श्यामचीं पत्रें
पांडुरंग सदाशिव साने
पत्र तेरावे
जसें शिक्षण तसें जीवन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद,तू मला परवाच्या पत्रात अचानक एक नवीनच प्रश्र केलास. ठीक केलेंस. राष्ट्रांतील सर्व प्रश्नांची माहिती हवी. भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटलें आहे, 'तें खरें शिक्षण जें या क्षणापर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सम्यक् ज्ञान देतें. जास्तीत जास्त पुढे गेलेल्या आजच्या विचारसरणीशीही गांठ घालतें.' तू वर्धा शिक्षण पध्दतीविषयी माहिती विचारलीस मला आनंद झाला. तुझ्या सेवादलांतील एका मुलानें हा प्रश्र तुला विचारला. त्याला वक्तृत्वोत्तेजक सभेंत या विषयावर बोलायचे आहे. चांगलें आहे. तुला जातां जातां एक गोष्ट सांगतों. तुमच्या सेंवादलांतील मुलांसाठी चिकट-बुकें तयार करा. इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रें येत असतात. त्यांतून निरनिराळया विषयांवरची कात्रणें कापून ती निरनिराळया फायलींतून चिकटवावींत. ही चीनची फाईल, ही महायुध्द फाईल, ही रशिया फाईल, ही काँग्रेस फाईल, ही विद्यार्थी चळवळीची फाईल, ही किसान-कामगार फाईल, ही कम्युनिस्ट फाईल, ही खेळ-व्यायाय फाईल, ही कला व वाङमय फाईल, अशा अनेक फायली कराव्या त्या त्या विषयांसंबंधिची कात्रणें त्या त्या फायलीत ठेवावीं. म्हणजे आपणाजवळ माहिती जमते. आपणांस चीनची माहिती पाहिजे असली म्हणजे ती चीन-फाईल काढावी. शिक्षणासंबंधी माहिती हवी असली कीं शिक्षण फाईल काढावी. जसें हे कात्रणाचें सांगितले, तसेच एक काम म्हणजे अल्बममध्ये निरनिराळया देशभक्तांचे निरनिराळया वेळचे फोटो, युध्दांचे देखावे, इतरही निरनिराळया क्षेत्रांतील फोटो, सुंदर स्थळें व देखावे यांचे फोटो अशांचे सुंदर अल्बम करावें. मुलांना दाखवायला बरें असते. असो.वर्धा शिक्षण पध्दतीवर लिहिलेली पुस्तके अशी मराठीत अद्याप फारशी नाहींत. आजन्म शिक्षणकार्याला वाहून घेतलेले श्री. आपटे गुरुजी या विषयावर पुस्तक, प्रसिध्द करणार होते. वर्धा शिक्षण पध्दतींत उद्योगद्वारा शिक्षण द्यायचें असते. पू. विनोबाजींनी खादीद्वारा शिक्षण द्यायचें झाले तर कसे द्यावे यावर एक लहान पुस्तक लिहून प्रसिध्दीसाठी दिलें. बोर्डीच्या सुप्रसिध्द शाळेचे थोर चालक आचार्य भिसे यांनी शेतीद्वारां कसें शिक्षण द्यावें तें एका पुस्तकाच्याद्वारां लिहिले आहे. त्यागी व विद्वान आचार्य भाग्यवंत 'वर्धा शिक्षण पध्दति पत्रिका' चालवीत असत. त्या पत्रिकेंतूनही काही निबंध प्रसिध्द झाले आहेत.शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचें महत्वाचे साधन. जसें शिक्षण तसे मन. जसें मन तसें जीवन. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. जीवन सुंदर करायचे असेल तर शिक्षणाचा खोल विचार करायला हवा. बर्नार्ड शॉ ने एके ठिकाणी म्हटले आहे, 'सा-या शाळा बंद करा. म्हणजे मानवजात सुधारेल !' शॉ नेहमी अत्यंतिक तऱ्हेने लिहितो व बोलतो. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, शिक्षण हे पुष्कळ वेळां सत्ताधारी हुकूमशहा आपल्या इच्छेप्रमाणे लादीत असतात. जसें सरकार तसें शिक्षण. मनुष्याच्या हृदयाच्या, बुध्दीच्या व देहाच्या भुका व गरजा कोण बघतो? शिक्षणाने देह, मन व बुध्दी या तिहींचा समन्वय करता आला पाहिजे. शिक्षणानें देहाचे पोषण करायला आपण समर्थ बनलें पाहिजे. मनाने उदार झाले पाहिजें. बुध्दि विचार ग्रहण करणारी व स्वतंत्रपणे विचार करणारी झाली पाहिजे.हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून शिक्षण आहे. आपल्याकडे बहुजन समाजाच्या शिक्षणाचे साधन श्रवण हे असे. सारेच गुरुगृही जाऊन शिकत असतील असें नाही. स्त्रियांचे शिक्षण तर पुढे बंदच झालें. मुलें-मुली एकत्र शिकत उत्तररामचरित् व शाकुंतल यांतील उल्लेखांवरुन वाटतें. राजांचे मुलगेहि आश्रमांत रहात. त्यांनाही शिस्तीत व आश्रमाच्या नियमांप्रमाणे वागावे लागे. चौदा विद्या व चौसष्ट कला आपण मानीत आलो. आश्रमांतून बौध्दिक व शारीरिक शिक्षण दिले जाई. काही काहींना विशिष्ट असे शिक्षण दिले जाते असावे.विषय कोणतेही असोत, भारतीय शिक्षणशास्त्राने जर कशावर भर दिला असेल तो एकाग्रतेवर. मन एकाग्र करायला शिका. बुध्दि एकाग्र करायला शिका. मग गायत्री मंत्राने एकाग्र करा, सूर्याकडे पाहून एकाग्र करा, किंवा अर्धोन्मीलित दृष्टि ठेवून एकाग्र करा. कोठूनही हें चंचल मन एकाग्र करायला शिका. मनाची शक्ति अनंत आहे. ही अनंत चैतन्यशक्ति सारखी सर्वत्र वारेमाप जात असते. ती एकत्र केली पाहिजे. सूर्याचे किरण काचेंतून एकत्रित करुन कापसावर सोडले तर कापूस पेटतो ! परंतु कापूस नुसता उन्हांत धरुं तर पेटणार नाही. फांकलेल्या किरणांत ती शक्ति नसते. केंद्रीभूत किरणांत ती शक्ति असते. त्याप्रमाणे मनाची, बुध्दिची शक्ति केंद्रिभूत करुन एखाद्या विषयावर सोडली तर तो विषय समजण्यास कठीण जाणार नाही.
