Nirbhaya - part- 18 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया - part -18

Featured Books
Categories
Share

निर्भया - part -18

                                     निर्भया - १८. 
       दीपाला कळून चुकलं, की शिल्पाला समजावण्याच्या भरात  तिला  कळू नये, अशी गोष्ट ती बोलून  गेली होती. जर शिल्पाला अर्धवट सत्य समजलं तर ती गैरसमज करून घेईल; "पण शिल्पा अजून लहान आहे. तिला या सगळ्या गुंतागुंतीचं आकलन होईल का? तसं असलं तरी आज अशी वेळ आली आहे की,  तिला सगळं  समजायलाच  हवं. मला  सुद्धा माझी बाजू मांडायला परत कधी संधी  मिळेल की नाही ; हे  सांगता येत नाही." दीपाचं हेलकावे घेत होतं.
शेवटी तिने शिल्पाला सगळं सांगायचा निर्णय घेतला.
      "राकेशबरोबर माझं लग्न ठरलं होतं. आमचं लग्न काही दिवसांवर आलेलं असताना  अशाच   एका  नववर्षाच्या  रात्री तो मला मलबार हिलवर निर्मनुष्य जागी घेऊन गेला, रात्रीची वेळ आणि भयाण शांतता बघून मी घाबरले आणि त्याला तिथून निघण्यासाठी आग्रह करू लागले.पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं; आणि मग पुढे  माझ्याबाबतीत  जे  झालं,  ते  आठवलं, की  अजूनही  माझ्या अंगावर काटा येतो. त्यानंतर मी अनेक दिवस हाॅस्पिटलमध्ये होते. त्यातून मी बरी झाले पण त्याच्याशी ठरलेलं  माझं लग्न त्याच्या आई - बाबांनी  मोडलं. " शिल्पा तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत आहे, हे पाहून ती पुढे बोलू लागली.
       " त्यानंतर  आम्ही लग्न करता आलं नाही तरी   चालेल पण आयुष्यभर एकमेकांशी   एकनिष्ठ   रहायचं  असं   ठरवलं.  त्यानंतर   मी  त्याच्या  घरी आठवडयातून एकदा जात असे. पण माझी  मनःस्थिती ठीक  होईपर्यंत मला स्पर्शही न करण्याची अट मी घातली होती. माझ्या मनात भाबडी आशा होती, की तो कधी ना कधी माझ्याशी लग्न करेल,आणि माझ्या कुटुंबाची गमावलेली प्रतिष्ठा  त्यांना परत मिळेल." ती पुढे  बोलू लागली,
     " हे काही दिवस चालले.  मधल्या काळात  मला बाहेर सगळीकडून जी अपमानास्पद वागणूक मिळत  होती,  त्यामुळे हळूहळू मी मनाने खचत होते. स्वतःला  संपवण्याचा  निर्णय  मी घेतला होता. तो निर्णय तडीस नेण्यासाठी वीषसुद्धा मिळवलं होतं. राकेशला शेवटचं भेटण्यासाठी मी त्याच्या घरी गेले. पण तिथे वेगळंच नाटक घडायचं होतं." दीपाची कहाणी ऐकण्यात शिल्पा रंगून गेली होती.आपल्या आईने भोगलेलं दुःख ऐकून तिचे डोळे भरून आले होते. तिने दीपाचा हात घट्ट धरला होता. 
"आई! तू काल एवढी का घाबरली होतीस हे आता कळतंय मला! पण तुझ्यावर अन्याय झाला होता, आणि तुला सहानुभूती न दाखवता लोक त्रास का देत होते?" तिने कुतूहलाने विचारले.
