येईल. इंग्रजींत डी किन्सी म्हणून एक थोर लेखक झाला. दुसरें सामर्थ्यसंपन्न वाङमय, Literature of knowledge and literature of power. ज्ञानमय वाङमय म्हणजे ऐतिहासिक, शास्त्रीय किंवा त्वज्ञानात्मक वाङमय. हें वाडमय बदलत असतें. एक सिध्दांन्त जातो, दुसरा येतो. टॉलेमीचा शोध खोटा ठरला. केप्लूरचाव कोपर्निकसाचा आला. न्यूटनचा शोध होता तो आइन्स्टीननें बदलला. राजवाडे यांचें कांहीं सिध्दान्त होते. ते आज मागें पडले. अशा रीतीनें हें वाङमय निश्चयात्मक नसतें. तें चुकांतूनच वाढत जातें.परंतु दुसरे जें सामर्थ्य-संपन्न वाङमय, जीवनांतील वाङमय, तें कधीं मागें पडत नाही. रामायण कितीहि काळ गेला तरी ताजेंच वाटेल. प्रभु रामचंद्र सत्याचा महिमा सांगत राहतील. भरत व लक्ष्मण बंधुप्रीति शिकवीत राहतील. सीता त्याग शिकवील. हनुमान सेवा शिकवील. ते अमर आदर्श आहेत. अशा वाड्मयाला सामर्थ्यमय वाङमय समजावें. असें जें सामर्थ्य-संपन्न वाङमय असतें तें जडांना चैतन्य देतें, मढयांना उठवितें, निद्रितांना जागृति देतें. सूर्याचे किरण येतांच सारी सृष्टि चैतन्यमय होते, त्याप्रमाणें सामर्थ्यवान लेखणी सर्वांना अंधार दूर करायला लावते, अन्याय दूर करण्यास उठवितें. असें सामर्थ्यवान वाङमय आज हवें आहे. समाजांतील विषमात, दास्य, अन्याय, पिळवणूक वैगरे अनंत विपत्तींनी घाबरुन नाहीं जातां कामा. तिकडे कानाडोळा करुन दिवाणखान्यांत आनंदाच्या भ्रमांत राहण्यानें वस्तुस्थिती बदलत नसते.असें प्रतिभासंपन्न व सामर्थ्यसंपन्न वाङमय, जनतेचें जीवन आपण पाहूं तर निर्मिता येईल. सागरांत बुडया मारुं तर मोती मिळतील. तीरावर गंमत कराल तर शिंपा व कवडया याशिवाय काय मिळणार? आज आमचे साहित्यिक जनतेच्या जीवनांत खोल शिरावयास भीत आहेत. ते घाबरतात. त्यांची छाती होत नाही. ते तीरावरच शीळ वाजवीत बसले आहेत ! अशांना साहित्यिक ही पदवी मी कशी देऊं?पूज्य विनोबाजींनीं गीताई लिहिली. गीतेची मराठी समश्लोकी लिहिली. त्यांची आई त्यांना म्हणत असे, '' मला ही संस्कृत गीता नाही रे समजत. '' विनोबाजींनीं वामनपंडिताची समश्लोकी आईला दिली. तीहि तिला नीट समजेना. शेवटीं गीतेतीलच सोपे लोक काढून त्यांनी ते आईला दिले. तेव्हांपासून त्यांच्या मनांत स्त्रिया, मुलें, अशिक्षित लोक सर्वांना सहज समजेल असें गीतेचें समश्लोकी भाषांतर करण्याचें होतें. तें त्यांनी पुढें केले. १९३२ मध्यें तें प्रसिध्द झाले. सर्व जनतेला सुटसुटीत असें गीताधर्माचें पुस्तक मिळालें ! तें पुस्तक लिहितांना विनोबाजींच्या समोर हा महान् महाराष्ट्र होता. दिवाणखान्यांतील महाराष्ट्र त्यांच्या डोळयांसमोर नव्हता. भाषांतरित श्लोक रोज आश्रमांतील मुलींना ते देत. त्या मुलींना समजलें म्हणजे विनोबांजींना समाधान होईल. मराठीत हें अपूर्व व ईश्वरी प्रसादानें भरलेलें गीताई पुस्तक लाखांवर खपलें. परंतु एकाहि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षानें त्या गीताईचा उल्लेख केला नाहीं. ! जें पुस्तक जनतेनें जवळ घेतलें, त्याचा आमच्या साहित्यिकांना पत्ताहि नाही !! ते आपल्याच दिवाणखानी जगांत आहेत. तेथें त्यांच्या चर्चा चालल्या आहेत. परंतु दु:खी, कष्टी, अडाणी, जनतेची चर्चा करावयास कोणीहि उठत नाहीं. ती जनता त्यांच्या डोळयांसमोर नाहींच मुळीं.