वसंता, मी एकदां एक मनुष्य पाहिला होता. तो सुपारी दोन बोटांनी धरी व तिचा चुरा करी ! अंगठा व मधले बोंट या दोन बोटांच्या अग्रभागी सारी शरीरांतील शक्ति तो जणू एकवटी आणि ती शक्ति या सुपारीवर सोडी. सुपारीचा चुरा होई ! तसेच बुध्दिचे आहे. ज्याला बुध्दि एकाग्र करण्याची सवय झाली तो कोणत्याही विषयांत प्रगती करू शकेल. भारतीय शिक्षण शास्त्राने हा महत्वाचा सिंध्दांत जगाला दिला आहे.हिंदुस्थानातील बहुजन समाज लहानपणापासूनच बापाचा धंदा शिकत असे. जीविकेचा धंदा लहानपणापासूनच सुरू होई. कुंभाराचा मुलगा मडकें करू लागे. सुताराचा रांधू लागे. लोहाराचा भाता फुंकू लागे. आपापल्या पिढीजात धंद्याचे ज्ञान त्यांना घरींच जणूं मिळे. किंवा त्या त्या धंद्यातील अधिक कसबी माणसाकडे काही दिवस उमेदवारी करीत. मनांचे व बुध्दिचे सांस्कृतिक ज्ञान श्रवणाने मिळे. कथा, किर्तने, पुराणें यातून मिळे. जग हीच जणुं आमची शाळा होती !ब्रिटिश राजवट आली. आणि मुख्य फरक हा झाला की येथील धंदेच बुडाले. लोक बेकार होऊ लागले. ब्रिटिशांनी नवीन शिक्षण सुरू केले. प्रथम हें शिक्षण त्या त्या प्रांताच्या प्रांतिक भाषांतून सुरू झाले. निरनिराळया विषयांवर भाषांतरे होऊं लागली. पर्रतु मेकॉले साहेबांनी आपली भारतीय शिक्षणावरची पत्रिका प्रसिध्द केली आणि इंग्रजीतून शिक्षण सुरू झालें !परभाषेंतून शिक्षण देण्याचा प्रयोग दुनियेंत कोठे झाला नसेल ! शिक्षणाचे माध्यम मातृभाषा हेंच असणें साहजिकच आहे. परंतु पारतंत्र्यांत सारेंच अस्वाभाविक असते. देशाची लेंकरे अन्नास मोताद होतात व परकीयांची चैन चालते ! इंग्रजांना देशाचा कारभार चालविण्यास गावठीसाहेब हवे होते. त्यांना इंग्रजी लिहीणारे, बोलणारे कारकून हवे होते. प्रथम इंग्रजी शाळेंत मुलांनी यावे म्हणून खाऊ वाटले जात, बक्षिसें दिली जात, पैसे दिले जात. मुलांनी फी देण्याऐवजी शाळेतूनच घरी पैसे न्यावे ! परंतु पुढें सारे तंत्र बदलले. लाखो लोक शिकू लागले आणि शिकून कर्मक्षेत्र तर दिसेना.शिक्षण सरकारच्या हाती होते. लोकांना वाटले की आपल्या हातांत शिक्षण घ्यावें मिशनरी लोकांच्या संस्था देशभर होत्याच. आपले लोकही शिक्षण संस्था काढूं लागले. महाराष्ट्रांत प्रथम थोर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शिक्षण कार्यास वाहून घेतलें. त्यांना आगरकर, टिळक अशी अद्वितीय माणसें मिळाली. न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झाले. फर्ग्युसन कॉलेज झालें. प्रथम सरकारी ग्रँट घ्यायची नाहीं असे धोरण होते म्हणतात. परंतु पुढे ग्रँट घेऊ लागले. लोकमान्य संस्था सोडून गेले ! सरकारी शाळा-कॉलेजातून शिक्षण मिळे तेंच येथेंहि मिळे. येथे फी थोडी कमी, शिक्षक कमी पगारावर रहात. अन्यत्र मोठया नोक-या मिळत नसूनही त्यागपूर्वक या संस्थांतून कामें करीत.
या संस्थेचे अनुकरण करणा-या अनेक संस्था महाराष्ट्रभर निघाल्या. परंतु शिक्षणांत काय बदल झाला? शिक्षण तेंच. शिक्षक शिकवतांना देशभक्तीच्या ज्या काही थोडयाफार गोष्टी सांगतील तेवढाच काय तो फरक. परंतु ज्याला रहावत नाही असा शिक्षक कोणत्याही शाळेंत असो, तेंथे तो देशभक्तिच्या गोष्टी सांगेलच. रोज उठून काही इन्स्पेक्टर बघायला येत नसतो. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाचे सारे विषय मातृभाषेतून शिकवण्याचे ध्येय होते. परंतु ते ध्येय्य कागदावरच राहीले व इतर शाळांप्रमाणेच तेथेंहि शिक्षण सुरु झाले. १९१८ मध्ये प्रो. घारपुरे यांनी न्यू कॉलेजमध्ये पहिल्या वर्गाला मराठीतून सृष्टिशास्त्र शिकवायला आरंभ केला. परंतु इतर प्रोफेसरांनी त्यांना तसे शिकवणे बंद करायला लावले !१९०६ साली कलकत्याच्या राष्ट्रीय सभेत जी चतु:सूत्री जन्मली तीत राष्ट्रीय शिक्षण हा शब्द जन्मास आला. सरकारी शाळांवर बहिष्कार घालावा. सरकारशी संबंध नसणा-या शिक्षणसंस्था काढाव्या असे ठरले. बडोदे संस्थानांतून श्री. अरविंद घोष तेथील सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कलकत्यास राष्ट्रीय विद्यालय स्थापण्यासाठी गेले. महाराष्ट्रांत तळेगांवला श्री. अण्णासाहेब विजापूरकर यांनी समर्थ विद्यालय काढले. श्री. ज.स.करंदीकर, श्री. जनार्दनपंत ओक वगैरे थोर त्यागी माणसे तेथे शिकवूं लागली. परंतु या संस्थांतूनही शिक्षण कोणते होते? तेच शिक्षण ! शिक्षणाचा खोल असा कोणी फारसा विचार केला नव्हता. समर्थ विद्यालयांत पहाटे उठणे, स्नानसंध्या, गंध, हजामत, सोवळें, श्लोक म्हणणें या गोष्टींवर अधिक भर देण्यांत येई. ही जी ब्राम्हणी सोंवळी संस्कृति तिचा येथे जणु आदर्श होता ! खरे म्हणजे आपले राष्ट्र त्यावेळेस चांचपडत होते. राष्ट्रियता शोधीत होते. स्तिमीत झालेला देश कोठून स्फूर्ति मिळते का ते पहात होता. कोणी रजपूत इतिहासातून स्फूर्ति घेऊ लागले, कोणी मराठी इतिहासांतून स्फूर्ति घेऊं लागले. कोणाला ती जुनी जानवी व शेंडीची संस्कृती स्फूर्ति देईल असे वाटू लागलें. या सर्व गोष्टी ही बाहय प्रतीकें होती. या सर्व गोष्टीतून देशाविषयीचा अभिमान आम्हांस जागृत करावयाचा होता. साहेबाचे अंध अनुकरण करणारे आम्ही होत होतो. स्वदेशास पारखे होत होतो. हॅट, बुट, सूट घालणे पाप आहे असें नाही, परंतु त्यामुळे जर स्वजन व स्वदेशी यांच्यापासून दूर जाणार असू तर हया वस्तू त्याज्यच समजल्या पाहिजे. इतिहाससंशोधक राजवाडे म्हणत, 'प्रयोगशाळेत पंचा नेसून आपण गेलो तर काय ऑक्सिजन तयार होणार नाही? त्यासाठी काय साहेबांची विजारच पाहिजे?'