      "आपल्या समाजाची मानसिकता अशीच आहे बाळा! तर पुढे ऐक--! त्या दिवशी राकेशने तो नयना नावाच्या एका मुलीशी लग्न ठरत असल्याचं मला सांगितलं. याचं कारण म्हणून अत्यंत  हीन शब्दांत  माझ्या  गमावलेल्या  कौमार्याची आठवण करून दिली. त्याच्या बोलण्यातून त्या दिवशी मला कळलं की, माझ्याशी  ठरलेलं   लग्न मोडायचा  निर्णय  त्याच्या आईवडिलांनी त्याच्या संमतीनेच  घेतला  होता. मला  वाईट वाटलं पण  अशा  गोष्टींची  गेल्या  काही दिवसांमध्ये मला सवय झाली होती. पण  पुढे  तो  मला म्हणाला की नयनाशी जरी मी लग्न केलं, तरी आपले संबंध असेच रहातील, तू नंतर इथेच येऊन रहा, मी वेळ मिळेल तेव्हा तुला भेटायला येत जाईन; तेव्हा मात्र माझा राग अनावर झाला. त्याने मला फसवलंच होतं, पत्नीला फसवायचे इरादे लग्नाआधीच सुरू झाले होते.  कायदा त्याचं  काहीही  बिघडवू  शकत  नव्हता. हा माणूस नाही; राक्षस  आहे. हा जिवंत  रहाता  कामा  नये! हा   विचार  मनात  आला, आणि दुस-याच क्षणी मी माझ्या पर्समधून  विषाची  बाटली  काढून त्याच्या नकळत  सरबताच्या ग्लासात रिकामी केली; आणि ग्लास त्याच्या हातात दिला, तेव्हाच त्याच्या मित्राचा फोन आला,आणि ती संधी साधून मी तिथून निघाले. तो त्याचं आवडतं सरबत नक्की पिणार याची मला खात्री होती." आता मात्र शिल्पाच्या आसवांची जागा आश्चर्याने घेतली होती. तिचे  डोळे  विस्फारले होते. आपली आई हे करू शकते हे तिला पटत नव्हतं, हे  तिच्या  नजरेत  स्पष्ट दिसत होतं. शिल्पा पुढे बोलू लागली,
"नंतर मला माझ्या हातून घडलेल्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. पण घडून गेलेली गोष्ट दुरूस्त करता येणार नव्हती."
"तू  जे  काही  केलंस  ते  बरोबरच  केलंस आई!   ज्या  माणसामुळे   तुझं   आयुष्य  उध्वस्त   झालं त्याला कायदाही शिक्षा करू शकत नव्हता आणि इतके वाईट विचार. असणारा राकेश जगण्याच्या लायकीचाच नव्हता. मला  कळत  नाही;  तू त्याला विष  दिलंस याचा तुला नंतर पश्चात्ताप का झाला? "  शिल्पाने विचारलं. 
        " तू अजून लहान  आहेस. तुला  कर्मविपाक सिद्धांत  नाही  कळणार.  पण एकच गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक  चांगल्या- वाईट कर्माचे  बरं- वाईट फळ माणसाला  कधी  ना  कधी  मिळत  असतं;   हा   नियतीचा    नियम   आहे.  राकेशच्या वागण्याला कायद्यामध्ये शिक्षा  नव्हती;  पण नियतीकडून त्याला कधी  ना  कधी प्रायश्चित्त  मिळणारच  होतं.  कायदा हातात घेण्याचा हक्क मला नव्हता. ही मोठी चूक माझ्या  हातून रागाच्या भरात घडली. राग शांत झाल्यावर माझी चूक माझ्या लक्षात आली. पण तेव्हा वेळ निघून गेली होती." दीपाने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. ती पुढे बोलू लागली,
 "राकेशच्या आग्रहाखातर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य जागी जाण्याची एक चूक मला कुठे घेऊन  गेली; ते  तुझ्या  लक्षात  आलंच  असेल! यासाठी मुळातच शक्य तितकी काळजी घेणं आवश्यक आहे."