वसंता, तूं जीवनाच्या कलेचा उपासक हो. तुझ्या सेवादलांतील मुलांना जीवनाची कला उपासावयास सांग. त्यांच्याजवळ जर इतर कला असतील तर त्या त्यांनी जीवनाच्या कलेसमोर आणाव्या.वसंता, लौकरच माझा खटला चाजून मला शिक्षा होईल. तर पुढें तुरुंगात लिहीन तें बाहेर येईपर्यंत वहीतच राहील. सध्यांपुरता तरी सर्वांस सप्रेम प्रणाम. तुम्ही बहुतेक विद्यार्थी आहांत. विद्यार्थ्यांनी राजकारणांत पडावें कीं न पडावें, याची चर्चा आतां फोल आहे. स्वतंत्र्य देशांत अशी चर्चा कोणी करीत नाहीं. कठीण प्रसंगी सारे एकजात त्यांत पडतात. अशी चर्चा आपल्या देशासारख्या अभागी देशांतूनच होते. आज जगांती इतर देशांतील तरुण आपापल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व सोडून बाहेर पडले आहेत. मी तुम्हांलाहि सांगेन की, शाळा-कॉलेज सोडा व खेडयांतून निर्भयता पसरवा. ज्यांना शक्य त्यांनीं तरी निघावें. तुम्ही हजारों तरुण पडा बाहेर. जा खेडोपाडी व अस्पृश्यता नष्ट करण्यास सांगा. हरिजनांची वस्ती झाडा. खांद्यावर खादी घेऊन ती खपवा. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रसंग वरचेवर आणा. निरनिराळया सणांचे वेळेस जमवा हिंदु-मुसलमान एकत्र. संक्रांत झाली तर त्यांना तिळगूळ वाटा. प्रेमानें भेटा. आणि हें सारें करीत असतांना कॉग्रेसची विशुध्द भूमिका सर्वांना समजावून देत रहा. निर्भय व्हा. सारें राष्ट्र जागृत होऊं दे. जागृत राहूं दें. गा गाणीं. घ्या हाती उंच भव्य तिरंगी झेंडें. मिरवणुकी काढा. सभा घ्या. धूमधडाका सुरु करा. ही जीवनाची कला आहे. जीवनांत आज रंग भरण्याची ही वेळ आहे. तुम्ही का स्वस्थ राहणार?ज्यांना हें नसेल करतां येत, त्यांनीं साक्षरतेचा प्रसार करावा. सुटीचे दिवस सेवेंत दवडावे. मी किती सांगूं, काय सांगूं? माझें हृदय भरुन आलें आहे. सारा महाराष्ट्र उचंबळून उठेल का? क्षुद्र जातीय डबकीं सोडून अखिल भारतीय अशी मोठी दृष्टि घेऊन, स्वातंत्र्य डोळयांसमोर ठेवून उठतील का सारे महाराष्ट्रीय तरुण? ज्या राष्ट्रांतील तरुणहि संकुचित दृष्टीचे बनले, जात्यंध बनले, त्या राष्ट्राला कोण तारणार? तरुण तरी मोठया दृष्टीचा हवा. खरीं शास्त्रीय दृष्टि घेणारा हवा. दुसरा वाईट वागला तरी आपण श्रध्देनें सन्मार्ग घेऊनच गेलें पाहिजे. कॉग्रेस हें सांगत आहे. तुम्ही सेवादलांतील मुलें ! तुम्ही उठा सेवा करायला, शक्य ती तरी करायला. वसंता, आपण केव्हां भेटूं? मी सुटेन तेव्हां तोंपर्यंत मनोमय भेट. सेवादलांतील सर्वांस प्रणाम !लहान दत्तू, व रामूस आशीर्वाद.तुझा श्याम