रजपूत व मुसलमान यांचे झगडे, मराठे व मुसलमान यांचे झगडे यांतून आम्ही नवराष्ट्रस्फूर्ति मिळवीत होतो ! परंतु जुन्या इतिहासांतून राष्ट्रीयता घेतांना काहींची मते हिंदु-मुस्लीम द्वेषाने नकळत भरली वास्तवीक त्या जुन्या इतिहासांतील त्यागाची, स्वातंत्र्याची स्फूर्ति घेऊन आजच्या स्वातंत्र्य लढयांत ती उपयोगावयाची असते. परंतु आजचा परकी शत्रू दुर राहून काही नव सुशिक्षित हिंदु-मुसलमान एकमेकांचेच वैरी होऊ लागले !
त्या काळांत विचार नव्हता. स्वराज्याचा थोडासा विचार होता. परंतु स्वराज्याचा अर्थही स्पष्ट नव्हता. स्वेदशाची, स्वदेशीची, स्वधर्माची, स्वसंस्कृतीची चाड उत्पन्न करण्यासाठी नवीन संस्था निघाल्या. परंतु शिक्षणशास्त्राचा असा त्यांत विचार नव्हता. शिक्षण इतरत्र मिळे तेंच येथे मिळे. १९०७-०८ साला नंतर हिंदुस्थानभर सरकारने दडपशाहीचा वरवंटा फिरवला. त्यांत राष्ट्रीय शाळा बंद पडल्या. समर्थ विद्यालय बंद झाले. समर्थ विद्यालयांतील विद्यार्थांस दुस-या शाळेत घेण्यास बंदी झाली ! तळेगांवच्या समर्थ विद्यालयांतीलच तो तरुण वीर पिंगळे ! गदर चळवळीत तो फांशी दिला गेला. जपानमध्ये राहणा-या रासबिहारींनी या हुतात्मा पिंगळयांबद्दल लिहिले, 'इतका तेजस्वी तरुण मी पाहिला नव्हता ! ' विजापूरकरांनी लो. टिळक सुटून आल्यावर नामदार चौबळ वगैरेंच्या सहाय्याने तळेगांवला नवीन समर्थ विद्यालय पुन्हा स्थापलें. तेथे बौध्दिक शिक्षणाबरोबर डेअरी, ऑईल इंजिन चालविणे वगैरे गोष्टींचेही शिक्षण द्यावे असे त्यांनी ठरविले. बौध्दिक शिक्षणाला धंदेशिक्षणाची तोड द्यावी असे विजापूरकर म्हणत होते.तिकडे १९१२ मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या हस्ते बनारस हिंदु विद्यापीठाचा पाया घातला गेला. पंडित मदनमोहन मालवियांचे ते अमर कार्य ! केवढी आहे बनारस युनिव्हर्सिटी ! हजारो मुलें तेथें शिकत आहेत. सर्व प्रकारची कॉलेज त्यास जोडलेली आहेत. कोटी कोटी रुपये त्यासाठी मालवीयजींनी मिळवले.परंतु हिंदुस्थानातील शिक्षण कसे असावे, याचा विचार कोणीही केला नव्हता. कलकत्ता युनिव्हर्सिटीने सॅडलर कमिटी नमून शिक्षणवर दहा बारा खंडांतून रिपोर्ट प्रसिध्द केला. तो रिपोर्ट महत्वाचा आहे. परंतु तो लायब्र-यांतून पडून राहिला ! त्या रिपोर्टातही अखिल हिंदुस्थानच्या सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही.१९२० साल आले. असहकाराचे युग आले. शाळा - कॉलेजांवर पुन्हा बहिष्कार आला. शेकडो विद्यार्थी बाहेर पडले. कारण शिक्षणांत जीवनदायी असे काही राहिलेंच नव्हते. 'मॉडर्न रिव्हयू' ने लिहिले 'शिलर या जर्मन नाटककाराचे 'रॉबर्स' नाटक वाचून व पाहून कित्येक जर्मन तरूण खरोखरच चोर बनले ! त्याप्रमाणे कॉग्रेसने शाळा सोडा म्हणताच शेकडोंनी शाळा सोडल्या. कारण शाळा कॉलेजांत आकर्षक असे काही नव्हतेंच.' परंतु या विद्यार्थ्यांचे पुढे करावयाचे? त्यांना शिकण्याची तर इच्छा होती. राष्ट्रीय शाळा-महाशाळा निघाल्या. टिळक विद्यापीठ स्थापन झाले. अहमदाबादला गुजरात विद्यापीठ स्थापन झालें. मुंबईस नॅशनल मेडिकल कॉलेज निघाले. अमळनेर येथे राष्ट्रीय महाविद्यालय निघाले. राष्ट्रीय शाळा तर सतारा, पुणे, नगर, चिंचवड, येवले, भुसावळ, खामगांव, अकोला, यवतमाळ, अनेक ठिकाणी बृहन्महाराष्ट्रांत निघाल्या.परंतु सर्व संस्थांतून शिक्षण कोणते होते? तेंच काव्यशास्त्रविनोदाचे शिक्षण ! मात्र ते मातृभाषेतून दिले जाई. गुजरात विद्यापीठाने थोडाफार अर्थशास्त्र विषयक शिक्षणाचा प्रयोग केला . 'मातर' तालुक्याची पाहणी हे संशोधनात्मक पुस्तक गुजरात विद्यापीठातील डॉ. कुमारप्पा यांनी विद्यार्थ्यासह खेडयापाडयात हिंडून तयार केले ! हिंदी अर्थशास्त्र म्हणजे सात लाख खेडयांचे अर्थशास्त्र असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींनी, 'स्वातंत्र्यासाठी सत्याग्रही तयार करील ते राष्ट्रीय शिक्षण.' अशी व्याख्या केली. राष्ट्र आधी स्वतंत्र केले पाहिजे. आज दुसरे प्रश्न आपण हाती घेऊ शकत नाही. कोणतेही प्रयोग स्वराज्याशिवाय फोल आहेत. तेंव्हा तें स्वराज्य जवळ आणण्यासाठी शिपायी हवेत. सत्याग्रही हवेत. शिक्षणाने असे त्यागी, स्वातंत्र्यप्रेमी सत्याग्रही सैन्य निर्माण करावे, असे महात्माजींचे म्हणणे.