        "पण  आई! हे सगळे  निर्बंध आम्हा  मुलींनाच का? हा मुलींवर अन्याय नाही का?" अनेक दिवसांपासून मनात टोचत असलेला प्रश्न शिल्पाने विचारला.
" हे निर्बंध फक्त मुलींसाठी नाहीत. मुलांनीही हे नियम पाळणं आवश्यक आहे. त्यांचं जीवनही  तुमच्याइतकंच मौल्यवान आहे. समाजकंटकांकडून  त्यांनाही धोका असतोच! जे नियम तुला; तेच सिद्धेशसाठीही आहेत." दीपा तिला तिच्या मनातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत होती. ती पुढे बोलू लागली,
    " राकेशच्या मृत्यूचा तपास तुझे पप्पा करत होते. तेव्हाच आमची ओळख झाली.  त्यांनी मला या प्रकरणात प्रथम संशयीत ठरवलं होतं. माझी कसून चौकशी ते करत होते. पण  नितिनची  महत्वाची परीक्षा तेव्हा चालू होती. मी ठरवलं होतं की, त्याची परिक्षा संपल्यावर सुशांतना सगळं  सांगून  टाकायचं. पण नंतर त्यांची ट्रांसफर नाशिकला झाली.  मानेंकडून कळलं  की, राकेशने सगळे सेव्हिंग्ज  टाकून इन्व्हेस्ट  केलेले शेअर्स बुडाले आणि तो धक्का सहन   न झाल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला. मी ठेवलेलं सरबत  त्यानं  घेतलंच  नव्हतं. हे  कळलं, आणि  माझ्या  मनावरचं ओझं  उतरलं. आता  सुशांतना    या  विषयी  काही सांगायची गरज नाही असं मला वाटलं;  त्यामुळे तो विषय परत कधी त्यांच्याकडे काढला नाही.  पण  आज  मला  कळलं   की त्यांच्या करीअरमधील ही  एकच अशी केस होती, की  ते  सोडवू  शकले  नव्हते. ही   गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागलीय. दीपावरच्या प्रेमाखातर आपण आपल्या कामात हलगर्जीपणा केला की काय; ही खंत त्यांना आहे. माझ्यामुळे त्यांच्या मनात स्वतःच्या कर्तव्याविषयी अविश्वास असणं मला योग्य वाटत नाही.  मी आज त्यांना सर्व काही सांगून टाकणार आहे. दीपाच्या या बोलण्यावर शिल्पाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली,
" मी तुला सांगितलं नं! त्यांना तू काहीही सांगणार नाहीस. तू कोणताही गुन्हा केला नाहीस. उलट तूच जगाने तुझ्यावर केलेले अन्याय माफ केलेस. तू तर  घर  सोडायलाही  तयार झालीस पण मी बरी जावू देईन तुला! तू नसशील तर  हे  घर, घर रहाणार  नाही. कदाचित्  न्यायनिष्ठूर  होऊन  पप्पा  तुला  दूरही  करतील पण  त्यामुळे  मनातून  त्यांना आनंद होईल; असं  तुला  वाटतं कां?" दीपाशिवाय आपल्या  घराची   कल्पनाही  तिला   सहन   होत नव्हती. 
    "हे तू माझ्यावरच्या प्रेमापोटी बोलतेयस. पण अपराध  तर  माझ्या हातून घडला आहे! जो निर्णय तुझे पप्पा घेतील तो मला मान्य असेल....."
    तेवढ्यात सुशांतना आत येताना पाहून दिपा बोलताना थांबली.
 "शिल्पा, तुझ्या मैत्रीणीने - नेहाने तुला काॅलेजला जायसाठी तयार व्हायला सांगितलंय! जा!  पळ! लवकर तयार हो! ती दहा मिनिटात ती येणार आहे. आणि  घाबरू नको, तुझी आई  कुठेही   जाणार  नाही." सुशांत  आत   येत  म्हणाले. 
                                     ********         contd......  part - 19.