१९३० व ३२ च्या लढयांत राष्ट्रीय शिक्षण संस्था सामील झाल्या त्या लढयांत या संस्थांच्या आहुती पडल्या ! त्या संस्था पुन्हा उभारणे जड झाले. गांधीजींनी गुजरात विद्यापीठाला विचारले, 'दहा वर्षे विद्यापीठ चालले. खेडयात काम करण्यात किती तरूण आपण तयार केले? ' समाधानकारक उत्तर मिळाले नाही ! गुजरात विद्यापीठ बंद झाले. महात्माजी वर्ध्याजवळ रहावयास गेले. तेथे पू. विनाबाजीं भोवती सेवकांचा मेळावा होता. जे खेडयापाडयातून हिंडत होते, कामे करीत होते.महात्माजींना काही मित्र म्हणाले 'तुम्ही खादी भक्कम पायावर उभारलीत. ग्रामोद्योग उभारलात, हरिजनसेवक संघ स्थापलात. हिंदी भोषेला चालना दिलीत. गोरक्षण सुरू केलेंत. परंतु शिक्षणाचा तुम्ही नवीन पाया घातला नाही. आम्ही राष्ट्रीय शाळा काढल्या पण तेच जुने शिक्षण देत बसलो. तुम्ही शिक्षणाकडे एकदां दृष्टि वळवा.'महात्माजींच्या मनांत शिक्षणासंबंधी विचार आफ्रिकेपासून घोळत होते. राष्ट्र-पुरुष सर्व गोष्टींचा विचार रात्रंदिवस मनांत करीत असतो ! त्याच्या स्मृतीतून, त्याच्या व्यापक दृष्टितून कोणतीही गोष्ट सुटत नसते. निरनिराळया आश्रमांतून प्रयोग चालले होते. शिक्षणशास्त्राचा अभ्यास केलेले श्री. काकासाहेब कालेलकर, पू. विनोबाजी वगैरे मंडळी महात्माजींजवळ होती. वर्ध्याच्या मारवाडी विद्यालयाच्या समारंभाच्या निमित्तानें महात्माजींनी शिक्षणशास्त्रज्ञांची एक बैठक बोलावली. दिल्लीच्या 'जमिया मिलिया' राष्ट्रीय विद्यालयाचे प्रमुख डॉ. झकीर हुसेन हे आले. प्रा. शहा आले. आर्यनायकम् आले. अनेक नामवंत शिक्षणतज्ञ आले. विचार-विनिमय झाला. महात्माजींनी आपले शिक्षणविषयक विचार तेथे मांडले व एक समिती नेमली गेली. डॉ. झकीर हुसेन तिचे अध्यक्ष होते.समितीने दोन महिन्यांत अहवाल लिहिला. वर्ध्याला ही शिक्षणपध्दती आखली गेली म्हणून हिला वर्धा शिक्षणपध्दती म्हणतात. वास्तविक हिला 'समवाय-शिक्षण-पध्दती' असे नांव दिले पाहिजे. वर्धा शिक्षण पध्दतीवर या लहानशा पत्रात मी कितीसे लिहू. परंतु आजपर्यंत ज्या ज्या शिक्षणपध्दती निघाल्या, शिक्षणशास्त्रांत जे जे सिध्दांत आजपर्यंत जगांत मांडले गेले ते सर्व जमेस धरुन त्यात वर्धा शिक्षणपध्दतीने आणखी नवी भर घातली आहे. वर्धा शिक्षणपध्दती म्हणजे महात्माजी व त्यांचे अनुयायी यांचे अशास्त्रीय ढंग नव्हते, ती एक शास्त्रीय पध्दती आहे. मानसशास्त्र तिने अभ्यासिले आहे. आजपर्यंतचे अनुभव जमेस घेतले आहेत. आपल्याकडे बी. टी. किंवा एस.टी.सी. वगैरे होताते, त्यांना शिक्षणशास्त्राचा इतिहास असतो. युरोपांतील अनेक शिक्षण तज्ञांनी कोणती भर घातली ते त्या इतिहासांत असते. रुसो, फ्रॉबेल, पेस्टॅलॉझी, माँटेसरी अशा शिक्षणाचा विचार करणात्या थोर व्यक्ति तिकडे झाल्या. मॉटेसरीबाई तर आज हिंदुस्थानांत येऊन आपली पध्दती शिकवीत आहेत ! बी. टी. वगैरे होणा-यांस या सर्व पध्दतींचा अभ्यास करावा लागतो. रुसो हा अत्यंत प्रतिभाशाली पुरुष होऊन गेला. तो म्हणत असे, 'निसर्ग हाच मोठा शिक्षक. निसर्ग शिकवील.' शेक्सपीअर या महाकवीने म्हटलें आहे 'Books in brooks and sermons in stones. - झ-यांतून पुस्तके आहेत, पाषाणांतून प्रवचने आहे.' मनुस्मृतीत सांगितले आहे, 'पाऊस पडूं लागला म्हणजे मुलांना सुटी द्यावी !'त्या मुलांना पावसांत नाचूं दे. त्यांच्या भावनाहि नाचूं लागतील. रुसोने निसर्ग शिक्षणावर जोर दिला.
फ्रॉबेल हा जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ सांगतो की 'लहान मुलें म्हणजे देवाचें काव्य ! जीवनांत ताल, छंद, नाच यांना महत्व आहे. मुलांना हावभाव करावे असें फार वाटतें. नाचावें, गावें असे वाटतें. यासाठी मुलांना निरनिराळया गाण्यांमधून शिकवा.' आपल्याकडे गुजराती लोकांत गर्बागाणी असतात. त्यांत हावभाव असतो. गर्बा जणुं लोकांच्या भावनांना वळण देणारें महान साधनच. प्लेटो म्हणत असें 'संगीत हा सृष्टिचा आत्माच आहे. तारे आकाशांत थरथरत आहेत. ते तेथे गात आहेत. गायनांतील तानांचा तो कंप आहे !' शिक्षणांत संगीताला फार महत्व. निदान लहान मुलांच्या शिक्षणांत तरी.पेस्टॅलॉझी शिक्षणांत श्रमशक्तिला वाव द्यावा असे म्हणे. क्रिया शक्तिला अधिक अवसर द्यावा असे म्हणे आणि इटालियन भगिनी मादाम माँटेसरी मुलांच्या उपजत वृत्तीवर अधिक भर देतात. मुलांच्या भोंवती असे वातावरण ठेवावे, असे साहित्य ठेवावें, की त्यांतू ती आपोआप आपल्या भावनास व बुध्दीस अनुरुप व अनुकूल तें घेतील. शिक्षक हा नुसता मार्गदर्शक, सूचक. मुलेंच जणुं स्वत: शिकत आहेत. तीच स्वत:ची शिक्षक. गुजरातमधील थोर बालसेवक स्वर्गीय गिजूभाई यांनी भावनगर येथें दक्षिणामूर्ति नांवाची अभिनव संस्था चालविली होती, तेथे या पध्दतीचे प्रयोग होत असत.अमेरिकेंतील बुकर टी. वॉशिंग्टन या निग्रो महात्म्यान औद्योगिक शिक्षणावर भर दिला. मुले स्वत:ची शाळा बांधीत आहेत, विटा पाडीत आहेत, कौले तयार करीत आहेत. मला असे वाटते काकासाहेब कालेलकर पंधरा-सोळा वर्षापूर्वी भरलेल्या एका राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वेळी म्हणाले, 'उद्योगधंदा देणें हे पहिले काम. इतर काव्य-साहित्य .फिरायला जातांना, भांडी घासतांनाही शिकवतां येई.' मुलें घेऊन आपण फिरायला निघालो. सृष्टि समोर आहे. शिकवा त्यावेळेस काव्य. 'पक्षी कसे मंजुळ शब्द गाती?' हे का चार भिंतीत सांगू? 'वरी बिंब ते लाल आलें विशाल' हे का खोलींत कोंडलेल्या मुलांना शिकवूं? रोमाँ रोलाँनी आपल्या 'जी ख्रिस्टो पे' या कादंबरींत एका प्रसंगी एका पात्राच्या तोंडी पुढील अर्थाचे वाक्य घातले आहे. 'खांलींत मी गाऊं शकत नाही. मला नदीकाठी, जंगलांत जाऊं दे. तेथे माझी तान आपोआप बाहेर पडेल. पक्षी पिंज-यांत गाऊ शकणार नाही. तो रानावनांतील मोकळया हवेंतच गाईल.'वर्धा शिक्षण पध्दतीने या सर्व विचारांतील सार घेतले आहे. वसंता, वर्धा शिक्षण पध्दतीत मुख्यत: प्राथमिक शिक्षणाचाच विचार करायचा होता. सर्व जनता साक्षर करावयाची तर कोणत्या मार्गाने, हा प्रश्र त्यांना सोडवायचा होता. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानच्या बाबतीत जर सर्वांत मोठें पाप काही केले असेल तर तें हे की जनतेच्या शिक्षणांकडे त्याने दुर्लक्ष केले. शंभर-दिडशे वर्षे राज्य करुनही शेकडा ऐंशी-नव्वद लोक निरक्षर, असे येथले चित्र आहे. येथील ब्रिटिश राज्यपध्दतीवर हा सर्वात माठा डाग आहे ! ब्रिटिश सरकारने दुय्यम व उच्च शिक्षणाकडे त्यांना नोकर वगैरे पाहिजेत म्हणून थोडेफार लक्ष दिले. परंतु प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे म्हणून खटपट केली नाही. आजच्या काळांत जनता निरक्षर राहणे योग्य नव्हे.उद्यां स्वतंत्र होणा-या हिंदुस्थानला आधी जर कोणते काम करावयाचे असेल तर सर्व जनता साक्षर करण्याचे. नवीन येणारी सर्व पिढी साक्षर हवी. लोकशाहीच्या काळांत निरक्षरता काय कामाची? ब्रिटिशांच्या राजवटींत हिंदुस्थान ही जगांतील अत्यंत दरिद्री असा देश झाला. चाळीस कोटी लोक आणि अत्यंत भीषण दारिद्रय ! उद्यां स्वतंत्र झालो तरी जनतेला शिकविण्यासाठी पैसा कोठून आणावयाचा, हा प्रश्न उभा राहील? ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानवर दारुचे गुत्ते घातले आणि दारुचे उत्पन्न शिक्षणाकडे लावले. काँग्रेस तर दारुबंदीचा विडा घेऊन उभी राहिलेली. हिंदुस्थानचे ७५ ते ८० कोटी रुपये दारुत जातात. गरीब हिंदुस्थानने दारु सोडली पाहिजे. पूर्वी हिंदुस्थान चीनला अफू विकी. नामदार गोखले नेहमी वरिष्ठ कायदे कौन्सिलांत म्हणत, 'चीनला अफूचे व्यसन लावून आम्ही पैसे मिळविणे हे पाप आहे. हा अफूचा व्यापार बंद झालाच पाहिजे !' त्याप्रमाणेच काँग्रेस म्हणते की लोकांना दारुचे व्यसन लावून तिजोरीत पैसा भरणे हे नीतीवर उभ्या असणा-या वा जनहिताकडे दृष्टि देणा-या सरकारचे कर्तव्य नाही. जनतेचा आत्मा व्यसनांतून मुक्त केलाच पाहिजे.'
पण मग शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा कसा? हिंदुस्थानांत आज प्राथमिक शिक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च होत आहेत. तरी शेंकडा १० लोकच साक्षर करायची म्हणूं तर १०० कोटी रुपये हवेत. आणि सर्व हिंदुस्थानचे मध्यवर्ति व प्रांतिक धरुन सरकारी उत्पन्न जवळ जवळ दोन अडीचशे कोटी आहे. म्हणजे निम्में उत्पन्न प्राथमिक शिक्षणाकडेच खर्च करावें लागेल आणि इतर राष्ट्रसंवर्धक कामे कशांतून करावयाची? ही एक मोठी समस्या आहे. महात्माजी म्हणाले, 'शिक्षण संस्था स्वावलंबी नाही का करतां येणार?' शाळेंत येणारी मुलें काही हस्तव्यवसाय नाही का करणार? त्यांतून काही उत्पन्न शाळेला नाही का मिळाणार?' शाळेतील शिक्षण हस्तव्यवसायांमार्फतच द्यावयाचे असा मुद्दा निघाला. आणि मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र दोनही या गोष्टीला अनुकूल आहेत.वसंता, हिंदुस्थानात सक्तिचे व मोफत असे प्राथमिक शिक्षण हवे असें आपण म्हणतो. तेवढयाने प्रश्न सुटत नाही. लहान मुलें-मुलीही गरिबाच्या संसारास हातभार लावतात. जपानसारख्या श्रीमंत देशांतही सक्तिचे शिक्षरण करतांना शेंकडा १० लोक बाद करावे लागले. कारण त्या अत्यंत दरिद्री लोकांना आपली मुलेंबाळे शाळेंत पाठवणे कठिण जाई म्हणून श्रीमंत जपानची जर ही स्थिती तर हिंदुस्थानांत कशी स्थिती असेल बरे? म्हणून पू. विनोबाजी म्हणाले, 'हिंदुस्तानांतील शिक्षण केवळ सक्तिचें व मोफत करुन भागणार नाही. तर ते शिक्षण मुलांना दोन दिडक्या देणारे झाले पाहिजे. तर मग गरीब आईबाप म्हणतील, शेण गोळा करणे, बक-या चारणें वगैरेंसाठी पोर नाही गेला तरी चालेले. शाळेंत जाऊनही तो रुपयाभर घरी आणतो ! 'मुलांनी घरी दोन पैसे देणे दूर राहिले, परंतु निदान शिक्षण तरी स्वावलंबी करतां येईल का? आणि मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र यांच्या पायावर ते उभारतां येईल का? मुलांचे मानसशास्त्र काय सांगते? मुलाला तर हालचाल करायला आवडते. आजचें प्राथमिक शिक्षण मुलांना चार घंटे बसवून ठेवतें ! मग मुले हळूंच कोणाला चिमटे घेतील, हळूंच कोणाचा सदरा ओढतील, कोणाचे पुस्तक फाडतील, कोणाची पेन्सिल मोडतील. मुलांचे हातपाय बांधून ठेवणारे शिक्षण व्यर्थ आहे. मुलांना काम द्या. कामांत रमवा त्यांचे हात, रमवा त्यांचे कान, रमवा त्याचा डोळा. द्या त्याला कापूस निवडायला आणि तोंडाने गाणें म्हणायला सांगा :'कापसांतली घाण काढूं याचित्तांतली घाण काढूं यादेशातील घाण काढूं यासाफ करूं, साफ करूंस्वच्छ करूं, स्वच्छ करूं,अज्ञान आपुले दूर करूं.'
सांगा असे गाणें. ते काम करतांना हा कापूस कोठे होतो? काळया जमिनीत. जगांत कोणत्या कोणत्या देशात होतो? हिंदुस्थान, ईजिप्त, अमेरिका, चीन, असा भूगोल सांगा. कापसाचे कापड करण्याचा धंदा हिंदुस्थानांत गावोगांव होता. तो कां मेला? यंत्रे आली, गिरण्या आल्या. परकी सत्ता आली. अशा रीतीनें इतिहास व अर्थशास्त्र जोडा. कापसाचें कापड होईपर्यंत पुष्कळ स्थित्यंतरातून कपसास जावे लागतें. त्याला पिंजून घ्यावे लागतें. चरक्यावर पीळ द्यावा लागतो. त्याप्रमाणे जीवनाला किंमत येण्यासाठी लोकांच्या निदांनी टीकांच्या प्रहारांनी पिंजून घ्यावे लागतें. संयमाचा व निश्चयाचा त्याला पीळ द्यावा लागतो. प्रेमाचा रंग द्यावा लागतो. ध्येयासाठी तें ताणून धरावे लागते.' असे सांगून नीतीची व काव्यसाहित्याची गोडी त्यांत ओता. कर्मद्वावारांच सारे ज्ञान हस्तव्यवसायांद्वारा भूगोल, इतिहास, शास्त्रे, काव्यसाहित्य, नीति सारे शिकवितां येईल. प्रत्यक्ष क्रियेतून हे ज्ञान द्यायचे असल्यामुळे ते जिवंत राहील. ते हवेंत उडून जाणार नाही !आजपर्यंत आपण बौध्दिक शिक्षण व उद्योगधंद्यांचे शिक्षण अलग गरीत होतों. दोन तास बौध्दिक शिक्षण द्या, दोन तास उद्योगधंद्याचे शिक्षण द्या. परंतु ती खरी शास्त्रीय पध्दती नाही. उद्योगधंदा हेंच शिक्षणाचे माध्यम करा. सरस्वति मोरावर बसून येते. त्याप्रमाणे ज्ञान उद्योगावर बसून येऊ दे. उद्योग, प्रत्यक्ष कर्म हे ज्ञानाचे वाहन होऊं दे. वर्धा शिक्षणपध्दती, उद्योगधंदे बौध्दिक शिक्षण दोन्ही थोडथोडे ठेवा, असे नाही म्हणत. केवळ समन्वय करा असेहि म्हणत. तर समवाय करा असे म्हणे. मडक्यापासून माती निराळी करता येत नाही, त्याप्रमाणे शिक्षणापासून उद्योग निराळा करुं नका. दोन्हीचा एकजीव करा. कर्मातूनच ज्ञान फूलूं दे.टेनिसन या महाकवीने म्हटले आहे. 'To know a flower is to know the universe ! - एका फुलाचें ज्ञान करुन घेणे म्हणजे सर्व विश्वाचे ज्ञान करुन घेणे आहे.' त्याप्रमाणे एका उद्योगाच्या द्वारां सर्व शास्त्रांचे, सर्व प्रकारचे ज्ञान देता येईल. मात्र तो उद्योग व्यापक हवा. कापसाचा उद्योग, शेतीचा उद्योग, कागदाचा उद्योग कोणता तरी मूलभूत उद्योग घ्या.याने काय होईल? मुलांच्या हालचालींना वाव मिळेल. त्याला लहानपणी कापावें, फाडावें, मोडावे असे वाटत असते. त्याला क्रिया पाहिजे असते. लहान मुल आईबरोबर विहिरीवर लहान तांब्या घेऊन पाणी आणायला जाईल. तो आईजवळ पोळी लाटायला मागेल. तो म्हणेल मी झाडतो, मी कपडें धुतों. आईला त्याला आवरतां आवरतां नकोसें होते. आपले हातपाय, डोळे सर्वांचा उपयोग सारखा करावा असें त्याला वाटतें. ही जी मुलांत असणारी क्रियाशक्ति तीला चालना मिळेल. प्रत्येकाला सर्वांत जर कोणता मोठा आनंद वाटत असेल तर तो स्वत:च्या निर्मितीचा. लहान मुल लिहित असतांना आपण जर त्याचे हात धरुं तर त्याला तें आवडत नाही. तो वेडयावाकडया रेघा काढील व त्याकडे पाहिले. त्याला वाटत असते, ही माझी कृति ! आजकालच्या रुढ असलेल्या शिक्षणांत ही निर्माण शक्ति नष्ट केली जाते. ज्या राष्ट्रांतील मुलांची निर्माणशक्ति लहानपणीच नष्ट झाली, ती मुलें उद्यां नवं-राष्ट्रनिर्मिती काय करणार? कोणते प्रयोग करणार? कोणते नवीन शोध लावणार?वर्धा शिक्षणपध्दतीने मुलांची कल्पकता, शोधकता वाढेल; ती मरणार नाही. पुष्कळसे उद्योगधंद्यांतले शास्त्रज्ञ त्या त्या उद्योगधंद्यांतूनच उदयास आले. त्या त्या कर्मांतूनच त्यांची शोधक बुध्दि प्रज्वलित झाली. कर्म हें ज्ञानांचे पेटवण आहे. म्हणून आमच्या नवसुशिक्षितांस भीति वाटायला नको की, मग उद्यां शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ निघतील की नाही? आज शे-दिडशें वर्षे शिक्षण सुरु आहे. किती यंत्रज्ञ व शास्त्रज्ञ निघाले? निर्माणशक्तीच जे शिक्षण मारते तें काय निर्माण करणार? उलट या वर्धा शिक्षणांतूनच राष्ट्राला उद्यांचे शास्त्रज्ञ व यंत्रज्ञ भरपूर मिळतील.
सात वर्ष उद्योगधंद्यांतूनच सारे शिक्षण देऊं या. इंग्रजीविरहित आजकालच्या मॅट्रिकला जितके ज्ञान असते, तितकें उद्योगधंद्यांतून सात वर्षात देतां येईल. आणि मग ज्याला पुढे अधिक शिकावयाचे आहे, ज्याच्या ठिकाणी कल्पकता आहे; शोधकता आहे, तो दुस-या उच्च शाळांतून जाईल. संशोधनाच्या शाळा उद्योगधंदेवाल्यांनीच काढावा असे गांधीजींचे मत आहे. प्रयोगाची त्यांना जरुरी. युरोपांतील बहुतेक कारखान्यांतून प्रयोगालये असतात. तेंव्हा सरकारवर हा खर्च न लादतां व्यापा-यांनीच संशोधनाच्या उच्च संस्था चालवाव्या आणि सात वर्षे हस्तव्यवसायांतून शिकलेली तरतरीत बुध्दीची मुले तेथे जातील. अर्थात ही गांधीजींची सूचना होती.उद्योगधंद्यांतून शिक्षण देणारे शिक्षक विशेष दृष्टिचे हवेत. ते सर्वांनाच शक्य होईल असे नाही. ती पध्दती शिकवणारी शिक्षणधामें निघाली पाहिजेत. परंतु हा नवीन प्रयोग आहे. हिमतीने करुं या, असे म्हटले पाहिजे. परंतु आमचे लोक म्हणू लागले, 'मुलांना का हमाल बनवावयाचे? ती कोवळी असतात. त्यांना शाळेत का काम करायला लावायचे?' नाना गोष्टी बोलूं लागले. अरे, काम म्हणजे वाईट वाटते? आणि मुलांच्या डोक्यावर का गोणी द्यावयाचे आहेत? मुलांना तर काम हवं असते. परंतु मुलांची मनोवृत्ती पाहतो कोण? आईबापही म्हणू लागले की, मुलगां शाळेत पाठवतो तो काम करायला नाही. काम करणे म्हणजे कमीपणा, अशी आमची भावना झाली आहे ! ज्या देशांतील श्रीकृष्णाने 'ईश्वराची कर्मरुप पूजा कर व मुक्त हो' असे सांगितले त्या देशांतील लोकांना कर्माची का किळस यावी? अरेरे ! केवढा हा अध:पात ! मुलें तर कर्मात तेंव्हाच रमतात. कर्मांत त्यांना मोक्ष वाटतो. शिक्षकानेही त्या कर्मात मुलांबरोबर रमावे. मुलांच्या भातुकजीत आईनेही भाग घेतला तर मुलांना मोठे कौतुक वाटते. मुलें पाणी घालीत आहेत, शिक्षक काढून देत आहेत. मुले खणीत आहेत, शिक्षकही खणून घामाघूम होत आहेत. गाणी म्हणत आहेत, फाळेंफुलें निर्मित आहेत. निर्मितीचा आनंद मिळत आहे. मजा आहे. सलोनमध्ये तर पुष्कळ शाळांना शेती जोडलेली आहे. मुलांचे संघ असतात. ते शेती पिकवतात. सारे सामुदायिक, संगीत काम ! ते बाजार करतात. जमाखर्च ठेवतात. सिलोनमधील या प्रयोगाने असा फायदा करुन करुन दिला की, पूर्वी मुलगा शिकला की, तो शेतीकडे वगैरे वळतच नसे. तो नोकरी धुंडू लागे. परंतु आतां मुलें शिकली तर स्वत:ची शेती करायला जातात. 'शिकणे म्हणजे मातीत हात न घालणे' असे आतां त्यांना वाटत नाही. शिकलेला व न शिकलेला यांत मी असा फरक करीन : शिकलेल्या उद्योगांत, कर्मात आदंद घेतां आला पाहिजे, जो अशिक्षितांस घेतां येत नाही.आपल्याकडे श्रम आणि शिक्षण यांची फारकत झाली आहे. अमळनेर येथील शाळेच्या वसतीगृहांत मी रहात असे. मी पहात असे की, नवीन मुलगा शिकावयास येतांना आपली ट्रंक स्वत:च्या डोक्यावर घेऊन स्टेशनवरुन बोर्डिंगात येई. परंतु बोर्डिंगात राहून शाळेत थोडे शिकून तो सुटीत परत जाऊ लागला म्हणजे स्वत:ची ट्रंक डोक्यावरुन न्यायला त्याला लाज वाटे ! तो पांढरपेशा बने. कपडा सुरुकतेल, मळेल ! 'शिक्षण म्हणजे शरीरश्रम न करणे' असे कोष्टकच झालें. अमळनेरला डॉ. उत्तमराव पाटील आहेत. तीस साली त्यांनी इंग्रजी सहावीतून शाळा सोडली. पुढे नऊ महिने शिक्षा भोगून ते घरी गेले. ते नांगर चालवूं लागले. तर त्यांच्या गांवांतील लोक म्हणत, 'इंग्रजी शिकलास व शेवटी नांगर हातांत धरलास. मूर्ख आहेस तूं ! मग शाळेत गेलास कशाला?'वर्धा शिक्षणपध्दतीने ही पोशाखी वृत्ती जाईल. मुलांच्या नैसर्गिक वृत्तींना वाव मिळेल. त्यांची शोधक व कल्पक बुध्दि वाढूं लागेल. तो खेडयापाडयांत घरी जाऊन उद्योग करील; त्यांत नावीन्य आणील. त्याला हस्तव्यवसाय मिळाल्यामुळे उपजीविकेचाही प्रश्न सुटेल आणि या पध्दतीने शिक्षणसंस्थाही स्वावलंबी होईल.
उद्योगधंद्यांतून शाळेला पैसे मिळालेंच पाहिजत असे नाही. पंरतु ही पध्दती शास्त्रीय आहे असें ठरले. जगांतील काही शिक्षणशास्त्रज्ञांनी ही पध्दती योग्य आहे असे म्हटलें. या पध्दतीतून अर्थात द्रव्यही निर्माण होईल. नाना वस्तू तयार होईल. कापसाचा मूलभूत उद्योग घेतला तर सूत निघेल, कापड होईल. शेतीचा मूलभूत उद्योग घेतला तर फुलें, फळें, भाज्या, धान्य यांची निर्मिती होईल. भातकाम घेऊं तर विटा, मडकी, कौले, खुजे, पेले निर्माण करुं. आणि जसजशी पध्दति अधिकाधिक व्यवस्थित हाईल तसतसें निर्माणही चांगले हाईल. त्या वस्तू विकतां येतील. मुलांनाही अभिमान वाटेल. मुलांना कंटाळा येणार नाही. 'देशांतील लोकांनी दारु पाजून तुझ्या शिक्षणाला पैसे घेणे चांगले का?' असे मुलांना विचारा. ती 'नाही' म्हणतील. 'आपली शाळा आपण चालविली आहे. आपल्या श्रमांतून चालविली आहे, याचा तुम्हांला आनंद नाही का वाटणार?' असे मुलांना विचारा. मुले कंटाळत नाहीत. मुलांची उत्साहशक्ती अनंत असते. त्यांच्या भावना निर्मळ असतात. मुलांनीच जगांत क्रांन्त्या केल्या मुलें उदात्त भावनांना एकदम मिठी मारतात. त्यांच्या भोंवती तसे वातावरण ठेवा म्हणजे झाले.मुलें कंटाळलेली नाही, जी आजच्या शिक्षणाला कंटाळलेली आहेत. कंटाळलेले जर कोणी असतील तर सुशिक्षित लोक ! त्यांना नवीन प्रयोग नको. चालेले आहे. ते बरें अशी त्यांची मरतुकडी वृत्ती ! 'जगाच्या प्रयोगांत हिंदुस्थान कांही भर घालीत आहे, करुं या प्रयोग, दीडशे वर्ष तो प्रयोग झाला; आता हा करुं, हा प्रयोग पूर्णतेस नेऊं, त्यांत अनुभवाची भर घालूं, आपल्या दरिद्री देशाच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवूं.' असे यांच्या मनांतही येत नाही ! 'सरकारने जनतेच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केलाच पाहिजे' अशी वाक्ये झोकून देतात. परंतु उद्यां स्वराज्य आल्यावर एकदम कोठॅन येणार आहे पैसा? गरीब ना आहे आपला देश? आणि इतर देशांची लुटमार करुन तर आपणांस पैसा नाही ना आणावयाचा? आपला तर अहिंसक मार्ग. सारे देश स्वतंत्र असोत. कोणाची पिळवणूक नको. असे ना आपले म्हणणे? मग शिक्षणाचा प्रश्न कसा सुटेल. श्रमाची माहितीही पटेल. पांढरपेशे व श्रमणारे हे भेद जातील. संशोधक वृत्ती वाढेल. हिंसेची भावना कमी होईल. पोटाला धंदा मिळेल. वर्धा शिक्षण पध्दती म्हणजे 'वर-दा' वर देणारी आहे. महात्माजींची ही थोर देणगी आहे. राष्ट्राला हा वर आहे. मृत राष्ट्राला ही संजीवनी आहे. वसंता, वर्धा शिक्षण पध्दती म्हणजे काय याची तुला व तुझ्या मित्रांना थोडीफार कल्पना येईल अशी मला आशा आहे.तुझा श्याम